तेजस पाटील
कोल्हापूर शहरापासून वीस- पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावात माझं सगळं शालेय शिक्षण पूर्ण झालं. माझे सख्खे चुलत आजोबा ज्यांना मी आबा म्हणतो ते गावातल्या राजकीय पुढाऱ्यांच्या सोबत सक्रिय असायचे. तसं त्यांचं त्यातील स्थान हे कडेकडेचंच, कारण आमचं मूळ गाव सोडून काही कारणामुळे माझ्या आजोबांनी आजीच्या गावी स्थलांतर केलं होतं. ( तसं आमच्या मूळ गावात आणि या गावात केवळ एक नदीचं अंतर ) त्यामुळे कितीही झालं तरी या गावात आमची भावकी नाही, फारसा गोतावळा नाही त्यामुळे आजोबांचं त्या राजकारणातलं स्थान जेमतेमच. पण आजोबा गावातल्या सहकारी सोसायटीत कसलं तरी ऑफिसचं काम करायचे, त्यामुळे न कळत्या वयातही त्यांच्यासोबत कधी पतसंस्थांच्या, सहकारी सोसायटीच्या बैठकांना त्यांच्याबरोबर मीही हजर असायचो.
बैठका संपल्या की गाव ते तालुका, जिल्हा पातळीवरील राजकारणाच्या चर्चा कानावर पडायच्या. माझ्या तालुक्यात शेकाप पक्षाचं वर्चस्व होतं. त्यामुळे न कळत्या वयातही माझ्या आठवणींच्या कप्प्यात सतत तो लाल झेंडा, कोणत्यातरी निवडणुका आल्या की लोकांनी स्वतःहून भाकरी बांधून त्याच्या प्रचाराला जाण्यासाठी केलेली लगबग, कधी गावात प्रचार सभा झाल्या तर त्यात व्यासपीठावरून नेते, पुढारी काय बोलतात हे गांभीर्याने ऐकणारे चेहरे, त्याला तितकाच रसरशीत दाद देणारा जमिनीवर बसलेला शेतकरी, कामगार वर्ग… हे सारं कारेलं गेलंय.
गावातल्याच सरकारी मराठी शाळेत मी शिक्षण घेत होतो. आमच्यासारखे देखील बरेच जण- जे त्यांचं मूळ गाव सोडून या गावी राहायला आले होते अशा सर्वांच्या मिळून दोन-तीन गल्ल्याच होत्या. यातले बहुतांश लोक जमिनी नसलेले, त्यामुळे शेतमजुरी, ऊस तोडणी, बांधकामाची कामं किंवा कुणाची तरी शेती कसायला घेणे ही कामं करणारी होती. त्यामुळे त्यांचा रोजचा दिवस मूलभूत गरजांची पूर्तता व्हायला जेवढे लागते ते मिळवण्यातच जायचा. त्यामुळे आपल्या मुलांनी काय अभ्यास केला किंवा नाही केला, ते काय करतात, काय नाही यावर लक्ष ठेवायला त्यांना थोडीच फुरसत होती. तेवढं त्यांचं शिक्षणही झालं नव्हतं. माझे आईवडील शिकलेले होते, त्यामुळे त्यांचे माझ्या अभ्यासावर, अभ्यासातल्या प्रगतीवर चांगलं लक्ष असायचं. मी याच गल्लीतल्या मुलांच्या बरोबर माझं पूर्ण बालपण घालवलं. शाळेत वेळेवर अभ्यास पूर्ण करणं, आज्ञाधारी असणं, टपोरीपणा न करणं असल्या पाचकट गोष्टी मला जमायच्या. पण ही पोरं मात्र शिक्षकांच न ऐकणं, सुट्टीच्या दिवशी उनाडक्या करत फिरणं, काही ना काहीतरी जुगाड करत असायची. या सगळ्यात मीही माझ्या शाळेत आणि लोकांच्या नजरेत असणारी आज्ञाधारी प्रतिमा जपत त्यांच्या सगळ्या जुगाडात सामील असायचो.
