‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ हे वचन ऐकले नाही असा माणूस नसेल. ‘चाले तैसा बोले, त्याची वंदावी पाऊले’ हे मात्र कुणी ऐकले नसेल. तशी ही दोन्ही वचने आपापल्या परीने बरोबर आहेत; पण तसे वागण्याचे परिणाम मात्र फार वेगळे आहेत. आपण आधी काही बोलून ठेवले तर नंतर ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागणे हे अत्यंत ताण उत्पन्न करणारे असते. म्हणजे त्यातून ढोंग उत्पन्न होण्याची शक्यता फार असते. आधी म्हणायचे- ‘स्त्रीसंग हा आध्यात्मिक प्रगतीसाठी अयोग्य!’ आणि नंतर लक्षात येते की, आपण सामान्यच आहोत आणि आपल्याला स्त्रीही फार आवडते. मग भावनांना दाबून ठेवणे चालू होते आणि ते अनर्थापर्यंत घेऊन जाते.
कित्येकांनी आपल्या आयुष्यात ‘बोले तैसा चाले’ हे आचरणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आयुष्यात फक्त ढोंग उभे करण्यात ते यशस्वी झाले आहेत. आत्मिक अनुभूती झाल्यामुळे मुखातून असे शब्द ‘निघणे’ हे ज्यांच्या बाबतीत झाले आहे त्यांची वर्तणूकदेखील आपोआप परिवर्तित होत गेली आहे. पण ज्यांनी देखावा उत्पन्न करण्यासाठी काहीतरी विधान केले आहे, उदाहरणार्थ- ‘पैसा हे सर्व अनर्थाचे कारण आहे’ किंवा ‘स्त्रीसंग हा अवनतीस नेतो,’ इ.- त्या सर्वाना आपण उच्चारलेले हे वाक्य निभावण्यासाठी लांडय़ालबाडय़ा करायला लागल्या आहेत. त्या लपवायला खोटेनाटे वागावे लागले आहे.
आपण जे करू तेच सांगितले की नक्कीच खरे बोलले जाते आणि कोणताही ताण येत नाही व आयुष्यात ढोंगही राहत नाही. मुख्य म्हणजे आपण खरे कसे आहोत, ते कळत राहते आणि आयुष्यात बदल आणण्याचे मार्ग खुले होऊ लागतात. आपण खोटे बोलू शकतो, हे आपल्याला समजले की, ‘खरे बोलावे, खोटे बोलू नये’ असे ढोंगी विधान करण्याऐवजी ‘काही वेळा खोटे बोलावे लागते-’ हे सत्य आपण बोलू शकतो. फक्त आपण खोटे बोललो हे उघडकीस आले तर पुन्हा खोटे बोलणे गाढवपणाचे ठरते. हा विरोधाभास भल्याभल्यांना कळत नाही. जगात खोटे वागावे लागते, हे सत्य आहे. मुळात एखादी गोष्ट खरी आहे म्हणजे नक्की काय आहे, हे आपण कधीच ठरवू शकलेलो नाही. बदल आणि सतत बदल- एवढेच आपण म्हणू शकतो.
आपण कसे आहोत, हे कळण्यासाठी सतत स्वत:कडे लक्ष असणे आवश्यक असते. त्याला अन्य भाषेत ‘निगाहे करम’ असे म्हटलेले आहे. कसे वागावे, हे कुणी कुणाला अजिबात सांगू शकत नाही. कुणी सांगूही नये आणि कुणी ऐकूही नये. पण आपल्या वागणुकीकडे लक्ष मात्र असायला हवे. आणि तेही सतत. हे लक्ष देता देता आपण आपोआपच ऊर्जेचा साठा करू लागतो. कारण ‘चुकीचे’ वागलो की आपली ऊर्जा कमी होते, हे आपले आपल्याला कळू लागते. योग्य वागलो की सुख, शांती, समाधान आपल्याकडे चालत येते, हेही कळू लागते.
‘निगाहे करम’ हे कसे करायचे? तर आपण जे काही करतो ते अलिप्तपणे पाहायचे. मग ते साधे दात घासणे असो, खोटे बोलणे असो, पैसे खाणे असो, लैंगिक संबंध असो, शरीरधर्म असोत, अगर काय वाट्टेल ते असो. हे मी चांगले केले, हे मी वाईट केले, असे अजिबात न म्हणता त्या कृतीचे परिणाम म्हणून आपल्या ऊर्जेचा स्तर कसा राहतो, हे फक्त बघत राहायचे. हे बघताना आपल्याला आपल्या आणि इतरांच्या आयुष्याचे आयाम कळू लागतात. कंगोरे कुठे आहेत, ते कळते. कधी चालायचे आणि कधी थांबायचे, ते कळू लागते. थांबल्यावर ‘अरे, गेलो असतो तर बरे झाले असते..’ असे वाटणे आणि चालल्यावर ‘अरे, थांबायला हवे होते..’ असे वाटणे जवळजवळ बंद होते. गोष्टी मनापासून केल्या जातात.
प्रथमच ‘जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही’ असा दृष्टिकोन प्राप्त होतो. ज्याला अवघड भाषेत ‘वैराग्य’ असे नाव दिले जाते. आयुष्यातली सर्व मजा इथे आणि आताच आहे, नंतर नाही, असा साक्षात्कार होण्याची शक्यता वाढते. यात विरोधाभास असा, की वैराग्य प्राप्त झालेला माणूसच आयुष्याच्या क्षणाक्षणाचा आनंद घेऊ शकतो. असा माणूस हा कोणत्याही स्थितीत मजेतच असतो.
एका राजाला असे वाटे की, आपण आपल्या गुरुजींना राजवाडय़ात राहायला बोलवावे. ते आपले जंगलात राहत असत. दरवेळेस राजा आमंत्रण देई आणि ते म्हणत, ‘अरे, मी इथेच बरा आहे. तिथे काय आणि इथे काय!’ राजाला वाटे की, सुखोपभोग मिळाल्यावर आपण घसरू अशी त्यांना भीती वाटत असणार. दुसरे काय? त्यामुळे एके दिवशी तो त्यांच्या खनपटीसच बसला. ‘इथे काय आणि तिथे काय असे नुसते म्हणण्यात काय अर्थ आहे? खरेच तिथे येऊन राहून दाखवा,’ असे त्याने जवळजवळ आव्हानच दिले. गुरुजींनी थोडा विचार केला आणि म्हटले, ‘बघ हं! नंतर तुला असे वाटता कामा नये, की उगीच बोलावले.’ राजा म्हणाला, ‘मला असे कसे वाटेल? तुम्ही मला वंद्य आहात.’ गुरुजी ताडकन् उभे राहिले आणि ‘चल’ म्हणाले. झाले! दोघे राजवाडय़ात आले. राजाने मस्त आरामदायक सोयी करून ठेवल्या होत्या. दास-दासी होते. म्हणाल ते खायला-प्यायला होते. गुरुजी मजेत राहायला लागले. एके दिवशी त्यांनी मद्य मागवले असे राजाच्या कानावर आले. एक दिवशी मांसाहार केला असे समजले. एक दिवशी स्त्रीसंगदेखील केला असे कळल्यावर मात्र राजाचा धीर सुटला. तो तडक त्यांना भेटायला गेला. गुरुजी मजेत होते. राजा म्हणाला, ‘आता तुम्ही अगदी माझ्यासारखे सर्व ऐषोराम करत आहात. आता तुमच्यात आणि माझ्यात फरक काय?’ गुरुजींनी हातातला प्याला खाली ठेवला. झटकन् उभे राहिले आणि म्हणाले, ‘चल, सांगतो तुला.’ राजा त्यांच्याबरोबर निघाला. त्यांनी राजधानीची सीमा ओलांडली. राजा विचारी- ‘सांगा ना आता.’ ते म्हणत, ‘थोडे पुढे चल.’ अखेर राजा थांबला. म्हणाला, ‘आता शक्य नाही. माझ्या राण्या, सैन्य सगळे मागे आहे. मी नाही पुढे येऊ शकत.’ गुरुजी म्हणाले, ‘हाच तो फरक. मी पुढे जाऊ शकतो. मी परतही येऊ शकतो. पण आता तुझ्या मनात किल्मिष आले आहे. मी जातो.’ असे म्हणून पुन्हा झोपडीत राहण्यासाठी ते निघून गेले.
फारसे बोलू नये. बोलायची वेळ आलीच तर आपला जो अनुभव असेल त्याला अनुसरून आपण जसे वागत असू तसेच बोलावे. त्यात आपल्याला जे सांगायचे आहे तसेच बोलता येणे, हे फार थोडय़ा लोकांना जमते. सामान्यपणे लोक बोलतात आणि नंतर ‘मला तसे म्हणायचे नव्हते, मला असे बोलायचे होते,’ असे म्हणून वेगळेच काहीतरी बोलतात. त्यामुळे बोलतानादेखील ‘निगाहे करम’ अत्यावश्यक ठरते. तरच जे आणि जसे सांगायचे असते, तसे सांगता येते. तसे सांगता नाही आले तर तेदेखील नीट समजते. काय चुकले, कुठे चुकले, ते कळते. पुढच्या वेळेस जास्त चांगले बोलता येते. अशी प्रगती चालू राहते. कधीकाळी अनुभव नसताना अनुमानाने बोलायची वेळ आली तर तसे स्पष्ट सांगितले की काम होते. ‘मला याचा अनुभव नाही. पण तरीदेखील माझे मत हवे असेल तर ते असे आहे. ते संपूर्णपणे चुकीचे असू शकते,’ असे नि:संकोपणेच सांगता येते.
‘निगाहे करम’ जमायला लागल्यावर चालायचे कसे, हे कळते. चालताना थांबण्याचे भान राहते. थांबताना चालण्याचे भान राहते. चालायचे कसे, हे कळल्यावर ते शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करता येऊ लागतो. जमले तर शब्दांना वजन येऊ लागते. ऐकणाऱ्यांना ते कळू लागते. सांगण्यातला फापटपसारा कमी होत जातो. फार मोठय़ा महापुरुषांचे चालणेच बोलणे होऊन जाते. अखेर ‘गुरोऽस्तु मौनम् व्याख्यानम् शिष्यास्तु प्रच्छिन्नसंशय:’ अशी परिस्थिती होऊन जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा