आजचा दिवस पुन्हा ए. आर. रेहमानचा. सकाळीच त्याचं ‘रॉकस्टार’मधलं ‘नादान परिंदे’ गाणं ऐकलंय. आता दिवसभर काही का कामं चालेनात, ते गाणं त्याच्या भव्यतेसह मागे असेलच. श्रोत्याला सहज सोडून देणारं ते गाणं मुळीच नाही. तुम्ही ऐकलं आहे ते गाणं? नसेल, तर जरूर ऐका. आधी ऐका. रॉक संगीतावर आपण मागचे काही आठवडे बोलत आहोत. त्या सगळ्याचं खास भारतीय नजरेनं साररूप मांडणारं ते गाणं आहे. तुम्ही रॉक कधीच ऐकलं नसेल तर इथून सुरू करा. का, ते मी पुढे सांगतोच आहे. पण तेवढय़ात माझ्यासमोरच्या संगणकावर ‘चॅट’च्या ‘विंडोज’ उघडय़ा होत आहेत. ‘लयपश्चिमा’चे वाचक रॉकवरचं आपलं मत नोंदवत आहेत. पुष्कर जोशी नावाचा तरुण ‘ओअॅसिस’च्या गाण्यामध्ये रॉकचा पिंड कसा अचूक पकडला आहे, ते सांगतो आहे. ‘Please don’t put your life in the hands of rock n’ roll, who’ll throw it all away!!’ मानसी आणि प्रणव लेले त्यांना रुचणाऱ्या रॉक गाण्यांची सुंदर यादी पाठवीत आहेत. समुद्रावर बोटीत बसून रणजित मुळे ‘फेसबुक’वर म्हणतो आहे- ‘एम टीव्हीमुळे पॉपसारखंच आता रॉकसंगीतही व्यावसायिक होऊ लागलं आहे.’ इंग्लंडहून डॉ. शिल्पा चिटणीस बजावते आहे, ‘आशुतोष, तू रॉकची दुसरी बाजू ध्यानात घे. रॉक बँडच्या निमित्तानं शाळा-शाळांमध्ये मुलं एकत्र येतात, संगीतनिर्मितीचा प्रयत्न करतात, संगीताची जादू त्यांना कळू लागते, हेही महत्त्वाचं आहे.’ इंग्लंडलाच असलेली अभिनेत्री मधुरा देव लिहिते आहे, ‘श्रवणीय, सुखद, आवडेलशा संगीताशी सहज मैत्री होते. पण तुला हे मान्य असेल, की ‘रॉक’ हे अजून थोडं रॉकिंगच आहे. बोल्डसुद्धा!’ आणि तिचं म्हणणं खरं ठरवीत तौलनिक साहित्याच्या व्यासंगी अभ्यासिका सरोज देशचौगुले नवी खिडकी उघडत सांगताहेत, ‘रॉकमध्ये त्वेष, राग असतो; पण माझ्या ते अंगावर येतं, पचनी पडत नाही. कितीही पोटातून आलं तरी मला ते आक्रस्ताळं वाटतं.’
सदराच्या पुष्कळ मध्यमवयीन वाचकांना असंच वाटत असेल याची मला खात्री आहे. पण भारतीय शास्त्रीय संगीताच्या गाढय़ा अभ्यासिका डॉ. शुभदा कुलकर्णी मात्र म्हणताहेत ते मला फार मोलाचं वाटतं. ‘आज कर्कश आणि उथळ वाटणारं संगीत उद्या कधी अभिजात होऊन बसतं, ते कळतही नाही!’ हे विधान शास्त्रीय संगीताचा इतिहास अभ्यासणाऱ्या जाणकारानं केलेलं आहे, हे ध्यानी घेतलं की त्याचं महत्त्व पटावं. एक ई-मेल मात्र मला विचारत आहे- ‘हे रॉकबिक खरंच आपल्या भारतात आहे का?’
