हाँगकाँगकडे जगभरातल्या पर्यटकांचे पाऊल वळले नाही तरच नवल, इतक्या सोयीसुविधा आणि विकासाचे जाणीवपूर्वक प्रयत्न येथे होताना दिसतात. पर्यटकांसाठी देवभूमी असलेल्या हाँगकाँगचा हा सफरनामा!
‘भ न्नाटच!’
हॉंगकॉंगहून परतीच्या साडेपाच तासांच्या प्रवासात मनात रेंगाळणारी ही प्रतिक्रिया मायभूमीत पाय ठेवताच आपसूक ओठांवर आली. भारताचा शेजारी असलेल्या चीनच्या दक्षिण टोकावरील हॉंगकॉंगमध्ये घालवलेले ते चार दिवस आचारविचार स्वातंत्र्यासह सैन्यातील शिस्तीचा प्रत्यय देणारे ठरले. हाँगकाँग म्हणजे चीनमधील एक शहर आणि जागतिक आर्थिक केंद्र एवढेच त्याआधी माहिती होते. मात्र, या हाँगकाँग दौऱ्यात जागतिक आर्थिक केंद्राच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी मुंबईला आणखी कितीतरी काळ जावा लागेल, ही जाणीव प्रकर्षांने झाली.
भारत आणि हाँगकाँग यांच्यात एक साम्य आहे. ते म्हणजे या दोन्ही देशांवर ब्रिटिशांनी तब्बल दीडशे वर्षे राज्य केलं. भारतानं स्वातंत्र्याची सहा दशकं साजरी केली असली तरी चीनच्या या दक्षिण भागावर अगदी काल-परवापर्यंत ब्रिटिशांची सत्ता होती. अगदी आपल्याकडे आर्थिक उदारीकरणाला सुरुवात होऊन एका पंचवार्षिक योजनेचा कालावधी पार पडला होता तेव्हा.. १९९७ साली ब्रिटिशांनी हाँगकाँगवरील आपला हक्क सोडला. ब्रिटिशांनी तिथली सत्ता सोडल्यानंतरसुद्धा या शहराचा झालेला नेत्रदीपक विकास आज त्याला जागतिक आर्थिक केंद्रांच्या यादीत अग्रक्रमी राखून आहे.
हाँगकाँग हा चीनचा दक्षिणी भूभाग. तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला. पर्ल नदीच्या काठावरचा. नदीच्या एका किनाऱ्यावर मकाऊ, तर दुसऱ्या बाजूला हे शहर. २०० छोटय़ा-मोठय़ा वस्ती- बेटांचं हे शहर. पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायनाचा विशेष प्रशासकीय विभाग येथे आहे. १,१०४ चौ. कि. मी. क्षेत्रफळाचा हा प्रदेश. त्यात ५० चौ. कि. मी.चा पाण्याचाही समावेश. बेटाचा केवळ २५ टक्के भाग विकसित करण्यात आला आहे, तर तब्बल ४० टक्के भागावर बगीचे आणि अन्य नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन केलं गेलेलं आहे. शहरात सध्या रस्ते, उड्डाणपूल यांचं काम जोरात चाललेलं आहे. पण तेही नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी न करता. विशेष म्हणजे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण न करता. म्हणूनच हाँगकाँग ते चीनची राजधानी बीजिंग यांना थेट जोडणाऱ्या जलद रेल्वेसाठी इथं सुरू असलेलं खोदकाम शहरात वाहन चालवताना अडथळे निर्माण करत नाही. ताशी २०० कि. मी. वेगाने धावणारी रेल्वे येत्या दोन वर्षांत या मार्गावर सुरू होईल, अशी माहिती हाँगकाँग पर्यटन महामंडळाचा मार्गदर्शक फ्रेड शेन्ग यानं दिली.
हाँगकाँगची लोकसंख्या ७२ लाख. पैकी ९४ टक्के चिनी. येथे प्रामुख्याने कॅन्टोनीज भाषाच बोलली जाते. कॅन्टॉन नावाचा प्रदेश या भागात आहे. आता तो ‘गुआन्गडॉन्ग’ नावाने ओळखला जातो. येथेही कम्युनिस्टांची तीन दशकं सत्ता होती. पहिल्या महायुद्धाच्या काळात हाँगकाँगमध्ये ब्रिटिश वसाहती स्थापन झाल्या. या शहरापाठोपाठ परिसरातील नोलून पेनिनसुला, न्यू टेरिटरीज्मध्येही ब्रिटिशांनी पाय पसरले. तर दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या लष्करी हालचाली इथे सुरू होत्या. मात्र, अखेपर्यंत ब्रिटिशांचीच येथे सत्ता राहिली. १ जुलै १९९७ रोजी हाँगकाँगमधून ब्रिटिशांनी मायदेशी माघारी जाताना या भूभागाला विशेष प्रशासकीय विभागाचा दर्जा दिला. (जगप्रसिद्ध मकाऊ हेही हा दर्जा प्राप्त झालेले चीनमधले दुसरे शहर.)
