– लोकेश शेवडे

अवधूत डोंगरे यांची ‘पान, पाणी नि प्रवाह’ ही कादंबरी वाचकांशी सहज गप्पा मारत असल्यासारखी सुरू होते आणि त्यात गुरफटून टाकते. वाचक हा आपल्यापेक्षा अधिक जाणकार असल्याचे सुचवत येथील गप्पांचा ओघ समाजातील विविध प्रवाहांची ओळख करून देतो. कादंबरीच्या एका प्रकरणात लेखक पक्ष्याशी (बगळ्याशी) गप्पा मारतो – त्यातही तो पक्षीच जास्त बोलतो, तर दुसऱ्या एका प्रकरणात एक ‘पान’ वाचकांशी गप्पा मारतं..

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
Dhirendrakrishna Shastri makes unscientific claims promote superstition under guise of spirituality
धीरेंद्रकृष्ण यांच्या कार्यक्रमास अंनिसचा विरोध, अंधश्रध्देस खतपाणी घालणाऱ्यांना परवानगी दिल्याबद्दल नाराजी
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत

कल्पित साहित्य (फिक्शन : कथा-कादंबऱ्या वगैरे) मी फारसं वाचलेलं नाही. काही जुन्यांपैकी आणि अगदीच थोडे नव्यांपैकी नावाजलेले लेखक-लेखिका वगळता इतर अनेकांचं साहित्य माझ्याकडून वाचायचं राहून गेलंय. त्यात साहित्याचं रसग्रहण, स्वत: करणं तर दूरच, इतरांचं रसग्रहणदेखील वाचलेलं नाही. सबब साहित्यातले प्रकार- प्रवाह फारसे ज्ञात नाहीत, त्याबाबत जी काही माहिती आहे ती आता कालबा आहे. कल्पित साहित्यातील घडामोडींबाबत अज्ञानात पहुडलेल्या अवस्थेत असताना अचानक अवधूत डोंगरे या तरुण लेखकाची प्रफुल्लता प्रकाशनाने काढलेली ‘पान, पाणी नि प्रवाह’ ही कादंबरी हाती पडली. नावावरून विषय – आशय यांच्याबाबत कुठलाच मागमूस न लागल्यामुळे फक्त चाळण्याप्रीत्यर्थ अनुक्रमणिकेचं पान उघडलं आणि जमिनीवर इतस्तत: पडलेली गुंतवळ फिरत्या भोवऱ्याच्या आरीपाशी आली की जशी भोवऱ्याभोवती झटकन लपेटली जाते, तसा त्या अनुक्रमणिकेतल्या प्रकरणांच्या शीर्षकांपाशी आल्यावर या कादंबरीभोवती लपेटला गेलो. एके काळी कादंबरीच्या सुरुवातीला उपोद्घात असे तर अखेरीस ‘उपसंहार’ असे. या कादंबरीचं दुसरं प्रकरण ‘उपोद्घात’ आहे आणि त्याअगोदरचं- म्हणजे, पहिलं प्रकरण- ‘घात’ आहे आणि मग उपोद्घात.

हेही वाचा – आदले । आत्ताचे: एकांताचा निर्भय एल्गार

कादंबरीचं शेवटून दुसरं प्रकरण ‘उपसंहार’ आहे आणि अखेरचं ‘संहार’ म्हणजे, कादंबरीचा आरंभ ‘घाता’चा आहे तर शेवट संहाराचा. असो. कादंबरीचं ‘कथन’ प्रथमपुरुषी आहे असं म्हटल्यास तांत्रिकदृष्ट्या ते योग्य असलं तरी ते वाचकाच्या दृष्टीनं चूक ठरेल. कारण ते ‘कथन’ किंवा निवेदन नाही. ‘घात’ या पहिल्याच प्रकरणात लेखक स्वत:ला ‘अज्ञ म्हणजे अजाण’ जाहीर करतो आणि वाचकाला, ‘‘बाकी, तुम्ही महान. तुम्ही तज्ज्ञ. तुम्हाला सगळं कळतं. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, सगळे विषय. सगळी माहिती..’’ असं म्हणून लेखक हा वाचकाशी गप्पा मारायला सुरुवात करतो. ‘‘तरीही आपण सोबत जाऊ या का? बघा, तुम्हाला कसं वाटतं ते. कादंबरी आली सोबत तर चालेल काय?.. बघा, तुम्हाला काय वाटतं ते.. मनापासून वाटलं तरच पुढे जाऊ या.’’ असं विचारत, विनंती- आर्जवं करत, वाचकाचा प्रतिसाद घेत, कथन करत – नव्हे, गप्पा मारत लेखक कादंबरी पुढे नेतो. त्या गप्पांच्या ओघात मध्येच एखाद्या पात्राच्या संदर्भात, ‘‘त्याची माहिती कादंबरीच्या पुढच्या भागात येईलच, तेव्हा आता अधिक काही सांगत नाही,’’ असंही वाचकाला सांगतो आणि वाचकाशी गप्पा सुरू ठेवतो, ते अगदी शेवटपर्यंत..

कादंबरीत लेखक स्वत: एक पात्र आहे, पण तो कादंबरीतल्या कोणत्याही घटनेचा भाग नाही किंवा कोणत्याही घडामोडीत सहभाग घेत नाही. तो वाचकाशी गप्पा मारताना स्वत: कुठे राहतो (रत्नागिरी), तिथल्या परिसराचा – माणसांचा प्रत्यक्षातला तपशील देतो. तो इतका तंतोतंत आहे की तो भाग वाचताना ते लेखकाचं चरित्र असल्याचा भास होतो. पुढे तो कुठे जातो, कोणाला भेटतो वगैरे वेगवेगळ्या ठिकाणांचं, परिसरांचं, व्यक्तींचं-पात्रांचं, समूहांचं, त्यांच्या परस्परांच्यातल्या वैचारिक आणि अवैचारिक गप्पांचं, कृतींचं, घटनांचं, सूक्ष्म निरीक्षणासह वर्णन वाचकांसमोर गप्पागोष्टींच्या ओघातच मांडत राहतो. या वर्णनातून मॉल-मल्टिप्लेक्समध्ये अव्याहत जाणाऱ्या तरुणांपासून, उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरीत उच्च पद मिळवू पाहणाऱ्या ‘करिअरिस्टिक’ तरुणांपर्यंत आणि खानदानी स्थावर- जंगम- जमीनदारांपासून, रोज मॉर्निग वॉक घेऊन उडपी हॉटेलात न्याहारी घेणाऱ्या पेन्शनर वयस्करांपर्यंत संबंध मध्यम-उच्चवर्गीयांची आत्ममग्नता- यशोन्माद, या वर्गाची स्वत:खेरीज इतरांबाबतची तुच्छता, बेपर्वाई वाचकाला जाणवू लागते. याच वर्गासाठी केल्या जाणाऱ्या शहरीकरणामुळे होत असलेला निसर्ग-पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत व त्यासाठी लागणाऱ्या अवाढव्य व्यवस्थेबाबत – व्यवस्थेच्या खर्चाबाबत त्याच मध्यम – उच्च वर्गाची बेफिकिरी अलगद वाचकासमोर येते. या साऱ्या गप्पांमध्ये कथानक असल्याचं किंवा ते पुढे जात असल्याचं मात्र कुठेही जाणवत नाही. पुढे त्या शहरी भागानंतरच्या गप्पांत गडचिरोली – विदर्भ भागाशी निगडित असलेल्या (भास्कर, सायली, लताक्का, राणी वगैरे) व्यक्तिरेखांची कौटुंबिक पार्श्वभूमी, व्यक्तिगत जीवनाच्या वाटचालीचा तपशील आणि त्या भागातील निसर्ग-जंगल, तिथली नदी (प्राणहिता), आदिवासी भाषा (गोंडी), जीवन पद्धत, त्यांच्यावर होणारं आक्रमण, त्याविरुद्ध दिल्या जाणाऱ्या लढ्याबाबत विविध गटांचे मार्ग आणि दृष्टिकोन गुंफले जाऊ जातात.

