मराठी साहित्यात आत्मचरित्रं हा समृद्ध साहित्यप्रकार आहे आणि त्यात स्त्रियांची आत्मचरित्रं- आत्मकथनं हे समृद्ध आणि वैशिष्टय़पूर्ण दालन आहे. आज अभिव्यक्तीच्या पातळीवर त्यांना पूर्ण वाव आहे. पण एकेकाळी जेव्हा समाजविचार, रूढीपरंपरा यांच्या तथाकथित बेडय़ा होत्या तेव्हाही अनेकजणींनी आत्मचरित्रं लिहिली. जीवन अनुभवण्याची आणि पचवण्याची ताकद, थेट भिडणारी भाषा, म्हणी-वाक्प्रचारांचा, अलंकार-उपमा-उत्प्रेक्षांचा वापर, भावनिकता, अभिव्यक्ती अशा सगळ्याच पातळ्यांवर त्यातली अनेक आत्मचरित्रं लक्षणीय आहेत. अर्थात स्त्रियांची आत्मचरित्रं म्हणजे त्यांच्या नवऱ्यांची चरित्रं असंही या आत्मचरित्रांबद्दल म्हटलं गेलं. आपल्याकडची पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रीचं अनुभवविश्व पाहता ते खरं असलं तरी या मर्यादेत राहूनही या स्त्रियांनी आपल्या लिखाणाची दखल घेणं समाजाला भाग पाडलं आहे.
या सगळ्या पाश्र्वभूमीला कारण आहे, हुमान हे संगीता धायगुडेंचं आत्मचरित्र. हुमान म्हणजे नियतीने घातलेलं कोडं. संगीता धायगुडे या आज प्रशासनात उपायुक्त म्हणून काम करतात. १९७१ साली दहावी झालेली त्याच वर्षी बोहल्यावर चढते. पोलिसात असलेल्या नवऱ्याच्या संसारात रमते. त्यानंतर काही वर्षांनी पतीचं आकस्मिक निधन झालेली संगीता दोन मुलांसह जगण्याच्या लढाईत उतरते, परिस्थितीशी दोन हात करत करत उभी राहते. नुसती उभी राहात नाही तर इतक्या वर्षांनंतर पुन्हा अभ्यास करत, परीक्षा देत एमपीएससी होते आणि सरकारी सेवेत अधिकाराच्या पदावर दाखल होते. हा सगळा प्रवास थक्क करणारा आहे.
हुमानमध्ये एका पातळीवर आता अस्तित्वात नसलेल्या प्रियकर-पतीशी अखंड संवाद-साहचर्य आहे आणि
दुसऱ्या पातळीवर स्वत:चं अस्तित्व सिद्ध करायला उभी असलेली एक स्त्री आहे, एक आई आहे. त्यांचं पतीवियोगाचं चटका लावणारं दु:ख वाचकालाही हळहळायला लावतं. पती असेपर्यंत असलेलं संपूर्ण सुरक्षाकवच आणि तो गेल्यावर आपलं आणि मुलांचं अक्षरश: रस्त्यावर येऊ पाहणारं आयुष्य सावरणारी स्त्री अशा दोन टोकांवरच्या जगण्याचं हुमान नियतीने संगीता धायगुडे यांना घातलं. ते त्यांनी कसं सोडवलं ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे. मुख्य म्हणजे यात माझ्यावर कशी परिस्थिती आली हा आक्रोश नाहीये, तर अशा परिस्थितीतून मी कशी उभी राहिले, याचं प्रांजळ निवेदन आहे. भाषा थेट हृदयाला भिडणारी आहे. संगीता धायगुडे अर्बन मॅनेजमेंटच्या डिप्लोमासाठी एक वर्षभर जर्मनीला गेल्या होत्या. तेव्हा एक प्रकरण तिथल्या वास्तव्यावर आणि लगेच त्याला जोडून पुढचं प्रकरण मागच्या आयुष्यातल्या आठवणी हे या आत्मकथनाचं फ्लॅशबॅकचं तंत्र इतकं अचूक आहे की नकळत वाचक त्यांच्या लिखाणात गुंतून जातो. उत्तम धायगुडे असेपर्यंत संसारात, मुलाबाळांत पूर्ण रमलेल्या त्या उत्तम यांच्या
निधनानंतर स्वत:साठी, मुलांसाठी ज्या पद्धतीने उभ्या राहतात, त्यानंतर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनतात
ते पाहिलं की संसार पणाला लावल्याशिवाय किंवा पणाला लागल्याशिवाय स्त्री स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करत नाही, हे वास्तव अधोरेखित होतं.
हुमान – संगीता उत्तम धायगुडे
ग्रंथाली, मुंबई,
पृष्ठे- २९६, मूल्य-३५० रुपये.

Story img Loader