दूरदर्शनवरची सेंचुरी प्लायची जाहिरात माझ्या मनात नवी आंदोलने निर्माण करते. जेवणाच्या टेबलावर गप्पा-मस्करीमध्ये रंगलेले कुटुंब.. आणि नानाचा आवाज.. टेबलाचे कौतुक करणारा.. टेबलावर तबल्याचा ठेका धरून त्याला ‘आनंदाचा रंगमंच’ म्हणणारा..
तुमच्या- आमच्या प्रत्येकाच्या घरात असे आनंदाचे रंगमंच असतात. कधी ते टेबलाचे रूप घेतात, कधी सोफ्याचे, कधी शिवणयंत्राचे, तर कधी कोपऱ्यात वर्षांनुवष्रे विनातक्रार उभे असलेल्या, पारा उडालेल्या, आरसा लावलेल्या लोखंडी कपाटाचे. कधी एखादी पिढीजात चालत आलेली सणसणीत लाकडी पेटी असते, तर कधी माळ्यावर चढण्यासाठी तयार केलेले लाकडाचे स्टुल असते. या साऱ्या गोष्टी निर्जीव असतात. लाकडा-लोखंडाच्या बनलेल्या असतात. त्यांना स्वत:चे वेगळे अस्तित्व नसते. पण त्या आपल्या अस्तित्वाचा एक भाग बनून राहिलेल्या असतात. घरात आणि मनात त्यांचे एक भक्कम स्थान असते. Materials management च्या भाषेत त्यांची वर्गवारी Dead stock Register मध्ये जरी झाली तरी या वस्तू Dead नसतात. त्यांचे श्वास आपल्यात गुंतलेले असतात. माळ्यावर चढावयाच्या स्टुलावरून पडल्यावर आपला हात मोडला की स्टुलही गहिवरते. त्याची चूक नसते; ते फक्त निमित्तमात्र असते. म्हणूनच आपण त्याला फेकत नाही. जेवणाच्या टेबलाने आपले उष्टावण पाहिलेले असते. आपल्याला धड जेवता येत नाही तेव्हापासून आपण सांडवलेल्या घासांना त्याने रांगोळी म्हणून वागविलेले असते. गरम वाफाळलेला चहा आपल्याला मिळावा म्हणून कढत कपाचे चटके सहन केलेले असतात. खरखरीत टॉवेलने आपले सर्वाग पुसून घेतलेले असते. ३० वर्षांपूर्वी आपले पाटी-दप्तर त्याच्यावर फेकून आपण खेळायला पळालेले असतो. आज ऑफिसमधून आल्याक्षणी आपण आपला लॅपटॉप त्याच्यावर ठेवतो. या जेवणाच्या टेबलाने घरातील औपचारिक-अनौपचारिक मीटिंग्ज अटेंड केलेल्या असतात. त्याचा घरादाराला मोठा आधार असतो. त्याच्यावर सांडवळ झाली तरी त्याची तक्रार नसते. टेबल घरातील माणसे एकत्र बसली की मनात हरखते. आणि कधी भांडय़ाला भांडे लागून वेगवेगळ्या खोलीत डिश मांडीवर ठेवून जेवली की हिरमुसते. टेबल हे एकत्र येण्याचे साधन बनते. प्रेमाचे, आपुलकीचे माध्यम ठरते.
कोपऱ्यात वर्षांनुवष्रे उभे असलेले कपाट म्हणजे तर तटस्थता आणि स्थितप्रज्ञतेचा अद्भुत नमुनाच. घरातली चिडचीड..आनंद.. सण.. दुख.. या साऱ्या गोष्टींकडे ते पाहत राहते. घरातल्या माणसांच्या भावभावनांचे प्रतििबब त्याच्याच दरवाजाच्या बिलोरी आरशात पडते. पारा उडतो, गंज चढतो; पण कपाटाची चौकट मात्र भक्कमपणे उभी असते. कधी घर रंगवण्यासाठी काढलेच तर कपाट थोडेसे पुढे ओढून मागची बाजू रंगविली जाते. आणि कधी कधी तर ‘काय करायचेय एवढा द्राविडी प्राणायाम करून?’असा सार्वत्रिक निर्णय झाल्यामुळे नवी निळी िभत पूर्वी पिवळी होती याची साक्ष देणारा एक चौकोन तेवढा कपाटामागे शिल्लक राहतो. कपाटाने खूप काही जपलेले असते. गहाणखत, अॅग्रीमेंट पेपर्स, एलआयसीच्या पॉलिसीज्, पणजीच्या पाटल्या, आईचा हार हे सारे काही सांभाळलेले असते. कपाटाच्या दरवाजांना वर्षां-वर्षांत तेलपाणी मिळत नाही. पण त्याची तक्रार नसते.
खरे तर हे सारेच घरातले आनंदाचे रंगमंच असतात. त्यांची खरेदी मोठय़ा विचाराअंती, प-पशाची जमवाजमव करून झालेली असते. ‘Off the shelf’ खरेदी करण्याचा तो काळ नव्हे. गणपती- दसरा- दिवाळीला त्यांचा गृहप्रवेश झालेला असतो. शेजाऱ्यांना खास आमंत्रण देऊन त्यांना दाखविले गेलेले असते. घरात एक नवा मेंबर आल्याचे ते क्षण असतात. पुढे आपण त्यांना गृहीत धरू लागतो. त्यांचे असणे आपल्या अस्तित्वाला आकार देते. पण या निर्जीव वस्तूंच्या अणुरेणूतही माया आहे, हे मात्र आपण विसरतो. घरातली सदस्यसंख्या वाढली की मग त्यांच्या भक्कमतेची अडगळ होऊ लागते. हॉल मग आपले पाय गॅलरीमध्ये पसरतो आणि कपाटाची रवानगी गॅलरीच्या एका कोपऱ्यात होते. कपाट कुरकुरत नाही. घरातले दुडदुडते नवे सदस्य त्याच्याच आधाराने पहिल्यांदा दोन पायांवर उभे राहतात. कपाट मनोमन सुखावते आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे हास्य आपल्या आरशात पाहते.
आताशा मात्र मला भीती वाटते. आता या सगळ्याच गोष्टी अधिक दर्शनीय आणि कमी टिकाऊ हव्यात. कारण आम्ही दर पाच वर्षांनी त्या बदलू इच्छितो. जुन्या सोफ्याची जागा लाऊंजर घेतो. ताठ कण्याची खुर्ची जाऊन बिनबॅग ऐसपस अजागळपणे येऊन बसते. काऊच पोटॅटो होऊन पोटॅटो वेफर्स खाताना आम्ही मॉडर्न होतो. लोखंडी कपाटाला लाकडी लॅमिनेटेड दरवाजे झाकून टाकतात. आमच्या नव्या घरात ते आजोबांचे ‘गोदरेज’ आम्हाला ‘काँटेम्पररी मॅच’ वाटत नाही. कपाट स्वत:ला झाकून घेते. आता त्याला घरातल्या घडामोडी दिसत नाहीत; फक्त ऐकू येतात. आणि त्याचे उसासे घरातल्यांपर्यंत पोहोचत नाहीत. आता प-पसा जमविण्याचे प्लॅिनग होत नाही. फक्त फíनचर लोनच्या हप्त्यांचा हिशेब होतो.
..नानाची प्लायची जाहिरात आणि त्याचा तबल्याचा ठेका मला आत खोलवर स्पर्श करून जातो. मी जेवणाच्या टेबलावर कृतज्ञतेने हात ठेवतो.. तेवढय़ात जाहिरात बदलते आणि गॉगल घालून पसे मोजत घरातले सामान सेलफोनवर सेल केल्याचा आनंद साजरा करत घरात फेर धरणाऱ्या तिघीजणी Quickr चा शंखनाद करत माझे डोके बधिर करतात.. जमाना OLX चा आहे. मी सुन्न होतो.
आनंदाचा रंगमंच
दूरदर्शनवरची सेंचुरी प्लायची जाहिरात माझ्या मनात नवी आंदोलने निर्माण करते. जेवणाच्या टेबलावर गप्पा-मस्करीमध्ये रंगलेले कुटुंब..
First published on: 07-12-2014 at 12:54 IST
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home decoration stage of happiness