भारतीय संगीत- मग ते शास्त्रीय असो की सुगम; धृपद-ख्याल असो की ठुमरी; हिंदुस्थानी असो की कर्नाटकी.. त्याचा अविभाज्य भाग म्हणजे रागसंगीत. रागमांडणीच्या पहिल्या काही मिनिटांत बंदिश दमदारपणे मांडली गेली, की पुढची रागबढतही ताकदीनं होणार असल्याची खात्री पटते. छोटय़ाशा बीजामध्ये ज्याप्रमाणे पुढे मोठय़ा होणाऱ्या वृक्षाची सारी शक्यता दडलेली असते, त्याचप्रमाणे संपूर्ण रागाच्या व्याप्तीची सगळी शक्ती बंदिशींमध्ये ठासून भरलेली असते. या बंदिशी गेल्या कित्येक शतकांपासून गुरू-शिष्यांच्या पिढय़ान् पिढय़ांतून संक्रमित होत आपल्या भारतीय रागसंगीताची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा अविरत वाहती ठेवताहेत. त्यातही बंदिशींमधला श्रावण ही तर खाशी चीज. कलावंत या बंदिशींकडे किती भावभरल्या हृदयाने पाहतो, याचे हे वर्णन.. एका सिद्धहस्त कलावंताच्या लेखणीतून झालेलं..
या
वर्षीचा पाऊस फार म्हणजे फारच वेळेवर आला. ७ जूनला मुंबईचा पाऊस सुरू होतो, असं लहानपणी शिकलेलं; ते खरं करून दाखवत अगदी ७ जूनला यंदा तो अवतीर्ण झाला. खरं म्हणजे पावसाच्या आधी त्याचे पडघम वाजायला हवेत, त्याचं वातावरण निर्माण व्हायला हवं; पण यंदा या साऱ्याच्या आधीच पाऊस लागला!
..तर पावसाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम गरज कुणाची? अर्थात् ढगांची! पण हे ढग म्हणजे ‘घन’ बरं का! पाण्यानं भरून ओथंबलेले.. ‘घन’दाट झालेले.. केव्हाही बरसतील असे मेघ. स्वत:च्या ‘घन’ या नावाला शोभेलसं अजस्र रूप धारण करून त्यांनी आधी वातावरण कोंदून टाकावं, सूर्याला झाकून टाकत अंधार दाटून आणावा, धुळीचं वादळ उठवावं, त्या वादळात वाळलेला पाचोळा गोल गोल फिरवावा.. हत्तीच जणू! त्याची ताकद, शक्ती, त्याचा रांगडेपणा, त्याची चाल, त्याचा वेग.. सारं काही हत्तीसारखं!
‘घन घुमंड गगन गरजत..’
पावसाच्या आगमनासाठी उत्सुक झालेलं हे वातावरण म्हणजे राग मेघ किंवा मेघमल्हार! या रागात नियामतखान ऊर्फ ‘सदारंग’ या अठराव्या शतकातल्या संगीतकारानं रचलेला ख्याल आज इतक्या वर्षांनंतरही आम्ही गातो आहोत..
‘गरजे घटा घन कारे री कारे,
पावस रितु आई दुलहन मन भाई।
रैन अंधेरी कारी बिजुरी डरावे
सदारंगीले महंमदशा, पिया घर नाही आये।।
चहू ओर घनघोर, बोले दादुर, मोर
नियामतखान सुख पावे।।’
संपूर्ण बंदिशीत फक्त पावसाच्या आधीची वातावरणनिर्मिती आहे! ‘पावस रितु’ आहे. प्रत्यक्ष पाऊस नाहीच आहे! काळ्या मेघांनी आभाळ दाटून आलेलं आहे. रात्रीचा अंधार आणखीनच गडद झालाय. वीज कडकडतेय. नि अशा परिस्थितीत दादुर (बेडूक), मोर इत्यादींची फौजदेखील नव्या नवरीची मीलनोत्सुकता वाढवताहेत. मग अर्थातच ते मीलन घडेल, तेही नैसर्गिक आवेगानंच! आतुरलेल्या मेघांच्या रूपानं श्यामवर्णीय कृष्णच जणू धरेच्या क्षितिजावर ओथंबून तिच्यावर जलरूपी प्रेमाचा वर्षांव करतो आहे..
‘मेघश्याम घनश्याम,
श्यामरंग तन छायो,
बादल के रूप श्याम
प्रेमरंग बरसायो।
उमडघुमड घटा घोर
बादरवा करे थोर
गोपीसंग बनवारी
सबही श्यामरंग भयो।।’
मेघांच्या गडगडाटाचा घनघोर आवाज येतोय. आणि त्यानंतरच्या जलवर्षांवात कृष्णासवे साऱ्या गोपी ‘त्या’च्या रंगात न्हाऊन निघाल्याहेत. जणू साऱ्या श्यामरंगी बनल्याहेत.. अशी थोडीशी आध्यात्मिक डूब दिलेली ही बंदिश श्रोत्यालादेखील ‘त्या’च्या श्यामरंगात न्हाऊ घालते!
हा मेघमल्हार! पावसाच्या आधीचं, त्याच्या आगमनाची सूचना देणारं वातावरण! काहीतरी जन्म घेण्यासाठी जणू आता कोणत्याही क्षणी प्रस्फोट पावेल अशा शक्यतेनं मंत्रभारित झालेलं!
पण प्रत्यक्ष सृजनाच्या वेणा सुरू होतात ना, तेव्हा बाहेरच्या वातावरणातला सगळा धुमाकूळ थांबतो; आणि खोल, घनगंभीर अशी खर्जातली पावसाची संततधार लागून राहते. सारी धरती जणू मुक्याने सृजनसोहळा अनुभवू लागते. उभ्या-आडव्या झोडपणाऱ्या धारांनी सचैल स्नान करीत वनस्पती जणू शुचिर्भूत होत असतात. अपार वाहणारं पाणी निसर्गात सामावेनासं झालं की त्याचे पाट वाहू लागतात, डोंगरकडय़ांवरून प्रपातांच्या रूपात कोसळतात.
हा मियांमल्हार! वरुणराजाचा सगळा थयथयाट अबोलपणे, सोशिकपणे, धीरगंभीरपणे झेलणारा कर्ता पुरुष! सागरासारखा अथांग आणि सर्वसमावेशक! जगातलं सगळं पाणी अन् त्या पाण्याबरोबर वाहून आलेला सगळा गाळ शांतपणे आपल्या पोटात रिचवणारा! मियांमल्हाराची निर्मिती तानसेनानं केली असं मानलं तर हा राग इतर मल्हारांच्या मानानं तसा अर्वाचीन; पण त्याच्या धीरोदात्त स्वभावामुळे त्यालाच ‘बिनीच्या मल्हारा’चा मान मिळतो.
सदारंगाचा शिष्य ‘अदारंग’ यानं मियांमल्हारात बांधलेली ‘करीम नाम तेरो’ ही अप्रतिम बंदिश म्हणजे एक पसायदानच आहे. रागाच्या गंभीर प्रकृतीला साजेशी ही प्रार्थना जगाच्या भल्यासाठी ईश्वराला साकडं घालते..
‘करीम नाम तेरो, तू साहेब सतार।
दुख दरिद्र दूर करो,
सुख दे हो सबनको,
‘अदारंग’ बिनती करत,
सुन ले करतार!’
या बंदिशीत पावसाचा कुठेही मागमूसदेखील नाही; पण देवाकडे पावसाचं दान मागण्याकरताच ही प्रार्थना आहे यात मला जरासुद्धा संदेह वाटत नाही. भीमसेनजी किंवा अमीर खाँसाहेबांच्या धीरगंभीर आवाजात मल्हाराचे दोन निषाद ‘सुन ले करतार!’मधून मींडेनं तार षड्जापर्यंत जाऊन खाली उतरले, की त्या करुणा भाकण्यातली सगळी आर्तता साकार होते.
