आज, १५ मार्च! कवी आणि गीतकार सुधीर मोघे यांचा पहिला स्मरणदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या भगिनी हेमा श्रीखंडे यांनी जागविलेल्या आपल्या धाकटय़ा भावाच्या आठवणी..
गे ल्या वर्षी याच तारखेला दीड महिन्याच्या आजारपणाचे निमित्त होऊन सुधीर अंतर्धान पावल्यासारखा हे जग सोडून गेला. सगळ्यांना चटका लावून गेला. सतत विविध प्रकारच्या कामांत गुंतलेला उत्साही सुधीर नेहमीप्रमाणे अचानक समोर येऊन उभा राहील असे अजूनही वाटत राहते.
त्याचे कलाक्षेत्रातील विविधांगी कार्यकर्तृत्व सर्वज्ञात आहेच. माझ्या मनात मात्र आज तो लहान असल्यापासूनच्या खूप घरगुती, कौटुंबिक आठवणींची गर्दी दाटून येते आहे.
माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा दादा (श्रीकांत) आणि पाच वर्षांनी लहान सुधीर! या दोन कलावंत भावांची मी मधली बहीण. शेजारी काकांचे कुटुंब होते. आम्ही एकत्र कुटुंबासारखे वाढलो. आमचे वडील राम गणेश मोघे हे एक बहुगुणी व्यक्तिमत्त्व होते. खेडेगावात शिक्षण घेणे अवघड झाल्यावर ते दोघे भाऊ कराड-औंधकडे येऊन वार लावून, पूजा करून, कामे करून आपले शालेय शिक्षण पूर्ण करू शकले. औंधच्या हायस्कूलमध्ये बापूरावांची संस्कृत नाटकातील कर्णाची भूमिका, गाणे, वक्तृत्व हे सगळे पाहून औंधकर महाराजांनी त्यांना कीर्तन करण्यास उद्युक्त केले. त्यांनी कॉलेजची दोन वर्षे कष्टांतून पूर्ण केली. पण आर्थिकदृष्टय़ा अशक्य झाल्यावर दोघे भाऊ किलरेस्करवाडीला येऊन कंपनीत नोकरीला लागले. पण तिथे थोडे स्थैर्य लाभल्यावर तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांतून त्यांचा सहभाग वाढत गेला. नोकरीशिवाय त्यांचा संतसाहित्याचा अभ्यासही सुरू होताच. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम ही त्यांची दैवते होती. त्यामुळे त्यांच्याकडून जाता-येता, कीर्तनांतून खूप काही आम्हाला ऐकायला मिळत असे. शक्य होईल तशी उत्तमोत्तम पुस्तके त्यांनी जमवली होती. त्यामुळे आम्हा भावंडांना वाचनाची गोडी लागली. आई-वडील गोड गळ्याने गाणारे होते. त्यामुळे आम्ही तिघेही सदैव गाण्यांत रमलेले असू. किलरेस्करवाडी कारखान्याभोवती साडेतीनशे घरांची वसाहत असली तरी ‘किलरेस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ ही मासिके तिथूनच निघत. त्यांचे उत्साही संपादक शं. वा. किलरेस्कर यांच्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची तिथे रेलचेल असे. शास्त्रीय संगीत, नाटके, उत्तम भाषणे, काव्यगायने असे जे काही असेल त्या कार्यक्रमांना आम्हाला बरोबर नेण्याचा आई-वडिलांचा परिपाठ असल्यामुळे हे सर्व उदंड ऐकायला मिळत होते. शिवाय गणेशोत्सव, शाळेचे स्नेहसंमेलन यांत आम्ही असण्याला पर्यायच नव्हता. ‘बक्षीस मिळो- न मिळो, सगळ्या स्पर्धातून भाग घ्या. भरपूर वाचा, मोकळ्या हवेत भरपूर खेळा..’ असे बापूरावांचे प्रोत्साहक सांगणे असे. नोकरीशिवाय मिळकतीचे अन्य साधन नसूनही पायी चालत तीन-चार मैलांवरच्या कुंडलच्या डोंगरावर कधी सहलीला, तर कधी कृष्णा नदीचा पूर बघायला ते आम्हाला हौसेने घेऊन जात. त्यांचे पाठांतर प्रचंड होते. त्यातली स्तोत्रे, जुन्या कविता ते आम्हाला शिकवत, ऐकवत. स्वच्छ, शुद्ध शब्दोच्चार होतील याकडे कटाक्षाने लक्ष देत. आमच्या दोन्ही कुटुंबांतील भावंडे त्या साध्यासुध्या जगण्यातही मोठा आनंद घेत. सातारा जिल्ह्य़ाची स्वच्छ, कोरडी हवा, निसर्गरम्य परिसर, किलरेस्करांनी जाणीवपूर्वक ठेवलेली प्रचंड मोठी मैदाने, विविध खेळ, आखीवरेखीव रस्ते, मागे-पुढे अंगण असलेली छोटी घरे अशी टुमदार वसाहत आणि जात, धर्म, दर्जा असले काही न मानता माणसातील गुणांना महत्त्व देणारे किलरेस्कर कुटुंबीय-चालक अशा वातावरणात खूप काही आमच्या गाठीशी साठत गेले.
सुधीर एक वर्षांचा होता तेव्हा बापूरावांची दोन वर्षांसाठी ऑफिसकडून लखनौला बदली झाली. तिथून परतल्यावर हळूहळू मोठा होताना त्याचे स्वत:मध्ये रमणे दिसू लागले. घरातल्या सोंगटय़ा, बुद्धिबळ घेऊन त्यांची सैन्ये बनवून लढाया व्हायच्या. गोष्टींची पुस्तके वाचण्याची आवड वाढू लागली. दोन्ही घरच्या भावंडांत तो खूप रमायचा. आज सांगितले तर खरे वाटणार नाही, पण तेव्हा तो बुजरा होता. मात्र, संध्याकाळी अंगणातल्या बाकावर धाकटा चुलतभाऊ सुहास, मित्र बाळू व सुदामा यांच्याशी मनसोक्त गप्पा मारण्यात सुधीर हीरो! टारझन, रॉबिनहुड वगैरेंच्या कथा रंगवून सांगण्यात त्याचा हातखंडा असे. शाळेत दंगा करणाऱ्यांत, तसंच फार मोठा अभ्यास करणाऱ्यांत तो नसायचा. पण एकूण आजच्या भाषेत तो ‘कूऽऽल बंडू’ मात्र होता. नाटकांत भूमिका, दिग्दर्शन, एखाद्या समारंभात अचानक बोलायला सांगितले तरी उत्तम उदाहरणे व संदर्भ देत बोलणे, कीर्तन अशा अनेकविध गोष्टींत उत्साहाने वावरणारे बापूराव आम्ही सतत पाहत होतो. गुरुवारी घरी भजन असे. त्यात ‘देवाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ’, ‘ये गं ये गं विठाबाई’ आदी रसाळ अभंग बापूराव आणि त्यांची मित्रमंडळी अगदी आळवून गात. आम्हाला ही भजने ऐकायला खूप आवडे. सुधीरच्या मनात यातले काय काय रुजत गेले, ते त्याचे त्यालाच माहीत!
सुधीर साधारणपणे सातवी-आठवीत होता आणि त्याने घरातच ‘बुडबुडा’ नावाचे हस्तलिखित साप्ताहिक सुरू केले. वाडीत घडणाऱ्या घटनांविषयी विनोदी स्वरूपात लिहिणे असे या संपादकबुवांचे धोरण होते. सोबतीला बाकावरचा मित्रकंपू टेकू लावायला होताच.
वाडीच्या संरक्षणासाठी पोलीस शिपाई होतेच; परंतु इथल्या नागरिकांनाही कारखान्यात बनवलेले ओतीव, बोथट टोकांचे अवजड भाले देण्यात आले होते. गावाबाहेरील वस्तीवर कुठे दरोडा वगैरे पडल्यास प्रसंगी भाले घेऊन मदतीला धावून जाण्याची पद्धत होती. एकदा ऑफिसच्या एका मजल्यावर आग लागली तरी लांबचे लोक भाले घेऊनच आले. ते मग बाजूला ठेवून आग पाण्याने विझवावी लागली. त्यावर दुसऱ्या दिवशीच्या ‘बुडबुडय़ा’मध्ये संपादकीय लेख होता : ‘आगीवर उपाय- भालाफेक.’
‘बुडबुडा’चे बरेच अंक साठल्यावर गठ्ठा घेऊन स्वारी थेट संपादक शं. वा. किलरेस्कर (बापूरावांचा त्यांचा चांगला स्नेह होता.) यांच्याकडे पोचली. ‘अभिप्राय हवा’ ही विनंती झाली. त्यांनी दोन-तीन दिवसांनी बोलावले. म्हणाले, ‘शेवटच्या पानावर अभिप्राय बघ.’ शंकरअण्णांनी व्यंगचित्र रेखाटले होते : संपादक ‘बुडबुडा’ पाश्र्वभागाला पाय लावून पळताहेत आणि हातात सोटे घेतलेले वाडीकर त्यांचा पाठलाग करताहेत. खाली वाक्य होते- ‘सांभाळा होऽऽ संपादक.’ अर्थात सुधीरला मनापासून भरघोस शाबासकी द्यायलाही ते विसरले नाहीत. पण ही वार्ता कळल्यावर घरी सगळ्यांची हसून पुरेवाट झाली.
यानंतरचा छंद सुरू झाला रेडिओ ऐकण्याचा! लहान घरात शोभेलसा छोटासा रेडिओ आल्यावर पुणे-मुंबईचे कार्यक्रम सगळे घर ऐकत असे. पण रेडिओ सिलोन, पाकिस्तान यावरची हिंदी चित्रपटगीते, गैरफिल्मी गीते अगदी वेड म्हणावे अशी ऐकणे हा सुधीरचा आवडता छंद होता. अमीन सयानी, गोपाल शर्मा या निवेदकांची मिठ्ठास हिंदी ऐकताना आणि रविवारी रात्री रेडिओ सिलोनवरचे ‘आपके अनुरोधपर’ ऐकायला बसला की शेवटी श्रीलंकेचे राष्ट्रगीत संपेपर्यंत रेडिओपासून हलण्याचे नाव नसे. नंतर बऱ्याच वर्षांनी सुधीरचे सांगीतिक कार्यक्रम बघताना लक्षात येऊ लागले की, लहान वयातल्या त्याच्या त्या मन:पूर्वक श्रवणातून चित्रपट संगीत, गीतकार, संगीतकार, निवेदन, विविध कार्यक्रमांतील बारकावे याविषयीचा त्याचा केवढा अभ्यास मनातच घडला असेल! ‘करार लूटनेवाले करार को तरसे’ हे हृदयस्पर्शी गीत गाणाऱ्या पाकिस्तानच्या मुनीर हुसेन या गायकावरचा विलक्षण सुंदर लेख ‘निरंकुशाची रोजनिशी’ या त्याच्या पुस्तकात वाचताना याचे प्रत्यंतर येते.
दादा सांगलीहून कॉलेजच्या सुटीत आला की नवी भावगीते, तलतची गाणी गाऊन दाखवी. आम्हाला शिकवी. या दोन भावांनी घरातल्या हार्मोनियमवर हात चालवत पेटीवादन हस्तगत केले. बापूराव सांगलीला गेले की निवडक नव्या ध्वनिमुद्रिका आणत. त्यामुळे फोनोग्राफवर त्या सतत लावून दोघांचे श्रवणकार्य चाले.
सुधीर मॅट्रिकला असण्याच्या आगेमागे कविता लिहू लागला. साधारणत: ५७-५८ च्या सुमारास ‘पंडितराज जगन्नाथ’ नाटकाचे ५०० प्रयोग झाले. त्यानिमित्ताने भालचंद्र पेंढारकर यांनी ‘समस्यापूर्ती.. काव्यातून!’ अशी स्पर्धा जाहीर केली. मुंबईच्या वर्तमानपत्रातली ही माहिती सुधीरला कळवली. कवितेच्या चार-पाच एकेरी ओळी दिलेल्या होत्या. त्यातील एक ओळ निवडून कविता लिहायची होती. सुधीरने कविता पाठवली की नाही, कळले नाही. दोन महिन्यांनी वर्तमानपत्रातूनच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. त्याकाळी खणखणीत दीडशे रुपयांचे पहिले बक्षीस कवी सुधीर मोघे याला जाहीर झाले होते. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्याने लिहून पाठविलेली ती कविता अशी होती.. त्याने निवडलेली ओळ होती- ‘कवन असे विसरेल कुणी का?’
मूर्तिमंत कारुण्य जन्मले अदय अहेतुक क्रौंचवधातुन
मेघदूत जगि चिरंजीव हो विरहि जनांच्या विरहव्यथेतुन
वंचनेतल्या वेदनेतुनी तेजस्वी शाकुंतल घडले
बृहत्कथेस्तव गुणाढय़ कविने निजरक्ताचे सिंचन केले
व्यथा बोलते काव्य चिरंतन,
सत्य कुणी हे नाकारिल का?
मरणि अमरता चेतविणारे
कवन असे विसरेल कुणी का?
तेव्हा पाठ झालेल्या त्याच्या या ओळी कायम मनात वास्तव्याला तर राहिल्याच; पण ही कविता वाचताना मन अचंबित होत राहिले. आणि त्या क्षणी सुधीरच्या प्रतिभेला मनाने जे ‘मानले’ ते पुढे वृद्धिंगतच होत गेले.
पदवीधर झाल्यावर किलरेस्करवाडीतच बिझिनेस ऑफिसमध्ये त्याने नोकरीला सुरुवात केली. त्यात त्याचे मन फारसे रमत नव्हते. पण त्याची भरपाई सांस्कृतिक कार्यक्रमांत रस घेत, नाटकांतून भूमिका, गाणे, दिग्दर्शन असे करत केली जात होती.
आपले कुटुंब, भावंडे, मित्रमंडळी यांविषयी सुधीरला खूप जिव्हाळा होता. त्याचा अनुभव आम्ही आयुष्यभर घेतला. पुण्या-मुंबईत नाटय़क्षेत्रात दादाची धडपड चालू होती. पुढील काळात आई-बापूरावांना मुंबईत राहणे झेपणार नाही म्हणून डिपॉझिट भरून पुण्यात एक ब्लॉक घेतला होता. तो सुधीरला वाडीतली नोकरी सोडून पुण्यात आल्यावर आई-बापूरावांना घेऊन राहायला सोयीचा ठरला.
मुलांमधील गुणांचे आई-बापूरावांना कौतुक होते. त्यामुळे थोडे गैरसोयीचे झाले तरी मुलांच्या धडपडीला यश येईलच अशी मनाशी खात्री बाळगत दोघांनी मुलांना प्रोत्साहन दिले. लग्नानंतर मी मुंबईत होते. आम्हाला दोघे वरचेवर भेटत. सुधीरचे भाषण वा मुलाखत ऐकताना लक्षात येई की, आपले म्हणणे नेमकेपणाने व्यक्त करणे, बोलताना वाहवत न जाणे, ही त्याची विशेषता होती. विचारांची घट्ट बैठक, वाचिक सामथ्र्य आणि लख्ख स्मरणशक्ती ही त्याची कारणे होती. आपल्या प्रचंड पाठांतराचा योग्य जागी समर्पक उपयोग तो सहजपणे करीत असे. त्याच्या स्मरणशक्तीबद्दलच्या दोन आठवणी..
पाल्र्यात आमच्या जवळ राहणाऱ्या विमलताई एके दिवशी माझ्याकडे एक वही घेऊन आल्या. म्हणाल्या, ‘रिक्षातून जाताना मला ही वही मिळाली. कविता लिहिलेल्या दिसताहेत. कुठेतरी फक्त ‘सुधीर’ नाव दिसले. पत्ता वगैरे काही नाही. मी बऱ्याच लोकांना विचारले. तेव्हा कुणीतरी मला तुमच्याकडे पाठवले.’ मी बघते तर अक्षर सुधीरचेच! पुढे केव्हातरी सुधीर मुंबईत आला तेव्हा त्याला ही हकीकत सांगून मी ती वही दिली. आपण ती रिक्षात विसरलो वगैरे त्याच्या गावीही नव्हते. म्हणाला, ‘असं झालं होऽऽय? अगंऽऽ! पण नस्ती मिळाली, तरी मी त्या पुन्हा लिहिल्या असत्या.’ ही वही आणि त्यातील चार-चार ओळींच्या सव्वाशे कविता म्हणजे नंतर झालेले ‘शब्दधून’ हे पुस्तक!
फार पूर्वी त्याच्या या कुवतीचा आम्ही अनुभव घेतल्याची एक घटना स्वच्छ आठवते. सुधीर दहावीत असेल. मिरजेचे बुद्धिबळपटू म्हैसकर सर त्याला मराठी शिकवीत. सुधीर भाषेमुळे त्यांचा आवडता विद्यार्थी होता. लिहून आणायला सांगितलेला निबंध सरांनी वर्गातल्या चार-पाच मुलामुलींना वाचायला सांगितल्यावर जेव्हा सुधीर त्याचा निबंध वाचायला लागला तेव्हा त्याच्या शेजारी बसलेला मुलगा खाली मान घालून हसताना सरांनी पाहिला. ‘काय रे? हसायला काय झालं?’ असं विचारल्यावर त्या मुलाने जरासं अनमान करत सांगितलं की, ‘सुधीरच्या वहीत काहीच लिहिलेलं नाहीए.’ सरांनी त्याबद्दल विचारल्यावर सुधीरने कबूल केलं. आता सर हे बापूरावांना सांगणार म्हणून स्वारी गडबडली. चार-पाच दिवसांनी बापूरावांना भेटून सरांनी ही हकीकत सांगितलीही; पण त्या सांगण्यात तक्रारीपेक्षा त्यांना वाटलेलं मोठं आश्चर्य आणि कौतुकच जास्त होतं. कवी-गीतकार म्हणून सुधीरचे नाव सर्वतोमुखी होऊ लागले तेव्हा वृद्धावस्थेतल्या म्हैसकर सरांचे सुधीरचे कौतुक व अभिमान वाटत असल्याचे कार्ड मिरजेहून आलेले मी वाचले होते.
एकच गोष्ट कायम करत राहण्याचा सुधीरला कंटाळा होता. नोकरी सोडायची असा एकदा निश्चय झाल्यावर त्याने सरळ राजीनामा दिला. आपल्याला यापुढे अनिश्चित जीवन जगावे लागेल, हे ठाऊक असूनही! ७४-७५ मध्ये सुरू झालेले चित्रपटांसाठीचे त्याचे गीतलेखन ८७ पर्यंत ऐन बहरात होते. परंतु आपण मूलत: कवी आहोत, तेव्हा आयुष्यभर गीतलेखन करायचे नाही, या विचारासरशी हे काम तो थांबवत गेला. ‘सगळं चांगलं चाललंय तर हा संन्यास कशाला?’ असे त्याचे गुण जाणणाऱ्या, त्याच्याबद्दल आपुलकी असणाऱ्या शांताबाई शेळक्यांनी त्याला म्हणून झालं. पण सुधीरचा निश्चय बदलला नाही. ‘कविता पानोपानी’ हा त्याचा कार्यक्रम २० वर्षे चालला होता. पण तोही त्याच्या ठरवण्यानुसार! या सगळ्यातून लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली तरी त्याचे त्याला फार आकर्षण नव्हते. उत्कृष्ट दर्जा हे सुधीरच्या कलाकृतींचे वैशिष्टय़ रसिकांची मने जिंकून गेले आणि यश, नाव त्याच्या दिशेने आपसूक दौडत आले. अशावेळी सुधीरकडे अगदी त्रयस्थपणे पाहूनही अगदी मनापासून त्याचे कौतुक करावे असा त्याच्यातला एक दुर्मीळ गुण मला प्रकर्षांनं जाणवला. मिळालेल्या यशाने प्रसिद्धीसाठी आसुसलेला, हव्यासी झालेला सुधीर मी कधीच पाहिला नाही. अंत:स्फूर्तीतून जे करावेसे वाटले ते त्याने जीव ओतून केले. प्रतिभेला कल्पनाशक्तीची जोड देऊन आणि अविरत कष्ट करून त्याने सगळे प्रत्यक्षात आणले. यशाने हुरळून न जाण्याचा आणि अपयशाने नाउमेद न होण्याचा त्याच्यामधील स्थितप्रज्ञ भाव एका प्रसंगात माझ्या अनुभवास आला. ‘एकाच या जन्मी जणू’ हे ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटातले फार गाजलेले गीत राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडले गेले होते. नियमानुसार प्रादेशिक भाषेतील गीताबरोबर गीताचा इंग्रजी तर्जुमा पाठवावा लागतो. तो वेळेवर पाठवला गेला नाही. त्यामुळे जया भादुरी आदी परीक्षकांना ते गीत फार आवडलेले असूनही त्याची पुरस्कारासाठी निवड झाली नाही. सुधीरचे एक ज्येष्ठ निकटवर्ती स्नेही त्यावेळी दिल्लीला गेले होते. त्यांच्याकडून ही वार्ता खात्रीलायकपणे मला समजली. काही दिवसांनी मला भेटल्यावर हे सर्व सांगताना ‘असे असे झाले’ याखेरीज नॅशनल अॅवार्ड हा मोठा सन्मान हुकल्याचा कोणावर राग वा वैताग असली कसलीही प्रतिक्रिया सुधीरकडून व्यक्त झाली नाही. सुधीरच्या मूळ स्वभावाला हे इतके धरून होते, की मला त्याचे आश्चर्यही वाटले नाही. अनेक मान्यवरांनी त्याच्यावर लिहिताना त्याच्या फकिरी वृत्तीचा उल्लेख केला होता. ती गोष्ट अक्षरश: खरी होती. देवधर्म, अंधविश्वास आणि तशा गोष्टींची अवडंबरे यांचा सुधीरला मनापासून तिटकारा होता. पण निसर्गात परमेश्वराची जी रूपे त्याला जाणवली आणि त्याच्या काव्यातून व्यक्त झाली, ती फारच हृद्य आहेत. त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञानही सहजसुंदर शब्दांतून समोर येते.
वयाच्या सत्तरीनंतर श्रवणशक्ती पूर्ण गेल्यावर कार्यक्रमांना जाणे बापूरावांनी थांबवले. पण सुधीरचे सर्व तऱ्हेचे लेखन ते आवर्जून वाचत आणि दाद देत. चाली लावलेली गाणी, कविता सुधीर आईला ऐकवी आणि गाण्यावर फार प्रेम असलेली आई त्याचा मनापासून आनंद घेई.
कॉम्प्युटर वापरण्यात स्वत:च्या प्रयत्नांनी तो वाकबगार झाला होता. पेटीवादन, चित्रकला, गाडी चालवणे हे त्याचे आवडीचे छंद होते. ‘अन्फरगेटेबल अनयुझ्युअल्स’ या नावाने खूप जुन्या हिंदी चित्रपटांपासूनची संस्मरणीय गाणी त्याने संकलित केली होती. मराठी भावगीतांचा इतिहास व कोश लिहिण्याचे काम पूर्ण करत आणले होते. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘सती’ या कथेवर चित्रपट करण्याची फार वर्षांची त्याची इच्छा ‘विमुक्ता’ या चित्रपटातून साकार होणार होती. त्याचं संगीत आनंद मोडक देणार होते. पटकथा-संवाद, गीते, दिग्दर्शन हे सगळे सुधीर स्वत: करणार होता.
‘अमृतवर्षिणी’ ही ज्योत्स्नाबाई भोळ्यांवरची फिल्म त्याने पूर्ण केली होती. किलरेस्कर उद्योगसमूहाला २०१० मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्यावरील माहितीपट करण्याची जबाबदारी किलरेस्करांनी नि:शंकपणे सुधीरवर सोपवली आणि त्याने या संधीचे सोने करून ‘आधी बीज एकले’ हा माहितीपट म्हणजे आरंभीच्या अपरिमित कष्टांपासून भविष्यात किलरेस्कर उद्योगसमूहाने उभ्या केलेल्या जगभरातल्या यशस्वी प्रवासाचा कायमचा दस्तावेज निर्माण केला.
असा चतुरस्र प्रतिभेचा सुधीर आज काळाच्या पडद्याआड गेला असला तरीही त्याच्या अनेकानेक भावस्पर्शी कवितांतून, बहुविध कलाकृतींतून तो सतत आमच्याबरोबर आहे, असणार आहे, हा विश्वास सोबत आहेच.
सुधीर..
आज, १५ मार्च! कवी आणि गीतकार सुधीर मोघे यांचा पहिला स्मरणदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या भगिनी हेमा श्रीखंडे यांनी जागविलेल्या आपल्या धाकटय़ा भावाच्या आठवणी..
आणखी वाचा
First published on: 15-03-2015 at 03:37 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In memories of sudhir moghe