सारंगी हे वाद्य हिंदी चित्रपटसंगीतात अनेक वर्षे वाजवणाऱ्या पंडित रामनारायणसाहेबांचं योगदान फार अनमोल आहे. मग ते संगीतकार दत्तारामांचं ‘आंसू भरी है ये जीवन की राहे’ (परवरीश) असो किंवा शंकर-जयकिशन यांचं ‘मनमोहन बडे झुठे’ (सीमा), रोशनसाहेबांची ‘बरसात की रात’ची ‘ये इश्क़ इश्क़ है’ ही कव्वाली असो किंवा पंडित रविशंकरांची ‘सांवरे सांवरे’ (अनुराधा), कोठीवरली गाणी किंवा उपशास्त्रीय ठुमरी, दादरा वगरे प्रकारांवर आधारीत गाण्यांत सारंगीचा भरपूर वापर होत राहिला. पण रामनारायणसाहेबांच्या सारंगीचा अतिशय प्रणयोत्सुक, तरल भावाविष्काराकरिता प्रयोग केला तो ओ. पी. नय्यरसाहेबांनी. ‘कही पे निगाहे कही पे निशाना’ (सी. आय. डी.), ‘आंखो से जो उतरी है दिल में’, ‘बंदा परवर थाम लो जिगर’ (फिर वही दिल लाया हूं), ‘रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना’ (मुहब्बत जिंदगी है), ‘दीवाना हुआ बादल’ (काश्मीर की कली), ‘ये क्या कर डाला तूने’ (हावडा ब्रिज),  ‘आज कोई प्यार से’ (सावन की घटा), ‘फिर मिलोगी कभी’ (ये रात फिर ना आयेगी) अशा कितीतरी गाण्यांत त्यांनी सारंगीचा अनोखा अंदाज पेश केला आहे… (उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
शहनाई या अस्सल भारतीय मंगल वाद्याचा िहदी चित्रपटसृष्टीत अतिशय सढळपणे प्रयोग होत राहिला. कारण भारतीय संस्कृतीतल्या सर्व मंगल प्रसंगांत शहनाई आणि (दक्षिण भारतात शहनाईचंच भावंडं असणारं) नादस्वरम् हे वाद्य अनिवार्यपणे सहभागी असतं. पंडित रामलाल, शरदकुमार असे नामवंत शहनाईवादक सातत्यानं वर्षांनुवष्रे गाण्यांत, पाश्र्वसंगीतात अनमोल अशी कामगिरी करत राहिले.
सी. रामचंद्र या श्रेष्ठ संगीतकारानं ‘नवरंग’ या चित्रपटामध्ये ‘तू छुपी है कहां..’ या गाण्यातील संगीतखंडातल्या शहनाईच्या सुरावटीतून दिलेली आर्त हाक, तसेच पंचमदा बर्मननी ‘पडोसन’मधल्या ‘शर्म आती है मगर’ या गाण्यातल्या दुसऱ्या अंतऱ्यापूर्वीचा मुग्ध प्रेमाची ग्वाही देणारा शहनाईचा संगीतखंड आणि शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीनं ‘दिल एक मंदिर’ या चित्रपटाकरिता ‘रुक जा रात ठहर जा रे चंदा’ या लतादीदींच्या गाण्यात शहनाईचा अतिशय सुंदर प्रयोग केला आहे. पहिल्या अंतऱ्याच्या ‘पहले मीलन की यादें लेकर’ या ओळींच्या पाश्र्वभागी शहनाईवरची संवादी सुरावट उलगडत पहिल्या रात्रीच्या आठवणी ताज्या करते, तर दुसऱ्या अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडात आरंभीची रोमॅन्टिक सुरावट भविष्यातल्या संभाव्य दु:खाच्या चाहुलीत विरघळून जाते..
पण ‘भारतरत्न’ उस्ताद बिस्मिल्ला खांसाहेब यांच्या शहनाईचं गारुड अनुभवायला मिळालं ते ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीतकार वसंत देसाईसाहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘गूँज उठी शहनाई’ या संगीतप्रधान चित्रपटाकरिता ध्वनिमुद्रित झालेल्या गाण्यांमधून आणि पाश्र्वसंगीतातूनही. ‘तेरे सूर और मेरे गीत’, ‘दिल का खिलौना हाय टूट गया’, ‘जीवन में पिया तेरा साथ रहे’, ‘कह दो कोई ना करे यहां प्यार’, ‘तेरी शहनाई बोले’, ‘हौले हौले घुंघट पट खोले’ यांसारख्या अप्रतिम गाण्यांतून बिस्मिल्ला खांसाहेबांची शहनाई रसिकांच्या मनभर व्यापून राहिली… (उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)                 
सारंगी कुळातलं अजून एक वाद्य तारशहनाई. दक्षिणामूर्ती टागोर नावाचे चित्रपट संगीत क्षेत्रात एकमेवाद्वितीयम असे तारशहनाईवादक होऊन गेले. त्यांच्या वाद्याच्या दु:खी, आर्त नादवैशिष्टय़ामुळे त्यांना वादकांनी टोपणनाव दिलं होतं ‘दुखीदा’! या टागोरदांच्या तारशहनाईनं अनेक गाण्यांत करुणेचे,  दु:खाचे, वेदनेचे गहिरे रंग भरले. संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्या ‘बम्बई का बाबू’- मधलं मुकेशजींच्या भिजलेल्या स्वरांतलं ‘चल री सजनी.. अब क्या सोचे’मधले संगीतखंड किंवा बर्मनदांच्याच ‘इश्क पर जोर नहीं’ या चित्रपटातल्या लतादीदींच्या स्वरातल्या ‘तुम मुझसे दूर चले जाना ना..’ या गाण्यातल्या संगीतखंडातला सहभाग गाण्याला आर्त करून जातो.  संगीतकार ओ. पी. नय्यरसाहेबांनी मात्र अनेकदा रोमॅन्टिक गाण्यांत सारंगीऐवजी चक्क तारशहनाईचा प्रयोग करत गाण्यांत मस्त रंग भरले. उदा. ‘फिर वोही दिल लाया हू’मधलं ‘अजी किबला.. मोहतरमा’ या गाण्याचा आरंभीचा संगीतखंड. पण मदनमोहनसाहेबांच्या संगीतात जुन्या- देव आनंद अभिनित ‘शराबी’ या चित्रपटाकरिता रफीसाहेबांनी अतिशय उत्कटतेनं गायलेलं, पण फारसं लोकप्रिय नसलेलं अप्रतिम गाणं ‘मुझे ले चलो आज उस गली से..’ या गाण्यातली दुखीदांची तारशहनाई रफीसाहेबांच्या सुराइतकीच आर्त होत गात राहते. (यू-टय़ूबवर अवश्य हे गाणं ऐका. ऐकाच; मात्र बघू नका. कारण बरीचशी सुंदर गाणी ही बघण्याकरता नसतातच.) … (उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)          
पाश्चिमात्य अभिजात संगीतातील व्हायोलिन समूहात डबल बास, चेलो, व्हीयोला आणि व्हायोलिन या चार प्रकारच्या वाद्यांचा समावेश होतो. ही चारही प्रकारची वाद्य्ो ग्रांड पियानोचा साताहून अधिक सप्तकांचा अवकाश कवेत घेतात. िहदी चित्रपट संगीतात संपूर्ण व्हायोलिन कुटुंबाचा फार वैविध्यपूर्ण प्रयोग होत राहिला आहे. ‘मेरा नाम चिन् चिन् चू’ या गाण्यात मेंडोलिनच्या साथीत डबल बासच्या तारा छेडून वाजलेले संगीतखंड त्या गाण्यातल्या नृत्यातली लचक अधोरेखित करत साऱ्या प्रसंगाला मादक उत्तेजकता प्रदान करतात.
‘चेलो’ या वाद्यांचा अतिशय तरल वापर करून सचिनदा बर्मननी गुरुदत्तच्या ‘कागज के फूल’ या चित्रपटाकरिता ‘वक्तने किया क्या हंसी सितम’ या गाण्यात नायक-नायिकेची होणारी घुसमट ज्या तरलतेनं मांडलीय ते एकमेवाद्वितीयच. चेलोच्या तारा दबक्या बोटांनी छेडत निर्माण होणाऱ्या छोटय़ा छोटय़ा तुटक स्वरावली, संगीतखंडात व्हायोलिन्सच्या साथीत वाजलेल्या चेलोवरील सुरावटी.. अंतऱ्यातल्या ओळीमधले अर्थपूर्ण स्वरावकाश, नायक-नायिकेची अगतिकता आणि एकटेपण पडद्यावर साकार होताना साक्षात् चित्रकाव्य बनलेल्या दृश्याला विलक्षण आर्त करतात. एरवी खर्जातल्या स्वरावली मांडणाऱ्या गंभीर चेलोचा अतिशय प्रणयरम्य भावाविष्कारासाठी संगीत संयोजक अमर हळदीपूर यांनी ‘ज्युली’ चित्रपटात राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘ये राते नई पुरानी’ या गाण्याच्या अंतऱ्यापूर्वीच्या संगीतखंडात अप्रतिम प्रयोग केलाय. तसाच रहस्यमय चित्रपटांच्या गूढ गाण्यांमध्ये आणि पाश्र्वसंगीतातही चेलोज्चा भरपूर वापर केला गेलाय. उदा. ‘कोहरा’ चित्रपटातल्या हेमंतकुमार यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘झूम झूम ढलती रात’ या गाण्याच्या संगीतात चेलोज्चा व्हायोलिन- सोबतचा प्रयोग वाद्यवृंद संयोजक सॅबेस्टियन यांनी कथानकातील गूढता आणि भयाची भावना गडद करण्यासाठी मोठय़ा प्रभावीपणे केला आहे. व्हियोला हे सदैव व्हायोलिनच्या साथीत वापरले गेलेय. संगीतकार
सज्जादसाहेबांच्या ‘रुस्तुम सोहराब’मधल्या ‘ऐ दिलरुबा’पासून पंचमदांच्या ‘कारवां’मधल्या ‘दिलवर दिल की प्यारे..’पर्यंत व्हायोलिनसमूह वेगवेगळ्या संगीतकारांनी आपापल्या शैलीत अत्यंत वैविध्यानं आविष्कृत केलाय. शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीनं तर जास्तीत जास्त व्हायोलिनवादकांचा वापर करत गाण्यांना समृद्ध स्वरसंगतीची जोड दिली. विशेषत: राज कपूरसाहेबांच्या चित्रपटांकरिता केलेल्या त्यांच्या गाण्यांमधले व्हायोलिनसमूहानं वाजवलेले संगीतखंड अत्यंत रिच न् रॉयल. त्यातला आवेग आणि झोत विलक्षणच…(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
त्यांचे अनुकरण मग बरेच संगीतकार करत राहिले. पण सचिनदेव बर्मन, रोशन, मदनमोहन आणि राहुलदेव बर्मन यांनी मात्र आवश्यक तेव्हाच आणि तोसुद्धा मोजक्याच- म्हणजे विसापेक्षाही कमी व्हायोलिनवादकांच्या ताफ्याचा आपल्या गाण्यात प्रयोग केला. सचिनदांनी ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटाच्या शीर्षकगीतात व्हायोलिनच्या अत्यंत कल्पक प्रयोगाने त्या अत्रंग गाडीच्या धावण्याच्या, रुसून बंद पडण्याच्या सर्व लीलांत धमाल आणली. तर ‘तीन देवीयां’मधल्या लता-किशोर यांनी गायलेल्या ‘उफ् कितनी थंडी है..’  या गाण्यात व्हायोलिनसमूहातून थंडीची शिरशिरी साकारली. रोशनसाहेबांच्या ‘चित्रलेखा’तल्या ‘मन रे तू काहे ना धीर धरे’ या अतिशय सुंदर गाण्यात सरोद आणि बासरीबरोबर व्हायोलिनवर वाजणाऱ्या छोटय़ाशाच, पण अर्थपूर्ण संवादी स्वरावली गाण्यातली विरक्ती इतकी सूक्ष्म संयतपणे अधोरेखित करतात, की वाद्यवृंद संकल्पक मास्टरजी सोनिकसाहेबांच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो. याच मास्टरजींनी मदनमोहनसाहेबांच्या ‘हकीकत’मधल्या ‘खेलो ना मेरे दिलसे’ या गाण्यात रचलेले व्हायोलिनसमूहाचे संगीतखंड हे अतिशय विस्मयचकित करणारे आहेत आणि भाववाहीसुद्धा.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader