रोमन साम्राज्याच्या बहराच्या काळातला एक पुतळा इ. स. १५०१ मध्ये खोदकाम करताना रोम शहरात एका नाक्यावर सापडला. तिथेच एका चबुतऱ्यावर तो बसवण्यात आला. आता अशा स्थानापन्न झालेल्या पुतळ्यानं काय करावं? … तर कावळ्यांना, कबुतरांना टेकायला जागा द्यावी. आजूबाजूला घडतंय ते फक्त पाहावं. बाकी काही करू नये. पण हा पुतळा जरा विचित्र निघाला. रोममधल्या सत्ताधीशांनी केलेल्या कारनाम्यांवर दाहक टिप्पणी करणारे विचार या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर चिकटवलेल्या चिठ्ठ्यांमधून उमटू लागले. येणारे-जाणारे ते वाचून चपापू लागले. कधी पवित्र रोमन सम्राटाबद्दल, कधी पोपच्या उधळपट्टीबद्दल, कधी कुणा नेत्यांबद्दल काही ना काही विचार या चबुतऱ्यावरच्या चिठ्ठ्यांमध्ये एकाएकी प्रगट होत. असं म्हणतात की, आजूबाजूच्या घडामोडींवर शेलकं भाष्य करणाऱ्या पास्कीनो नावाच्या शिवणकाम करणाऱ्या कारागीरानं हा वात्रटपणा सुरू केला. पुतळ्याला ‘पास्कीनोचा पुतळा’ असं नाव मिळालं. पण तरी या पुतळ्याचा ‘बोलविता धनी’ कोण ते नक्की कधीच कळलं नाही. या चबुतऱ्यावर उमटणाऱ्या वात्रटिका आणि कवितांपासून प्रेरणा घेऊन रोममधले आणखीनही असेच चार-पाच पुतळे ‘बोलू’ लागले. त्यांना ‘रोममधले बोलके पुतळे’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सुरुवातीला पोपनं अगदी देहान्त शासनाचाही धाक घालून ही पुतळ्यांची बडबड थांबवण्याचे प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले. आता तशी धडपड शासनानं सोडून दिली आहे. सोळाव्या शतकापासून आजतागायत ही परंपरा कायम आहे. घडणाऱ्या-बिघडणाऱ्या वास्तवाबद्दल अनामिक राहूनही विरोधाचे तिरकस उद्गार मोकळेपणानं मांडायला या पास्कीनोच्या पुतळ्यामुळे एक हक्काची जागाच गेली पाचशे वर्षं रोममधल्या जनतेला मिळालेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा