‘माझा गाव माझी माणसे’हा इंद्रजीत भालेराव यांचा ललित लेखसंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. गावाचा एक परिपूर्ण पट या लेखांमधून मांडला आहे. ‘गावाकडं’ या पहिल्याच लेखात गावाविषयी लोकांच्या मनात असलेलं प्रेम याविषयी लिहिलं आहे. बहिणाबाई चौधरी, वामनदादा कर्डक, केशवसुत, बा. सी. मर्ढेकर यांची आपलं गाव सोडतानाची तगमग याविषयी लेखक सांगतो.
हे ही वाचा…वेड्या दोस्तीतील शहाणीव…
आपल्या गावातली माणसं, त्यांचं जगणं, गावगाडा, गावकऱ्यांचं गावाभोवती गुंफलेलं जगणं या पुस्तकातून शब्दांकित झालं आहे. भालेरावांचं कवी असणं हे या पुस्तकात जागोजागी जाणवतं. ललित लेखनाला कवितेची जोड असं दुहेरी आनंद देणारं हे लेखन आहे. गावाकडच्या गोष्टी वाचून कधी मन प्रसन्न होतं, कधी हळवं होतं. गावात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदतात याचं प्रत्ययकारी वर्णन करताना लेखक म्हणतो-
‘अलीवलींच्या सूफी कवाली मजार दर्ग्यात
नाथांचा भावार्थ उलगडे मठा-मंदिरात तुऱ्यात कलगी रुतून बसली तिलाच सलगी साजे
मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे’
वर्गातल्या मुलांना गावातल्या वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून त्यांनी कविता लिहिली-
‘काळ्या बापाचं, बापाचं हिरवं रान
काळ्या माईनं, माईनं पिकवलं सोनं
पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता’
हे ही वाचा…मनोहर मालिका आणि…
गावातले सणासुदीचे दिवस, शेतीचा बहराचा काळ, दुष्काळ… अशा अनेक गोष्टी या लेखांमधून डोकावतात. गावाच्या गोष्टी वाचताना वाचक गावाशी कधी एकरूप होतो हे कळतही नाही. ‘माझा गाव माझी माणसे’,इंद्रजित भालेराव, सुरेश एजन्सी, पाने- १६८, किंमत- २६० रुपये.