प्रगतीच्या संधी आणि तंत्रज्ञान यांतून ‘जागतिक खेडे’ ही संकल्पना आकाराला आली. आज देशा-देशांतील अंतर कमी होऊन विविध संस्कृतींची परस्परांना जवळून ओळख होते.. खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला, ज्ञान यांची देवाणघेवाणही होते. विविध देशांमध्ये वावरताना प्रत्ययाला आलेल्या या संस्कृतिसंगमाच्या अनुभवांवर बेतलेला लेख!
गेल्या अनेक शतकांपासून माणूस शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समृद्धी या कारणांसाठी स्थलांतर करतोय. मात्र, नवीन प्रदेशाशी जुळवून घेताना तो आपले खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला आणि संस्कृती यांचं आवर्जून जतन करतो. आज तंत्रज्ञान व प्रगतीच्या संधींमुळे देशा-देशांतील अंतर कमी होऊन अनेक संस्कृती परस्परांमध्ये मिसळत आहेत. जागतिक खेडय़ातील या संस्कृतिसंगमामध्ये ‘प्रगतीसाठी धडपड’ हा समान धागा आहे. अशा संस्कृतिसंगमामध्ये खाद्यपदार्थ, भाषा, संगीत, कला, ज्ञान यांची देवाणघेवाण होते आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये वावरताना याचा वारंवार प्रत्यय येतो. काही वर्षांपूर्वी मलेशियातील क्वालालम्पूर शहरात ‘सर्वाणा भवन’ हॉटेलमध्ये जेवण्याचा योग आला. तिथे खास केळीच्या पानावर उत्तम पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थ खायला मिळतात. हॉटेलच्या अंतर्गत रचनेमध्ये दक्षिण भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडते. या हॉटेलमधल्या भिंती दक्षिण भारतीय चित्रकला, मूर्तिकला यांनी सजवलेल्या आहेत. तिथे जेवताना अगदी आपण चेन्नईच्या हॉटेलमध्ये जेवतो आहोत असे वाटले. इथल्या पदार्थाची खास पारंपरिक चव आणि उत्तम दर्जा पाहून न राहवून मी त्यांना याचे रहस्य विचारले. तेव्हा कळले, की सर्वाणा भवन हॉटेलातील स्वयंपाकी हे त्यांच्या चेन्नई शाखेतून खास प्रशिक्षण घेतलेले आहेत. त्यामुळे जगभरातील १२ देशांत असलेल्या त्यांच्या ४६ हॉटेल्समध्ये एकाच प्रकारची चव चाखायला मिळते. या हॉटेलमध्ये विविध देशांतील लोक तमीळ पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेत होते.
क्वालालम्पूरच्या कार्यालयात काम करताना माझे इंग्रजी हस्ताक्षर पाहून एका चिनी माणसाने मला ‘तू संस्कृत शिकला आहेस का?’ असे विचारले. मला काही कळेचना! तो म्हणाला की, तुझ्या इंग्रजी अक्षराचे वळण संस्कृत लिपीप्रमाणे आहे.’ मग कळले की, त्याला ते देवनागरी लिपीशी साधम्र्य असणारे वाटले. क्वालालम्पूरमध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय असल्याने रस्त्यावरून सहज फिरताना दुकानांमध्ये भारतीय सिनेमाच्या सीडी व डीव्हीडीज् विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात. अधूनमधून हिंदी सिनेमांतील गाण्यांचे स्वर कानावर पडतात. त्यामुळे आपण भारतातच आहोत असा भास होतो.
