– सुनील किटकरू
१९२५ साली विजयादशमीच्या दिवशी नागपुरात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. अथक त्याग, कष्टावर उभ्या राहिलेल्या या स्वयंसेवी संघटनेला प्रचारकांची परंपरा लाभली. शताब्दी वर्षाच्या आरंभी संघकार्य आणि संघविचार पुढे नेणाऱ्या या कर्मयोगी मंडळींचे स्मरण…
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वव्यापी व सर्वस्पर्शी झाला आहे. राजकारण असो की समाजकारण- संघ हा चर्चेचा विषय ठरला आहे. इंग्रजांना दोष न देता ‘आत्मविस्मृतीचा रोग हिंदू समाजाला झाला आहे. त्याचे निदान हिंदू संघटन’ या निष्कर्षावर डॉ. हेडगेवार ठाम होते. आता संघ शताब्दीकडे वाटचाल करीत आहे. संघ कार्यपद्धती अभिनव आहे. संघ दैनंदिन संघ शाखांच्या माध्यमातून कार्यान्वित असतो. व्यायाम, गीत, बौद्धिक, चर्चा, प्रार्थना इत्यादींचा त्यात समावेश असतो. रोज चालणारे कार्य असा लौकिक असणारी स्वयंसेवी संघटना जगात क्वचितच असावी. संघ म्हणजे शाखा आणि शाखा म्हणजे कार्यक्रम. कार्यक्रमांतून संस्कारी कार्यकर्ता निर्मिती, असे हे सूत्र आहे. विद्यार्थी शिक्षण, कामगार, सहकार, जनजाती, धार्मिक अशा विविध क्षेत्रांत संघ प्रेरणेतून ३२ हून अधिक अखिल भारतीय संघटना आपापल्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. ‘भारत राष्ट्र परमं वैभवं’ प्राप्त करण्याच्या उद्देशाने त्या कार्यरत आहेत. अनेक कार्यकर्त्यांचा अथक त्याग, कष्टावर त्या उभ्या झाल्या आहेत. तरी त्यांचा कणा प्रचारक हाच आहे.
संघ प्रचारक हा घरदार सोडून केवळ संघ सांगेल तिथे व संघ म्हणेल त्या क्षेत्रात निर्लेप वृत्तीने कार्य करतो. तो अविवाहित असतो. जेव्हा संघकार्य विस्ताराची गरज भासली, तेव्हा समयदान देणारे कार्यकर्ते आवश्यक होते. डॉ. हेडगेवारांच्या चुंबकीय व्यक्तिमत्त्वामुळे अनेक तरुण संघकार्याकडे आकर्षित झाले. त्यांपैकी बाबासाहेब आपटे आणि दादाराव परमार्थ हे दोघे आद्या प्रचारक. अधिकृत प्रचारक पद्धती यांच्यापासून सुरू झाली. बाबासाहेब आपटेंचे वाचन दांडगे आणि चिंतन उत्तम होते. भारताची सांस्कृतिक परंपरा, इतिहास, थोर पुरुष अशा अनेक विषयांवर त्यांची पक्की पकड होती. त्यांनी हिंदू राष्ट्राच्या प्राचीन परंपरेशी संघाचे नाते परोपरीने स्पष्ट केले व स्वयंसेवकांत राष्ट्रासंबंधी गौरवाची भावना निर्माण होईल, अशा प्रकारे विषयांची मांडणी केली. ठिकठिकाणी अवघड क्षेत्रातही संघकार्याच्या पायाभरणीचे काम त्यांनी जिवापाड कष्ट घेऊन केले. ठिकठिकाणी गेलेल्या तरुण कार्यकर्त्यांना त्यांनी मोेठा आधार दिला व त्यांचा मार्ग सुकर केला. इतिहास, संस्कृती, अमर हिंदू राष्ट्र, दशावतार आधारित राष्ट्रजीवनाच्या परंपरा, संजीवनी विद्या असे विपुल लेखन केले. इतिहास संकलन समितीचे, सरस्वती नदी शोध अभियानाचे कार्य त्यांच्या प्रेरणेने मोरोपंत पिंगळे यांनी प्रचारक असताना तडीस नेले. रामजन्मभूमी आंदोलन, गोरक्षण अशा अनेक विषयांचा सूत्रपात, रणनीती याच मोरोपंतांनी यशस्वी केली. पुढे त्यांचा कार्यभार अभियांत्रिकी शिक्षण प्राप्त केलेले, गर्भश्रीमंत असूनही पुढे आजीवन प्रचारक झालेले, राम मंदिर चळवळ हिंदू समाजाच्या अग्रस्थानी नेऊन ठेवणारे अशोक सिंघल यांनी सांभाळला.
हेही वाचा – वेड्या दोस्तीतील शहाणीव…
आद्या प्रचारकांपैकी ‘अवधूत’ अशी ख्याती असलेले दादाराव परमार्थ यांनी तमिळनाडू व आसाममध्ये संघकार्य पोहोचवले. लौकिक बंधनाच्या पलीकडे गेलेले असे हे व्यक्तिमत्त्व होते. अवधूताप्रमाणे सदैव कशाच्या तरी शोधात असलेले डोळे, हलणारी मान, विस्कटलेले केस असलेला चेहरा, धोतराच्या काठाला वारंवार चष्मा पुसण्याची त्यांची सवय, मधूनच नजरेला नजर देत ते शाखा चालवणाऱ्या कार्यवाहाला प्रश्न विचारत. एकदा त्यांनी कार्यवाहाला ‘शाखेत उपस्थिती कमी का झाली?’ असा प्रश्न केला तर उत्तर आले, ‘पावसाळा’ (रेनी सीजन). त्यावर ताबडतोब दादारावांनी केलेला ‘उपस्थिती कमी होण्याचे रीझन सीझन होऊ शकत नाही’ असा श्लेष आजही अनेकांच्या स्मरणात आहे. इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या दादारावांची गाडी भाषणात मराठी, हिंदीतून केव्हा इंग्रजीकडे वळे हे कळत नसे. ते देशाच्या फाळणीचे दिवस होते. एक काँग्रेसी नेता म्हणाला होता, ‘विभाजन ही एक निश्चित वस्तुस्थिती आहे का?’ याबाबत काही विद्यार्थ्यांनी दादारावांना विचारले असता त्यावर ते ‘विभाजन अमान्य केले तर नाही, मान्य केले तर आहे; तुम्हाला काय वाटते?’, असे म्हणाले. अशी त्यांची निरुत्तर करणारी शैली होती. आज सर्वांनाच वारंवार प्रश्न पडतो, शेवटी संघ आहे तरी काय? एका शिबिरात हाच प्रश्न दादारावांना विचारला गेला. त्यावर त्यांनी पुढल्या क्षणी उत्तर दिले, ‘संघ हा क्रमबद्ध उत्क्रांत होणाऱ्या हिंदू राष्ट्राचे जीवनध्येय होय.’ आजपर्यंत ज्या पद्धतीने संघकार्य विकसित होते हे अनुभवल्यावर वरील वाक्य सार्थच ठरते.
सुरुवातीच्या काळात भैय्याजी दाणी १९२८ साली बनारसला गेले. पुढे ते ‘प्रापंचिक प्रचारक’ म्हणून प्रसिद्धीला आले. त्यांचे मोठे योगदान म्हणजे संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना बनारसला असताना संघकार्यात आणणे हे होय. महात्मा गांधीजींपर्यंत पोहोच असलेले नि:स्वार्थ कार्यकर्ते म्हणजे वर्ध्याचे आप्पाजी जोशी. क्रांतिकारी, काँग्रेसमध्येही कार्य करून, तेथील अनेक संस्थांचे प्रमुख असलेले आप्पाजी शेवटी डॉ. हेडगेवार यांच्याशी एकरूप झाले. डॉक्टरांच्या आवडत्या शब्दात सांगायचे म्हणजे ‘संघाचे ‘भूत’ त्याच्यावर स्वार झाले.’ वरील दोघे प्रापंचिक होत, पण सुरुवातीच्या संघ विस्तारात त्यांचे भरीव योगदान होते. असे गृहस्थी (प्रापंचिक) प्रचारक आजही असतात पण अपवादात्मकच.
१९३२ पासून प्रचारकांची नागपूरहून रवानगी संघकार्य विस्तारासाठी झाली. भाऊराव देवरस (लखनऊ), राजाभाऊ पातुरकर (लाहोर), वसंतराव ओक (लखनऊ), एकनाथजी रानडे (महाकौशल) ज्यांनी पुढे विवेकानंद केंद्र शिला स्मारक कन्याकुमारीला उभारले. माधवराव मुळे (कोकण, पंजाब). विभाजनाच्या वेळेस लाखो हिंदूंचे रक्षण, पुनर्वसनाचे महत्कार्य माधवरावांनी केले. ते उत्कृष्ट कवी, लेखक होते. याखेरीज जनार्दनपंत चिंचाळकर, नाथमामा काळे (तमिळनाडू). जनार्दनपंतांनी पुढे ‘आदिम जाती सेवक संघा’चे प्रसिद्ध गांधीवादी ठक्करबाप्पांनी सुरू केलेले कार्य भारतभर पसरवले, नरहरी पारखी व बापूराव दिवाकर (बिहार), बाळासाहेब देवरस (बंगाल), यादवराव जोशी (कर्नाटक), अशी मालिका गुंफत गेली. पुढे चंद्रशेखर भिसीकर (कराची), बाबाजी देशपांडे (पंजाब), केशवराव गोरे (छत्तीसगड), मधुकरराव भागवत (गुजरात), दत्ताजी डिडोळकर (तमिळनाडू), बाबाजी कल्याणी (पंजाब), पांडुरंगपंत क्षीरसागर (बंगाल), मोरेश्वर मुंजे, (पंजाब), राजाभाऊ पातुरकर (पंजाब), बच्छराज व्यास (राजस्थान) अशी शेकडो प्रचारकांची फळी देशाच्या कानाकोपऱ्यात गेली. ही यादी मोठी आहे. १९५० पर्यंत नागपूर विदर्भातून ३२३ प्रचारक निघाले.
१९३९ पर्यंत डॉक्टर हेडगेवारांच्या हयातीत नागपुरातील संघ शिक्षा वर्गात ‘आज हिंदुराष्ट्राचे लघुस्वरूप पाहात आहे,’ असे उद्गार त्यांनी काढले होेते. ‘तेजोमय प्रतिबिंब तुम्हारा, स्वयंसिद्ध अगणित निकले’ असेच डॉक्टरांबद्दल म्हणावे लागेल. साधेपणा, नम्रता, सोशीकता, शिक्षणात उत्तम प्रावीण्य प्राप्त केलेली, राष्ट्रोत्थानासाठी वेगवेगळे प्रयोग, प्रकल्प, संघटना उभी करणारी ही कर्मयोगी मंडळी होती. येशू ख्रिास्ताचे पहिले बारा शिष्य व परमहंस रामकृष्णांचे पहिले १६ शिष्य (त्यातील एक विवेकानंद), तसेच हे डॉक्टरांचे सहकारी होते. आज उपलब्ध होत असलेल्या साहित्यावरून त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो. या सर्वांचे जीवन प्रेरणारूप आहे. कधी झाडाखाली तर कधी मंदिरात, कधी रस्त्याच्या कडेला झोपावे लागत होते. अनोळखी प्रदेश, माणसे, भाषा चालीरीती या प्रचारकांनी आत्मसात केल्या. मैलोन्मैल पायपीट केली. चणे-फुटाणे खात, पाणी पिऊन तर कधी उपाशी असे कष्टमय जीवन हिंदुराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी भोगले.
एके काळी प्रचारक राहिलेले सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘ज्योती पुंज’ पुस्तकाबद्दल म्हटले आहे, ‘माझ्या या संस्कार यात्रेदरम्यान मला जगाच्या नजरेत अतिशय लहान, पण प्रत्यक्षात महान व्यक्तिमत्त्वांजवळ जाण्याची संधी मिळाली. त्यांचे प्रेम, त्यांचे सान्निध्य, माझ्यावरील संस्कार प्रेरणास्राोत ठरले.’ खरे तर या नावांची यादी फार मोठी आहे. पण जागेची मर्यादा असल्याने काहींचे पुन:स्मरण करीत आहे. कोणतीही अपेक्षा न करता जीवन समर्पित करणाऱ्या उज्ज्वल परंपरेची फारच कमी लोकांना माहिती आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण आणि शरीराचा प्रत्येक कण मातृभूमीच्या सेवेत अर्पण करणाऱ्या अशा समाज शिल्पकारांचे क्वचित स्मरण केले जाते. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुगंध आजही दरवळत आहे. कधी-कधी अशा प्रेरणास्राोताचे स्मरण ऊर्जास्राोत ठरतो. आणि म्हणून अंतर्मनाच्या आनंदासाठी, सर्वांच्या सुखासाठी या समाज शिल्पकारांच्या जीवनातील सुगंधाला शब्दाच्या ओंजळीत साठवून अभिव्यक्त करण्याचा विनम्र प्रयत्न.
संघ शाखांद्वारे हिंदू संघटनेचे मूलभूत कार्य, मनुष्य निर्माणाचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्या टप्प्यात केले. तर दुसऱ्या टप्प्यात रचनात्मक कार्य, जसे सेवाभारती, वनवासी कल्याण आश्रम, दीनदयाल शोध संस्थान, सहकार भारती याद्वारे शाळा, दवाखाने, विविध छोटे-मोठे समाजाच्या आवश्यकतेनुसार प्रकल्प उभे केले. तर राष्ट्र जागरणासाठी गंगायात्रा, एकात्मता मार्ग, राम मंदिर (अयोध्या) अभियान, काश्मीर बचाव, पूर्वोत्तर पंजाब, मीनाक्षीपूरम येथील धर्मांतरण घटनेत एकात्म हिंदू समाज ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. चीन-भारत युद्ध असो, संघशक्ती एका सुरक्षा कवचाप्रमाणे धावून जाते हा सार्वत्रिक अनुभव आहे. संघाचा विरोध करणारे असू शकतात, पण संघ ‘सर्वेषां अविरोधेन’ भावनेनेे कार्य करतो. म्हणूनच बामसेफचे कार्यकर्तेदेखील त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधताना ‘संघ प्रचारकासारखी ध्येयनिष्ठा असावी’ हेच सांगतात. एखाद्या दुर्गम जंगलात चालणारे वसतिगृह असो किंवा ग्रामीण उद्याोग केंद्र असो, त्यांच्यासाठी समर्पण भावनेने एखादा बिनचेहऱ्याचा प्रचारक कार्यरत असतो.
संघासारखी शिस्त, देशभक्तीपूर्ण समाज निर्माण व्हावा, संघ व समाज या अर्थाने एक व्हावा हीच संघाची इच्छा आहे. यासाठी आधीही या देशात अनेक साधू-संन्यासी झाले. गाडगेबाबांसारखे विरागी झाले. प्रचारक हे संघाने समाजाला दिलेले देणे आहे, असे प्रचारक राहिलेले शिवराय तेलंग म्हणतात. अरुणाचलात प्रचारक असताना रामकृष्ण मिशनचे स्वामी विश्वात्मानंद म्हणाले होते की, ‘संघ प्रचारक पद्धती उत्तम आहे. सामान्य मनुष्य यातील काही वर्षे अथवा जीवन संघकार्याच्या माध्यमातून देऊ शकतो. एक स्वर्णिम आयुष्य अनुभवू शकतो, पण आमच्यासारख्या संन्याशांना मात्र वेशभूषा, नियमांमुळे लोकांमध्ये प्रचारकांप्रमाणे मिसळता येत नाही. स्वयंसेवक हे संघाचे समाजाला देणे आहे.’ तर प्रभुदत्त ब्रह्मचारी यांनी म्हटले आहे की, ‘रूढार्थाने प्रचारक संन्यासी नसतो, पण संन्याशापेक्षा कमीही नसतो.’
आज सर्वत्र प्रचारकांसाठी कार्यालये आहेत. अनुकूलता आहे. राजकीय क्षेत्रात सहविचारक प्रभावी होत आहेत. अशावेळी प्रचारकांनी अहंकारशून्य पद, अभिनिवेशमुक्त राहणे त्याची कसोटी आहे. आजही संघात आयआयटीमधील उच्चविद्याविभूषित प्रचारक मोठ्या संख्येत आहेत. विद्यामान सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणतात, ‘‘आजच्या पिढीसकट आणखी दोन पिढ्या संघाला असेच जोमाने कार्य करावे लागेल. राष्ट्राला सामर्थ्यवान विकसित भारतासाठी झिजावे लागेल. त्यासाठी दीपस्तंभासारखी प्रचारकाची भूमिका महत्त्वाची राहील.’’
संघ आज शाखा पातळीवर पर्यावरण, समरसता, कुटुंब प्रबोधनाचे परिस्थितीनुसार व्यापक कार्य करीत आहे. शेवटी समाजासमोरील आदर्श असेल तर तो सरसावतो. त्याची अट एकच आहे- ‘संघ किरण घर घर देने को, अगणित नंदादीप जले, मौन तपस्वी साधक बनकर हिमगिरि से चुपचाप गले.’
kitkaru7@gmail.com
(लेखक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक (अरुणाचल प्रदेश) आहेत.)