इंदिरा संत यांच्या समग्र कवितेचा वेध घेणारा संग्रह पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. कवयित्री अरुणा ढेरे यांनी तो संपादित केला आहे. या संग्रहास ढेरे यांनी लिहिलेल्या विचक्षण प्रस्तावनेतील संपादित अंश..
इंदिरा संत हे नाव मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रथम आले ते सत्तर-बहात्तर वर्षांपूर्वी. १९४० साली ‘सहवास’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. मात्र, हा त्यांचा स्वतंत्र संग्रह नव्हता. कवी ना. मा. संत आणि कवयित्री इंदिरा संत या पती-पत्नींचा मिळून तो सिद्ध झाला होता. १९३५ साली ते दोघे विवाहबद्ध झाले आणि मधल्या पाच वर्षांच्या परस्परसहवासाच्या सगळ्या आनंदखुणा वागवीत ‘सहवास’ आला.
मात्र, इंदिराबाईंची निजखूण उमटली ती ‘सहवास’मध्ये नव्हे. ती उमटली ‘शेला’ या त्यांच्या पहिल्या स्वतंत्र काव्यसंग्रहात. १९५१ साली ‘शेला’ प्रसिद्ध झाला आणि इंदिरा या नावाची वीजरेघ जाणत्या रसिकांच्या मनात लखलखून उमटली. तिची तीक्ष्ण चमक मर्मज्ञ समीक्षकांनाही दृष्टिआड करता आली नाही.
‘शेला’नंतर त्यांचे आणखी आठ संग्रह आले. ‘मेंदी’ हा दुसरा संग्रह ‘शेला’पाठोपाठ चारच वर्षांनी १९५५ मध्ये प्रसिद्ध झाला आणि ‘मृगजळ’ तर अवघ्या दोनच वर्षांच्या अंतराने १९५७ मध्ये प्रसिद्ध झाला. पुढच्या संग्रहांची प्रकाशनाची गती थोडी संथ झाली. रंगबावरी (१९६४), बाहुल्या (१९७२), गर्भरेशीम (१९८२), चित्कळा (१९८९), वंशकुसुम (१९९४) आणि निराकार (२०००) असे संग्रह सहा-सात वर्षांच्या अंतराने पुढे प्रसिद्ध होत राहिले.
वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी म्हणजे १९३०-३१ साली इंदिराबाईंच्या कवितालेखनाची सुरुवात झाली. तेव्हापासून ‘शेला’ हा त्यांचा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह प्रसिद्ध होईर्पयचा काळ हा मराठी कवितेतले जुने नामवंत अस्तंगत होण्याचा आणि नवे कवी उदयाला येण्याचा मोठा गजबजता काळ होता. ज्येष्ठ कवी एकापाठोपाठ एक दृष्टिआड होत होते आणि याच दोन दशकांत आधुनिक मराठी कवितेचे सामथ्र्य आणि सौंदर्य प्रकट करणारी विविधगुणी कविता घेऊन अनेक नवे प्रतिभावंत कवीही पुढे आले. ‘प्रतिभा’, ‘जीवनसंगीत’ आणि ‘दूधसागर’ हे बा. भ. बोरकरांचे तीन संग्रह या काळात प्रसिद्ध झाले. पु. शि. रेगे (‘फुलोरा’ आणि ‘दोला’), संजीवनी (‘संजीवनी’) आणि बा. सी. मर्ढेकर (‘शिशिरागम’) या कवींचे पहिलेवहिले संग्रह याच काळात प्रसिद्ध झाले. नव्या कवितेची सृजनशील गजबज हे या काळाचे वैशिष्टय़च म्हटले पाहिजे.
इंदिराबाईंच्या कवितेतले नवेपण ‘शेला’मध्ये जे प्रथम प्रकटले त्याचे स्वरूप समजून घेण्याआधी या गजबजत्या सर्जक काळाच्या पाश्र्वभूमीवर ‘सहवास’चा विचार करणे अगत्याचे आहे. कारण इंदिराबाईंच्या विशिष्ट गुणभारित कवितेच्या प्रातिभ क्षमतांची अर्धस्फुट, पण निश्चित चाहूल ‘सहवास’मध्ये लागते आहे. ‘सहवास’ हा रविकिरण मंडळाच्या छायेतला संग्रह आहे असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यशवंत आणि माधव जूलियन हे इंदिराबाईंचे आवडते कवी होते. आणि ‘सहवास’ला प्रस्तावना आहे तीही यशवंतांचीच आहे.
संत पती-पत्नी त्यांच्या पहिल्यावहिल्या संयुक्त संग्रहाच्या अभिप्रायासाठी रविकिरण मंडळाकडे वळलेले दिसतात. रविकिरण मंडळाच्या छायेतला संग्रह याच भावनेने यशवंतांनी त्याचे स्वागत केले आहे. फर्गसन महाविद्यालयातले विद्यार्थीजीवन, महाविद्यालयामागच्या टेकडीवरचे विहार, तिथल्या कवि-कातळावर रंगलेल्या गप्पा, फुलत जाणारे प्रेम आणि घरच्या विरोधातून झालेला विवाह ही संत दाम्पत्याची पाश्र्वभूमी रविकिरण मंडळाच्या इतिहासातल्या नोंदी पुढे नेणारी होती. विशेषत: श्री. बा. रानडे आणि मनोरमाबाई या दोघांची आठवण यशवंतांना ‘सहवास’चे स्वागत करताना येणे स्वाभाविक होते. ते दोघेही कविवृत्तीचे होते आणि प्रेमविवाहानंतर दोघांनीही ‘श्री-मनोरमा’ या नावाने एकत्रित कवितासंग्रह प्रसिद्ध केला होता. यशवंतांनी साहजिकच या दोघांची आठवण केली आहे आणि इंदिराबाईंची कविता मनोरमाबाईंइतकीच गोड असल्याचा अभिप्राय दिला आहे. इंदिराबाईंच्या किंवा मनोरमाबाई, पद्मा, संजीवनी, शान्ताबाई यांच्या प्रारंभकाळातल्या कवितांमधल्या गोडव्याचा पोत सर्वसाधारणपणे सारखा वाटतो. या कवयित्रींच्या कवितेतला गोडवा त्यांनी व्यक्त केलेल्या आधुनिक जीवनदृष्टीचा आणि काव्यदृष्टीचा आहे. रविकिरण मंडळामध्ये त्यांची कडी काहीशी अडकते ती आधुनिकतेच्या जाणिवेमुळे.
विसाव्या शतकाचा प्रारंभकाळ हा शिकू लागलेल्या स्त्रियांच्या जीवनात चहूबाजूंनी मोकळेपणाचे वारे शिरण्याचा काळ होता. या वाऱ्याने काही लिहित्या स्त्रियांच्या जाणिवांचे पदर उलगडले. स्वतच्या प्रतिमेकडे, कुटुंबाकडे, नातेसंबंधांकडे पारंपरिकापेक्षा स्वतंत्र दृष्टीने पाहण्याचे भान त्यांना आले. त्यामुळे नव्या वळणाची आणि नवा आशय असणारी कविता त्यांच्याकडून लिहिली गेली. हा निराळेपणा आधुनिकतेचा परिणाम म्हणून आलेला होता आणि त्याचे नाते त्या कवयित्रींच्या जीवनानुभवाशी होते. रविकिरण मंडळाशी त्यांचे पुसटसे नाते होते ते अभिव्यक्तीच्या पद्धतीमुळे.
‘सहवास’मध्ये ना. मा. संतांच्या पंचवीस कविता आहेत आणि इंदिराबाईंच्या सदतीस! या कविता बहुतांश प्रीतीच्या कविता आहेत. इंदिराबाईंनी पूर्ववयात जे अनुभवले, पाहिले-साहिले, ते मनातळाशी तसेच आहे. वडिलांच्या वियोगाचे दुख आहे. तापट काकांनी दिलेल्या मनस्तापाचा क्षोभ आहे. वेळोवेळी कुस्करल्या गेलेल्या मनोभावांचे, अपेक्षाभंगांचे, नकारांचे, अन्याय-अपमानांचे सल आहेत. पण प्रियकराच्या सहवासाने त्यावर फुंकर घातली गेली आहे. वय तरुण आहे आणि प्रेम करण्याची शिक्षा म्हणून काकांनी हातावर तप्तमुद्रा उमटवली तरी मनाजोगती साथसोबत मिळाली आहे आणि मनाचा भार तिथे हलका करता येतो आहे.
कोठे खोल तळात पूर्वस्मृतिचे ज्वालामुखी जागृत
त्यांची साहुनि आच नित्य मन हे आतूनिया पोळले
अशी कबुली देतानाच आतले ते कढत रसायन वर आणणे प्रियकरालाही साहवणार नाही म्हणून तो ज्वालामुखी तसाच निद्रिस्त ठेवण्याची त्यांची धडपड आहे. ‘कधी कुठे न भेटणार, कधि न काही बोलणार’ या व्रताचा उच्चार पुढच्या संग्रहात झाला असला तरी व्रताची सुरुवात मात्र ‘सहवास’मध्येच झाली आहे.
मनोरमाबाई, संजीवनीबाई वा पद्माताईंच्या कवितेत दिसतात तसे ‘सहवास’मधल्या कवितेत प्रीतिभावनेचे अगदी नाजूक खेळ दिसतात; पण त्या खेळात गुंतलेले अतिसूक्ष्म, अतिखोल आणि अतितरल असे मनोभाव मात्र एकटय़ा इंदिराबाईंच्याच कवितेत अगदी प्रारंभीच्या त्या कवितेतसुद्धा प्रकट होतात.
मातीखालून हरळीची मुळे पुढे सरसरत जावीत तशा या कविता ‘शेला’पाशी पोचतात असे वाटते. म्हणूनच की काय, ‘शेला’मध्ये काही मोजक्या कविता ‘सहवास’मधून निवडून घेतलेल्याच आहेत. ‘सहवास’मध्ये आलेल्या कवितांचा लेखनकाळ म्हणजे इंदिराबाईंच्या ऐन तरुणपणाची दहा वष्रे. त्यांच्या वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षांपासून पंचविसाव्या वर्षांपर्यंतच्या कविता या संग्रहात आहेत. तरी आश्चर्य असे वाटते की, त्यांच्या पूर्ववाचनाची सावली या संग्रहातल्या आशयावर तर कुठे नाहीच, पण अभिव्यक्तीवरही फारशी दाट नाही.
त्यांचे वडील गेले ते त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी. पण वडील असतानाच धार्मिक पुस्तके त्यांच्या ओळखीची झाली होती. रोज रात्री आईबरोबर बसून वडिलांनी वाचलेली आख्याने ऐकण्याची सवय झाली होती. ऐकून ऐकून काही आर्या, काही श्लोक पाठही झाले होते. रोज संध्याकाळी वडील वेगवेगळी स्तोत्रे म्हणायला लावत. सकाळी आई भूपाळ्या म्हणवून घेई. कवितेशी त्यांची ओळख अशी पारंपरिक रचनांमधून झाली. आर्या वृत्त आवडीचे झाले आणि प्राथमिक स्वरूपात कवितेचा- म्हणजे कविता रचण्याचा नादही लागला. शाळेत भेंडय़ा लावताना वृत्त-छंदांमधून कविता रचण्याइतकी कवितेशी सलगी वाढली आणि ‘फुलांची परडी’ या नावाने स्वरचित कवितेची वहीदेखील झाली.
वडील गेले आणि सुखकारक होते ते सारेच चित्र बदलले. उग्र आणि तापट अशा काकांच्या धाकात वाढत असताना त्यांच्या विरोधामुळे कवितेची वही लपवूनच ठेवावी लागली. पण तिच्यात गुंतलेला जीव काही तिच्यावेगळा झाला नाही. पुढे कविता थोडी जाणती झाली ती फर्गसन महाविद्यालयात शिकत असताना. इथेच तिचा रसिकांशी आणि कवी-समीक्षकांशी संबंध आला. ‘ज्योत्स्ना’, ‘संजीवनी’सारख्या संकलन-नियतकालिकांतून कविता प्रसिद्ध झाल्या. ना. मा. संत भेटले आणि कवितांनी परस्परप्रेमाचे रंग आणखी गडद केले.