काठाकाठावरून का असेना ते जे जे करतील त्या सगळ्यात मी असायचो. या पोरांना शाळेत मार बसायचा, लोक यांच्या करामतीने त्रस्त व्हायचे त्यांना शिव्या द्यायचे मग परत ते त्यांच्या पालकांचा मार खायचे. या सगळ्यामुळे ते त्यावेळेला टपोरी जरी वाटत असले. तरी आता मी जेव्हा या सगळ्याकडे बघतो त्यावेळेस वाटतं की आज्ञा मोडणं, आपल्याला हवं ते करणं, ज्या गोष्टीत आपल्याला रसच नाही अशा गोष्टी कोणीतरी सांगितल्या म्हणून न करता आपल्याला वाटेल ते स्वच्छंदी जगणं हे यांना जमायचं. त्यात पुन्हा त्यांच्या पालकांची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना आपल्या मुलांच्या प्रगतीतलं, अभ्यासातलं काहीच न कळणं आणि यामुळे मार्गदर्शनाअभावी त्यांना कोणती शिस्त न लागणे यात त्यांचा तरी काय दोष? म्हणजे व्यक्तीचं जगणं, त्याचं घडणं, त्याचं वर्तन, विचार हे सगळं सामाजिक संदर्भातच घडत असतं. याची वास्तवातली केस स्टडी म्हणून मी याकडे बघतो.
शाळेत इयत्ता तिसरीत होतो तेव्हा गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या होत्या. त्याचं पत्रक लावलं होतं, त्यात वक्तृत्व स्पर्धादेखील होती. मला त्यावेळेला वक्तृत्व म्हणजे कसली स्पर्धा असा प्रश्न पडला. म्हणून वडिलांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की वक्तृत्व म्हणजे भाषणाच्या स्पर्धा. मग मलाही भाग घ्यायचा आहे असं वडिलांना म्हणालो आणि मग वडिलांनी गावातील त्यांचा वर्गमित्र- जे शिक्षक होते त्या सरांकडे पाठवलं. त्या सरांनी आंबेडकरांवर दोन-तीन पाने लिहून दिली आणि ते पाठ करायला सांगितलं. मी ते पाठ केलं आणि संध्याकाळी त्या स्पर्धेत बोललो आणि कोणता तरी क्रमांकदेखील मिळाला. ही माझ्या शाळेतील अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींच्यात सहभाग होण्याची सुरुवात होती. पुढे शालेय स्तरावर वक्तृत्व, कथाकथन अशा स्पर्धेत भाग घेऊ लागलो बक्षीसही जिंकू लागलो. वक्तृत्व स्पर्धांना त्यावेळेला नेहमी शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या, युवक, अंधश्रद्धा असे विषय असायचे, त्यामुळे वडिलांनी सांगितलं होतं वर्तमानपत्र वाचून त्यातली कात्रणं जपून ठेवत जा. तशी कात्रण मग साठवत गेलो. एखादी स्पर्धा लागली की मग मी ती कात्रणं चाळायचो आणि त्यातील काही विषयाशी साम्य दाखवणारं आहे का हे शोधायचो.
या सगळ्यातून वर्तमानपत्र चाळायची एक सवय लागली. लहानपणापासूनच अशा सामाजिक विषयावर पाठ करून का असेना बोलायचं हे मला आठवतंय. स्पर्धेच्या व्यतिरिक्तसुद्धा मुलांमध्ये गप्पा मारताना एखाद्या विषयावर मी काहीतरी तावातावाने बोलतच असायचो. पुढे हायस्कूलमध्ये असताना शहरातील एका नाट्यसंस्थेशी जोडले गेल्यामुळे दर आठवड्याच्या शनिवार-रविवारी मी कोल्हापूरला एका बालनाट्याच्या सरावाला जायचो.