‘गुड्डी’ चित्रपटातलं सुप्रसिद्ध ‘बोले रे पपीहरा’ हे गीत याच शब्दांच्या मूळ बंदिशीवर आधारलेलं आहे; हीदेखील ‘सदारंगा’चीच बंदिश आहे- साडेतीनशे र्वष जुनी!
याच रागातली कुमारजींची बंदिश थेट ‘मेघदूता’ची आठवण करून देणारी आहे. या बंदिशीतली नायिका मेघाला म्हणते-
‘जा ज्यो रे बदरवा,
जाय तू तो सैंयाजी खेता बरसो रे।
जाय सुनावो मैं तोहे पठावा,
गरजो रे, पिया मुख हरसो रे!’
‘अरे बदरवा, जा, माझ्या सैंयाजीच्या शेतावर बरस जा.. जा, ‘त्यां’ना सांग, की मीच तुला पाठवलंय. तू गरजलास की ‘त्यां’च्या मुखावर हर्ष पसरणार आहे.. जा ना रे, बदरवा!’
आता हेच पाहा ना, ही विनंती करण्यासाठी तिनं किती चातुर्यानं आणि लाडिकपणानं त्या ‘घना’चा ‘बदरवा’ केला! हा ‘बदरवा’ तिचा सखा आहे. त्याच्याकडून तिला ‘फेव्हर’ हवंय, म्हणून त्याच्याशी अशी लाडीगोडी! पण तोच अनावर होऊन कोसळू लागला, तिला तिच्या पियापाशी घेऊन जाण्यातला अडसर बनू लागला, की लाडक्या ‘बदरवा’चा ‘बैरी बदरा’ होतो! अशाच तऱ्हेनं जेव्हा नायिकेला स्वत:च्या अंतर्मनातलं गुपित सांगायचं असतं तेव्हा सोयीस्करपणे त्याची ‘बदरी’ होते; अगदीच जिवाभावाचं गुपित असेल तेव्हा ‘बदरिया’! बृजभाषेच्या सौंदर्याची हीच तर खासियत आहे! जसा अर्थ अभिप्रेत असेल तसा शब्द वाकवायचा! ‘मेघ’सुद्धा कधी ‘मेहा’, कधी ‘मेहरवा’, किंवा ‘मेरुवा’, तर कधी ‘मिघवा’! ‘बिजुरी’देखील कधी नुसतीच ‘बिजु’, तर कधी ‘बिजुरिया’. ही ‘चमकते’ अन् तीच ‘दामिनी’ होऊन येते तेव्हा दमदारपणे ‘दमकते’!
मी मात्र माझ्या एका बंदिशीत स्वत:ला ‘बादर’च्या रूपात पाहिलंय; बदरवा नाही, बदरी नाही, बदरिया पण नाही; सरळ- साधा ‘बादर’! ही बंदिश ‘अभोगी’ रागात आहे. (वर्षांऋतूचा संबंध काही फक्त मल्हार रागप्रकारांशीच असला पाहिजे असं नाही! इतर अनेक रागांत पावसाच्या बंदिशी सापडतात.)
‘हम भये बादर,
गुरु तुम सागर,
तेरोही जल भर बरसत दूर देश।’
‘तेरे सूर की धारा,
तेरा संदेसा न्यारा,
बरसावत, हरित करत दूर देश।।’
निसर्गातल्या एका शाश्वत शास्त्रीय सत्याचा काव्यमय अन् संगीतमय आविष्कार!
मल्हाराचं लोभसवाणं, लडिवाळ, मृदू स्त्रीरूप दाखवणारा राग म्हणजे गौडमल्हार! तो मेघासारखा दांडगट, आक्रमक नाही. मियांमल्हारासारखा धीरोदात्त, गंभीरही नाही. तर उत्फुल्ल, तारुण्यानं मुसमुसलेल्या युवतीसारखा खेळकर आहे!
‘मान न करिये, गोरी!
तुम्हरे कारन आयो मेहा।
हरी हरी भूमपर बरसो ही चाहे,
नयी नार, नयो नेहा।।’
ही बंदिश केसरबाईंच्या भारदस्त आवाजात ऐकताना असं वाटतं, की जणू केसरबाई गौडमल्हाराच्या तरुणीला सांगताहेत..‘तुझ्या नवतारुण्याच्या आणि सौंदर्याच्या गर्वापोटी फार अकडू नकोस, बये! तुझ्याचसाठी तो मेघ अवतरलेला आहे, हे कितीही खरं असलं, तरी!’
या रागातल्या कुमारजींच्या सुप्रसिद्ध ‘रितु बरखा आई’ या बंदिशीतदेखील कुमारजींनी त्या ‘रितु बरखा’ला स्त्रीरूपच दिलं आहे. ‘रितु’ या शब्दाचा कुमारजींनी केलेला ‘रित्तु’ असा उच्चारही माझ्या कानांत रेंगाळतो आहे. गौडमल्हारातली पारंपरिक बंदिश- ‘गरजत बरसत भीजत अइलो..’ ही जेव्हा सुमन कल्याणपूर आणि कमल बारोट या दोघीं(स्त्रियां)च्या आवाजात चित्रपटगीत म्हणून ध्वनिमुद्रित झाली (संगीतकार- उषा खन्ना. पुन्हा स्त्रीच!) तेव्हा ती ‘गरजत बरसत सावन आयो रे..’ अशी थोडीशी बदलली. पण या कलावतींनी गौडमल्हाराच्या साऱ्या खेळकरपणाची प्रचीती या बंदिशगीतातून समर्थपणे दिली आहे.
महात्माजींच्या जन्मशताब्दीनिमित्त कुमारजींनी खास निर्मिलेला राग ‘गांधीमल्हार’! गांधीजींना समर्पित करण्यासाठी राग रचताना कुमारजींनी ‘मल्हारा’चीच निवड का केली असेल? भारतीय स्वातंत्र्याच्या सृजनाचे ते शिल्पकार होते म्हणून? पावसामुळे जसं निसर्गात आमूलाग्र परिवर्तन घडून येतं, तशी क्रांती गांधींच्या विचारांनी जगात घडवली म्हणून? कुमारजी म्हणतात, ‘माझे हात जुळतात ते गांधीजींच्या अभयसाधनेसमोर, त्यांच्या र्सवकष करुणेसमोर! या दोन्ही प्रवृत्ती व्यक्त करण्याची क्षमता मल्हार रागात होती. म्हणून या रागाचा ‘बेस’ घ्यायचं ठरवलं. जोडीला गांधींची विशुद्ध अन् शक्तिशाली सत्यसाधना आणि असामान्य धैर्य यांना व्यक्त करण्यासाठी मला शुद्ध गंधार योजावासा वाटला.’
गांधीजींना समíपत बंदिशीचे शब्द आहेत-
‘तुम हो धीर,
संजीवन भारत के विराट हो रे!
आहत के आरत के सखा रे
पावन आलोक अनोखे हो रे ।।’
मल्हाराचा आणखी एक प्रकार ‘सूरमल्हार’ म्हणजे साक्षात् श्रावणच! मियांमल्हाराची सरसरत येणारी झड आणि पाठोपाठ सारंगाच्या सुरांनी रंगवलेलं माध्यान्हीचं ऊन या दोघांचा पाठशिवणीचा खेळ! या रागातल्या ‘बादरवा बरसनको आये, सखि.. (उच्चारी बादर्वा)’ या बंदिशीवरच्या किशोरीताईंच्या सरसरीत, दाणेदार ताना म्हणजे श्रावणातल्या सरींवर सरीच!