गडचिरोली भागात आदिवासींना शोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी जागृत- उद्युक्त करण्यासाठी झोकून दिलेल्या सुशिक्षित आणि प्रशिक्षितांच्या संवाद-चर्चामधून साम्यवादी चळवळीत पडलेले गट – त्या गटांची पडलेली शकलं आणि त्यांच्या म्होरक्यांचे सिद्धांत, त्यात गेल्या ४०-५० वर्षांत घडत गेलेली स्थित्यंतरं, घडलेला सर्व बाजूंचा हिंसाचार आणि चळवळीची आजची अवस्था प्रकट होऊ लागते. त्यातले बरेचसे संदर्भ तर गेल्या दशकातले वर्तमानपत्रात वाचकानं वाचलेल्या नावांचे-बातम्यांचे-लेखांचे आहेत. त्यामुळे अनेकदा ही कादंबरी आहे की सत्यकथा, असा प्रश्न पडतो. हळूहळू त्यात स्थानिक, जागतिक वर्तमान आणि ऐतिहासिक संदर्भाची भर पडत जाते. त्या सत्य वाटणाऱ्या कथेतील पात्रांच्या चर्चा-संवादांतून मार्क्स, लेनिन, माओ, चे गव्हेरापासून चारू मुझुमदार- शरद पाटील यांच्यापर्यंत साम्यवादी, डाव्या- अति डाव्या अनेक नेत्यांचे, कुंदेरा, मार्खेजपासून अनिल बर्वेपर्यंत लेखकांचे आणि त्यांच्या विचारांचे उल्लेख येतात आणि शासन- प्रशासन, सरकार, संसद, निवडणुका, लोकशाही, भांडवलशाही, साम्यवाद, चळवळी, हिंसा, मृत्यू, युद्ध, पत्रकारिता, वृत्तसंस्था, लेखक, कवी, मानवी नातेसंबंध – व्यवहार, निसर्ग.. अशा स्थानिक ते आंतरराष्ट्रीय कित्येक आणि प्रत्येक बाबीच्या, व्यक्तींच्या आणि समूहांच्या प्रयोजनाबाबत – उपयोजनाबाबत व अवस्थेबाबत प्रश्नांचा कल्लोळ उभा राहतो, एखाद्या आगीच्या डोंबासारखा उसळणारा आणि दाहक! तथापि, लेखक स्वत: या कादंबरीतील एक पात्र असूनही तो यापैकी कोणत्याही व्यक्तींवर, व्यवस्थेवर, घडामोडींवर भाष्य करत नाही. तो फक्त त्या सर्व बाबतीत त्याचं निरीक्षण गप्पागोष्टी करत सांगणं चालू ठेवतो. या गप्पा केवळ लेखक आणि वाचक त्यांच्यातल्याच आहेत असं नाही. कादंबरीच्या एका प्रकरणात लेखक पक्ष्याशी (बगळयाशी) गप्पा मारतो – त्यातही तो पक्षीच जास्त बोलतो, तर दुसऱ्या एका प्रकरणात एक ‘पान’ वाचकांशी गप्पा मारतं.

या साऱ्या गप्पागोष्टी-संवाद-गूज अव्याहत सुरू असताना कथानक काय आहे आणि ते कसं साकारतं ते याकडे लक्षही जात नाही. फक्त विविध सिद्धांत – विचार – व्यवस्था या साऱ्याची आजच्या वास्तवाशी असलेली विसंगती कादंबरीभर गच्च भरून राहिलेली लक्षात राहते. ज्यांच्या हाती व्यवस्था असते ते बलवान असतात त्यामुळे ती व्यवस्था दुर्बलांसाठी उपयोगी न ठरता बलवानांसाठीच पोषक असते. किंबहुना, व्यवस्था ही दुर्बलांची अवस्था कायम ठेवण्यासाठी साहाय्यभूत ठरते; त्यासमोर दुर्बलांच्या उत्कर्षांच्या विचारांसकट कृती – चळवळींपर्यंत साऱ्या बाबी व्यर्थ ठरतात.. आणि दुर्बल हतबलच राहतात, याची जाणीव कादंबरीत जागोजाग होत राहते.

तथापि, या साऱ्याला, म्हणजे ही सर्व प्रकरणं असलेल्या या पुस्तकाला कादंबरी म्हणावं का किंवा का म्हणावं? असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. तिला कोणी कादंबरी म्हणो किंवा न म्हणो, लेखक मात्र प्रत्येक खेपेला तिचा कादंबरी म्हणूनच उल्लेख करतो. ‘गोधडी’ या नावाचं एक प्रकरण या कादंबरीत आहे. लेखकाचा एक बालमित्र निरनिराळ्या विषयांसंबंधी त्याच्या मनात येणारे विचार फेसबुकवर – ब्लॉगवर पोस्ट करत असतो, काही टाचणं लिहून ठेवत असतो, काही टिपणं नोंदवत असतो तर काही तुरळक कविता. त्यानं बाणभट्टाचं पुस्तक (कादंबरी-सार) वाचून त्यावर ‘‘त्यातल्या एका पात्राचं नाव कादंबरी आहे’’ असं टिपण लिहिलंय. भारद्वाज पक्ष्याचा आवाज, रंग, आकाराबद्दल लिहिलंय, रत्नागिरी आणि अमरावतीतल्या ‘नगर वाचनालयां’बद्दल लिहिलंय आणि ‘‘सत्तेचा माज कुठून येतो? समोरचा माणूस कमकुवत दिसला की माणूस त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याच्या भूमिकेत किंवा कणवेच्या भूमिकेत का जातो? – आहे तसाच का राहत नाही?’’ असं स्वत:च्याच विचारांचं टाचण लिहिलंय. याखेरीज या लेखकाची एक कादंबरी (स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट) वाचून टिपण लिहिलंय आणि दुर्गा भागवतांचं पुस्तक (कदंब) वाचून ‘कदंबाच्या फुलापासून की फळापासून काढलेल्या दारूला कादंबरी म्हणतात. ‘कदंब’चा दुसरा अर्थ समूह असाही आहे. त्यावरून कादंबरीचा अर्थ समूहापासून काढलेली दारू’ असंही टाचण लिहिलंय. यापैकी कुठल्याही एका लेखनाचा दुसऱ्या लेखनाशी संबंध नाही. तरीही त्याच्या त्या लेखन नोंदी एकामागून एक वाचताना वाचकाला लेखकाच्या त्या मित्राच्या मनाचा थांग लागतोय असं वाटतं. काही तरी एकत्र गवसल्यासारखं वाटतं आणि ते वाचकाला ओढून घ्यावंसं वाटतं. वेगवेगळे पोत आणि रंग असलेले कपड्यांचे तुकडे एकत्र जोडून – शिवून जशी एक गोधडी तयार होते, तसं ते प्रकरण आहे आणि नेमकी तशीच ही कादंबरीदेखील आहे.

हेही वाचा – खुदा की आवाज!

निरनिराळ्या व्यक्तिरेखा, समाजघटक आणि प्रसंगांचे तुकडे शिवून ही कादंबरी तयार होते. हे तुकडे शिवण्यासाठी कथानकाच्या धाग्याऐवजी, दुर्बलांच्या हतबलतेचा धागा वापरला आहे. हा धागा अधूनमधून मानवी मृत्यूच्या ठिकाणी पृष्ठभागी येऊन ठळकपणे दिसतो. कादंबरी वाचताना त्या प्रसंगांत, ‘या जीवघेण्या अवस्थेसाठी – त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण?’ हा प्रश्न नकळत वाचकासमोर अनेकदा उभा राहतो. विशेषत: कादंबरीच्या उत्तरार्धात माणसांच्या मरणाशी निगडित अत्यंत करुण प्रसंग आहेत, तेव्हा हा प्रश्न उग्र – टोकदार बनून वाचकाला टोचणी देऊ लागतो, गोधडी शिवणाऱ्यानं सुया काढून न घेता गोधडीतच ठेवून दिल्या, तर ती पांघरून झोपणाऱ्याला जशा टोचतील, तसा!

कादंबरीच्या सुरुवातीला लेखकानं वाचकाला ‘तुम्ही तज्ज्ञ. तुम्हाला सगळं कळतं ..’ असं म्हटलं आहे. सबब, वाचक हा ‘सगळे विषय. सगळी माहिती’ असणाऱ्या शहरी मध्यम-उच्च वर्गाचा घटक असण्याची शक्यता दाट. तथापि, ‘इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान, गणित, अर्थशास्त्र’ कळूनही तो वाचक ‘त्या करुण मृत्यूसाठी जबाबदार कोण?’ या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणं मात्र जवळजवळ अशक्य आहे.. बाकीचे तर तुच्छच आणि लेखक स्वत: ‘अज्ञ – अजाण’! मग.. ते काय उत्तर देऊ शकणार?

धर्म आणि बुद्धिप्रामाण्यवादाचे अभ्यासक. विविध नियतकालिकांमधून मिष्किल तसेच सडेतोड लेखन. ‘आमचं तुमचं नाटक’, ‘तोच मी’ ही नाटके आणि ‘प्रस्थापितांच्या बैलाला’, ‘(लो)कशाहीबद्दल’ हे लेखसंग्रह प्रकाशित. सामाजिक आणि राजकीय घटनांचे ऐतिहासिक अंगाने भाष्यकार म्हणूनही ओळख.

lokeshshevade@gmail.com