इंदिराबाईंनी लिहून ठेवलेली या काळातली एक आठवण त्यांच्या स्वतंत्र कविताकुळीची ओळख देणारी आहे. कोल्हापूरला असताना माधव जूलियनांशी त्यांचा परिचय झाला. माधवरावांनी आपण होऊनच तो करून घेतला आणि त्यांची कवितांची वही मोठय़ा आग्रहाने वाचायला नेली. त्या काळात बाईंचेच शब्द वापरायचे तर त्या ‘मोठय़ा भावावर्तात’ सापडल्या होत्या. प्रेम केले होते आणि प्रेमाला घरचा अर्थात् काकांचा तीव्र विरोध होता. फर्गसन महाविद्यालय सोडून कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये येणे भाग पडले होते. अशा काळात संतांची प्रेमभेट असलेली काळ्या रेशमाचे कव्हर असलेली ती सुंदर वही माधवरावांनी वाचायला नेली आणि दुसऱ्याच दिवशी ती परत केली तेव्हा तिच्यात तांबडय़ा पेन्सिलीने सर्वत्र चुका दाखवणाऱ्या खुणा होत्या आणि शेवटी शुद्धलेखन सुधारण्याची सूचना होती. ‘आधी जे म्हणायचे ते गद्यात लिहून काढा आणि मग ते कवितेत आणा. ज्ञानेश्वरी वाचा. लावण्या वाचा. शब्दाला स्वतचे व्यक्तिमत्त्व असते हे ध्यानात ठेवा,’ असा तोंडी उपदेशही त्यांनी केला. इंदिराबाईंनी लिहिले आहे, ‘त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व वाचले; शब्दांच्या दृष्टीने वाचले. पण त्याचा काही फारसा परिणाम झालेला मला दिसून येत नाही. कोणता का शब्द असेना, त्यात जे तेज कवी निर्माण करतो, त्याने त्या शब्दाला व्यक्तिमत्त्व येते असे माझे त्यावेळी मत झाले.’
इंदिराबाई अशा तऱ्हेने माधव जूलियनांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्या, किंवा यशवंतांच्या कविता आवडीने वाचत गेल्या, किंवा ‘वाग्जयंती’सारखे संग्रह पुनपुन्हा चाळत राहिल्या तरी पूर्वकवींच्या किंवा रविकिरण मंडळाच्या प्रभावळीत त्या जाऊन बसल्या नाहीत. याचे कारण अगदी प्रथमपासूनची त्यांच्या कविवृत्तीची पृथगात्मता आणि त्या पृथगात्मतेची त्यांना असणारी स्पष्ट जाणीव. या पृथगात्मतेची वैशिष्टय़पूर्ण घडण बऱ्याच अंशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून म्हणजे त्यांच्या िपडधर्मातून झाली आहे आणि काही अंशी त्यांच्या बालपणीच्या परिसरातून झाली आहे.
तवंदी हे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरचे गाव. इंदिराबाईंचे बालपण तिथे गेले. साठ-सत्तर वर्षांपूर्वी खेडय़ातल्या माणसांचे ऐकणे, वाचणे आणि सगळ्याच कला त्यांच्या दैनंदिन व्यवहारात मिसळून गेलेल्या असायच्या. त्या कलांची जीवनाशी असलेली निकटता आणि त्यांचा उत्स्फूर्त आणि सहज असा आविष्कार यांचा ठसा इंदिराबाईंवर फार गाढपणे उमटला. निसर्गातल्या रंग-गंधांनी जीव माखला गेला. आकारांनी दृष्टीवर गारुड केले आणि आविष्काराची अनलंकृत, स्वाभाविक, तरीही प्रतिभासंपन्न अशी पद्धतही त्यांना मनापासून भावली. जीवनाच्या मुक्ततेचा, चतन्याचा, लयपूर्णतेचा आणि सहज-साधेपणाचा गाढ परिणाम मनावर झाला. पुढे तोच कवितेच्या गाभ्याशी राहिला. त्यांच्या पृथगात्मतेची ती एक वेधवंती खूण झाली.
‘सहवास’ ते ‘शेला’ हा दहा-अकरा वर्षांचा काळ इंदिराबाईंच्या आयुष्यातला फार सुखाचा आणि फार दुखाचाही काळ ठरला. फार मोठय़ा उलथापालथीचा काळ ठरला. घरचा तीव्र विरोध पत्करून संतांशी त्यांनी प्रेमविवाह केला होता. तीन मुले झाली होती आणि उभ्या जगात परस्परांना आपणच फक्त काय ते आहोत, अशा गाढ विश्वासावर दिवस सरत होते. ते जर तसेच जात राहिले असते तर इंदिराबाई कवयित्री म्हणून फारशा क्रियाशील राहिल्या असत्या असे वाटत नाही. ‘माझे स्वप्न माझ्या हाती आले होते. आनंदाने मन भरलेले होते. कवितारचनेकडे माझे लक्ष नव्हते,’ असे त्यांनी स्वतकडे वळून बघताना पुढे म्हटले आहे. त्या दहा वर्षांत अवघ्या बारा कविता आणि त्याही बऱ्याचशा अंशी मुलांभोवती केंद्रित अशा त्यांनी लिहिल्या. कविता ही त्या काळात गौण होती. जगण्याच्या केंद्रस्थानी ती आलेली नव्हती.
१९४६ साली संतांच्या आकस्मिक मृत्यूने मात्र संसार एकदम हेलपाटला. पुराचा जबरदस्त तडाखा बसून घरदार होत्याचे नव्हते व्हावे तशी अवस्था झाली. माहेर असून नसल्यासारखेच होते. सासरचेही कोणी नव्हते. तीन मुलांची ती आई अवघी तीसच वर्षांची होती. त्या अवघड आणि शोककारी प्रसंगात सहनशक्तीच्या शोधात इंदिराबाई कवितेकडे वळल्या आणि दोन्ही परस्परांमध्ये वितळून गेल्या. हे वितळणे एकप्रकारे काचेसारखे होते. भावनांचे अतिशय नितळ िबब धरणारे आणि तरी अगदी कठीण, कणखर असणारे.
‘शेला’ सर्वस्वी इंदिराबाईंचा असा पहिला संग्रह. स्वतंत्र असा बासष्ट कवितांचा संग्रह. मनोरमाबाईंच्या कवितेतल्या गोडव्याशी आणि रविकिरण मंडळाच्या शैलीशी काहीशा क्षीण स्वरूपातच, पण दृश्यमान असलेला पूर्वीचा बंध या संग्रहाने पुरा नाहीसा झाला आणि इंदिराबाईंच्या विविध भावावस्थांचे नकाशे-अगदी त्यांच्याच शैलीने कवितेत उमटून आले. ते एकाच मनप्रदेशाचे नकाशे होते आणि तो सारा प्रदेश दुखार्त वाऱ्याने झोडपून गेल्यासारखा झाला होता.
हे दुख तसे अगदी व्यक्तिगत होते. त्याला सामाजिक किंवा सांस्कृतिक दुखांचे परिमाण नव्हते. किंबहुना, एकूणच इंदिराबाईंच्या कवितेला- काही अपवाद वगळता (आणि तशा अपवादात्मक कवितांमध्ये कवितापण उणावलेलेच आहे, हे लक्षात घेता) सामाजिक, सांस्कृतिक सुखदुखाचे भान नाहीच म्हटले तरी चालेल. पतिनिधनाचे दुख फक्त त्यांचे असेच होते, पण ते खरे तर प्रीतीचे दुख होते. ज्याच्यावर जीव उपसून प्रेम केले तो सहचर त्यांनी कायमचा गमावला होता आणि पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी त्यांची कविता जीव घाबरा होईपर्यंत तडफड करीत होती. वाचणाऱ्याला सहन होऊ नये इतकी ती तडफड निकराची होती.
‘शेला’मधल्या याच अनुभवाचा विस्तार अधिक उचंबळून ‘मेंदी’त आणि त्याहीपेक्षा जास्त उसळीने ‘मृगजळ’मध्ये झाला आहे. इंदिराबाईंच्या एकूण कवितेत सर्वात उंच चढलेली कविता याच दोन संग्रहांमधली आहे. निसर्ग, प्रेम, विरह, दुख आणि एकाकीपण हे इंदिराबाईंच्या कवितेचे पंचप्राण आहेत असे म्हटले गेले आहे. पण ‘शेला’, ‘मेंदी’ आणि ‘मृगजळ’ या तीनही संग्रहांतल्या (आणि खरे तर पुढच्या सहा संग्रहांतल्याही) एकूण कवितांचे स्वरूप उलगडताना ही पंचप्राणांची कल्पना दूरच सारावी लागते. कारण यांपकी कोणताही एक भावघटक स्वतंत्रपणे इंदिराबाईंच्या कवितेत येत नाहीच. त्यांचे प्रेम म्हणजेच दुख आहे. दुखाच्या गाभ्यातच विरह आहे. विरहाची मिठी एकाकीपणाला आहे. आणि या सगळ्यात निसर्ग विरघळून एकजीव झालेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा