सॅबी परेरा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिय मित्र दादू यास,

सदू धांदरफळेचा या वर्षांतला शेवटचा नमस्कार.

दर पंधरवडय़ाला तुला एक पत्र लिहायचं असं ठरवून जानेवारीपासून सुरू केलेल्या या उपक्रमाला बघता बघता वर्ष पूर्ण झालं. खरं म्हणजे दोन आठवडय़ाचा ‘चौदारवडा’ होतो, पण त्याला पंधरवडा का म्हणतात कुणास ठाऊक! असो. माझा एक मित्र म्हणाला, ‘‘अरे, अगदी हा-हा म्हणता तुमचं टपालकीचं वर्ष संपलं की!’’ मी मनात म्हटलं, हा-हा म्हणता जर वर्ष संपलं असतं तर नवज्योतसिंग सिद्धू, अर्चना पुरनसिंग, अश्विनी काळसेकर यांच्यासारख्या हाहाकारी लोकांचं वर्ष एका दिवसातच संपलं असतं! हो की नाही?

दादू तुला सांगतो, आपल्याला मिळालेली एखादी संधी, आपण एन्जॉय करत असलेला एखादा छंद वा काम सोडण्याची किंवा मित्रमंडळी व कुटुंबासोबत घालवत असलेली सुट्टी संपण्याची वेळ येते तेव्हा लोक हटकून एक डायलॉग वापरतात..‘दिवस कसे भर्रकन् निघून गेले बघ!’ एखादा कर्जाचा हप्ता, विजेचं, सोसायटीचं, वाण्याचं बिल द्यायची वेळ येते तेव्हाही लोक हाच डायलॉग वापरतात. ‘आता अगदी कालपरवाच तर पैसे दिले, तोवर पुन्हा पैसे द्यायचा दिवस आला. दिवस कसे भर्रकन् निघून जातात बघ!’ पण मी म्हणतो दादू.. ‘मागच्या महिन्याचा पगार अजून बँकेतून काढून घरी आणला नाही तोवर चालू महिन्याचा पगार बँकेतल्या खात्यावर जमादेखील झाला! दिवस कसे भर्रकन् निघून जातात बघा!’ असं कुणाला कधी बोलताना ऐकलंय का?

मित्रा, मी आपला माझ्या आधीच भरकटलेल्या विचारांचा फापटपसारा मांडणारं पत्र लिहिणार.. मग तूही त्याला आपल्या गोळीबंद शैलीत उत्तर लिहिणार.. अशी आपली ही मतर-कथा छान रंगली होती. निदान मला तरी तसं वाटत होतं. पण असं म्हणतात की, कथा कितीही चांगली आणि हवीहवीशी असली तरी कथेला अंत हवा, नाहीतर तिचा ‘डेली सोप’ होतो! दादू, मत्रीच्या हक्काने तुला एक सांगू इच्छितो- माझं हे पत्र वाचून त्यावर तुझं उत्तराचं शेवटचं पत्र तेवढं पाठव. माझ्या बाजूने हा पत्रव्यवहार मी थांबवल्यानंतर तूदेखील मला (किंवा आणखी कुणालाही) वर्तमानपत्राद्वारे पत्र लिहीत राहू नकोस. काय आहे दादू, की या वर्षभराच्या काळात मी तुझ्याबाबतीत थोडासा पझेसिव्ह झालोय. तूही माझ्यासारखा सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तुला याची कल्पना असेलच की, रात्री उशिरा आपल्याला गुड नाइट केल्यानंतरही गर्लफ्रेंड ऑनलाइन राहिली तर आपल्यासारख्या लिमिटेड प्रामाणिक असलेल्या माणसाच्या हृदयाची किती घालमेल होते!

शहाणेसुरते लोक (म्हणजे नाना पाटेकरपासून विश्वास नांगरे-पाटलांपर्यंत ज्यांच्या नावे सोशल मीडियावर चोवीस तास ज्ञानदानयज्ञ सुरू असतो ते!) म्हणतात की, माणसाने अधूनमधून एके ठिकाणी थांबून आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं पाहिजे, आयुष्याचं सिंहावलोकन केलं पाहिजे. पण तुला सांगतो दादू, छोटय़ा-मोठय़ा यशाचा टिळा एकदा का कपाळी लागला की अजिबात मागे वळून न पाहणारे लोकही असतात. अशा कधीही मागे वळून न पाहणाऱ्या लोकांना पुढे जाऊन मोठं यश भलेही लाभत असेल, पण स्वच्छतागृहात फ्लश न केल्याबद्दल शिव्या खाणं काही त्यांच्या नशिबातून टळत नाही. असो!

मित्रा, काळ पुढे चालतच राहतो आणि आपले पाय मात्र भूतकाळात रुतून बसलेले असतात. हा भूतकाळ केवळ आपल्या चेहऱ्यावर, आपल्या काळजात, आपल्या डोळ्यांत कोरला जातो, पण पुन्हा कधी गवसत मात्र नाही. आपण कॅलेंडर आणि घडय़ाळ घेऊन काळाचे तुकडे पाडतो आणि गेलेल्या काळात काय कमावलं आणि काय गमावलं याचा ताळेबंद मांडत बसतो. सोने-नाणे, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, नोकरीतली इन्क्रिमेंट, प्रमोशन, धंद्यातली उलाढाल, राष्ट्राचा जीडीपी अशा नानाविध फुटपट्टय़ा लावून आपल्या यशापयशाचं मोजमाप करत राहतो. त्यातून साध्य काहीच होत नाही. एक तर अपयशाचं भूत नव्याने मानगुटीवर मांड ठोकून बसतं किंवा यश टिकवण्याच्या आणि वाढवण्याच्या जबाबदारीचा आपल्या झोपेबरोबर ‘बार्टर एक्स्चेंज’ होऊन जातो.

दादू, मी अशा लौकिक गोष्टींचा ताळेबंद मांडण्यावर विश्वास ठेवणारा माणूस नाहीये. गेलेल्या काळात दुरावलेली किती नाती सांधण्यात आपल्याला यश आलं? किती नवीन सुहृद आपण गोळा केले? कुणाच्या जीवनात आपल्याला अल्पसा का होईना; आनंद फुलवता आला? आपल्यामुळे कुणाचं दु:ख हलकं झालं का? निदान आपण कुणाच्या दु:खाला कारणीभूत तर ठरलो नाही ना? असे प्रश्न माझे मलाच मी विचारतो आणि डोळे मिटून आत पाहिलं की या सगळ्या उत्तरांचं पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन सुरू होतं. तुला सांगतो दादू, त्या प्रेझेन्टेशनच्या ग्राफिक्समध्ये नात्यांमधली त्रिज्या वाढताना दिसली की आपुलकीचा परीघ आखडत चाललाय हे माणसाने समजून जावं!

मित्रा, तसं पाहिलं तर लौकिक आयुष्यातही माझं काही वाईट चाललंय अशातला भाग नाही. एकेकाळी मी ‘जॉब सॅटिसफॅक्शन नाही’ या सबबीखाली नोकऱ्या बदलायचो. आज (बाजारातील मंदीमुळे) माझ्याकडे कसा का होईना- जॉब आहे, या गोष्टीतच सॅटिसफॅक्शन मानण्याइतपत परिपक्वता माझ्यात आलीय. या वर्षांच्या सुरुवातीला माझ्यावर तीन वेगवेगळ्या बँकांचं कर्ज होतं. बँकांच्या विलीनीकरणामुळे आता माझ्यावर एकाच बँकेचं कर्ज आहे. त्याबद्दल मी सरकारचा, रिझर्व बँकेचा आणि बँका बुडवून परदेशी गेलेल्या सर्व उद्योगपतींचा आभारी आहे. ज्यांना आपण मोठय़ा हौसेने निवडतो ते नंतर आपलं ऐकत नाहीत, हा नेत्यांपासून बायकोपर्यंतचा सार्वत्रिक अनुभव असल्याने त्याविषयी तक्रार करण्यात काही हशील नाही. तसा मला बायकोच्या बडबडीचा थोडाफार त्रास आहे, पण पुढील वर्षी तिला मावा किंवा गुटखा खायला शिकवायचा माझा संकल्प आहे. त्यामुळे तोही प्रश्न लवकरच सुटेल अशी आशा आहे. सरत्या वर्षांत माझ्या मुलींच्या शाळेतून त्यांच्याबद्दल एकही तक्रार आली नाही, त्या अर्थी त्यांचंही सारं काही ठीक चाललं असावं. बाकी त्यांनी माझ्या ऑफिसातल्या ‘अ‍ॅप्रायझल’विषयी मला विचारू नये आणि त्यांच्या परीक्षांतील रिझल्टविषयी मी त्यांना विचारू नये असा आमचा सव्वा लाखाच्या झाकल्या मुठीचा अलिखित करार आहे.

यार दादू, घाई आहे म्हणून चहाही न घेता निघणारी बाई जाता जाता दरवाजापाशी तासभर गप्पा मारत उभी राहते, तशी आज माझी अवस्था झालीय. एकेकाळी ‘पत्रास कारण की.. न सापडल्याने मी हल्ली पत्रच लिहीत नाही. पत्र लिहायलाही कारण लागतं. विनाकारण लिहायला ती काय कविता आहे काय?’ असं म्हणणारा मी वर्षभर सातत्याने तुला पत्र लिहू शकलो याचं माझं मलाच कौतुक वाटतं. माझ्या काही पत्रांत आणि बोलण्या-चालण्यात देवेंद्र, नरेंद्र, डोनाल्ड, बोरीस, पुतीन या व्यक्तींचा प्रथमपुरुषी एकवचनी उल्लेख होतो म्हणून काही मित्रांनी आक्षेप नोंदवला होता. पण तुला सांगतो दादू, एकेरी उल्लेख केल्यानं आणि मिठय़ा मारल्यानं जिव्हाळा वाढतो असं माझं सांप्रतकाळचं निरीक्षण आहे. असो.

दादू, घसरून पडलेल्यांच्या अंगाखांद्यावर पाय देऊन ट्रेनमध्ये चढणाऱ्या लोकांच्या या देशात- मी आणि माझा हा पत्रव्यवहार आज थांबत असला तरी माझ्या थांबण्यामुळे काळ-वेळ, मित्र, समाज, देश, जग काहीच थांबणार नाही याची मला कल्पना आहे. बाकी काही पुढे जावो- न जावो, आपला देश तर पुढे जाणारच आहे. कुणीतरी म्हटलं आहेच की, ज्या देशाच्या तुरुंगातही संत-महात्मे राहतात तो देश पुढे न गेला तरच नवल!

‘मी आश्वासन दिलं नाही, मी पंधरा लाख देणार नाही’असा टिळकांचा ‘लॉ ऑफ टरफले’ ऐकवणाऱ्यांच्या या देशात- दादू, आज मी तुला आश्वासन नाही तर वचन देतो की, मी पुन्हा येईन. सभ्य माणसं आश्वासन देत नाहीत तर वचन देतात आणि दिलेलं वचन निभावतात. ‘सभ्य स्त्रिया कुणाकडून काही मागत नाहीत, त्या फक्त थँक्यू म्हणतात’ ही प्रसिद्ध उक्ती तुला ठाऊक असेलच. त्या उक्तीला स्मरून मी वचन देतो की, मी नक्की येईन. पण तू हक्काने बोलावणार आणि प्रेमाने स्वीकारणार असशील तरच! माझं लिहिणं, बोलणं, माईकसमोर किंचाळणं (माझ्या बायकोचं गाणं ऐकणं आणि व्हिडीओ अल्बम पाहणं) मी कुणावर लादणार नाही. खरं म्हणजे मी पुन्हा येईन असं म्हणणंही चुकीचंच आहे रे दादू. केवळ मी नाही, तर आपण दोघेही पुन्हा येऊ! नक्की येऊ!

दादू, येणाऱ्या नवीन वर्षांत तुला आणि माझ्या सर्वच मित्रपरिवाराला फुकट काहीच मिळू नये आणि चांगल्या उद्देशानं तुम्ही केलेले कोणतेही कष्ट फुकट जाऊ नयेत, कुणाच्या स्वातंत्र्याला धक्का न लावता तुम्हाला मनाजोगतं खायला, प्यायला, ल्यायला, वाचायला, पाहायला, ऐकायला, वागायला मिळावं. जे पटत नाही त्याविषयी जाहीरपणे व्यक्त होण्याचं आणि तरीही निर्भयपणे मॉìनग वॉकला जाण्याचं भाग्य तुम्हाला लाभावं, हीच शुभेच्छा! तू जर पंचांगाप्रमाणे नवीन वर्ष साजरं करत असशील तर याच शुभेच्छा सध्या फ्रीजमध्ये ठेवून गुढीपाडव्याला वापरल्यास तरी हरकत नाही.

तुझा (अल्प)मतवाला मित्र

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ill be back again tapalki article abn