मुंबईत नुकतीच भारतीय विज्ञान परिषद पार पडली. तीत प्राचीन भारतीय विज्ञानावर एक परिसंवाद झाला. त्यात माजी वैमानिक कॅ. आनंद बोडस यांनी भारतातील प्राचीन विमानविद्येची माहिती देत आपल्याकडे त्याकाळी विमानविद्या किती प्रगत होती याचे दाखले दिले. त्यांच्या या दाव्याची तपशिलांत चिकित्सा करणारा लेख..
आपले पूर्वज थोर होते यात शंकाच नाही. इसवी सन पूर्व २००० ते १४०० हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. म्हणजे आजपासून साधारणत: चार- साडेचार हजार वर्षांपूर्वी ऋग्वेदासारखे काव्य रचणारे लोक बुद्धिमानच असणार. सिंधुसंस्कृती त्याही आधीची. इसवी सन पूर्व ३२०० ते २६५० मधली. त्या काळात त्यांनी नगरे उभारली. आजच्या आपल्या शहरांहून त्यांची रचना कितीतरी पटीने उत्तम होती. त्याच आपल्या पूर्वजांनी पुढे उपनिषदांसारखे तत्त्वज्ञान सांगितले. लोकायतांचे प्रत्यक्ष प्रमाण सिद्धान्त आपल्या लोकप्रिय धार्मिक तत्त्वज्ञानाला किती पटतात, हा भाग वेगळा; पण आपल्या पूर्वजांनी ज्योतिर्विद्या व आयुर्वेदासारखी शास्त्रे रचली म्हटल्यावर त्यांना विज्ञान संशोधनाचे प्राथमिक नियम नक्कीच ठाऊक होते. चरकाने सांगितलेले काढे, आरिष्ट आणि आसवे तर आजही आपण घेतो. जगातला पहिला प्लास्टिक सर्जनही आपलाच. सुश्रुत हे त्याचे नाव. इसवी सन पूर्व ६५० हा त्याचा काळ. याच पूर्वजांनी जगाला बीजगणिताची मूलभूत तत्त्वे दिली. ‘लाइफ ऑफ पाय’ हे तर आपल्या पूर्वजांमुळेच शक्य झाले. आर्यभट्टांनी ग्रीकांच्या कितीतरी आधी ‘पाय’ची अगदी अचूक किंमत सांगून ठेवली होती. शिवाय जगाला आपण शून्य दिले, हे तर आता बालवाडीतील मुलेही सांगू शकतात. एकंदर ही यादी अशी बरीच लांबवता येते. पण अलीकडे काहीजणांना ही यादी ताणण्याचा छंद जडला आहे.
या ताणण्याची प्रक्रियाही मोठी रंजक असते. म्हणजे तिकडे पाश्चात्त्य देशांत एखादा शोध लागला रे लागला, की ही मंडळी आपली बासने झटकू लागतात. एखादा संस्कृत ग्रंथ हुडकून काढतात आणि फुललेल्या चेहऱ्याने व फुगवलेल्या छातीने सांगतात की, हा शोध तर आमच्या पूर्वजांनी केव्हाच लावून टाकलाय. पुन्हा त्या प्रत्येक शोधाला नासाचे प्रमाणपत्र जोडलेले असतेच. हल्ली गायत्री मंत्र आणि हनुमान चालिसाबाबतचे शोध समाजमाध्यमांतून फिरत आहेत. त्यानुसार गायत्री मंत्र हा जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. त्यासाठी जर्मनीच्या हॅम्बर्ग विद्यापीठातल्या डॉ. हॉवर्ड स्टेनगेरील या अमेरिकी शास्त्रज्ञाचा हवाला देण्यात येतो. त्यात मौज अशी की, या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच नव्हे, तर इंटरनेटवर अन्यत्र कोठेही हे डॉक्टर सापडत नाहीत. ‘हनुमान चालिसा’ची कथाच न्यारी. त्यातील ‘युग सहस्र योजन पर भानू लील्यो ताही मधुर फल जानू’ या ओळींमध्ये सूर्य व पृथ्वी यांमधील तंतोतंत अंतर दिलेले आहे असे या मंडळींचे म्हणणे असून, त्यात नासाची साक्षही काढण्यात आली आहे.
आज आपली माती आणि आपली माणसे तिसऱ्या जगात गणली जातात. गेल्या कित्येक वर्षांत एकही भारतवासी भारतीय विज्ञानातले नोबेल मिळवू शकलेला नाही. जग बदलून टाकतील असे कोणतेही मोठे शोध आपण लावू शकलेलो नाही. याचा अर्थ सगळेच शून्य आहे असे नाही. याचा अर्थ एवढाच, की आपण फार काही मोठे तीर मारलेले नाहीत. तर मग त्यावर उपाय काय? मारा बढाया! ते तर न्यूनगंडावरचे जालीम औषध! भारतीय विज्ञान परिषदेत उडविण्यात आलेली विमाने हा त्याच बढायांचा आणि छद्मविज्ञानाचा उत्तम नमुना होता.
या परिषदेत ४ जानेवारी रोजी ‘प्राचीन भारतीय विज्ञान’ या विषयावर परिसंवाद झाला. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आणि त्यात परम महासंगणकाचे शिल्पकार डॉ. विजय भटकर हेही सहभागी झाले होते. या परिसंवादात माजी वैमानिक कॅ. आनंद जयराम बोडस यांनी भारतातील प्राचीन विमानविद्य्ोची माहिती दिली. बोडस यांचा या विषयावरील उत्तम अभ्यास असून, त्याआधारे त्यांनी ‘प्राचीन भारतीय विमानशास्त्र’ हे पुस्तकही लिहिले आहे. या विज्ञान परिषदेत त्यांनी याच पुस्तकावर आधारित ‘पेपर’ वाचल्याचे दिसते. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतात सात हजार वर्षांपूर्वी विमाने होती. हा काळ अर्थातच नागरी सिंधुसंस्कृतीच्याही आधीचा. म्हणजे लोक दगडी हत्यारे बनवून शिकार वगैरे करीत असत तेव्हाचा. तर या काळात लोक विमानांतून फिरत.. परग्रहांवर जात. हे दावे करताना कॅ. बोडस यांनी ऋग्वेद आणि पुरातन काळातील काही ग्रंथांचा हवाला दिला. पण त्यांचा भर होता महर्षी भारद्वाज यांच्या ‘बृहद् विमानशास्त्र’ या ग्रंथावर. कॅ. बोडस यांच्या पुस्तकानुसार, महर्षी भारद्वाजांनी ‘यंत्रसर्वस्व’ नावाचा ग्रंथ तयार केला होता. त्यात निरनिराळ्या विषयांचे ज्ञान देणारे चाळीस खंड होते. त्यातला एक खंड म्हणजे ‘बृहद् विमानशास्त्र.’ या ग्रंथासाठी त्यांनी ९७ संदर्भग्रंथ वापरले असून, त्यात १०० विभागांत आणि आठ अध्यायांत मिळून ५०० सूत्रे दिलेली आहेत. या ग्रंथामध्ये भारद्वाज ऋषींनी विमान वा अंतराळयानाच्या इंधनापासून रडार यंत्रणेपर्यंत विविध माहिती दिली आहे. वैमानिकांचा आहार कसा असावा, त्यांनी कपडे कोणते घालावेत, हेही लिहून ठेवलेले आहे. ही विमाने लढाऊसुद्धा असत. तेव्हा त्यातील शस्त्रांचीही माहिती देण्यात आली आहे. आता भारद्वाज ऋषींनी सात हजार वर्षांपूर्वीच हे सर्व लिहून ठेवले आहे म्हटल्यावर त्यापुढे कोण काय बोलणार? तशात या ग्रंथाच्या आधारे मुंबईतील संस्कृताचार्य शिवकर बापूजी तळपदे यांनी ‘मरूत्सखा’ नावाचे मानवरहित विमान बनविले होते. महत्त्वाचे म्हणजे त्याचे यशस्वी उड्डाणही करण्यात आले होते. तेही १८९५ साली.. राइट बंधूंच्या विमानोड्डाणाआधी, असेही सांगण्यात येते. त्यासाठी ‘केसरी’तील बातमीचे पुरावेही काढण्यात येतात. ती बातमी सध्या कुठे सापडत नाही हा भाग असला तरी आता त्याला बढाया आणि छद्मविज्ञान कसे म्हणायचे?
पण बरोबर ४० वर्षांपूर्वी पाच भारतीय शास्त्रज्ञांनी नेमके तेच सिद्ध करून दाखविले होते. एच. एस. मुकुंद, एस. एम. देशपांडे, एच. आर. नागेंद्र, ए. प्रभब आणि एस. पी. गोविंद राजू अशी त्यांची नावे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधील एरोनॉटिकल आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागात ते काम करीत. ते स्वत: विमानविद्य्ोचे अभ्यासक. त्यामुळे त्यांनी ‘वैमानिकशास्त्र’ या प्राचीन ग्रंथाचा अभ्यास केला. त्यानुसार काही प्रयोग केले आणि ते सगळे १९७४ च्या ‘सायंटिफिक ओपिनियन’ या विज्ञानपत्रिकेत ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ द वर्क वैमानिकशास्त्र’ या शीर्षकाने प्रसिद्ध केले.
भारद्वाज ऋषींच्या नावावर खपविल्या जात असलेल्या विमानविषयक ग्रंथाचा नेमका इतिहास शोधणे हेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यांच्यासमोर श्री ब्रह्ममुनी परिव्राजक यांचा १९५९ मध्ये प्रकाशित झालेला ‘बृहद् विमानशास्त्र’ आणि जी. आर. जोसेर यांचा ‘वैमानिकशास्त्र’ असे दोन ग्रंथ होते. त्यातल्या जोसेर यांचा इंग्रजी ग्रंथ आणि परिव्राजक यांचा ग्रंथ यांत सारखेच संस्कृत श्लोक होते. ते अर्थातच भारद्वाजांच्या ‘यंत्रसर्वस्व’मधले होते. आता प्रश्न असा होता की, ते आले कुठून? ‘बृहद् विमानशास्त्रा’चा आधार होता- बडोद्यातल्या राजकीय संस्कृत ग्रंथालयातले एक हस्तलिखित. ते १९४४ मध्ये उपलब्ध होते. शिवाय जी. वेंकटाचल शर्मा यांची सही आणि ९- ८- १९१९ अशी तारीख लिहिलेले एक हस्तलिखित पुण्यात मिळाले होते. त्याचाही आधार घेण्यात आला होता. येथे पं. सुब्बराय शास्त्री यांचे नाव येते. हे तेव्हाच्या मद्रास प्रांतातल्या होसूर तालुक्यातले. जोसेर यांच्यानुसार, विमानशास्त्राचे श्लोक सुब्बराय शास्त्री यांनी जी. वेंकटाचल शर्मा यांना सांगितले. ते त्यांनी लिहून ठेवले. तेव्हा मुकुंद यांच्या चमूने शर्मा आणि पं. सुब्बराय यांचे पुत्र वेंकटराम शास्त्री यांचा शोध घेतला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंडितजींकडे विशिष्ट अतिंद्रिय शक्ती होत्या. ते जेव्हा समाधीत जात तेव्हा त्यांच्या मुखातून श्लोक बाहेर पडत. शर्माजी ते लिहून ठेवीत. शास्त्रीजींचा मृत्यू १९४१ मध्ये झाला. तत्पूर्वीच या श्लोकांची हस्तलिखिते तयार करण्यात आली होती. ती नंतर ठिकठिकाणी गेली. त्यातील एक बडोद्यातील ग्रंथालयात गेले. सुब्बराय शास्त्रींच्या चरित्रानुसार, त्यांना गुरुजी महाराज या थोर साधुपुरुषाने विमानविद्या शिकविली होती. ते मुंबईलाही येत असत आणि तेथेच विमानशास्त्राचे काही श्लोक त्यांनी सांगितले होते. १९०० ते १९१९ या काळात त्यांनी एल्लप्पा नामक एका ड्राफ्ट्समनकडून काही आकृत्याही काढून घेतल्या होत्या. शिवकर बापूजी तळपदे यांनी सुब्बराय शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली विमान तयार केले होते, पण ते उडू शकले नाही, असे मुकुंद यांनी नमूद केले आहे.
मुकुंद यांच्यासमोर आता सुब्बराय यांनी सांगितलेले श्लोक होते. त्यातले संस्कृत वैदिक वळणाचे नव्हते. श्लोकांचा छंद अनुष्टुभ होता, पण भाषा साधी आणि आधुनिक होती. त्यातील अंतर्गत आणि निगडित पुरावे लक्षात घेता ते प्राचीन असणे अशक्य असल्याचे मुकुंद यांनी म्हटले आहे. ‘वैमानिकशास्त्र’ हा ग्रंथ १९०० ते १९२२ या काळात पं. सुब्बराय शास्त्री यांनी रचला असून तो भारद्वाज ऋषींचा आहे याला कोणतेही पुरावे नाहीत. म्हणजे या ग्रंथाचे प्राचीनत्व उडाले. तो तर विसाव्या शतकातला निघाला. आता मुद्दा राहिला त्यातल्या आकृत्या आणि माहिती यांतील तथ्यांचा आणि त्यातल्या मांत्रिक, तांत्रिक आणि कृतक विमानांच्या खरेपणाचा. या ग्रंथात शकून, सुंदर, रुक्म आणि त्रिपूर अशा चार प्रकारची कृतक विमाने वर्णिली आहेत. आपल्या या शास्त्रज्ञ पंचकाने त्यांतील तत्त्वे, भूमिती, रसायने व अन्य सामग्री अशा विविध बाबींचे संशोधन केले आणि शेवटी थेटच सांगून टाकले की, यातले एकही विमान उडू शकत नाही. त्यात ते गुणधर्मही नाहीत आणि क्षमताही. त्यांची भौमितिक रचना भयंकर आहे आणि उड्डाणविषयक तत्त्वे उडण्याला साह्य़ करण्याऐवजी विरोधच करणारी आहेत. या ग्रंथात विविध प्रकारच्या धातूंच्या निर्मितीबद्दल सांगितले आहे. भारतात प्राचीन काळापासून त्याची माहिती होतीच. ती आजही चालत आली आहे. असे असले तरी ग्रंथातील धातू आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया हे प्रत्यक्षात उतरूच शकणार नसल्याचे दिसते. आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे या विमानांचे आणि त्याच्या भागांचे वजन किती असेल, हे कुठेच दिलेले नाही.
म्हणजे आपले हे प्राचीन उडनखटोले प्रतिभाशक्तीचेच नमुने ठरले. पुन्हा हे केवळ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधील शास्त्रज्ञच सांगत होते असे नाही. जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनीही तेच म्हटले होते. एप्रिल १९८५ च्या ‘सायन्स एज’मध्ये लिहिलेल्या एका लेखात त्यांनी हे प्राचीन विमानशास्त्र विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही पातळ्यांवर आपले समाधान करू शकले नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
मुंबईतल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या आयोजकांना हे सर्व माहीत असणे कदाचित शक्य नाही. पण इतरांनी तरी तसा विज्ञानांधळेपणा दाखवू नये, इतकंच. आणि राहता राहिला प्रश्न आपल्या इतिहासगौरवाचा! तर आपल्या इतिहासात, संस्कृतीत गौरव करण्यासारखे खूप काही आहे. त्या सोन्यात हीणकस मिसळण्याची गरजच नाही.
–रवि आमले
आपली प्राचीनातली उड्डाणकला!
मुंबईत नुकतीच भारतीय विज्ञान परिषद पार पडली. तीत प्राचीन भारतीय विज्ञानावर एक परिसंवाद झाला.
आणखी वाचा
First published on: 11-01-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian science congress says real science ignored