आपल्या मराठी मनाला श्रावण जसा पूजाअर्चानी, सणासमारंभांनी आणि व्रतवैकल्यांनी पवित्र भासतो, तसाच भारतभर सर्वत्र ‘सावन का महिना’ हा ‘पावन महिना’ समजला जातो. उत्तर भारतात लोकसंगीताची एक सशक्त धारा ‘उपशास्त्रीय संगीता’च्या रूपानं आज अनेक दशकं अखंड वाहते आहे. या उपशास्त्रीय संगीतात वर्षांऋतूला राणीपद मिळायला तर काहीच प्रत्यवाय नसावा. (राजेपदाचा मान नि:संशय वसंत ऋतूलाच!) किती त्या वर्षांराणीची कौतुकं! ‘कजरी’ काय, ‘झूला’ काय, ‘सावन’ काय, ‘बुन्दिया’ काय! या ऋतूत जी खास वर्षांगीतं गायली जातात, त्यांना ‘कजरी’ म्हणतात. ती गाण्याची ठरावीक पद्धतही आहे अन् त्यांची भलीमोठी परंपराही आहे. ‘कजरी’ असं नाव का पडलं असेल या गाण्यांना? काळ्या मेघांतल्या ‘सावन’सारखे ‘ति’चे काजळभरले (कजरारे!) डोळे त्याच्या आठवणींनी झरतात म्हणून?
शोभाताईंच्या दर्दभऱ्या आवाजातली कजरी आठवून पाहावी..
‘बरसन लागी सावन बुन्दिया
प्यारेबिन लागे न मोरी अंखियाँ।
चार महिने बरखा के आये,
अजहूँ न आये हमारे सैंया ।।’
शोभाताईंनी नुसतं ‘बरसन लागी’ एवढं जरी आळवलं, तरी ‘काय बरसन लागी?’ – ‘बदरिया की अंखियाँ?’ – या प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळून जातं. आणि बेगम अख्तर यांचा सुप्रसिद्ध गझलनुमा दादरा- ‘छा रही काली घटा, जियरा मोरा लहराये है..’ बेगमनं आपल्या सगळ्यांच्या ‘जियरा’ला किती जीवघेणं लहरवलंय त्यात!
‘ऐ पपीहा! चुप खुदा के वास्ते हो जा जरा,
रात आधी हो चुकी है, अब तुझे क्या हो गया?
तेरी पी पी से पपीहा, पी मुझे याद आये है।।’
..अध्र्या रात्री झोप तर तिला लागत नाहीच आहे, त्यात तो (काळा) पपीहा आपल्या बेवक्तच्या पुकारीनं तिला परेशान करतो आहे; कारण त्याच्या ‘पी-पी’ अशा आवाजानं तिला म्हणे ‘पी’ची (पियाची) आठवण छळतेय!
पारंपरिक सावनगीतांतला आणखी एक फर्मास प्रकार म्हणजे ‘झूला’! आपल्याकडे महाराष्ट्रात नागपंचमीला जसे झोपाळे बांधले जातात, तसे उत्तर भारतात श्रावण महिनाभर मोठमोठय़ा झाडांना झूले बांधून त्यांवर मुली, लेकी, सुनांनी झुलायची प्रथा आहे. याप्रसंगी गायची खास लोकगीतं आहेत. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला मैया (कालिमाता)चा झूला बांधला जातो (कृष्णाचा नव्हे!). तो बांधायचा, सजवायचा आणि मग त्यावर चवऱ्या ढाळायचा मान ‘मालनिया’ ऊर्फ माळीणबाईंचा असतो.
‘मैया झूले चंदन (उच्चारी चनन) झुलनवा
हो मालिन चंवर डुलावैली।’
श्रावणाच्या उत्तरार्धात कृष्णजन्माष्टमीचा सण येतो, अन् मग तर कृष्णाला झोपाळ्यावर बसवून त्याचे लाडकोड पुरवायची गोपींमध्ये अहमहमिकाच लागते..
