मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रिय वाचकहो, पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं जर तुम्हाला मी विचारलं तर तुमची उत्तरं ‘नीट सांगता येत नाही’ इथपासून ते ‘ते ऐकवत नाही’ इतक्या दोन टोकांची असू शकतील. संगीताच्या ज्या मराठीप्रेमींना पाश्चात्त्य संगीताची पुरेशी कल्पना नसेल त्यांच्यासाठी हे दोन लेख सादर करीत आहे. हे लेख वाचून तुमच्यापैकी कोणीही बाखचा ‘मास इन बी मायनर’ किंवा बीथोव्हनची ‘नाइन्थ सिम्फनी’ या प्रसिद्ध संगीतरचना ऐकायला धाव घेणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. किंवा ते वाचून तुम्ही पाश्चात्त्य संगीतावर लगेच प्रेम करायला लागाल अशीही अपेक्षा नाहीये. पण या लेखांमुळे या संगीताकडे आपण का दुर्लक्ष करीत आलो, किंवा त्याबद्दल आपल्या मनात औदासीन्य का निर्माण झालं याची थोडीफार कल्पना तुम्हाला येऊ शकेल अशी आशा करतो. कदाचित हे लेख वाचून या संगीताबद्दलचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन थोडाफार कमी होईल, किंवा कदाचित पूर्वीप्रमाणेच त्याकडे दुर्लक्ष करत राहाल. आणि तुम्हाला हे संगीत आपण ऐकलं पाहिजे असं जर वाटलं तर फारच छान. (एक विनंती : १ मार्च २०२० च्या ‘सांगतो ऐका’ या सदरात ‘भारतीय संगीताची सर्वसमावेशकता’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचा आपल्या सांगीतिक संस्कृतीवर कसा प्रभाव पडला आहे हे सोदाहरण दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख जर तुम्ही परत वाचू शकलात तर हे दोन लेख तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने समजू शकतील.)

‘पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचं भारतात भवितव्य काय?’ क्रिकेटचं अमेरिकेत किंवा योगाभ्यासाचं पाकिस्तानात भवितव्य काय, अशा प्रकारचा हा प्रश्न मला एकदा मुंबईत आलेल्या इस्राएल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या पियानोवादकाने विचारला होता. त्यावेळी मी त्याला दिलेलं त्रोटक उत्तर काहीसं असं होतं.. पाश्चात्त्य संगीताचा भारतातील पारंपरिक श्रोता आणि आश्रयदाता हा अति अल्पसंख्य पारशी, ख्रिश्चन आणि पूर्णपणे आंग्लाळलेले भारतीय आहेत. त्यामुळे या संगीताला भारतात फारसा भूतकाळ नाहीये आणि वर्तमानातलं त्याचं अस्तित्वदेखील नगण्य आहे.

पण यासंदर्भात असे इतर काही प्रश्न आहेत, जे आपण नेहमीच विचारण्याचे टाळतो. यापैकी माझ्या दृष्टीने जे दोन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते असे- (१) पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताने भारतीय सांस्कृतिक पर्यावरणात मूळ का धरलं नाही? आणि (२) या संगीताबद्दल भारतीय पूर्वगृहदूषित आहेत का? आणि ते तसे असतील तर मला ही बाब चिंताजनक का वाटते?

या दोन प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतल्यानंतर वाचकाला या दोन्ही संगीतपद्धतींतील साम्य आणि भेदस्थळांची ओळख या सदराच्या शब्दमर्यादेत शक्य तेवढी करून देण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि हे करत असताना मी मूल्यात्मक मतप्रदर्शन शक्यतो टाळणार आहे. विशेषत: संगीताच्या आध्यात्मिक बाजूबद्दल. उदाहरणार्थ, आमचं भारतीय संगीत स्वर्गीय असून ते आत्म्याशी निगडित आहे, तर पाश्चात्त्यांचं संगीत हे पार्थिव असून मनाशी आणि फार फार तर हृदयाशी संबंधित आहे.

पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतानं आपल्या भारतीय सांस्कृतिक भूमीत मूळ का धरलं नाही? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला दोन महत्त्वाची निरीक्षणं नोंदवावीशी वाटतात. (१) ज्ञान, विज्ञान, ‘एनलाइटन्मेन्ट’ (धर्म व परंपरा याऐवजी तर्क आणि विज्ञान यांचे महत्त्व अधिक आहे असे प्रतिपादन करणाऱ्या लेखक, तत्त्ववेत्ते आणि वैज्ञानिक यांनी अठराव्या शतकात युरोपात समर्थन केलेली मतप्रणाली!), साहित्य, चित्रकला आणि कायदा याविषयीच्या संकल्पना आपण स्वीकारल्या. यातल्या काही इंग्रजी राज्यकर्त्यांनी आपल्यावर लादल्या, काही आपण नाखुशीने घेतल्या, तर काही आपण उत्साहाने अंगीकारल्या. पण आपण जसा साहेबाचा धर्म स्वीकारला नाही, तसंच आपण त्याच्या शास्त्रीय संगीताला ‘थँक्स, बट नो थँक्स’ म्हणून नकार दिला. असं आपण करूच कसं शकलो याचं मला कधी कधी आश्चर्य वाटतं.

(२) जवळजवळ २०० वर्षांपर्यंत पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत हे युरोप खंडात केंद्रित होतं. अठराव्या शतकात ते अमेरिकेत गेलं आणि आता तर ते सगळ्या जगात फोफावत असल्याचं चित्र दिसतं आहे. गेल्या चार दशकांत चीन, जपान, दक्षिण कोरिया या पौर्वात्य देशांत या संगीताचा उन्मादी उत्साहाने स्वीकार झाल्याचं दिसून येतं. सध्याचे चिनी पालक हे आपल्या मुलांना पाश्चात्त्य वाद्यसंगीत शिकण्यासाठी अशा उत्साहाने प्रोत्साहित करताना दिसतात, जसे भारतीय पालक आपल्या मुलांना शैक्षणिक कोचिंग क्लासेसमध्ये भरती करतात. (क्वचित क्रिकेट कोचिंग क्लासला!) याचा परिणाम म्हणजे आज जवळजवळ तीन कोटी चिनी मुलं पियानो शिकत आहेत, तर त्याच्या एक-चतुर्थाश मुलं व्हायोलिन शिकताहेत. महत्त्वाचं म्हणजे उत्तर कोरिया, इराण आणि इराक यांसारख्या देशात पाश्चात्त्य संस्कृतीबद्दल फारसं प्रेम नसूनदेखील या देशांमध्ये पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत आज कमी-अधिक उत्साहात शिकलं जातंय.

जगभर आता वेगानं पसरत चाललेल्या या संगीताचं आपल्याला इतकं वावडं का? किंवा आपण त्याबद्दल इतके उदासीन का?

मला याची दोन प्रमुख कारणं दिसतात. एक म्हणजे आपलं शास्त्रीय संगीत हे जगभरात सर्वात प्राचीन, सर्वात समृद्ध आणि सर्वात श्रेष्ठ (विशेषत: पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतापेक्षा!) अशी असलेली आपली प्रगाढ श्रद्धा. आणि दुसरं म्हणजे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताबद्दल असलेलं आपलं आश्चर्यकारक (बऱ्याचदा धक्कादायक) अज्ञान आणि त्याबद्दल असलेली उदासीनता व तिरस्कार उघडपणे दर्शवणे याबाबतीत भारतीय अभिजन वर्गाची जणू काही एकजूट झालेली दिसते. आपल्या संगीताचं श्रेष्ठत्व ठामपणे प्रस्थापित करायला केवळ भारतीय अभिजन वर्गच कारणीभूत आहे असं मी म्हणणार नाही, हेही लगेचच नमूद करतो. कारण याबाबतीत पाश्चात्त्य अभिजन वर्गदेखील तितक्याच आक्रमकतेने आणि कर्कश्श आवाजात त्यांच्या संगीताची महती गाताना दिसतो. याबाबतीत माझं स्वत:चं मत थोडक्यात असं आहे की, आपल्या समृद्ध सांगीतिक वारशाबद्दल आपल्याला वाटणारा अभिमान योग्यच आहे. पण पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताबद्दल असणारा आपला पूर्वग्रह आणि त्याबद्दलची आपली असहनशीलता मात्र निश्चितच अयोग्य आहे.

माझ्यासारख्या सारग्राही आणि र्सवकष संगीत आस्वादकाला हा दृष्टिकोन त्रासदायक वाटण्याचं कारण म्हणजे त्यामुळे आपण बाख, बीथोवन आणि मोझार्ट यांनी अजरामर केलेल्या संगीताला मुकतोय असं मला वाटतं. तुम्हाला तानसेन आणि त्यागराज यांच्या संगीताचा आस्वाद घ्यायचा असेल तर बाख आणि बीथोवन यांच्या संगीताचा आस्वाद घेता येणार नाही असा काही कुठे नियम नाही. इंग्रजीत सांगायचं तर- ‘द टू एक्सपिरियन्सेस आर नॉट म्युच्युअली एक्स्क्लुसिव्ह.’

दोन्ही शास्त्रीय संगीतपद्धतींचा बाजूबाजूला ठेवून घेतलेला पुढील आढावा..

काही महत्त्वाच्या सांगीतिक निकषांवर  या दोन संगीतपद्धती कुठे एकमेकांना मिळतात आणि कुठे त्यांच्यात फारकत होते ते बघू या.

(१) प्राचीनत्व : वेदपूर्व काळ आणि पुराणकथांमधला ब्रह्मदेवाचा आणि आपल्या संगीताचा संबंध आपण सोडून देऊ आणि सरळ विश्वासार्ह अशा वेदिक पठणकाळात प्रचलित असलेल्या वेदिक ऋचेकडे येऊ. ख्रिस्तपूर्व १५०० ते १००० या काळात ही गायनपद्धती अस्तित्वात होती असं सर्वसाधारणपणे मानलं जातं.  पाश्चात्त्य संगीतातील ‘ग्रेगोरियन चॅन्ट’पेक्षा (हा एक समूह गानप्रकार लॅटिन भाषेत असून, तो रोमन कॅथलिक चर्चमध्ये गायला जातो.) वेदिक ऋचा ही सुमारे दोन हजार वर्षे जुनी आहे. पण आपण जर ख्रिस्तपूर्व २०० ते इ. स. २०० या काळात लिहिल्या गेलेल्या भरतमुनींच्या ‘नाटय़शास्त्र’ या ग्रंथाचा आधार घ्यायचा ठरवला तर पाश्चात्त्य मंडळी त्याचा प्रतिवाद ग्रीक तत्त्ववेत्ता पायथागोरस याने ख्रिस्तपूर्व ५०० या काळात शोधलेल्या संगीत सप्तकाचा हवाला देऊन करू शकतात. ‘धिस गेम ऑफ अ‍ॅण्टीक्विटी वूल्ड टेक अस नोव्हेअर.’ केवळ दोन्ही पद्धतींच्या प्राचीनत्वाची तुम्हाला कल्पना यावी यासाठी मी हा मुद्दा उपस्थित केला.

(२) दोन्ही पद्धतींमधील महत्त्वाचे घटक : खालील अवतरणात महान व्हायोलिनवादक आणि कंडक्टर यहुदी मेन्युहिन (१९१६- १९९९) यांनी मेलडी, हार्मनी आणि ऱ्हिदम या पाश्चिमात्य संगीतातील तीन मूलभूत घटकांची सेंद्रीय एकात्मता अतिशय उत्कृष्टपणे अधोरेखित केली आहे.

‘‘Music creates order out of chaos; for rhythm imposes unanimity upon the divergent, melody imposes continuity upon the disjointed, and harmony imposes compatibility upon the incongruous.’’

(संगीत गोंधळातून एक व्यवस्था निर्माण करतं. ऱ्हिदम हा भिन्न घटकांना एकात्म करतो. मेलडी विस्कळीतपणामध्ये सलगता आणते. आणि हार्मनी विसंगतीतून संगती बहाल करते.)

येहुदी मेन्युहिन यांच्या या अवतरणावर माझी जी अतिशय साधी प्रतिक्रिया आहे ती अशी की, मेलडी आणि ऱ्हिदम हे घटक या दोन्ही संगीतपद्धतींत समान घटक असले, तरी हार्मनी मात्र नाही. आपल्या शास्त्रीय संगीतपद्धतीत हार्मनी या घटकाचा अभाव आहे. वस्तुत: तिचं अस्तित्व इतकं लहान असतं, की ते षड्ज पंचम या युतीबरोबर सुरू होतं आणि संपतं. (काही संगीतज्ञांच्या मते, ही या अतिशय प्राथमिक पातळीच्या बरीच पुढे जाते. पण तो तांत्रिक मुद्दा आहे आणि आपण त्यात अडकून पडायचं कारण नाही.) आपलं संगीत हे मेलडीप्रधान आहे आणि त्यांचं संगीत हे हार्मनीप्रधान आहे, असं वापरून आता गुळगुळीत झालेलं एक विधान हार्मनी आणि मेलडी यांच्या संबंधाबाबत नेहमी केलं जातं. यामुळे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतात मेलडी नसतेच असा प्रचंड गैरसमज संगीताचं मुळीच ज्ञान नसणाऱ्या बऱ्याच भारतीयांमध्ये पसरला आहे. अशा या श्रोत्यांना मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं की, मेलडीशिवाय कुठलंही संगीत अस्तित्वात येऊच शकत नाही. पण मानवनिर्मित हार्मनीशिवाय मात्र ते अस्तित्वात येऊ शकतं आणि असं संगीत अस्तित्वात आहे.

(पूर्वार्ध)

शब्दांकन : आनंद थत्ते