इथे पहिल्यांदा मराठी शाळेतल्या मित्रांपेक्षा वेगळे मित्र भेटले. इंग्रजी माध्यमातली, खासगी शाळांतली मुलं भेटली. ते बऱ्याच बाबतीत अपडेट असायचे. तोपर्यंत चित्रपट म्हणजे फक्त झी टॉकीजवरचे अशोकमामा- लक्ष्या यांचे चित्रपट एवढंच माहीत होतं. पण या मित्रांमुळे काही जणांनी वेगवेगळ्या कार्टून, चित्रपटाच्या डीव्हीडी, व्हिडीओ गेम्स यांची माहिती कळली. माझा मामा कोल्हापूरचाच असल्याने मी त्याही आधी दिवाळी आणि मे महिन्यामध्ये कोल्हापूरला सुट्टीला जायचो. तेव्हा रंकाळाजवळच्या बागा, तिथल्या मुलांच्या बरोबर क्रिकेट, फुटबॉल खेळणं. कोल्हापुरातल्या तालमींच्या फुटबॉलच्या मॅचेस स्टेडियमला बघायला जाणं, माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या मावसभावाला मोबाइलमधलं सगळं कळायचं तेव्हा त्याच्याकडून त्यांच्या मोबाइलमध्ये Subway Surf, टेम्पल रन बुजरेपणाने खेळायचो… माझ्या आईकडचे सगळे पाहुणे हे कोल्हापूर शहरातले, त्यामुळे मामाकडचा कोणताही घरगुती कार्यक्रम असला की आम्हा सर्व लहान मुलांच्यात मी आणि माझी बहीण आम्ही दोघेच गावाकडचे, त्यामुळे आमची भाषा सहज ओळखू यायची. तेव्हा ही शहरात शिकणारी मुलं कुणाकडे काही मागायला, हट्ट धरायला घाबरायची नाही. आम्ही मात्र लाजत – बुजरेपणानेच कुठल्यातरी कोपऱ्यात गप्प बसायचो. आमच्या अशा या शांत स्वभावामुळे आमचं कौतुक व्हायचं आणि आईवडिलांचंदेखील… पण तो शांतपणा आज्ञाधारकतेतून नव्हे तर आपलं त्यांच्याशी जुळत नाही किंवा आपण वेड्यात निघू नये म्हणून दाखवलेलं धोरणीपण होतं. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे या सर्व आठवणींनीच गाव आणि शहर यात असणारा फरक माझ्या मनात नोंदवला होता. आपल्यातल्या काहीतरी गोष्टी या शहरी नॉर्म्समध्ये बसत नाहीत हे कळण्याची पहिली पायरी होती..
नाटक, वक्तृत्व यांमुळे मला वाचनाची सवय लागली. या सगळ्यातून आपला कल हा कला क्षेत्रातच आहे हे स्पष्ट झालं आणि मी महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. ( पण मला आता असं वाटतं की आपला रस, आवड यांना प्राधान्य देण्याची निवड काहीच जणांना परवडणारी आहे. बाकीच्यांना मागं फारसं भांडवल नसेल, प्रिव्हिलेज स्थानातून येत नसेल. त्यांनी गप्प त्या काळात जगण्यासाठी पैसे मिळवून देणारी जी-जी कौशल्यं असतात ही सगळी शिकून घ्यावी. पोट महत्त्वाचं. निवडीची चैन आपल्याला परवडणारी नाही).
कला शाखेत राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र हे विषय होते. महाविद्यालय पातळीवरसुद्धा वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेसाठी महाराष्ट्रभर फिरत होतो. तेव्हा घटना, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, राज्याची जबाबदारी, राज्य, नागरिक, राजकारण या अमूर्त संकल्पनांचे नेमके अर्थ उलगडू लागले होते. बरोबरची मुलं अकरावी-बारावीनंतर इंजिनीअरिंग, डॉक्टर, फार्मसी यांसाठी प्रवेश घेणार होती, त्यामुळे आता आपणही लवकर काहीतरी करिअरचं बघायला हवं, या विचाराने आपणदेखील ग्रॅज्युएशनला पुण्याला शिकायला जायचं आणि स्पर्धा परीक्षा वगैरे करून सरकारी नोकरीमध्ये अधिकारी व्हायचं ठरवलं होतं. त्यामुळे पुण्याला आलो. पुण्याबद्दल विद्येचे माहेरघर वगैरे ऐकलं होतच… ( हे असले स्टॅंडर्ड कोण आणि का ठरवत असतं?) इथे पसरलेले स्पर्धा परीक्षा क्लासेसचे जाळे, अभ्यासिका, सरकारी नोकरी मिळावी यासाठी उमेदीतील वर्षं दावणीवर लावलेली मुलं असं एक चित्र… शेतीची दुरवस्था, ग्रामीण भागाचे बकालीकरण आणि रोजगारांची असलेली वाणवा यांमुळे महाराष्ट्रभरातल्या ग्रामीण भागातील तरुणांनी या शहरात स्थलांतरित होऊन सुजवलेल्या पेठा. वर्तमानपत्र, झेरॉक्स, क्लासेस, अभ्यासिका मेस, रूम, ब्रोकरेज यांची उभी केलेली एक नवी अर्थव्यवस्था. सहज लक्षात यावा एवढा सांस्कृतिक आणि आर्थिक विषमतेचा आलेख या शहरात राहिल्याने लक्षात येऊ लागला.
इथले मॉल्स, पब, खासगी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलांचा जगण्याचा स्टॅंडर्ड , नाट्य करंडकासारख्या स्पर्धा आणि कसले कसले फेस्ट, चर्चा, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, सक्रिय असणाऱ्या मध्यमवर्गांचे काही गट हे सगळं दिसत होतं. याची तुलना मी सतत इतर भागांशी करायचो. म्हणजे इथल्या लोकांचे सामाजिक आणि आर्थिक स्थान हे कशातून येते? यांना स्व आणि कुटुंब यांच्या पलीकडील प्रश्नांवरती काथ्याकूट करायला उपलब्ध वेळ कुठून येतो? इथल्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय मुलांमधील आणि इतर मुलांमधील असणाऱ्या सांस्कृतिक भांडवलातील तफावत ही नैसर्गिक आहे की ती कृत्रिम आहे? असे प्रश्न पडत राहतात. सामाजिक शास्त्रांचं आणि त्यातही राज्यशास्त्र विषयातून माझे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे आणि सोबत सामाजिक संदर्भ असणारी पुस्तकं वाचत असल्याने माझं मन समाजातील अशा विषमता, अभावग्रस्तता शोधून काढत असतं.
राजकारणाचा नागरिकांच्या जगण्याशी असणारा खोलवरचा संबंध लक्षात आला. २०१४ची निवडणूक पार पडली तेव्हा एवढं समजत नव्हतं. पण आधीच्या झालेल्या चुका (?) पुसून काढून दि ग्रेट काहीतरी करायला कोणता तरी पक्ष एका मसीहाला घेऊन पुढे आलाय. त्या मसीहाने दिलेला ‘अच्छे दिन’चा नारा यांनी लोकांच्यात पसरलेला उत्साह पाहिला होता. हा केवळ सत्तांतराचा बदल नव्हता तर पूर्वीपेक्षा काहीतरी वेगळ्या अशा राजकीय आणि सांस्कृतिक बदलाची सुरुवात आहे. हे पुढे वाचनातून समजत गेलं.
