गेल्या वीस वर्षांत (विशेषत: गेल्या १० वर्षांत) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. शिक्षणाच्या प्रसाराने तळागाळातील तरुण स्पर्धा परीक्षांकडे मोठय़ा प्रमाणावर वळू लागले आहेत. त्यांना त्यात कमी यश येत असले तरी यातून इतर अनेक क्षेत्रांसाठी कुशल असे मनुष्यबळ तयार होते आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. गेल्या वीस वर्षांत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून असे कुशल मनुष्यबळ इतर अनेक क्षेत्रांना पुरवले जात आहे.
उ दारीकरणाच्या धोरणाचा  व्यावहारिक पातळीवर विचार केल्यास सामाजिक, आíथक, शैक्षणिक क्षेत्रात घडून आलेल्या बदलांची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. सुधारणा काळाने सर्वच क्षेत्रास कमी-अधिक प्रमाणात प्रभावित केले आहे. या लेखात राज्य व केंद्रीय पातळीवरील नागरी सेवा म्हणजे एमपीएसी-यूपीएससीद्वारा घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात घडून आलेल्या विविध बदलांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्राचा विचार केल्यास, गेल्या २० वर्षांत (विशेषत: गेल्या १० वर्षांत) केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांविषयी मोठय़ा प्रमाणात माहितीचा प्रसार झाला आहे. स्पर्धा परीक्षांविषयक वाढलेली ही जागरूकता आपल्या व्यवस्थेतील विविध घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर तपासावी लागते. लोकशाही राजकारणाच्या प्रभावामुळे जनसामान्यांच्या वाढलेल्या आशाआकांक्षा, शिक्षणाचा झालेला प्रसार, कल्याणकारी धोरणांचा काही घटकांना झालेला लाभ, आरक्षण धोरणाचा लाभ घेतलेल्या अनुसूचित जाती-जमातीतील पहिल्या पिढीच्या वाढलेल्या आकांक्षा आणि १९९१ नंतर उदारीकरणाचा शहराबरोबरच ग्रामीण भागावर झालेला परिणाम, वाढत्या वृद्धिदराचे लाभार्थी, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण क्षेत्रात घडून आलेल्या क्रांतीमुळे वाढलेली गतिशीलता, शहरीकरणाच्या प्रक्रियेत झालेली लक्षणीय वाढ आणि निर्माण झालेल्या काही नव्या संधी इ. घडामोडींच्या संदर्भात महाराष्ट्रात लक्षणीयरीत्या स्पर्धा परीक्षांकडे वाढलेला कल पाहावा लागतो.
महाराष्ट्राचा विचार करता वैद्यक (मेडिकल), अभियांत्रिकी (इंजिनीअिरग), कायदे क्षेत्र ही क्षेत्रे दीर्घकाळ पालक व विद्यार्थ्यांची प्रमुख आकर्षण केंद्रे ठरली. १९९० नंतर व्यवस्थापन, संगणक, माहिती तंत्रज्ञान ही नवी क्षेत्रे पुढे आली. परिणामी, उत्तरेकडील राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अगदी अलीकडे म्हणजे १९९४-९५ पर्यंत नागरी सेवांच्या विकल्पाविषयी फारशी आशावादी स्थिती नव्हती. राज्यात शिक्षण तसेच औद्योगिक क्षेत्राचा लक्षणीय विकास झालेला असल्याने प्रशासकीय सेवा विशेषत: भारतीय नागरी सेवा क्षेत्रापेक्षा वैद्यक, अभियांत्रिकी, वकिली आणि फार तर प्राध्यापकी या पारंपरिक सेवा संधीचाच पर्याय आकर्षक मानला गेला. याउलट, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांकडे बराच काळ दुर्लक्ष झाले. परिणामी, इतर सेवासंधींचा पर्याय आणि स्पर्धा परीक्षांविषयी आढळणारे गरसमज यामुळे स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून फारसे लक्ष गेले नाही.
गेल्या २० वर्षांत स्पर्धा परीक्षांकडे वळलेल्या विद्यार्थ्यांची सामाजिक पाश्र्वभूमी पाहिल्यास त्यात उच्चजातीय, उच्चवर्गीय आणि शिक्षणाची सुरुवातीपासूनच पाश्र्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अल्पच आहे, हे लक्षात घेता येते. कारण साधारणत: १९५० आणि १९६० च्या दशकापर्यंतच या घटकासाठी प्रशासन हे करिअरचे मुख्य आकर्षण क्षेत्र होते. त्यांनतर मात्र वैद्यक, अभियांत्रिकी आणि आता व्यवस्थापन व संगणक ही क्षेत्रे त्यांच्यासाठी मुख्य आकर्षण केंद्रे ठरली आहेत. त्यामुळे आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांत मध्यम जाती, इतर मागास वर्ग आणि अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांचा मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. निमशहरी आणि ग्रामीण पाश्र्वभूमी असणारे असंख्य विद्यार्थी या क्षेत्राकडे वळलेले दिसतात. मुलींचा विचार केल्यास राज्य प्रशासनात आरक्षण धोरणामुळे किमान सहभागाची हमी मिळाली आहे. तथापि, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत अजूनही असमाधानकारकच स्थिती आहे.
१९९०च्या दशकात महाराष्ट्रातील यूपीएससी परीक्षेविषयी असलेले असमाधानकारक चित्र बदलण्यास सुरुवात झाली.  १९९२ मध्ये भूषण गगराणी यांनी मराठी माध्यमातून ही परीक्षा देऊन संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक मिळवला. ही घटना महाराष्ट्रातील यूपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या  आकांक्षांना कलाटणी देणारी ठरली. त्यातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी यूपीएससी परीक्षेकडे वळले. महाराष्ट्रात यूपीएससी परीक्षेची अभ्याससंस्कृती व यशवंतांचे मार्गदर्शन उपलब्ध होऊ लागले. मराठी माध्यमातूनही परीक्षा देता येणे शक्य झाल्याने बरेच विद्यार्थी या परीक्षांमध्ये यशस्वी ठरू लागले. परिणामी, या परीक्षेविषयी अनेक गरसमज व त्याविषयी मराठी विद्यार्थ्यांमध्ये आढळून येणारे न्यूनगंड गळून पडले.
स्वाभाविकच निमशहरी, ग्रामीण, मराठी माध्यमाची पाश्र्वभूमी असणारे विद्यार्थीदेखील या परीक्षांकडे वळू लागले. या परीक्षेसंबंधी उपलब्ध झालेले मार्गदर्शन; वरिष्ठ, यशवंतांच्या मार्गदर्शनाची परंपरा; पुरेशा संदर्भ साहित्याची उपलब्धता; त्यातही मराठी भाषेतून दर्जेदार मार्गदर्शन व संदर्भ साहित्याचा पुरवठा; परीक्षेत यशाचा वाढणारा आलेख; विशेषत: बहुजन, ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश आणि या सर्व बाबींमुळे समाजात प्रशासकीय सेवेतील करिअरविषयी निर्माण होणारी जागृती, इ. घटकांमुळे विद्यार्थी या क्षेत्राचा विचार करत आहेत. या संदर्भात आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे २००५ नंतर वाढलेली पदांची संख्या.
 खासगी क्षेत्रात गेल्या तीन-चार वर्षांपासून चालू असलेल्या मंदीच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक नोकऱ्यांचे वाढलेले हे प्रमाण नक्कीच महत्त्वाचे आहे. २००७ पासून केंद्र लोकसेवा आयोगाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांची एकूण संख्या साधारणत: ७०० ते १००० दरम्यान असलेली दिसते. त्यासाठी भारतभरातून अडीच-तीन लाख विद्यार्थी अर्ज करतात. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास दरवर्षी सुमारे चार-पाच हजार नवे विद्यार्थी पूर्णवेळ या परीक्षेच्या तयारीसाठी सिद्ध होतात.
यूपीएससी परीक्षेत अपयश आले तरी या परीक्षेच्या तयारीच्या काळात वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये विकसित झाल्यामुळे हे विद्यार्थी अनेक पर्यायी मार्गाचा अवलंब करतात. ही एका अर्थाने स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून निर्माण झालेली कुशल विद्यार्थ्यांची फळीच मानली पाहिजे.
नागरी सेवांची तयारी करताना सामान्य अध्ययन विषयाच्या अभ्यासात इतिहास, भूगोल, राज्यघटना, शासन-राजकारण, अर्थव्यवस्था, जागतिक राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान आणि विभिन्न क्षेत्रांतील चालू घडामोंडीचा विस्तृत अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयांची  (१,२०० गुण) तसेच निबंधाच्या विषयाची (२०० गुण) तयारी करावी लागत असल्याने त्यांच्या आकलनाचा लक्षणीयरित्या विस्तार होतो. पूर्व परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ पद्धतीचा, मुख्य परीक्षेसाठी प्रभावी लेखनकौशल्याचा तर मुलाखतीसाठी उत्तम संवादकौशल्याचा विकास करावा लागतो. परीक्षेतील विविध विषय, त्यातील विविध उपघटक, त्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे सतत बदलणारे स्वरूप यामुळे ही परीक्षा खऱ्या अर्थाने आव्हानात्मक ठरते. परीक्षेत विचारले जाणारे बहुतांश प्रश्न समकालीन स्वरूपाचे, विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करायला लावणारे आणि विश्लेषणात्मक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचा मोठय़ा प्रमाणात विकास होतो. मुलाखतीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जात असल्यामुळे प्रत्येकाला या टप्प्याची सर्वागीण तयारी करावी लागते. यात स्वत:च्या व्यक्तिगत बाबींबरोबरच भोवतालच्या विविध समकालीन घटना-घडामोडींचे भान, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आपल्या मताचे प्रभावीपणे सादरीकरण करण्याची क्षमता या बाबींवर विशेष भर द्यावा लागतो. स्वाभाविकच या चाचणीच्या तयारीतून विद्यार्थ्यांचे आकलन, दृष्टिकोन, आत्मविश्वास या गुणवैशिष्टय़ांबरोबरच निर्णय निर्धारणाची क्षमतादेखील विकसित होते.
त्यामुळे केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांची वाचन-लेखन, संवादकौशल्याचा विकास आणि एकंदर दृष्टिकोनाचा विस्तार अशा विविध अंगांनी जडणघडण होते, यात शंका नाही. त्यामुळेच यूपीएससी परीक्षेत अपयश आले तरी हे विद्यार्थी विविध बँकांच्या अधिकार पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, नाबार्ड संस्थेतील विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षा, भारतीय आयुर्वमिा महामंडळाच्या विकास अधिकाऱ्यांच्या परीक्षा, भारतीय वन व अभियांत्रिकी सेवा यांसारख्या इतर स्पर्धा परीक्षांत यश संपादन करताना दिसतात. काही विद्यार्थी प्रसारमाध्यमे (िपट्र, इलेक्ट्रॉनिक), प्राध्यापकी, बिगर शासकीय संस्थांतील संधी अशा पर्यायी करिअरकडेदेखील वळतात. तर काही विद्यार्थी विविध स्वरूपाच्या व्यक्तिगत व्यवसायात चांगल्या प्रकारे स्थिरावतात. परिणामी, निमशहरी अथवा ग्रामीण भागातून या परीक्षेच्या तयारीसाठी आलेला विद्यार्थीदेखील तयारीच्या प्रक्रियेत प्राप्त झालेल्या विविध कौशल्याच्या जोरावर कोणता ना कोणता पर्याय निवडून त्यात यशस्वी होताना दिसतात.
म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी कमी प्रमाणात उत्तीर्ण होत असले तरी यातून इतर अनेक क्षेत्रांसाठी कुशल असे मनुष्यबळ तयार होते आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या मुलांचा भारतीय राजकारण, लोकशाही, प्रशासन, सामाजिक-राजकीय स्थिती, इतिहास-परंपरा अशा अनेक विषयांचा अभ्यास होत असल्याने ते कुठल्याही क्षेत्रात गेले तरी उत्तमरीत्या आणि इतरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. नव्हे करत आहेत. गेल्या वीस वर्षांत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून असे कुशल मनुष्यबळ इतर अनेक क्षेत्रांना पुरवले जात आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना त्यात यश आले नसले तरी ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात अधिक चांगले काम करत आहेत. शिवाय अशा तरुणांची संख्या गेल्या वीस वर्षांत लक्षणीयरीत्या वाढली आहे. या तरुणांचा परीक्षेच्या तयारी दरम्यानच्या काळात केलेल्या अभ्यासाने प्रश्न-समस्या याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात अमूलाग्र बदल होतो.
अशा तरुणांची काही उदाहरणेच द्यायची तर, सर्वसामान्यांना विविध कायद्यांची माहिती मिळावी यासाठी जितेंद्र बोराणे यांनी लॉ-पोर्टलसारखा उपक्रम सुरू केलेला आहे. बार्शीतील गणेश कुलकर्णी यांनी शेती-राजकारणाची सांगड घालत डािळब शेतीत नवनवे प्रयोग हाती घेतले. काही विद्यार्थी आपापल्या परिसरातील शिक्षण आणि आरोग्याची स्थिती कशी सुधारता येईल या विचाराने प्रेरित होऊन अल्प पातळीवर समविचारी मित्र-मत्रिणींच्या माध्यमातून जागृती अभियान राबवत आहेत. त्याचाच भाग म्हणून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात झालेले प्रयोग लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर एनजीओच्या माध्यमातून असे प्रयोग राबविण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही विद्यार्थी आपापल्या परिसरातील शिक्षण आणि आरोग्याची स्थिती कशी सुधारता येईल या विचाराने प्रेरित होऊन अल्प पातळीवर समविचारी मित्र-मत्रिणींच्या माध्यमातून जागृती अभियान राबवत आहेत. त्याचाच भाग म्हणून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात झालेले प्रयोग लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून असे प्रयोग राबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही विद्यार्थ्यांनी गाव, तालुका पातळीवर छोटय़ा स्वरूपातील वाचनालये सुरू करून नव्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनविषयक आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  
एकंदर पाहता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीघ विस्तारला आहे आणि त्यांनी स्पर्धा परीक्षेत अपयश येऊनदेखील उदारीकरणाच्या काळात पुढे आलेल्या इतर पर्यायी संधींचा फायदा उठवून ते पुढे जात आहेत. आपल्या तयारीच्या काळात विकसित झालेल्या कौशल्याच्या पुंजीच्या जोरावर हे परीक्षार्थी या संधीचा लाभ घेताना दिसत आहेत. या कुशल मनुष्यबळास अर्थपूर्ण आणि प्रभावीपणे वापरण्यासाठी जाणीवपूर्वक भरीव प्रयत्नांची गरज आहे, यात शंका नाही.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान