प्रकाशनसंस्थांच्या संस्थापकांची आत्मचरित्रे आणि चरित्रे मराठीमध्ये फारच कमी आढळतात. मातब्बर म्हटल्या जाणाऱ्या    रा. ज. देशमुख, श्री. पु. भागवत, रामदास भटकळ या प्रकाशकांनीही आत्मचरित्र लिहिण्याचे टाळले आहे. यातील काहींचे गौरवग्रंथ निघाले आहेत खरे, पण आत्मचरित्र ही फस्र्टहँड डॉक्युमेंटरी असते. संबंधित प्रकाशकाने स्वत: अनुभवलेला काळ त्यानेच सांगणे जास्त महत्त्वाचे असते. शिवाय मराठीमध्ये मोजके अपवाद वगळता गौरवग्रंथाची परंपरा ही फारशी नावाजण्याजोगी नाही. अलीकडच्या काळात तर ज्या प्रकारचे गौरवग्रंथ प्रकाशित होतात, त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. असो. तर पहिल्या फळीतल्या प्रकाशकांनी आपली आत्मचरित्रे फारशी लिहिली नसली तरी दुसऱ्या फळीतल्या प्रकाशकांनीही फारशी लिहिलेली नाहीतच. पण त्यातील काही मात्र अलीकडे लिहू लागले आहेत. पुष्पक प्रकाशनाचे ह. ल. निपुणगे यांचे ‘हलचल’ हे त्यापैकीच एक. हे आत्मचरित्र खऱ्या अर्थाने प्रकाशकीय म्हणावे असे नाही. कारण निपुणगे यांनी केवळ प्रकाशन एके प्रकाशन असे काही केलेले नाही. खरं तर त्यांनी प्रकाशनाचा व्यवसाय करून पाहिला, मुद्रण व्यवसाय करून पाहिला, लायब्ररी चालवून पाहिली, दिवाळी अंक चालवला, कृषिवलसारख्या वार्षिक दैनंदिनी काढल्या, मासिक चालवले आणि उतारवयात मसापचे पदाधिकारी म्हणूनही काम केले. पण यापैकी कुठेच फार उल्लेखनीय म्हणावी अशी कामगिरी निपुणगे यांना करता आलेली नाही. पण हेही तितकेच खरे की, काय केले नाही यापेक्षा जे काही केले ते काय प्रतीचे आहे, असे पाहणे हे अधिक सयुक्तिक ठरते. निपुणगे यांच्या या आत्मचरित्राबाबतही तोच दृष्टिकोन ठेवला तर ते फारसे निराश करत नाही.
याची काही कारणे आहेत. एक म्हणजे अतिशय सामान्य परिस्थितीतून काबाडकष्टांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व पिढीतील निपुणगे आहेत. फारसे शिक्षण नसताना, जवळ कुठल्याही प्रकारचे भांडवल नसताना मंचरसारख्या ठिकाणाहून नेसत्या वस्त्रानिशी आईसह पुण्यात आले. भाडय़ाच्या खोलीत राहू लागले. आधी आलेपाक, मग उदबत्त्या, मग पेपर टाकणे, मग प्यून, नंतर कम्पाउंडर, लग्न व्यवस्थापक, बांधकाम मॅनेजर अशा मिळेल त्या नोकऱ्या करत निपुणगे यांनी आपली वाट शोधत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नंतर ते व्हीनस प्रकाशनात कामाला लागले. त्यानंतर वोरा बुक कंपनीत. पडेल ते काम करण्याचा स्वभाव असल्याने आणि प्रामाणिकपणा अंगात मुरलेला असल्याने निपुणगे जातील तिथे लोकांचा विश्वास संपादन करत राहिले. वोरा कंपनीत काम करत असतानाच त्यांनी मित्राबरोबर नेपच्यून लायब्ररी सुरू केली. शाळा-कॉलेजमधील मुलांसाठी असलेल्या या लायब्ररीला चांगला प्रतिसादही मिळाला. लायब्ररी चालू असतानाच १ जून १९६३ रोजी निपुणगे यांनी पुष्पक प्रकाशन सुरू करून ‘रेखन आणि लेखन’ हे आपले पहिले पुस्तक प्रकाशित केले. या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुण्यात एका होतकरू आणि धडपडय़ा प्रकाशकाची भर पडली.
निपुणगे यांनी प्रकाशनाला सुरुवात केली, त्याला आता जवळपास पन्नास र्वष होऊन गेली आहेत. या काळात त्यांनी   रा. चिं. ढेरे, उद्धव शेळके,   ह. मो. मराठे, बाळ गाडगीळ, ग. वि. अकोलकर अशा काही लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. आचार्य अत्रे यांच्याविषयीची ‘साहेब’ ही कादंबरी उद्धव शेळके यांच्याकडून तर ग. दि. माडगूळकर यांच्याविषयीची ‘निर्मोही’ ही कादंबरी रवींद्र भट यांच्याकडून लिहून घेतली. या दोन्ही पुस्तकांकडून त्यांची फार अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. पण गप्प बसतील ते निपुणगे कसले. त्यांनी आपला धडपड करण्याचा उद्योग चालूच ठेवला. १९८१ सालापासून ‘विशाखा’ या दिवाळी अंकाचे पुनप्र्रकाशन करायला त्यांनी सुरुवात केली, मग बळीराजा, गृहिणी, कृषिवल या वार्षिक दैनंदिनींचे प्रयोग करून पाहिले. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. थोडेफार आर्थिक स्थैर्य आले.
त्यांच्या पत्नी त्यांना ‘मारा अंधारात उडय़ा आणि धडपडा’ असे म्हणत. निपुणगे यांच्या प्रकाशन, मुद्रण, मासिक, दैनंदिनी, दिवाळी अंक या सर्व उद्योगांसाठी हेच वर्णन समर्पक ठरते. त्यांच्या या प्रयोगांना त्यांच्या पत्नीची खंबीर साथ होती हेही तितकेच खरे. शिवाय त्यांनी नोकरी करून घर सांभाळले. त्यामुळे निपुणगे यांना धाडसी प्रयोग करून पाहण्याचे आणि सतत धडपडण्याचे स्वातंत्र्य मिळत राहिले!
प्रकाशकाने प्रकाशित केलेल्या एखाद्या पुस्तकावरून काही वादविवाद झाले नाहीत, न्यायालयीन खटले लढावे लागले नाहीत, असे सहसा होत नाही. सध्याच्या काळात या सव्यापसव्याच्या भीतीने अनेक मराठी-इंग्रजी प्रकाशक आपली पुस्तके सपशेल मागे घेतात किंवा नष्ट करून टाकतात. तर ते असो. विनोदी लेखक बाळ गाडगीळ यांच्या ‘वळचणीचे पाणी’ या आत्मचरित्राविषयी वर्षभराने फग्र्युसनचे माजी प्राचार्य बोकील यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून गाडगीळ आणि निपुणगे यांना न्यायालयात खेचले. त्याची छोटीशी हकिकतही रोचक म्हणावी अशी आहे.
असे संघर्षांचे छोटे-मोठे प्रसंग निपुणगे यांच्या आयुष्यात सतत आले आहेत. हे आत्मचरित्र अशा हकिकतींनीच भरले आहे. पण त्या सर्व आर्थिक संघर्षांच्या आणि व्यावहारिक हिकमतीच्या आहेत. निपुणगे यांनी त्यांना जमेल तेवढे आणि तसे प्रयोग करून स्थिर होण्याचा प्रयत्न केला. पण अशा गोष्टींना मूलभूत मर्यादा असते. त्यामुळे या चौकटीत जे आणि जेवढे शक्य होते, तेवढेच यश निपुणगे यांना मिळाले.
दिवाळी अंकासाठी, मासिकासाठी जाहिराती मिळवण्यासाठी काय काय करावे लागले, याविषयी निपुणगे यांनी सविस्तर लिहिले आहे, तसेच विशाखा या दिवाळी अंकात दरवर्षी काय काय साहित्य छापले याविषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. केशवराव कोठावळे, श्री. ग. माजगावकर, वोरा कंपनीचे अमरेंद्र गाडगीळ, बाळ गाडगीळ अशा प्रकाशनव्यवहाराशी संबंधित व्यक्तींच्या स्वभावाचे काही पैलू निपुणगे यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून नोंदवले आहेत. शेवटचे प्रकरण हे त्यांच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतील कामाविषयीचे आहे. या प्रकरणातून मसापचे अंतरंग काही प्रमाणात जाणून घ्यायला मदत होते. या साहित्यिक संस्थेत कशा प्रकारचे राजकारण चालते, त्याची चांगल्या प्रकारे माहिती होते आणि राजकारणी काय किंवा साहित्य व्यवहारात लुडबुड करणाऱ्या व्यक्ती काय, यांच्यात कसा फारसा फरक नसतो, हे आपसूकच समजायला मदत होते.
प्रकाशनापासून सुरुवात करून पुस्तक विक्री, मुद्रण व्यवसाय, दिवाळी अंक इथपर्यंत प्रवास केलेल्या एका धडपडय़ा प्रकाशकाचे हे आत्मचरित्र आहे. साडेतीनशे पानांचे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला आवडेलच
असे नाही, पण प्रकाशन व्यवहाराशी संबंधित असलेल्यांना यातून काही संदर्भ-माहिती मिळू शकते आणि ज्यांना या क्षेत्राकडे वळायचे आहे त्यांना काय करू नये आणि कशा प्रकारे करू नये, याचा धडा या आत्मचरित्रातून नक्की मिळू शकतो. त्यांनी या पुस्तकाच्या वाटेला जायला काहीच हरकत नाही. फार थोर असे काही हाती लागणार नाही हे खरे, पण फार अपेक्षाभंगही होणार नाही.    
‘हलचल’ – ह. ल. निपुणगे, पुष्पक प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – ३५२, मूल्य – ३५० रुपये.    
ramrao.jagtap@expressindia.com