जागतिकीकरणाच्या वीस पंचवीस वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर इथल्या केवळ जीवनपद्धतीतच नव्हे तर जीवनमूल्य आणि जगण्याच्या धारणांमध्ये झालेला बदल, रोजच्या जगण्यात वाढलेल्या पैशाचं अतोनात महत्त्व, वेगवेगळ्या सांस्कृतिक धक्क्यांना सामोरी जाणारी इथली समाजव्यवस्था, लोकांच्या वाढलेल्या भौतिक महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्याने होणारी चिडचिड, आक्रमकता, वाढलेली हिंसा, शहरापासून ग्रामीण भागापर्यंतच्या जगण्यावर गुन्हेगारीची पडलेली छाया, राजकारणातील खोके, गद्दार, मारतो, बघतोच ही नवी भाषा. माझ्यासहित माझ्या वयाच्या मुलांमध्ये माध्यमांचा वाढता प्रभाव, इन्स्टा, फेसबुक, स्नॅप, रील्स, स्क्रोलिंग या आभासी जगण्यातील गुंतत जाणं… स्क्रीनवरील जगण्यातील आणि आपल्या वास्तव जगण्यातील फरक लक्षात येऊन कधी कधी येणाऱ्या नैराश्याच्या कळा. कशाचा कशाला संबंध न लागणारी मनाची अवस्था… बाजाराने तयार केलेले जगण्याचे सगळे भौतिक निकष पूर्ण करण्याचं मनावर असणारं दडपण. या सगळ्यात ‘स्व’ सोडून इतरेजनांशी आपण कसे जोडून घेणार आहोत?
मराठवाड्यातील मराठा आरक्षणासाठी कुणा एकाचे कैक दिवस उपोषणाला बसणे, त्याला लाखो लोकांचा पाठिंबा मिळणे. तर हे सगळं राजकीय कटकारस्थान आहे अशा चर्चा. त्याला धरून ‘सब एक है’च्या पदराखाली आक्रमक आकार घेणाऱ्या जातीय घडामोडी. कोणत्या तरी भरतीत घोटाळा झाला म्हणून, कोणत्या तरी परीक्षा घेतल्याच गेल्या नाहीत म्हणून रस्त्यावर येणारे तरुणांचे मोर्चे. हे मी आता अनुभवत असलेलं इथलं सामाजिक पर्यावरण आहे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांसारख्या आर्थिक गुंतवणुकीच्या डोळ्यावर धडकणाऱ्या जाहिराती. शहरात जागांचे, फ्लॅटचे लागलेले फलक… या सगळ्या गोष्टी स्वतःजवळील भौतिक कमतरतेची जाणीव देते. शूद्रत्वतेची भावना देतं… यालाच परात्मभाव म्हणतात काय? ( मी ‘कोसला’ वाचलेली नाही)
कबीरसिंग, ॲनिमल, हर्षद मेहता स्टोरी, मिर्झापूर आवडणारी माझी पिढी. खोटा भाबडेपणा ठेवत नाही. राग, निराशा व्यक्त करणारी, पण तरीही जगण्याला स्पिरिट देणारी Divine, संबाटा, MC Gavathi, rockson, Swadeshi, paradox यांचे रॅप ऐकणारी माझी पिढी… एवढा राग, निराशा, अस्वस्थता रिचवते कुठे? विखंडित स्वरूपातील हे सगळं समजायला मलाही जड जातं. सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करणारे आम्ही… राजकारण, बदल, बदलाच्या काही कृती करण्यात मागे का पडत असू? याचं कारण इथल्या पालकांपासून शिक्षणव्यवस्थेने आमचं केवळ कौशल्यपूर्ण कामगारांच्या मध्ये केलेले रूपांतर आणि जगण्याचे स्वकेंद्री साचेबंद भौतिक निकष यात असेल काय?
इथे मी माझी सगळी पिढी एकाच तराजूत तोलली असली तरी ती तशी एकरेषीय नाही. यातही सामाजिक, आर्थिक स्तरांचे कप्पे आहेत आणि त्या कप्प्यांनुसार प्रत्येकाला अनुभवायला येणारं वेगवेगळं वास्तव आहे… या तुकड्या तुकड्यात विभागलेल्या माझ्या पिढीला बदलांचा वेग सोसत, आपल्याला जे बोचतं त्याविरुद्ध आणि तसंच इतरांना बोचत असेल तर त्याविरुद्ध काहीतरी कृती करण्याचं भान येईल काय?
tejaspatil8113@gmail. com
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागात, रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहेत.)