नेदरलँडमधील अ‍ॅमस्टरडॅम शहरात आठवडाभर राहिलो तेव्हा खाण्याचे हाल होण्याची परिस्थिती उद्भवली होती. पण माझ्या निवासाच्या हॉटेलजवळच एक चिनी हॉटेल सापडले. त्यामुळे मसालेदार खाण्याची सोय झाली. त्या हॉटेलमध्ये दर्शनी भागात बीजिंग शहराचा एक मोठ्ठा फोटो आणि आजूबाजूला चिनी ड्रॅगनची चित्रे आणि चिनी प्रतीके लावली होती. मेनू कार्डच्या चिनी, डच आणि इंग्रजी अशा तीन आवृत्त्या होत्या. तिथे चिनी, डच आणि इतर युरोपीय लोकही चिनी पदार्थावर ताव मारीत होते. अर्थात ते भारतातल्या चिनी पदार्थाएवढे मसालेदार नव्हते. त्यामुळे अतिरिक्त मीठ घ्यावे लागले. तशात मी मागितलेले ‘सॉल्ट’ चिनी वेटरला काही केल्या कळेना. शेवटी कागदावर ‘रं’३ ’असे लिहून दाखवल्यावर मीठ मिळालं!
लंडनच्या हीथ्रो विमानतळावर अशाच प्रकारचे जागतिक संमेलन अनुभवाला आले. जगातील बहुतेक सर्व खंड व देशांचे प्रतिनिधित्व या विमानतळावर पाहायला मिळते. अनेक शतके शिक्षण व व्यापाराचे लंडन हे केंद्र असल्यामुळे तिथे विविध देशांचे लोक स्थलांतरित झालेले आहेत. इथल्या पार्किंगमध्ये हिंदी सिनेमाचे गाणे गुणगुणत उभ्या असलेल्या टॅक्सीचालकाने ‘ऑए पाज्जी, कित्थे जाना है?,’ असे विचारल्यावर क्षणभर मुंबईतच आहोत की काय, असे वाटले.
अमेरिकेतल्या डेनवर शहरातील डाऊन टाऊनमध्ये भारतीय, चिनी, जर्मनी, इटालियन, ब्राझिली, पेरुअन, थाई, सिंगापुरी, अमेरिकी, मेक्सिकन, जपानी अशा विविध देशांतील उपाहारगृहांची रेलचेल अनुभवायला मिळते. प्रत्येक उपाहारगृहात त्या- त्या देशातील चित्रे, चिन्हे व शिल्पांची सजावट केलेली असते. अनेक हॉटेल्समध्ये त्या- त्या देशाचे पारंपरिक संगीत कानावर पडते. थाई हॉटेल्समध्ये थायलंडच्या हत्तींची चित्रे, शिल्पे व बुद्धमूर्ती असतात. एका जपानी हॉटेलची रचना जपानी घरासारखी केलेली होती. रस्त्यावरून एक कुंपण, अंगण आणि जपानी शैलीचे कौलारू घर दिसते आणि आत गेले की एखाद्या जपानी घरात जेवणाची सोय केली आहे असे वाटते. आत मोठ्ठे, गोल आकाराचे लाकडी टेबल आणि स्टुलाप्रमाणे असलेल्या खुच्र्या होत्या. घराच्या आत असलेल्या भिंतींवर प्राण्यांचे मुखवटे, जपानी हस्तकला आणि प्रतीके लावलेली होती. मेनू कार्डाचे डिझाइनसुद्धा जपानी चित्रे-प्रतीकांनी नटलेले होते. जेवणाच्या पाश्र्वभूमीला मंजूळ असे जपानी संगीत ऐकायला मिळाले. एका मंगोलियन हॉटेलमध्ये ग्राहकांना हवी ती डिश त्यात हव्या त्या पदार्थाची निवड करून प्रत्यक्ष ग्राहकासमोर एका मोठय़ा तव्यावर तयार करून मिळते. म्हणजे ग्राहकांनी हव्या त्या भाज्या, सॉस आणि इतर पदार्थ निवडायचे आणि मग एका मोठय़ा तव्यावर आचारी ते पदार्थ एकजीव करून गरमागरम डिश तयार करून देतो. हे करताना आचारी त्या प्रक्रियेचे गमतीशीर वर्णन मोठय़ा आवाजात आणि विविध आविर्भावांसकट करत असतो. प्रत्येक ग्राहकाला अशा तऱ्हेने जेवण मिळते. भारतीय हॉटेल्समध्ये भारतातली चित्रे लावलेली असतात आणि हिंदी सिनेमांतील गाणी कानावर पडतात.
विविध देशांच्या हॉटेल्समध्ये जेवताना काही क्षणांसाठी त्या देशातील खाद्यपदार्थाबरोबरच त्यांच्या संस्कृतीची झलकही अनुभवायला मिळते. अमेरिकन लोक खूप उत्साहाने विविध देशांतल्या उपाहारगृहांत पदार्थाचा आस्वाद घेताना दिसतात. चिनी व भारतीय उपाहारगृहांत खास मसालेदार पदार्थासाठी अमेरिकन लोकांची गर्दी असते.
डेनवरच्या कार्यालयात ‘हा भारतीय पदार्थ कसा करायचा?,’ ‘चहा कसा करायचा?’, ‘हा मसाला कोणत्या भारतीय दुकानात मिळेल?’ अशी विचारणा माझे अमेरिकन सहकारी करायचे. काही अमेरिकन्स तर ‘रेडी टू इट’ भारतीय पदार्थ घेऊन यायचे. एकदा माझ्या एका अमेरिकन सहकाऱ्याने मला इंग्रजीमध्ये विचारले, ‘आज माझ्या डब्यात काय असेल? गेस?’ मी म्हटले, ‘काय बुवा?’ तर तो खास अमेरिकन उच्चारात म्हणाला, ‘फनिर ठिख्खा मसाला!’ एक अमेरिकन सहकारी प्रत्येक वेळेस भेटला की, ‘हे भारतीय हॉटेल तू पाहिले आहेस का? मी गेल्या आठवडय़ात तिथे गेलो होतो!’ असे मलाच माहीत नसलेले नवीन भारतीय हॉटेल सांगायचा. एकदा तर त्याने मला विचारले, ‘तू घरून रोज माझ्यासाठी जेवणाचा डबा आणशील का? मी तुला प्रत्येकी दहा डॉलर देईन!’ हे ऐकून मला हसू आवरेना.
अमेरिकेत सार्वजनिक बसमधून उतरताना वाहकाला ‘थँक यू’ असे म्हणण्याची रीत आहे आणि वाहक त्याला उत्तर म्हणून ‘यू आर वेलकम. हॅव अ गुड इव्हिनिंग,’ असे म्हणतात. एकदा मी बसमधून उतरताना वाहकाला ‘थँक यू’ म्हणालो, तर त्या अमेरिकन वाहकाने चक्क हिंदीत मला ‘शुक्रिया! शुभरात्री!’ असे म्हटले आणि मी उडालोच! नंतर कळले की, कुणा भारतीय माणसाने त्याला हे हिंदी शब्द शिकवले होते. तेव्हापासून तो वाहक भारतीय प्रवासी उतरला की असे हिंदीत उत्तर द्यायचा. तो वाहक अशा प्रकारे बऱ्याच भाषांतील शब्द शिकला होता आणि प्रवासी पाहून तो ते वापरायचा.
डेनवरच्या बँकेत असलेले काही कर्मचारी मी किंवा कुणी भारतीय लोक काऊंटर गेले की हात जोडून ‘नमस्ते’ म्हणायचे! मूळचा इथोपिअन वंशाचा असलेला माझा अमेरिकन बॉस बऱ्याचदा ‘नमेस्ते’ असे म्हणायचा. माझ्या कार्यालयातले काही सहकारी ‘आम्ही असे ऐकले आहे की, क्रिकेटमध्ये एका वेळी एकच बॅट्समन असतो आणि त्याने मारलेला चेंडू सीमेला लागला तर चार धावा मिळतात. हे खरे आहे का?,’ असे आश्चर्याने विचारायचे. बोस्टनला एकदा एका अमेरिकन माणसाने ‘सचिन तेंडुलकर कोण आहे?’ विचारून माझीच विकेट काढली होती.
