स्वानंद किरकिरे
इन्दौर.. राहत इन्दौरीसारख्या मोठया शायराचं.. इन्दौर ‘नई दुनिया’सारख्या नामवंत हिन्दी वर्तमानपत्राचं.. डॉ. राजेंद्र माथुर, प्रभाकर माचवे यांच्यासारख्या मातबर विचारवंतांचं.. खव्याचं.. पोह्यांचं.. इंदुरी गानवैशिष्टय़े जपणाऱ्या रामूभय्या दातेंचं. नाटयगुरू बाबा डिके यांचं. इन्दौर चित्रकार कलागुरू देवळालीकरांचं.. मराठी संस्कृती, खाद्यपरंपरा जपणाऱ्या या शहरातला मी तुमच्याशी संवाद साधणार आहे- या शहरावर आणि इथल्या आप्तांवर..
‘‘रा ऽऽऽ ओ ऽऽम!’’ एके काळी इन्दौर या ‘मिनी मुंबई’ची पहाट या आरोळयांनी व्हायची. इन्दौर.. मध्य प्रदेशातलं एक शहर- जे मराठे राजे होळकरांनी वसवलं, घडवलं, सजवलं; आणि तिथं एक आगळी-वेगळी मराठी संस्कृती रुजवली. इन्दौरला ‘मिनी मुंबई’ म्हणतात! ‘मिनी बॉम्बे’.. याची वेगवेगळे लोक वेगवेगळी कारणं सांगतात. इन्दौर एक व्यापारी शहर- तसं थोडं मॉडर्न, कॉस्मोपॉलिटिन वगैरे.. पण माझी स्वत:ची अशी ‘थिअरी’ आहे की, इन्दौरमध्ये मुंबईसारख्याच कापड गिरण्या होत्या आणि मोठा कापड बाजारसुद्धा! म्हणूनच इन्दौर ‘मिनी बॉम्बे’ झालं. मी लहान असताना इन्दौर मिलच्या भोंग्याच्या आवाजावर लोक आपली घडयाळं चालवायचे. आजी म्हणायची, ‘‘नऊचा भोंगा झाला अन् पाणी नाही आलं अजून.’’ किंवा ‘‘सातच्या भोंग्याला अमुक ठिकाणी भेटतो.’’
हेही वाचा : हिंदूंच्या ‘राजकीय पर्यटना’चा आरंभ
या गिरण्या, त्यांत काम करणारे मजूर, कामगार संघटना सगळं काही मुंबईसारखंच होतं. पुढे त्या मुंबईच्या गिरण्यांसारख्याच बंदही झाल्या आणि तिथल्या मजुरांचे मुंबईच्या गिरणीकामगारांप्रमाणेच हालदेखील झाले. पण या गिरण्यांनी एक सुंदर सांस्कृतिक वारसा जोपासला. या गिरण्यांमध्ये गणपती उत्सव साजरे होत आणि हौशी नाटकवाल्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक मंचदेखील उपलब्ध होत असे.
आजही इन्दौरची जुनी मराठी मंडळी त्या गावाला ‘इन्दूर’ म्हणतात. माळव्याचा पठार, तिथली काळी माती भरपूर देणारी. एक म्हण आहे –
मालव भूमी गहन गभीर
पग पग रोटी, डग डग नीर
माळव्याच्या भूमीत पावला पावलावर धान्य आहे आणि जिथे पाय ठेवू तिथे पाणी.. इतकी समृद्धी आहे इथे.
मल्हारराव होळकर यांच्यानंतर देवी अहिल्याबाई होळकर, तुकोजीराव आणि यशवंतराव होळकरांपर्यंत सगळयाच होळकरांनी इन्दौरला खूप प्रेमानं घडवलं.. खूप काही दिलं- संगीतापासून ते क्रिकेटपर्यंत.. सगळयांची एक सुरेख सुबत्ता इन्दौरात आली. लताबाईंचा जन्मसुद्धा इन्दौरचा (फक्त जन्मच!) योगायोगानं त्या काळी माई मंगेशकर इन्दुरात होत्या. पण आम्ही इन्दौरकर या गोष्टीचा प्रचंड अभिमान बाळगतो. गायक किशोर कुमारदेखील इन्दौरजवळच्या खांडव्यातला, पण तो थोडा काळ इन्दौरमध्ये शिकला. आम्हाला त्याचाही खूप अभिमान! आम्हाला अभिमान बाळगायला आवडतं. आम्हाला आमच्या (क्रिकेटपटू) कॅप्टन मुश्ताक अलींचा अभिमान आहे, सी. के. नायडू यांचाही अभिमान आहे, आम्हाला आमच्या ‘शब- ए- मालवा’चा (म्हणजे माळव्याची रात्र, दिवसा कितीही गर्मी असली, तरी माळव्याची रात्र थंडगार असते.) अभिमान आहे. आम्हाला आमच्या खाद्य संस्कृतीचा अभिमान आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या तीन राज्यांच्या सीमा इन्दौरपासून जवळ. त्यामुळे थोडं मारवाडी, थोडंसं गुजराती आणि पुष्कळशा मराठी पदार्थाची एक चविष्ट देवाण-घेवाण या मातीत झाली.
हेही वाचा : गजराजाचा पहावा प्रताप!
पोहे.. आमच्या इन्दौरमध्ये (माळवी पोहे हा प्रकार) जन्माला आला आणि संपूर्ण मध्य प्रदेशाचा ‘स्टेपल डाएट’ बनून गेला.
मी असं ऐकलं होतं की, एका कुण्या जोशी कुटुंबानं महाराष्ट्रातील कांदेपोहे, मिसळ, साबुदाणा खिचडी हे खाद्यपदार्थ महाराष्ट्रातून इन्दौरमध्ये नेले. पण त्यावर त्यांनी रतलामची (इन्दौरजवळचं गाव) तिखट शेव वर भुरभुरून पोह्याला आपलंसं केलं.. जिरावण (जिरा मसाला) कच्चा कांदा असे आणखी काही संस्कार करून पोह्यंनी माळव्यात आपले पाय रोवले आणि इन्दौरात ते ‘पोहा’, ‘पोए’, ‘पोया’ या सगळया प्रेमळ नावांनी ओळखले जाऊ लागले. इथल्या लोकांनी पोहे रिचवले, पचवलेही! मिसळ-उसळ, पोहे, रजस्थानची कचोरी, सामोसे इन्दौरनी आपलेसे केले. एक कंद- गराडू फक्त रतलामचा आणि खास इन्दौरलाच खायला मिळतो. खोबऱ्याचं पॅटिस, भुट्टयाचा कीस (मक्कीच्या कणसाचा), दाल बाफले (वाफवलेल्या बाटया) हे सगळे इन्दौरचे खास पदार्थ आणि शिवाय माव्याच्या मिठाया. मावा म्हणजे खवा. इन्दौरला माव्याची राजधानी म्हणायला हरकत नाही. बऱ्याच राज्यांमध्ये खवा इन्दौरमधून निर्यात होतो. सोन्या- चांदीप्रमाणे माव्याचाही भाव रोज बदलतो. आणि इन्दौरी खाद्य संस्कृतीचा प्रभाव म्हणा किंवा वेड.. शाळेत असतानादेखील मी आणि माझ्या शाळेतली मुलं माव्याचा भाव यांवर गप्पा रंगवीत असू.
‘‘आज मावा २२ हो गया यार!’
‘‘च् च् च्.’’
‘‘देखना कल गिरेगा.’’
‘‘नहीं भाई, दीवाली तक तो ३२ पहूंचेगा.’’
ज्या गावात काही कारण नसताना शाळकरी पोरं खव्याचे भाव ‘डिस्कस’ करतात त्या गावात इतर गोष्टींपेक्षा कशाला जास्त महत्त्व असेल, हे तुमच्या लक्षात आलंच असेल.
कोल्हापूरप्रमाणे इन्दौरातही होळकरांनी कुस्तीला भरपूर आश्रय दिला होता. जुन्या इन्दौरात इथे तिथे सगळीकडे लाल मातीच्या व्यायामशाळा होत्या. त्याकाळी मुलांना व्यायामशाळेत पाठवायची पद्धत होती.
मीपण फावडा (कुदळ) हातात घेऊन आखाडयातील लाल माती खणली आहे. पहिलवान बनण्याची ती पहिली पायरी.
गल्लीच्या नाक्यावर अनेक पहिलवानांना मी ‘खुराक नही मिल रहा है, नही तो इस बार का हिन्द केसरी तो मैं ही बनता.’ असं म्हणताना पाहिलं आहे. कापड गिरण्यांच्या गणपती उत्सवाच्या झॉंकी निघत. त्या बघायला गावोगावचे लोक इन्दौरात गर्दी करत. या झॉंक्यांमध्ये बरेचसे विषय ‘करंट अफेअर’ला धरून हाताळले जात. आणि या झॉंक्यांचं दुसरं वैशिष्टय म्हणजे इन्दौर शहरातले विविध आखाडे. (व्यायामशाळा) पहलवान लोक आपली लाठी- तलवार – पट्टी असे शस्त्र चालवण्याची कला दाखवत. इन्दौरची शान होती पहलवानी.
हेही वाचा : आदले । आत्ताचे : टोचणारी गोधडी
इन्दौरचे सणसुद्धा आगळेवेगळेच. सगळया जगभरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते आणि रंग खेळला जातो. पण इन्दौरात त्या दिवसाव्यतिरिक्त पाच दिवसांनी रंगपंचमी त्यापेक्षाही अधिक उत्साहानं साजरी करण्यात येते. रंगपंचमीच्या दिवशी गणपती उत्सवाच्या झॉंक्यांप्रमाणे वेगवेगळया सामाजिक संस्था रस्त्यावर येतात अन् त्या टोळया विशिष्ट यंत्रांच्या मदतीनं लांबलांब रंग फेकत-उधळत गावात निघतात. कुणाची तोफ किती फूट लांब रंग फेकू शकते याची स्पर्धा रंगते.
सगळं गाव रंगात न्हाऊन निघतं. आम्हा मुलांचं बरं, होळीनंतर आठएक दिवस तरी चेहरे लालच. रस्ते, घर, गाडया, खिशातल्या नोटा, पैसे.. सब कुछ लालम् लाल!
एक आणखी आगळा वेगळा खेळ खेळला जातो इन्दौरला लागून एका गावात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी -‘हिंगोट युद्ध’. हिंगोट नावाचं एक फळ असतं- साधारण एका छोटया वांग्याइतकं. ती फळं वाळवून त्यात दारू (फटाक्याची) भरून ती पेटवून दोन टोळया ते हिंगोट एकमेकांवर फेकतात- अगदी दिवाळीच्या रॉकेटसारखं! मग हे हिंगोट दुसऱ्या बाजूचा खेळाडू ढाल समोर करून अडवतो. असा हा भयानक खेळ सुरू राहतो. रात्रीच्या वेळी लांबून दिसायला हे सारं मोहक असलं, तरी या खेळात अनेक लोक भाजतात. काही हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. पण कोण जाणे कसल्या आवडीनं हिंगोट युद्ध खेळतात? स्पेनमधील बैलांबरोबरची लढाई किंवा जल्लीकट्टूइतकाच क्रूर खेळ आहे हा!
आणखी काही मराठी परंपरा- ज्या मला महाराष्ट्रातसुद्धा कमीच आढळतात, त्या इन्दौरात बऱ्याच काळ जोपासल्या गेल्या. एक म्हणजे होळीच्या रात्री बोंबलणं. एकाएका घरासमोर जाऊन त्यांच्या उखाळया-पाखाळया काढणं, बोंबा मारणं सुरू असायचं, पण त्या रात्री कुणाला कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटायचं नाही. खूप धमाल करायची पोरं; आणि ज्याच्या नावानं बोंबलायचं तेसुद्धा हे हसण्यावारी घेत असत किंवा घ्यावं लागत असे.
दुसरी एक छोटीशी परंपरा इन्दौरनं बरीच वर्ष जोपासली होती ती म्हणजे गुलाबाईची गाणी. एक गुलोबा आणि गुलाबाई अशा दोन लहान मूर्त्यां गणपतीसारख्या घरात बसवल्या जायच्या. गणपती झाला की मग काही दिवसांनी सफारी घातलेले गुलोजी आणि नऊवारी घातलेल्या गुलाबाई-अशा दोन मूर्त्यां घराघरांत स्थापन व्हायच्या. कुणी म्हणायचं, ते शीव-पार्वतीचे अवतार आहेत. कुमारिकांचा हा सण. पण आमच्या लहानपणी हा लिंगभेदविरहीत पार पडे. मुली कुणाच्या तरी घरी एकत्र यायच्या आणि गुलाबाईची गाणी म्हणायच्या.. ती गाणी बरीचशी महाराष्ट्रातल्या भोंडल्यात सापडतात.
‘काल्र्याचा वेल लाव ग सुने.. मग जा आपल्या माहेरा..’ लोकगीतांसारखी गंमतशीर गाणी असायची. पण सगळयात मोठी गंमत म्हणजे गाणी म्हणून झाल्यावर जो प्रसाद असायचा तो मुलांना ओळखावा लागायचा.
‘‘कश्या परी?’’
‘‘गोडा परी’’
‘‘तिखटा परी’’ आणि मग खाद्यपदार्थ मुलांना मिळायचे. शिरा, छोले, गुलाबजाम.. शेवटचं मला आठवतं ती ‘मॅगी’ होती.
हेही वाचा : चौसष्ट घरांच्या गोष्टी : राज्यातील बुद्धिबळाची झळाळी…
इन्दौरात काही सुंदर चर्च आहेत. सुरेख मशिदी आहेत. मोहर्रमला होळकरांतर्फे एक ‘सरकार ताजिया’ अजूनही उठतो. इन्दौर हे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील उस्ताद आमिर खान यांचं गाव! सुरेल लोक .. सुरेल गाणं.. सुरेल परंपरा..
महिला क्रिकेटचं पहिलं मोठं ट्रेनिंग सेंटर इन्दौरच. ‘हॅप्पी वन्डर्स क्लब’ने अनेक राष्ट्रीय पातळीच्या खेळाडू दिल्या.
इन्दौर.. राहत इन्दौरीसारख्या मोठया शायराचं.. इन्दौर ‘नई दुनिया’सारख्या नामवंत हिन्दी वर्तमानपत्राचं.. डॉ. राजेंद्र माथुर, प्रभाकर माचवे, राहुल भारुटेसारख्या अनेक मातबर विचारवंतांचं. इंदुरी कला-संस्कृती, गायन रसिक आणि त्यांना जोपासणाऱ्या रामूभय्या दातेंचं. नाटयगुरू बाबा डिके यांचं. इन्दौर चित्रकार कलागुरू देवळालीकरांचं आणि त्याच्या अनेक नामवंत शिष्यांचं. इन्दौर हुसेन यांचं, इन्दौर विष्णू चिंचाळकर ‘गुरूजी’ यांचं..
इन्दौरच्या गल्ल्याबोळांत सुरा घेऊन फिरणारा गुंड आणि उत्तम गाणी गाणारा गवई एकत्र विडया, पान, तंबाखू खाताना आढळू शकतात. किंवा त्या दोघांची मैत्री असणं काही फार आश्चर्याची बाब नसते. इन्दौर साधी पत्तीचं (तंबाखू), इन्दौर शिकंजीचं (लिंबू नाही एक आगळया वेगळया श्रीखंड, रबडी तत्सम पेय).. इन्दौर रात्र रात्रभर खादाडी करणाऱ्या सराफा बाजाराचं.. सोन्याचं, चांदीचं आणि आज ढग कडाडतील का पाऊस पडेल? यांसारख्या कुठल्याही गोष्टीवर सट्टा खेळणाऱ्यांचं!
विविध रंग, विविध ढंग आणि एक विशेष तल्लख विनोदबुद्धी असलेल्यांचं हे शहर आणि इथला मी.. मराठी? का माळवी?.. मराठी माळव्याचा खरं तर..
मी या सदरात इन्दौरबद्दल लिहिणार आहे. इथल्या माझ्या असलेल्या काही लोकांवरच लिहिणार आहे. काही लोक- जे आता आपल्यात नाहीयेत.
swanandkirkire04@gmail.com