‘झमकि झुकी आई बदरिया कारी,
झूला झूले नंदकिशोर।
कदंब की डार पे सुभग हिंडोला
रेशम लागी डोर।।
झूमी झूमी झूमी झोका दे,
सखियाँ ठाडी दोऊ ओर।।
इक ओर झूले कुंवर राधिका,
दूजे नंदकिशोर ।। झमकि झुकी आई..’
एकदा श्रावणात कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उत्तर प्रदेशात सहारणपूर, मेरठ, मुझफ्फरनगर या भागांत फिरत असताना स्थानिक यजमानांच्या घरी ‘श्रावणातल्या झूल्यां’चा पारंपरिक कार्यक्रम पाहायचा योग आला. यजमानीणबाई डॉक्टर होत्या. साहजिकच त्यांचे बरेच पाहुणे वैद्यकीय व्यवसायातलेच होते. साऱ्याजणीच उच्चविद्याविभूषित, स्वयंप्रज्ञ, कर्तृत्ववती स्त्रिया! पण पारंपरिक ‘सावन के झूले’ नाचायला सगळ्याजणी आपापल्या उंची साडय़ा वर उचलून, खोचून तयार झाल्या होत्या! गोल िरगणाच्या मध्यभागी एक जाड भिंगाचा चष्मा लावलेल्या, पिकल्या केसांच्या अन् बोळक्या तोंडाच्या आजीबाई हातात ढोलक घेऊन बसल्या. आजीबाई एक ओळ सांगायच्या अन् मग गोल फिरत सगळ्या बायका नाचाच्या पावलांच्या साथीनं ती ओळ पुन्हा दोहरावायच्या! असा चांगला तास- दीड तास सोहळा चालला. सगळी जुनी, पारंपरिक लोकगीतं होती. नव्या, मॉडर्न चित्रपटगीतांचा नि वाद्यमेळाचा लवलेशही नव्हता. एक गाणं संपलं की लगेचच दुसरं घेतलं जात होतं.. अगदी नॉनस्टॉप झूला!.. मग काही दिवसांनंतर या कार्यक्रमात मी सहभागी झाल्याचा परिणाम म्हणून माझी जौनपुरी रागात एक बंदिश साकारली :
‘ए सावन की झर लागी बरसन को,
अहो पिया, मोरे मन की आस पुरावो।
रितु सावन में त्योहार मनावो

अहो पिया, माझ्या मनची आस पुरवा ना! श्रावणातला सण साजरा करण्यासाठी मला छानशा िहदोळ्यावर झुलवा ना!’

Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Maharashtrachi Hasya Jatra inside rehearsal video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘अशी’ होते रिहर्सल! शिवालीने केलं भन्नाट ‘टंग ट्विस्टर’, मालवणी भाषा अन्…; पाहा व्हिडीओ

आजचा जमाना कितीही बदलला असला, तरी मानवी भावभावना त्याच आहेत. ती आसही तशीच, ती विरहवेदनाही तशीच! पूर्वीच्या काळातल्या ‘पिया’ला ‘बिलमव’णाऱ्या ‘सौतन’ किंवा ‘सास-ननदिया’ आता नसल्या, तरी अजूनही ‘त्या’ला ‘बिलम’ होतच असतो. शहरगावातल्या नोकरदार स्त्रियांना आता ‘झूले’ झुलायला वेळ नसतो, तशीच खेडेगावातली शेतावर मजुरी करणारी स्त्री देखील या सुखाला आता दुरावलीय. पण तरी देखील, श्रावण आला, की या दोघींच्याही मनात एक झूला नकळत आंदोळू लागतो, गळ्यात कजरी उमटते, मल्हाराच्या सुरांची बरसात होते, अन् ती नकळत गाऊ लागते,

‘‘एरीबरसे कारी बदरिया
पियासंग जिया मोरा झूले।
छाय रही कारी कारी बदरी
सावन बून्दनकी लागी झरी
सीतल पवन बहे सुखदाई
मनुवा डोले, गाये कजरी
एरी चमके, बरी बिजुरिया
पियासंग जिया मोरा झूले..’’

Story img Loader