याचं उत्तर मात्र मला द्यायला हवं. हो, रॉक ‘भारता’त आहे. केवळ ‘इंडिया’मध्ये नाही. ते आज भारतातल्या पंधरा ते पंचवीस वयोगटातल्या तरुण-तरुणींचं हक्काचं गाणं आहे. ते शहरात आहे आणि छोटय़ा गावांतही आहे. ते खेडय़ांमध्येही पसरतं आहे. जागतिकीकरणाच्या या काळात इंटरनेटच्या एका ‘क्लिक्’निशी नवी, अद्भुत दुनिया सहज (आणि स्वस्तामध्ये) उलगडते आहे, तिथे रॉक न पोचलं तरच नवल! अर्थात माझा गायक मित्र धवल चांदवडकर म्हणतो तसं परके कपडे, परकं खाणं (आठवा : मॅक्डोनाल्ड) जसं लोक सहज स्वीकारतात, तसं परकं गाणं सहज स्वीकारतीलच असं नाही. पण तरुण रक्त हे बदलाला अधीर असतं, उतावीळ असतं. त्या रक्ताला त्याची म्हणून असलेली संवेदना व्यक्त करणारी कला हवी असते. आणि रॉकमधली आक्रमकता आणि आवेग हे त्या तरुण रक्ताशी सुसंगत आहे. केवढे भारतीय रॉक बँड्स आसपास वाजताहेत! चेन्नईचा ‘फिश आइड् पोएट्स’, मुंबईचा ‘डेमोनिक रीसरेक्शन’, दिल्लीचा ‘परिक्रमा’ बँड. तो तर भारतामधला बहुधा सर्वात जुना रॉक बँड असावा. १९९१ पासून ‘परिक्रमा’ करत तो बँड आज चांगलाच नावारूपाला आलेला आहे. आसाममध्ये, अरुणाचल प्रदेशामध्ये कितीतरी स्थानिक रॉक बँड्स आहेत. तिथे रॉक संस्कृती चांगलीच रुजलेली आहे. कोलकात्यामधले बंगाली रॉक बँड्स त्या शहराला व्हिक्टोरियन काळामधून पुढे आणताहेत आणि बंगळुरूचे ‘आगम’ आणि ‘स्वरात्मा’सारखे बँड्स हे भारतीय संगीताला जाणीवपूर्वक रॉकशी जोडत आहेत. एम टी.व्ही. आणि बाकीचेही चॅनेल्स तरुणांसाठी, त्यांच्या रॉकसाठी व्यासपीठ पुरवीत आहेत. सिअॅटलमध्ये जसे ‘गॅरेज बँड्स’ निघाले तसे बँड्स सांगली-साताऱ्यात, अमरावती-नागपूरमध्ये उगवत आहेत. अर्थात अजूनही हे बँड्स आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण नाहीत. तितका जनाधार त्यांना अजून मिळायचा आहे. आणि शिवाय साऱ्या जनमानसाला प्रभावित करेल अशी निर्मितीदेखील त्यांच्या हातून अजून व्हायची बाकी आहे! पुष्कळदा हौशी तरुण दिवसा हिंजवडी, नाहीतर तळवडय़ाला ‘ऐटी’त नोकरी करून रात्री ‘गीग सेशन्स’ना, सरावाला एकत्र बसताहेत. या हौशी कंपूपैकी सारेजण प्रतिभावंत नसतील, हे उघडच आहे. पण त्या मिषानं संगीतासारख्या सर्वस्पर्शी कलेचा त्यांना आतून परिचय होतो आहे, हे किती झकास आहे! मुलगा रात्रभर गिटार वाजवत बसतो किंवा ड्रम्स बडवतो म्हणून तक्रार करणारे पालक मला माहीत आहेत. त्यांनी हे ध्यानात घ्यावं की, तरुणपणी चकाटय़ा पिटण्यापेक्षा हे कधीही उत्तम आहे!
अर्थात या रॉक कंपूंचा आणि बॉलीवूडचा छत्तीसचा आकडा आहे. भारतामधले रॉक कंपू हे पाश्चात्त्य कंपूंसारखेच रॉकची स्वायत्त ओळख टिकवायला धडपडतात. पण रॉकच्या बाबतीत हा ‘आयडेंटिटी क्रायसिस’ जुनाच आहे. रॉक संगीताला जर सर्वदूर पोचायचं असेल, व्यापक बनायचं असेल तर त्याला व्यवस्थेला सोबत घ्यावं लागेल. मग रेकॉर्ड कंपन्या, चॅनेल्स, पुरस्कार आणि त्या साऱ्यामागची राजकीय गणितं सोबत आलीच. पण जर रॉक अशा तऱ्हेनं व्यवस्थेला शरण गेलं तर ते ‘रॉक’च राहणार नाही. ते त्याचा आत्मा हरवून बसेल! भारतीय रॉक कंपूंपुढे अजून एक ‘लोकल’ प्रश्न आहे तो सुरांच्या अभिसरणाचा. भारतीय सुरावटी कितपत घ्याव्यात, रागांचा वापर करावा का (खरं तर तो बीटल्सनं पुष्कळ अगोदर केलेला आहे!), गीतांची भाषा इंग्रजी ठेवावी की हिंदी, हे सारे प्रश्न भारतीय रॉकच्या पुढय़ात उभे आहेत.
पण बॉलीवूड नावाची इरसाल संस्था कशावरही मार्ग काढू शकते. रॉकचा पिंड खरं तर जनसामान्यांना रुचणाऱ्या हिंदी चित्रपटगीतांहून निराळा आहे. पण शंकर-एहसान-लॉयनं ‘रॉक ऑन’ चित्रपटाद्वारे रॉक संगीत मुख्य संगीताच्या प्रवाहात यशस्वीरीत्या आणलं आणि मग ए. आर.नं ‘रॉकस्टार’च्या गाण्यांमधून रॉकला भारतीय संगीत परंपरेचा हिस्सा करून टाकलं! इरावती कर्वे यांनी म्हटल्याचं मला स्मरतं आहे की, भारतीय संस्कृती ही अजगरासारखी शांतपणे परक्या संस्कृतीला गिळून आत्मसात करते. आत्ता भारतामध्ये रॉकबरोबर जे काही चाललेलं आहे, ते इरावतीबाईंचं म्हणणं खरं ठरवण्याकडे आहे. ‘अग्नी’सारख्या बँडचं गाणं ऐकताना पुष्कळदा आपण गिटारवरचं भारतीय संगीत ऐकत असल्याचा भास होतो, तो उगाच नाही. आणि ए. आर. रेहमान नावाच्या ‘आनंदसरोवरीची कमळे’ फुलवणाऱ्या अवलियाचं मी मघाशी उल्लेख केलेलं हे गाणं : ‘नादान परिंदे घर आ जा..’ चुकलेल्या पाखराला परत घराकडे वळवणारं हे रॉक गाणं. ते गाणं रॉकही आहे. संपूर्णतया. आणि तरीही ते अगदी भारतीय आहे. सुरुवातीचा चर्च कॉयरचा पीस त्या गाण्याचं गांभीर्य मनावर ठसवतो. मग द्रुतगतीत वाजणारा ड्रम ते गाणं शंभर टक्के रॉक असल्याची ग्वाही देतो. आणि मग मोहित चौहानची गायकी इर्शाद कामिलची समर्थ अभिव्यक्ती मांडत जाते..
‘कोई भी ले रस्ता
तू ही तू बेबस्ता
अपने ही घर आयेगा तू’ म्हणताना मोहितचा आवाज किती भावुक होतो! तो आवाज, त्यामधली कळ ही केवळ रॉकची नाही. आणि ते दुसरं कडवं ऐकलंत? त्याची सूरसंगत विसरून जर ते गुणगुणलंत, तर ती बंदीशच वाटावी! आणि मग लगोलग येणारा हा ‘नादानऽऽ’ म्हणत आक्रोश करीत थांबलेला करुणरम्य सूर! दुर्गा भागवत म्हणतात तसं ‘ते ऐकून तुमच्या कानात घुमले नाही असे व्हायचे नाही!’ ए. आर. रेहमाननं रॉकची बंडखोरीही समजून घेतली आणि त्याला एक नवं, अभिजात भारतीय वळणही लावलं. केवढी मोठी गोष्ट आहे! वाट चुकलेल्या पाखराला घरी परत बोलावत ए. आर. रेहमाननं रॉकसारख्या संगीताला क्षमाशीलतेची दीक्षा दिली!
इंडिया, भारत आणि रॉक
आजचा दिवस पुन्हा ए. आर. रेहमानचा. सकाळीच त्याचं ‘रॉकस्टार’मधलं ‘नादान परिंदे’ गाणं ऐकलंय. आता दिवसभर काही का कामं चालेनात, ते गाणं त्याच्या भव्यतेसह मागे असेलच.
First published on: 23-03-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India bharat and rock music