चीनला तिथले सर्व ‘मेन लॅण्ड’ म्हणतात. एकाच देशाचे नागरिक असले तरी या दोन प्रदेशांतील रहिवाशांना एकमेकांच्या भागात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसासारखी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. या दोन भागांतील राजकीय तसेच न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे. इथले १,२०० सदस्य हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड करतात. आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच येथील जीवनमानही उंचावले आहे. अर्थात मानवी विकास निर्देशांकाबरोबरच इथे भ्रष्टाचाराचा आलेखही चढताच आहे. न्यूयॉर्क (अमेरिका), लंडन (ब्रिटन) नंतर हाँगकाँगची तिसरे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून ओळख आहे. शहरात फिरताना चिनीपेक्षा ब्रिटिश वातावरणाचाच इथे जास्त प्रत्यय येतो. ‘क्राऊन कॉलनी’ आणि ‘सिटी ऑफ व्हिक्टोरिया’ हे दोन वर्षांत त्यांनी प्रत्यक्षात आणले.
‘हाँगकाँग डॉलर’ हे येथील चलन जगातील आठवे महागडे चलन आहे. एका हाँगकाँग डॉलरसाठी आठ भारतीय रुपये मोजावे लागतात. वेळेच्या बाबतीतही हे शहर भारताच्या अडीच तास पुढे आहे. आशियातील प्रसिद्ध हँग सँग निर्देशांकासाठी ओळखला जाणारा इथला ‘हाँगकाँग स्टॉक एक्स्चेन्ज’ हा जगातील सातव्या क्रमांकाचा मोठा शेअर बाजार आहे. कंपन्या ज्या प्राथमिक भागविक्रीतून निधी उभारतात, ती ‘आयपीओ’ प्रक्रिया पार पाडणारे हे जगातील सर्वात मोठे शहर आहे. हाँगकाँगला त्याची वित्तीय शहर म्हणून मिळालेली ओळख ही ९० च्या दशकातली.. म्हणजेच ब्रिटिशांच्या अखत्यारीत असतानाची. हॉंगकॉंगचा आजचा विकास हा ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली झालेल्या विकासाची पुढची पायरी आहे. त्याची गती आता आणखीनच वाढली आहे.
जागतिक आर्थिक केंद्राच्या जोरावर आणि पर्यटनाच्या चलतीवर वाटचाल करणाऱ्या या भूभागाला खाद्यान्न आदींसाठी मोठय़ा प्रमाणात आयातीवरच अवलंबून राहावे लागते. भारत, श्रीलंकेसारख्या देशांतून हॉंगकॉंग माशांची आयात करतो. माशांसह समुद्री खाद्यान्नावर गुजराण करणारा हॉंगकॉंग त्याचा पुरेपूर आस्वाद घेतो. चीन, जपान, अमेरिका हे अन्य सेवांबाबत त्याची मोठी निर्यात बाजारपेठ आहे. बेरोजगारी, उपासमार, गरिबी इथं औषधालाही नाही. इथलं चलन (भारताच्या तुलनेत) महागडं असल्यानं इथल्या मातीलाही मोल आहे. श्रीमंतवर्ग वगळता इतरांना निवासाकरिता इथं सरकारी मदत दिली जाते. इथं तुरळक भारतीय दिसतात. तेही व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने आलेले. ब्रिटिशांच्या काळापासून इथं भारतीय असल्याचं सांगितलं जातं. ब्रिटिशांना त्यांच्या सैन्यदलासाठी मनुष्यबळ लागे. त्यासाठी चिनी माणसं तयार नसत. त्यामुळे मग भारतीयांना इथं सैन्यात दाखल करून घेतलं गेलं. त्यातील अनेकजण इथेच स्थायिक झाले. आता त्यांची चौथी पिढी इथली नागरिक आहे.
ब्रिटिशांकडून हाँगकाँगचे चीनला हस्तांतरण झाले तेव्हा त्याच्यावर दुहेरी संकट कोसळलं. आशियाई वित्तीय संकट आणि ‘एच ५- एन १’ इन्फ्लुएन्झाचीही साथ आली. २००३ मध्ये तर सार्स हा जंतुसंसर्गही मोठय़ा प्रमाणात झाला. त्यात ३०० जणांची जीवितहानी तसेच ३८ कोटी हाँगकाँग डॉलर्सची आर्थिक हानी सोसावी लागली. सागरी खाद्यान्नातून पसरलेल्या या विषाणूंची इथं अजूनही इतकी दहशत आहे, की विमानतळावर नाका-तोंडाला फडकी बांधलेली माणसं आजही दिसतात. आजही इथल्या उपाहारगृहांतून काटेकोर स्वच्छता पाळली जाते. इथलं आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे लोकांचं चहाचं प्रचंड वेड. अर्थात ब्लॅक टीचं! जेवताना घासाला पाण्याचा घोट घ्यावा तसा इथं चहा रिचवला जातो.
अगदी चालतही अख्खं शहर पालथं घालता येईल एवढा हाँगकाँगचा परिसर आहे. वाहतूक व्यवस्थाही इथल्या अत्याधुनिकतेला साजेशी. डोंगराळ भागातही जल, रेल्वे, ट्राम आणि रस्ते वाहतुकीच्या सुविधा आहेत. त्यांचे दरही तुलनेने माफक. शहरात खूप नवी बांधकामे सुरू आहेत. इथल्या अनेक भव्य वास्तूंखालून जाताना त्या जणू आपल्या अंगावर आल्यासारख्या वाटतात. लोक प्रवासासाठी बस, ट्राम, रेल्वे, फेरी बोटींसारख्या सार्वजनिक व्यवस्थेचा ९० टक्के वापर करतात.
हाँगकाँग म्हणजे फ्रॅग्नन्ट हार्बर.. सुगंधी खाडी! या खाडीवरील मच्छिमारांशी ब्रिटिशांचा सर्वप्रथम संबंध आला आणि त्यांनी इथे व्यापार सुरू केला. हाँगकाँगच्या उत्तरेला नोलून हे शहर आहे. तिथून ब्रिटिशांच्या कारभाराला प्रथम सुरुवात झाली. ‘हॉंगकॉंग’ हे शहराचे नाव असले तरी ते लिहिण्यात भिन्नता आढळते. ‘हाँगकाँग’ हा एकत्र शब्द १९२६ पासून आजतागायत सरकारी कागदपत्रांमध्ये वापरला जातो. तर नव्या आर्थिक व्यवहारांत तो स्वतंत्र लिहिला जातो. येथे आणखी एक भाषा बोलली जाते, ती म्हणजे मॅन्डरिन. ती चीनची मुख्य भाषा आहे.
इथं स्वयंशिस्तीचा आदर्श पदोपदी प्रत्ययाला येतो. डस्टबिन तर दर ५० फुटाला आढळते. धूम्रपानावर जरी इथं बंधन नाही, तरीही सिगारेटची थोटकं आणि राख झटकण्यावर इथं लोकांनी स्वत:हून मर्यादा घालून घेतल्याचं दिसतं. रस्त्यात येणाऱ्या-जाणाऱ्याला अडचण होणार नाही अशा तऱ्हेनं इमारतीच्या आडोशाला उभं राहून लोक धूम्रपान करतात. वाहतुकीबाबतही तेच. रस्त्यावर मोटारींच्या हॉर्नचा कर्णकर्कश्श आवाज सहसा ऐकू येत नाही. सार्वजनिक वाहनातील प्रवासात तिकीट चुकवेगिरीचा प्रश्नच नाही, कारण स्मार्ट कार्ड पंच केल्याशिवाय तुम्ही वाहनात चढूच शकत नाही. जागोजागी तुम्हाला सिग्नल दिसतील, पण तो तोडणारे कुणी आढळत नाही. मग ती एखादी निर्जन गल्ली असो वा रात्रीची वेळ असो.
नोलून या शहरातील गेलॉर्ड आणि हॉलीवूड रोडवरील ‘जशान’ या अस्सल भारतीय हॉटेलमध्ये देशी खानपानाबरोबरच वातावरणही त्याला साजेसेच होते. गेलॉर्डमध्ये तर सायंकाळ झाली की कलाकारांच्या गाण्यांची लाइव्ह मैफल सुरू होते. येथे भारतीय खान्याबरोबरच अन्य देशांतील वैशिष्टय़पूर्ण ‘दावत’ची साखळी हॉटेल्स यशस्वीरीत्या चालविणाऱ्या मूळ भारतीय पंजाबी असलेल्या उद्योजकाचे भारतीय सेवासुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष असल्याचे जाणवले.
