मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com
माझा इंदूरच्या दिवसांतला एक बालमित्र उपेंद्र खांडेकरचं (आम्हा मित्रांसाठी ‘उप्या’!) गेल्या महिन्यात अमेरिकेत निधन झालं. उप्या हा एक अतिशय हुशार विद्यार्थी होता. तो भारतात डॉक्टर झाला आणि १९७० च्या सुमारास अमेरिकेत गेला आणि तिथेच स्थायिक झाला. त्याने इंदूर सोडल्यानंतर आम्ही फक्त-दोनदा भेटलो होतो. पुस्तकं, संगीत आणि माणसं या गोष्टी आमच्या मैत्रीतला दुवा होत्या. आणि म्हणूनच तो अमेरिकेत गेल्यानंतरही आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिलो. आणि हे जरा विलक्षणच होतं. कारण जगाच्या दृष्टीनं उप्या हा अतिशय यशस्वी माणूस होता आणि त्यामानाने मी एक सामान्य माणूस होतो. अमेरिकन बोलीभाषेत बोलायचं झालं तर तो एक प्रदीर्घ ‘विनर’ आणि मी एक ‘लुजर’ होतो. तरीही आमची मैत्री अतूट राहिली. आणि ती टिकवून ठेवण्याचं सगळं श्रेय उप्यालाच जातं. आम्हा दोघांमध्ये असलेली ही सामाजिक तफावत त्याने कधीच आमच्या मैत्रीच्या आड येऊ दिली नाही. उप्याच्या जाण्यानं माझाच एक भाग गेला असं मला वाटतं.
गेली दोन दशकं उप्या कॅलिफोर्निया येथील ऑरंज काऊंटीमधल्या सांता अॅना या शहरात स्थायिक झाला होता. २०१६ साली त्याला असं समजलं की, तो ज्या शहरात राहत होता, त्याच शहरात सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी इंदूर संस्थानचे अखेरचे महाराज यशवंतराव होळकर यांनी बारा खोल्यांचा एक भव्य राजमहालासारखा बंगला बांधला होता. महाराजांची पहिली पत्नी संयोगिता (२२ व्या वर्षीच तिचं एका किरकोळ आजाराने स्वित्र्झलडमध्ये निधन झालं होतं.) हिच्यापासून झालेली प्रिन्सेस उषा (ही तेव्हा पाच वर्षांची होती.) आणि दुसरी पत्नी मार्गरिटा ब्रानयेन (ही अमेरिकन होती. त्यांनी तिच्याशी १९३८ मध्ये लग्न केलं होतं.) यांच्यासाठी ही भव्य वास्तू उभारली होती. त्यानंतर काही दिवसांनी उप्याने मला या भव्य बंगल्याबद्दल एका स्थानिक वर्तमानपत्रात आलेला एक लेख पाठवला. दरम्यान, या वास्तूला सांता अॅना शहरात पुरातन वारसा वास्तूचा दर्जा मिळाला होता. उत्तरादाखल मी माझ्या या मित्राला पुढील ई-मेल पाठवली.
ऑगस्ट ११, २०१६
प्रिय उप्या,
गेल्या आठवडय़ात सांता अॅनामधील होळकर बंगल्यासंबंधी जो लेख तू पाठवला होतास, तो मी काल वाचला. लेख अतिशय इंटरेस्टिंग आहे. होळकर घराण्यात अहिल्यादेवी होळकरांचा गौरवशाली अपवाद सोडला तर त्यांच्यानंतर बडोद्याचे सयाजीराव महाराज किंवा म्हैसूरचे जयचामराजा वाडियार यांच्यासारखा राजा झाला नाही, ही वस्तुस्थिती आपण मान्य करू. पण तरीही होळकर घराण्याची राजे मंडळी ही आपल्या आणि आपल्या वाडवडिलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग. आणि तसाही सरंजमशाहीचा मी कधीच समर्थक नव्हतो, हे तुला माहीत आहेच. आणि या एकमेव धाग्यामुळेच तू तो लेख मला पाठवलास आणि मी तुला आता उत्साहाने त्यास प्रतिसाद देत आहे. माझं हे ई-मेलरूपी पत्र नेहमीप्रमाणेच लांबलचक आणि बरंच नागमोडी वळणाचं असेल, forwarded is forwarded. तर हो आता सज्ज वाचण्यासाठी..
तू मला पाठवलेल्या लेखात प्रिन्सेस उषाराजे होळकरांचा वारंवार उल्लेख आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात : त्यांचे वय आज ८५ च्या आसपास असून, त्या अनेक वर्षांपासून दक्षिण मुंबईत राहतात. एम्पायर उद्योगसमूहाचे उद्योगपती सतीशचंद्र मल्होत्रा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. महाराजा यशवंतराव होळकर यांनी १९५० मध्ये स्थापन केलेल्या उषा ट्रस्टच्या त्या प्रमुख आहेत आणि त्या माध्यमातून त्या इंदूरच्या जनतेसाठी अनेक वर्षांपासून समाजसेवा आणि लोककल्याणाची कामं करत आल्या आहेत.
रिचर्ड (जन्म १९४५) हा युफेमिया स्टीवन्सन या यशवंतराव महाराजांना तिसऱ्या बायकोपासून झालेला मुलगा आहे. युफेमिया ही अमेरिकन होती. (आणि तुझ्यासारखीच पक्की कॅलिफोर्नियनदेखील!) लग्नानंतर काही वर्षांतच महाराजांनी तिला घटस्फोट दिला. तुला कदाचित आठवत असेल की, जेव्हा रिचर्डचा जन्म झाला तेव्हा होळकर संस्थानच्या सगळ्या शाळांमध्ये बुंदीचे लाडू वाटले होते. अर्थात आपल्या शाळेतही! त्याच्या जन्मानंतर साधारण चार-पाच वर्षांनंतर सुरुवातील होळकर स्टेट प्रेस आणि नंतर उषा ट्रस्ट हे दरवर्षी एक कॅलेंडर प्रसिद्ध करायचे. त्यावर तीन-चार वर्षांच्या छोटय़ा क्युट रिचर्डचा चुरीदार, शेरवानी आणि जरतारी टोपी घातलेला फोटो असायचा. त्यानंतर कधीतरी मग यशवंतराव महाराजांच्या फोटोने त्याची जागा घेतली. आणि त्यानंतर अतिशय स्पिरिच्युअल दिसणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांच्या हातात शिवलिंग घेतलेल्या फोटोने जागा घेतली, ती कायमचीच.
भारतात रिचर्ड हा ‘मॉडर्न महाराजा’ म्हणून ओळखला जातो. तो स्टॅनफर्ड विद्यापीठाचा पदवीधर आहे. रिचर्ड हा युरोप आणि अमेरिकेत सतत भ्रमंती करत असला तरी महेश्वर हे नेहमीच त्याचं मुख्य निवासस्थान राहिलं आहे. (महेश्वर इंदूरपासून ९० कि. मी. अंतरावर आहे. ती अहिल्यादेवींची राजधानी होती.) अहिल्या किल्ल्याचं त्याने अहिल्या फोर्ट हॉटेलमध्ये दिमाखदारपणे रूपांतर केलं असून ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रातदेखील तो एक यशस्वी व्यावसायिक म्हणून मानला जातो. पण माझ्यासारख्या लोकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने महेश्वरी साडय़ांचं पुनरुज्जीवन केलं आणि साडय़ा बनवणाऱ्या कारागिरांचं एक भक्कम जाळं तयार केलं. रिचर्डने ‘कुकिंग ऑफ महाराजा’ या नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे.
अहिल्याबाईंची किमान अर्धा डझन चरित्रं सध्या उपलब्ध आहेत. पण विनया खडपेकर या त्यांच्या एका चरित्र लेखिकेनं ‘ज्ञात-अज्ञात : अहिल्याबाई होळकर’ या पुस्तकात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि जीवनाचं खालीलप्रमाणे जे वर्णन केलं आहे ते केवळ विस्मयकारक आहे- ‘‘ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती, पण त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होतं आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचं रूप घेतले. तिच्या अनाक्रमक, धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरत खेडय़ांच्या मंदिरा- मंदिरांमधून घुमले. मात्र, ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकाच्या मराठय़ांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.’’
१७९५ साली त्यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षांतच अहिल्याबाईंची कीर्ती ग्रेट ब्रिटनमध्ये पोहोचली. ज्या साहेब मंडळींनी त्यांना लंडनमध्ये प्रसिद्धी दिली, त्यात मुख्य होता सर जॉन माल्कम. (१७६९-१८३३) सर जॉन हा स्कॉटिश योद्धा, राजकारणी आणि इतिहासकार असून, तो शेवटी भारताचा गव्हर्नर झाला. त्याची परिचित तत्कालीन स्कॉटिश कवयित्री आणि नाटककार जोआना बेली (१७६२-१८५१) हिने अहिल्याबाईंवर एक स्तुतिपर कविता लिहिली. त्या कवितेचं अखेरचं कडवं असं आहे..
in the letter days from Brahma came,
To rule our land, a noble dame,
Kind was her heart and bright her frame
And Ahilya was her honoured name
आता थोडं आपल्या प्राथमिक शाळेबद्दल..
आपल्या शाळेचं सरकारी नाव जरी ‘भोई मोहोल्ला शाळा क्रमांक चार’ असं होतं, तरी सर्वसाधारणपणे ती ‘चणेखाऊ बुढय़ाची शाळा’ म्हणून ओळखली जात होती. याचं कारण म्हणजे आपले हेडमास्तर क्षीरसागर हे वयाच्या मानाने खूपच जास्त म्हातारे दिसत. त्यांना सतत चण्याचा (फुटाणे) खुराक लागायचा. तसेच त्यांचे डेप्युटी महाशब्दे हे सर्वत्र ‘शेवखाऊ बुड्ढा’ म्हणून ओळखले जायचे. त्यांना मध्यंतरात शेव आणि दही एका द्रोणात आणून देण्याची जबाबदारी त्यांच्या वर्गात सतत नापास होणाऱ्या जगदाळे या मुलाची होती. आता आपल्या शाळेतील ‘स्टार’ शिक्षक कोळंबेकरांबद्दल जरा विस्ताराने..
इयत्ता पहिलीत आमचे मास्तर होते कोळंबेकर सर. त्यांच्याबद्दल तुला माहिती नसणार. He was the finest and the most lovable teacher I ever had in my life. लतादीदींचा जन्म गाण्यासाठी, सचिनचा जन्म क्रिकेट खेळण्यासाठी झाला असं आपण म्हणतो. तसंच आमच्या कोळंबेकर सरांचा जन्म लहान मुलांना शिकवण्यासाठीच झाला होता असं म्हणावं लागेल. पाचएक फूट उंचीची ही वामनमूर्ती जणू चार्ली चॅप्लीनचा मराठी अवतार होता. ते नेहमी मातकट रंगाचा एक लांबच लांब कोट घालत आणि त्यावर मोठमोठे चौकोन असायचे. त्यामुळे सर होते त्यापेक्षा जास्तच बुटके वाटायचे. आता एक ढगळ पायजमा आणि मेणचट बालदार टोपी घातलेली आणि नाना फडणवीस स्टाईलचं निरुंद, कपाळावर गंध लावलेली व्यक्ती डोळ्यासमोर आण. ते आमचे सर. आणि याहून जास्त गमतीशीर त्यांचा कथ्थकसदृश नाच असे. (हो.. सर बऱ्याच वेळा गाताना नाचायचे.) गाऊन, नाचून कविता शिकवणारी त्यांची ती वामनमूर्ती मी कधीच विसरू शकणार नाही. ते एक ओळ गायचे. मग सर्व वर्ग ती ओळ गायचा. त्यातल्या मला अजूनही आठवणाऱ्या एका कवितेचा एक भाग असा होता..
‘छान आमुचा फळा फुलांचा
बागबगीच्या पाहूनी
आनंदाने कुणा जनांचे
जाईना मन मोहूनी
कल्लेवाला माळी काळा
मोटेवरती बैसूनी..’
(नंतर जेव्हा मी भारतीय शास्त्रीय संगीताचे राग ओळखू लागलो तेव्हा मला जाणवलं की ही कविता भीमपलास रागात आहे.)
भारताला स्वातंत्र्य मिळायला साधारण एक-दोन र्वष होती. त्यावेळी आम्हाला जी सकाळची प्रार्थना गावी लागे ती होळकर घराण्याच्या गौरवगाथेने भरलेली असे. आता मला त्या प्रार्थनेची एकच ओळ आठवते आहे. ती अशी : ‘‘देवा आमुच्या महाराजांच्या राखी विजयी भाल्याला’’ सर ही प्रार्थना मार्चिग टय़ूनसारखी गायचे आणि एखाद्या बँड मास्टरसारखी कंडक्ट करून आमच्याकडून म्हणून घ्यायचे.
ही मेल माझ्या नेहमीच्या स्टँडर्डनेसुद्धा खूपच लांबली.
I hope you will take it in the “What is a long letter between two old Friends” spirit
तुझा जुना दोस्त..
– मनोहर
जाता जाता : अहिल्याबाई होळकरांच्या गौरवपूर्ण संदर्भामुळे माझा मित्र सोपान अतिशय खूश झाला आणि त्यांच्या इतिहासातील स्थानाबद्दल भाष्य करत तो म्हणाला, ‘‘अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा / पंचकन्या स्मरे नित्य महापातकनाशम’ हा लोकप्रिय श्लोक आपल्या सर्वाना माहिती आहेच. तर माझ्या मनात विचार आला तो असा की, या श्लोकातल्या पाचही कन्या पुराणातील आहेत. आणि अहिल्याबाई होळकर या इहलोकातल्या असल्या तरी त्या निश्चितपणे त्यांच्याइतक्याच प्रात:स्मरणीय आहेत.’’ यावर मी म्हणाला, ‘‘For a change, I agree with you whole heartedly, Sopan..’’