जॉर्जियातल्या अल्फारेट्टा या गावात राहणाऱ्या नोकरदार भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तिथे बरीच भारतीय दुकाने, उपाहारगृहे आहेत. क्रिकेटच्या विश्वचषक सामन्यांच्या वेळी या गावात राहण्याचा योग आला. त्यावेळी तिथल्या भारतीय उपाहारगृहामध्ये चक्क मोठय़ा पडद्यावर अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. अंतिम सामना, नाश्ता आणि जेवण यासाठी खास तिकीट होते आणि सामन्याच्या दोन-तीन दिवस आधीच सगळी तिकिटे विकली गेली होती! अमेरिकेतील वेळेनुसार पहाटे चार वाजता वर्ल्ड कप अंतिम सामना असूनसुद्धा त्या उपाहारगृहामध्ये इतकी गर्दी झाली, की शेवटी आणखी एक पडदा उपाहारगृहाच्या बाहेर लावून लोकांना बाहेर उभे राहून सामना पाहण्याची सोय करण्यात आली.
कॅलिफोर्नियामध्ये तर मिश्र संस्कृतीचे बरेच अनुभव येतात. इथे स्थलांतरित आशियाई लोक खूप आहेत. भारतीय, चिनी, जपानी तसेच मध्यपूर्वेतील लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. सॅनफ्रान्सिस्कोला जाणाऱ्या रेल्वेमध्ये तर ७० टक्के भारतीय आणि चिनीच दिसतात. त्यामुळे रेल्वेत भारतीय आणि चिनी गप्पांना ऊत आलेला असतो. सॅनफ्रान्सिस्को हे शहर म्हणजे मुंबईच्या दादरसारखे आहे. तिथे भारतीय, थाई, चिनी, मध्यपूर्वीय, युरोपीय अशा विविध देशांची वैशिष्टय़पूर्ण उपाहारगृहे आहेत.
मध्यंतरी कॅलिफोर्नियातल्या एका मित्राने नवीन कार घेतली.  त्याचे फोटो पाठवले होते. कारच्या फोटोसोबत त्याने नारळ फोडला, त्याचाही फोटो होता. त्याच्या सोसायटीमध्ये चक्क नारळ फोडण्यासाठी एक कायमस्वरूपी ओटा तयार केला आहे आणि तिथे ‘कोकोनट ब्रेकिंग प्लेस’ असे लिहिले आहे!
कॅलिफोर्नियातील आमच्या कार्यालयात अमेरिकन, चिनी, जपानी, भारतीय, पाकिस्तानी, युरोपीय अशा विविध संस्कृतींचे लोक एकत्र काम करतात. त्यामुळे सहज जाता-येता इंग्रजी, मराठी, तेलगू, हिंदी, उर्दू, जपानी, चिनी अशा भाषा कानावर पडतात. विविध देशांचे पदार्थ कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये मिळतात. कॅलिफोर्नियातसुद्धा अमेरिकन लोकांना भारतीय खाद्यपदार्थाचे खूप आकर्षण आहे. माझ्या एका अमेरिकी सहकाऱ्याने गेल्या ख्रिसमसला त्याच्या मित्रांना चक्क गाजरचा हलवा तयार करून खायला घातला. आणि त्यांना तो
खूप आवडलासुद्धा!
मध्यंतरी आमच्या कार्यालयात सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला. त्यात प्रत्येकाने आपापल्या देशाची वेशभूषा आणि खाद्यपदार्थाचे सादरीकरण केले. सगळय़ा देशांचे झेंडे, विविध संस्कृतींची प्रतीके, चित्रे, शिल्पे, खाद्यपदार्थ यांनी कॅन्टीन सजले होते. भिंतीवर चिनी ड्रॅगन होता. टेबलावर गणपती होता. दुसऱ्या टेबलावर सांताक्लॉज होता. सगळेजण आपापल्या पारंपरिक वेशभूषेत विविध देशांच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत होते. विविध देशांचे संगीत कानावर पडत होते. संस्कृती, वेश, भाषा, कला, संगीत, खाद्यपदार्थ विविध होते, पण साऱ्यांत प्रगती व स्नेहाचे समान सूत्र होते. एका प्रातिनिधिक विश्वसंस्कृतीचा सकारात्मक संगम तिथे अनुभवायला मिळाला.     

Story img Loader