जेवढय़ा देशांच्या सीमा (भारत-पाकिस्तानसह १४ देशांच्या सीमा) चीनला खेटलेल्या आहेत, त्याहून अधिक या देशाचे सीमावाद आहेत. चीनमध्ये कम्युनिस्टांची हुकूमशाही सत्ता असली तरी हाँगकाँगमध्ये मात्र आर्थिक स्वातंत्र्य आहे. इथे चिनी संस्कृती रुजलेली असली तरी इथल्या व्यवहारात मात्र ब्रिटिश रीतिरिवाज मुरलेलं असल्याचं सतत जाणवतं. ‘सॉरी’ आणि ‘थँक्स’सारखे शब्द इथे पदोपदी उच्चारले जातात. लोकांची वर्तणूकही शिस्तबद्ध. वृत्तीही सोशीक. सगळेजण आपापल्या कामांत व्यग्र असले तरी त्यांच्याशी आपला संबंध आला की मानवी स्वभावगुण कळतातच. त्यांच्या कामांतला, वागण्यातला ‘परफेक्टनेस’ लक्ष वेधून घेतो. जागतिक आर्थिक केंद्र असल्याने मुंबईप्रमाणेच घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारे इथले लोक. स्वत:ला एक शिस्त लावून घेतलेले. चीनमधील सोशल साइट्सवरील बंधनं इथं नाहीत. इथल्या तज्ज्ञांनी शोधलेल्या सॉफ्टवेअरमुळे स्वभाषेतील लिपी स्मार्टफोनवर टीनएजर्सच्या वापरात दिसते. आम्ही हॉंगकॉंगला निघालो त्याच्या आदल्या रात्री जवळच्याच साय व्ॉन हो परिसरात मिन्ग पाओ दैनिकाच्या माजी संपादकांवर प्राणघातक हल्ला झाला होता. ‘माध्यम स्वातंत्र्यावरील तो हल्ला होता..’ या आम्हाला मिळालेल्या माहितीनेच इथल्या खऱ्या स्वातंत्र्याची ओळख पटली..
न टाळण्याजोगी ठिकाणं
ची लिन ननरी : इसवी सन पूर्व ६०० ते ९०० मधल्या काळानुरूप ९० च्या दशकात पुनर्रचना करण्यात आलेल्या या परिसरात बुद्धाचं संपूर्ण लाकडी बनावटीचं मंदिर आहे. इथला एकेक खांब हा एकेका झाडाचा बुंधाच आहे. ३५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळातील या मंदिर परिसरात एक बगीचाही आहे. त्यात चहाचं एक विशेष दालन आहे. तिथे चहाचा इतिहास कथन केला जातो.
द पीक : हाँगकाँग बेटाचा हा समुद्रसपाटीपासून ४२८ मीटर उंचीवरील भाग. व्हिक्टोरिया हार्बरच्या आर्थिक कंपन्या आणि बँकांच्या टोलेगंज इमारतींच्या मागील हा परिसर. इथे जायला दर दहा मिनिटाला एक ट्रेन आहे. तिचं भाडं येऊन-जाऊन ४० स्थानिक डॉलर आहे. वर गेल्यावर संपूर्ण शहर ३६० अंशांत टिपण्याची नामी संधी आपल्याला मिळते. इथल्या मादाम तुसॉं म्युझियममध्ये १०० हून अधिक जागतिक सेलिब्रेटींचे मेणाचे पुतळे आहेत.
लेडीज मार्केट : इथे खरेदीसाठी तुम्हाला खूप घासाघीस करावी लागते. इथले छोटे दुकानदार चिनी वस्तूंबरोबरच भाषेच्या अडचणीमुळे कॅल्सी घेऊनच बसलेले आढळतात. साधी मोबाइलसाठीची लाकडी की-चेन त्यांच्यासाठी दहा डॉलरची असली तरी आपल्यासाठी ती जवळपास शंभरची नोट असते. जवळच्याच गल्ल्यांमध्ये आपल्याकडच्या चायनीज गाडय़ांप्रमाणे सी-फूड विक्री दालने आढळतात. छोटय़ा पाण्याच्या टाक्यांमध्ये जिवंत सागरी जीव आणि शेजारी विजेरी चूल असते. त्यापैकी आपल्याला हव्या असलेल्याकडे बोट दाखवायचं, की काही मिनिटांतच ते कढईतून थेट आपल्या ताटात येतं.
हार्बर सिटी : देशी-विदेशी ब्रॅण्ड्सची८००० दालनं असलेलं सर्वात मोठं शॉपिंग मॉल इथं आहे. इथं पूर्वी नौदलाचं मुख्यालय होतं. अगदी समुद्रकिनाऱ्यापर्यंत पूर्वी येणाऱ्या रेल्वेचं क्लॉक टॉवरही इथं आढळतं. बाजूला विवाह नोंदणी कार्यालय, सांस्कृतिक भवन वगैरेही आहेत. महाकाय प्रवासी जहाजे धक्क्याला लागण्याचं ठिकाणही जवळच आहे. काहीशा मागच्या बाजूला असलेल्या ११८ मजली आयसीसी टॉवरवरून समोरच्या व्हिक्टोरिया हार्बरवर लेझर टाकले जातात. हार्बर सिटीतून व्हिक्टोरिया हार्बरला जाण्यासाठी रेल्वे व रस्ता मार्ग- तोही समुद्राखालून ५० मीटर खोल आहे.
कराटेमुळे ब्रुस ली साऱ्या जगात ओळखला जातो. तो मूळचा इथलाच. व्हिक्टोरिया हार्बरसमोरील सिम शा सुई येथे त्याचा अ‍ॅक्शन पुतळा बघायला मिळतो. ब्रुस लीचा शाळासोबती असलेले आणि विंग चून कूंग फूचे व्यवस्थापकीय संचालक सॅम के. एस. लाऊ यांनी आपल्या यिप मॅन गुरूच्या मार्शल आर्ट प्रसारासाठी इथं प्रशिक्षण संस्था उघडली आहे. ब्रोकर, ट्रॅव्हलर अशा भूमिकेतल्या साठीच्या लाऊ यांची ‘कला’ पाहून आम्हालाही दोन हात करायची सुरसुरी आली.
व्हिक्टोरिया हार्बर : हाँगकाँग म्हटलं की ट्रॅव्हल कंपन्यांच्या ब्राऊझरवर झळकणाऱ्या उंच इमारती याच व्हिक्टोरिया हार्बरच्या काठावरच्या. फोटोसाठी लहानग्यांनी दाटीवाटीने पोझ द्यावी तशा त्या उभ्या आहेत. दररोज संध्याकाळी १३ मिनिटं चालणाऱ्या त्यावरील लेझर शोनं गिनीज बुकात नाव नोंदवलं आहे. किनाऱ्यावर हाँगकाँग शांघाय बँक कॉर्पोरेशन, बँक ऑफ चायना, बँक ऑफ अमेरिका, मेरिल लिन्च, एआयजी अशा सर्व मातब्बर वित्तसंस्थांची मुख्यालये आहेत. मागच्या बाजूला हचिसनची टोलेगंज इमारत आहे. तिच्या सर्वात वरच्या मजल्यावरील अध्यक्ष लींच्या अपार्टमेंटकडे शहरवासीयांच्या जाता-येता नजरा वळतातच. थोडं पुढं गेलं की हॉलीवूड रोड आणि ब्रिटिश वातावरणाचा परिसर. चढउतारांच्या गल्ल्यांमध्ये हातात दारूचा ग्लास व सिगारेट ओढताना कोटय़वधींचे ‘मर्जर अ‍ॅण्ड अ‍ॅक्विजिशन डील’पासून मित्र-नातेवाईकांच्या भेटीगाठीपर्यंत इथं अनेक व्यवहार पार पडतात.
ओशियन पार्क : गुहेतून जाताना डोक्यावरून भलंमोठं कासव जातंय.. जेवणाच्या टेबलाजवळ महाकाय मासा चोच मारू पाहतोय.. असं काहीसं चित्तचमत्कारिक वातावरण इथं आढळतं. जगातल्या दहा प्रचंड मोठय़ा मत्स्यालयांमध्ये याचा समावेश होतो. ९१.५ एकर क्षेत्रावर हे मत्स्यालय वसलेले आहे. पेंग्विनसारख्या विविध वन्यजीवांबरोबरच ४०० हून अधिक प्रकारचे पाच हजार मासे इथं विहार करताना दिसतात. हाँगकाँगची जेवढी लोकसंख्या आहे, त्यापेक्षाही अधिक पर्यटकांमुळे इथं भेट देणाऱ्यांच्या संख्येचा विक्रम वर्षांगणिक मोडला जातो. १९७७ मध्ये अस्तित्वात आलेल्या या मत्स्यालयाचा सतत विस्तार होत असून यंदाच्या उन्हाळ्यात तर शार्क माशांचे मोठे मत्स्यालय इथे सुरू होईल, अशी माहिती ओशियन पार्क कॉर्पोरेशनचे जनसंपर्क अधिकारी रॉनी हुई यांनी दिली.
लान्टाऊ : गौतम बुद्धाचा जगातला सर्वात मोठा पुतळा इथलाच. १११ फूट उंचीचा हा पुतळा उभा करण्यासाठी एक तप लागलं. इथं दिवसाला पाच हजार लोक भेट देतात. हाँगकाँगपेक्षा दुप्पट आकाराच्या या बेटावर पोहोचण्यासाठी सागरी, रेल्वे व रस्ते मार्ग आहेत. मंदिर उभारणीतील कलाकुसर आणि शांत, विस्तीर्ण परिसराबरोबरच इथं पोहोचण्याचा न्गॉन्ग पिंग केबल कारचा मार्ग आपल्या डोळ्यांचं पारणं फेडतो. हे ५.७ कि.मी.चं अंतर २५ मिनिटांत तुम्ही आठ टॉवरच्या साहाय्यानं पार करता. त्यातही तुम्ही पारदर्शक केबल कारमध्ये असाल तर तुमच्या पायाखाली दहा-बारा डोंगरांवरची वनराजी तसेच ५० फूट खोल समुद्रातील मासेही नजरेच्या टप्प्यात सहज येतात.
आपल्याकडे पर्यटन संस्थांच्या जाहिरातींतून विदेशी सहलींचा होणारा प्रचंड मारा लक्षात घेतला तरी अन्य आशियाई देशांचे आकर्षण भारतीयांना कमालीचे आहे हे मान्यच करावे लागते. थायलंड, सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस, हाँगकाँग, मकाऊ, बँकॉक, पटायाचे पर्यटन दौरे काही हजारांत आयोजित केले जातात. भारतीयांचा हा ओढा लक्षात घेऊन हाँगकाँग टुरिझम बोर्डाने गेल्या काही वर्षांत विशेष आदरातिथ्य योजना तयार केल्या आहेत. त्याचा योग्य तो परिणामही दिसून येत आहे. त्यामधला दोन देशांतील एकसमान धागा ‘जागतिक आर्थिक केंद्र’ हा असू शकतो. तर अशा या आर्थिक राजधानीत आणि अनोख्या पर्यटन टापूवर २०१३ मध्ये ४,३४,६४८ पर्यटकांनी पाऊल ठेवले होते. गेल्या वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी पाच टक्क्यांनी विस्तारली आहे. यात पर्यटन वा काही काळासाठी येणाऱ्यांचे प्रमाण ३.४ ते ५.८ टक्क्यांनी वाढले आहे.
‘आमच्या देशातील पर्यटकांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन नवी बाजारपेठ विकसित करण्यासाठीची गुंतवणूक गेल्या काही कालावधीपासून आम्ही वाढवीत आहोत. येथील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्यांना अधिक सोयीसुविधा तसेच पर्यटनस्थळांच्या विकासासाठी हा निधी उपयोगी पडत आहे,’ असे हाँगकाँग टुरिझम बोर्डाचे कार्यकारी संचालक अ‍ॅन्थोनी लाऊ यांनी सांगितले.
असंख्य बेटांचा समूह असलेल्या या भूमीत गेल्या वर्षभरात ११.७ टक्के वाढीसह ५.४३ कोटी इतक्या विक्रमी पर्यटकांची नोंद झाली आहे. भारताप्रमाणेच रशिया, व्हिएतनामसारख्या देशांचाही हिस्सा त्यात लक्षणीय आहे. २०१२ च्या तुलनेत या देशातील भारतीय पर्यटकांचे प्रमाणही आठ टक्क्यांनी वाढले आहे. मुंबई-दिल्लीबरोबरच बेंगलुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकातासारख्या शहरांतून हाँगकाँगला जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्याकरता हाँगकाँगसह मकाऊ, शेनझेन आदी ठिकाणी पर्यटन व प्रवासाच्या सोयीसुविधा वाढवण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
regenrative tourism
नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?
Government initiatives like PMAY aim to address housing issues by offering financial aid for self-built homes or group housing.
IE THINC, आपली शहरे: ‘दिल्लीला कमी उंचीच्या, उच्च घनतेच्या घरांची गरज आहे’
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
Story img Loader