ऊर्जा हे काय प्रकरण आहे? जगात पदार्थ आहे, पोकळी आहे आणि ऊर्जा आहे. सारे विश्व या तीन गोष्टींचा खेळ आहे. ऊर्जा ही पदार्थात बदल घडवते. त्याला हलवते. ऊर्जा पोकळीतून जाऊ शकते. ऊर्जेमार्फत आपल्याला काही हवे ते करून घ्यायचे असेल तर तिला किंचित अवरुद्ध करून मग योग्य मार्ग दाखवायचा असतो. हे अवरुद्ध करणे प्रमाणाबाहेर झाले किंवा अवरुद्ध करणाऱ्या पदार्थाच्या क्षमतेचा हेर झाले, तर ऊर्जा ही भयानक स्फोटाद्वारे आपला मार्ग शोधून काढते आणि नाहीशी होते. यात अतोनात ‘नुकसान’ होते. नुकसान ही मानवी संकल्पना आहे. निसर्गात नुकसान असे काहीही नसते. फक्त बदल असतो. ही ऊर्जा अणुऊर्जा असेल तर चेर्नोबिल किंवा फुकुशिमा- सारखे भयानक अपघात होतात. ही ऊर्जा जर विद्युतशक्ती असेल तर झटका बसून माणसे मरतात किंवा अपंग होतात. विजेचा लोळ पडला तर भयानक हैदोस होतो. ही जर गतिमान ऊर्जा असेल तर त्या वाहनाच्या धडकेने आतील आणि बाहेरील माणसे मरतात. ही ऊर्जा जर दाबून ठेवलेली वाफ असेल तर सिलिंडर फुटून त्याच्या आकाराप्रमाणे भयानक नुकसान होते. ही जर प्राण्यांच्यात असलेली लैंगिक ऊर्जा असेल तर भयंकर लढायांपासून भीषण बलात्कारापर्यंत काहीही होऊ शकते. याच ऊर्जेचे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि भीती असे रूप असेल तर ते ज्यांना आवरता येत नाही, त्यांच्या हातून चोऱ्या, खून, दरोडे, हावरटपणा, द्वेष आणि भीतीपोटी कोणत्याही प्रकारचा हिंसक व्यवहार होऊ शकतो. वयात येताना निसर्ग ऊर्जा देतो. पण ती नियंत्रित कशी करायची, याची कोणतीही माहिती देत नाही. लगाम नसलेल्या अबलख घोडय़ावर स्वार झाल्यावर जशी स्थिती होईल तशी ती स्थिती असते.
ऊर्जेचे नियंत्रण न करता जर ऊर्जा उत्पन्न केली अगर झाली, तर त्या ऊर्जेचे दुष्परिणाम हे ठरलेलेच. किंवा ऊर्जा वाढविण्याचे प्रयत्न करीत असताना ती वाढल्यावर काय आणि कसे नियंत्रण करायचे, हे जर माहिती नसेल तर पाचर काढणाऱ्या माकडासारखी स्थिती होणे हे जवळजवळ नक्की. मूळ गोष्ट अशी : एकदा एक माकड बागडत बागडत एका लाकडी वस्तू बनविणाऱ्या कारखान्यात गेले. तिथे एका सुताराने एक मोठा ओंडका अर्धवट कापून त्यात पाचर घालून ठेवला होता. माकड त्या पाचरीकडे तोंड करून ओंडक्यावर बसले. त्याचा लोंबणारा अंडकोष त्या फटीत असताना त्याने पाचर काढायचा प्रयत्न चालविला. एका क्षणी ती पाचर निघाली आणि भयानक यातना होऊन माकड मेले.
आपण निद्रितावस्थेत असलेल्या माणसाला जर बदाक्कन् गार पाण्याची बादली ओतून जागे केले तर तो हातात मिळेल ते दांडके घेऊन आपल्याला बदडायला कमी करणार नाही. पण हळुवारपणे त्याच्या कपाळावर हात फिरवत किंवा अतिशय हलकी सुरावट त्याच्या कानाशी ऐकवली तर तो आनंदाने जागा होईल. त्याची जागी झालेली ऊर्जा आपल्या ऊर्जेशी सहयोग करेल वआपल्याबरोबर त्यालादेखील ज्ञानाचा सूर्य दिसेल. जर तो माणूस खोटा झोपला असेल आणि आपल्यापेक्षा अशक्त असेल तर गार पाण्याच्या बादल्या ओतल्या तरी तो निपचित पडून राहील आणि कितीही प्रयत्न केले तरी उठणार नाही. त्याचबरोबर त्याची झोपमोड करून त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केल्याबद्दल तो कधीतरी त्याच्या परीने त्याचा वचपा काढलेच. त्यामुळे ज्याला उठायचे नाही त्याला उठवायचा प्रयत्न करून आपली ऊर्जा वाया घालवू नये.
पिसाळलेले कुत्रे जर खड्डय़ात पडले असेल आणि त्याला बाहेर येता येत नसेल तर त्याला काढायचा प्रयत्न करताना हे माहिती पाहिजे की, ते पिसाळलेले आहे आणि आपण त्याला मदत करत आहोत हे समजण्याची त्याची कुवत नाही. त्यामुळे ते आपल्याला जवळजवळ नक्कीच चावणार. त्यामुळे सर्व काळजी घेऊन त्याला बाहेर काढणे किंवा आपल्याला ते शक्य नसेल तर त्याला मदत न करता पुढे जाणे योग्य असते. याबाबत एक अत्यंत महामूर्ख नीतिकथा आपल्याकडे प्रचलित आहे. एका तरुण संन्याशाला पाण्यात पडून वाहत चाललेला एक विंचू दिसतो. त्याला त्याचा कळवळा येतो. तो पुढे वाकून त्याला हातावर घेतो. पण तो विंचू त्याला डंख करून पळतो आणि परत पाण्यात पडून वाहून जाऊ लागतो. तो कळवळतो, पण त्याला परत उचलतो. विंचू परत डंख मारतो आणि पळतो आणि पाण्यात पडून वाहून जाऊ लागतो. एक दारूडा तिथे बसलेला असतो. तो त्याला विचारतो की, हे तुम्ही काय करत आहात? संन्याशी म्हणतो, ‘विंचवाचा धर्म डंख मारणे हा असला तरी माझा धर्म प्राणिमात्रांना मदत करणे हा आहे.’ आता तो दारूडा म्हणजे लेखकच आहे असे समजा. तो दारूडा म्हणतो, ‘अरे गाढवा, (हे मनात बरं का!) (आता प्रकट..) मदत करायचीच तर हाताने कशाला उचलायला पाहिजे? शेजारचे पिंपळाचे पान घे. त्याच्यावर काळजीपूर्वक उचल आणि दे सोडून! आणि तो विंचू रस्त्यावरून जाताना कुणी पाहिला आणि वहाणेने त्याला हाणला, किंवा एखादे वाहन त्याच्या अंगावरून गेले आणि तो मेला तर? त्यापेक्षा वाहत वाहत जाऊन एखाद्या सांदीसापटीत अडकून तो वाचला असता. त्याला मुलेबाळे झाली असती. मी त्याला वाचवतो आहे हा तुझा भ्रम आहे. गाढवा!’ (खरं म्हणजे गाढव असे कधीच वागणार नाही.. हे पुन्हा मनात बरं का!!)
समाजाचे संवर्धन करणे ही आपली सर्वाची जबाबदारी आहे. आपल्या हातून काही काम झाले तर त्यात प्रयत्न आणि नशीब या दोन्हीचा भाग असतो, हे विसरून चालत नाही. समाजातील काही घटकांना उभारी देणे आवश्यक; नव्हे अत्यावश्यक असते. पण जर कुणाला तुम्ही आणि तुमची मदत नको असेल तर त्यांच्यावर मदतीची जबरदस्ती करणे ही क्षुद्र अहंकाराची परिसीमा आहे. मी काय म्हणतो फक्त तेच तुमच्यासाठी योग्य आहे, तुम्ही असे वागलेच पाहिजे, अशी सक्ती करणे हा त्या घटकांचा एक प्रकारचा उपमर्द आहे. कुणी आपणहून नवीन काही शिकू म्हणतो आहे, करू म्हणतो आहे; त्याच्या पायात पाय घालून पाडणे आणि ज्याला शिकायचे नाही, ज्याला काहीही करायची इच्छा नाही अशांना जबरदस्तीने मदत करणे, ही आपली विशेषता आहे. त्यामुळे वर येऊ इच्छिणाऱ्यांची ऊर्जा दाबली जाते किंवा खच्ची केली जाते. आणि ज्यांना वर यायचेच नाहीए अशांना वर आणण्यासाठी भयंकर ऊर्जा खर्च होते. परिणामी एकूण समाजस्थिती- तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे राहिले, अशी सतत राहते आणि एक गचाळ माणसांचा समूह उत्पन्न होतो; जो कधी वर जात नाही, जो कधी फार खाली येत नाही, पण सदैव गचाळच राहतो.
समाजसेवा करणाऱ्या भल्या लोकांना एक प्रकारची ऊर्जा मिळत राहते. ही ऊर्जा जर जबाबदारीने नियंत्रित नाही केली, तर समाजसेवकांचे समाजकंटक बनतात. काही समाजसेवक समाजातील काही निद्रिस्त घटकांना फार त्रास देऊन उठवायचा प्रयत्न करत असतात. या सर्व लोकांचा स्वयंशोध संपलेला असतो. सारे लक्ष बाहेर असल्याने स्वत:त सतत सुधारणा करणे, हे प्रत्येक माणसाचे परमकर्तव्य ते विसरून जातात. आपल्याला सर्व काही समजले आहे आणि आता समाजाने कोणती दिशा घ्यायची ते आम्हीच ठरवणार, असा अहंकार उत्पन्न होतो. स्वयंशोध न घेता समाजसुधारणा करण्याचा प्रयत्न करणे हे ऊर्जेचे नियंत्रण न करण्यासारखेच असते.
हक्काची जाणीव ही ऊर्जा आहे, तर त्याबरोबर येणारी जबाबदारी हे नियंत्रण आहे. समाजातील गटांना नुसती हक्काची जाणीव करून देणारे नेते जेव्हा जबाबदारीचे नियंत्रण त्या ऊर्जेला देत नाहीत तेव्हा माकडाची गोष्ट कमी-जास्त प्रमाणात होणार, हे नक्की. यामुळे कुणाचाच फायदा होत नाही. तात्पुरते हक्क मिळाल्यासारखे वाटतात, पण त्याचे काय करायचे, हे माहिती नसल्याने केवळ असमाधानच होते. नेत्यांना आसपास हल्लागुल्ला करणारा एक जमाव मिळतो. जमावाला हल्लागुल्ला करायला कारण मिळते. पण जमावातील कुणाच्याही आयुष्याची प्रत वाढत नाही. नेत्याच्या तर नाहीच नाही.
आज आपल्याकडे अफाट ऊर्जा आहे. आणि आपण चेर्नोबिल, फुकुशिमा, बलात्कार, खून, दंगेधोपे, अपघात, घातपात, आंदोलने, दहशतवाद अशी त्या ऊर्जेची भयंकर रूपे पाहत आपला नाश होत आहे, हे कळत असताना प्रचंड प्रमाणावर अनुत्पादक अशा हालचाली करून त्याला हातभार लावत आहोत. यामध्ये प्रचंड उत्सव, महोत्सव, शोभायात्रा, निषेधाचे मोर्चे, प्रतिमांचे दहन, प्रचंड सभा, विविध जत्रा, यात्रा, चर्चा, परिसंवाद आणि टीव्हीपुढे सुस्त पडून राहणे या सर्वाचा समावेश होतो. आपण आपल्या या ऊर्जेचा स्वयंशोध घेतला पाहिजे. ते ऊर्जेचे फूल आपले आपण उमलले की त्याचा सुगंध आल्याने निद्रितांना जाग येईलच आणि त्यांची ऊर्जा आपल्या ऊर्जेशी सहयोग करेल!! पण तोपर्यंत त्यांना हलवू नका.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा