सुनीत पोतनीस
आपल्या डोक्यावरच्या अंतराळात केवळ ग्रह-तारे नाहीत तर इतर अनेक अद्भुत गोष्टी भरलेल्या आहेत. अज्ञात अशा अनेक ‘सुरस आणि चमत्कारिक’ वस्तू तसेच घटना यांनी हे विश्व बनलेले आहे. अशा या विश्वाचा परिचय सुप्रसिद्ध खगोल – अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत त्यांच्या ‘ओळख आपल्या विश्वाची’ या पुस्तकात करून दिला आहे.
मनोगतातच लेखकाने सांगितले आहे की, हे पुस्तक खगोलशास्त्र या विषयातील जाणकार व्यक्तींसाठी लिहिलेले नाही तर या विषयाची आवड निर्माण व्हावी किंवा असलेली आवड वाढीस लागावी यासाठी लिहिलेले आहे. पिंपळे यांनी एकंदर नऊ प्रकरणांत या विषयाची सुबोध मांडणी केली आहे. पहिल्या प्रकरणात जग आणि विश्व तसेच आकाश आणि अंतराळ या शब्दांमध्ये असलेला फरक नेमक्या शब्दांत स्पष्ट केला आहे. आपण रोजच्या व्यवहारात जग आणि विश्व हे शब्द किती ढिलेपणाने वापरतो ते त्यावरून आपल्या सहज लक्षात येते. अथांग अंतराळ शब्दविरहित, दिशाहीन, काळेकुट्ट आणि प्रचंड थंड असल्याची अनोखी माहिती या पहिल्याच प्रकरणात मिळाल्याने पुढची प्रकरणे वाचण्याची उत्सुकता खूपच वाढते.
लेखकाने पुढच्या प्रकरणांची रचना विचारपूर्वक केल्याचे जाणवते. दुसरे प्रकरण आपल्या सौरमालेची सविस्तर माहिती देते. सर्व घटकांची वैशिष्टय़े सांगत लेखकाने काही अतक्र्य गोष्टीसुद्धा नोंदवल्या आहेत. शुक्र ग्रहावरचा दिवस त्याच्यावरच्या वर्षांपेक्षा मोठा आहे आणि तेथे सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळतो ही विधाने आपल्याला अशक्य कोटीतील वाटली तरी ती खरी आहेत. अशाच अद्भुत गोष्टी विश्वात असल्याने त्याबद्दलची माहिती रंजक बनली आहे. तिसरे प्रकरण आकाशगंगेविषयी तर चौथे ‘विश्वरूपदर्शन’ घडविणारे आहे. ही सारी माहिती वाचताना आपण स्तंभित होतो. विश्वाची निर्मिती, त्याची रचना, त्याचे प्रसरण अशा अनेक गहन गोष्टींची माहिती लेखकाने सोप्या भाषेत दिली आहे. कृष्णद्रव्य आणि कृष्णऊर्जा म्हणजे काय हेही समजावून सांगितले आहे. विश्व प्रसरण पावते आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. पण हे प्रसरण किती काळ चालू राहील, विश्वाचा शेवट होईल का आणि कशा प्रकाराने होईल अशा अनेक यक्षप्रश्नांची चर्चा पिंपळे यांनी साध्या भाषेत केली आहे. त्याहीपुढे जाऊन, आपले विश्व हे एकमेव विश्व नाही असे काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे- म्हणजे अशी अनेक विश्वे अस्तित्वात असू शकतात अशी मती गुंग करणारी माहिती लेखकाने दिली आहे. ‘नक्षत्रांचे देणे’ असे चपखल शीर्षक दिलेल्या प्रकरण पाचमध्ये ताऱ्यांच्या जीवन चक्राचे वर्णन मनोरंजक पद्धतीने आले आहे. ताऱ्याचा मृत्यू, कृष्णविवर, श्वेत खुजा तारे, महाराक्षसी लाल तारे अशा अनेक घटना / वस्तूंचे स्पष्टीकरण या प्रकरणात आपल्याला वाचायला मिळते. सहावे प्रकरण दीर्घिका, क्वासार आणि तारकागुच्छ यासंबंधी आहे.
आकाशाबाबत कितीही माहिती वाचली तरी या विषयाची खरी मजा ही प्रत्यक्ष आकाश निरीक्षणामध्येच असते असे लेखक सातव्या प्रकरणाच्या सुरुवातीस म्हणतो ते अगदी खरे आहे. त्यामुळे या प्रकरणाला ‘आकाशाशी जुळवा नाते’ असे अगदी सुयोग्य शीर्षक देण्यात आले आहे. आकाशाचे वाचन करण्यासाठी कोणकोणत्या संकल्पना माहीत हव्यात याचे अगदी नेमके मार्गदर्शन डॉ. पिंपळे यांनी केले आहे. असे वाचन करताना पाळावयाची पथ्ये, घ्यायची खबरदारी याबाबतसुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. साध्या डोळय़ाने, द्विनेत्रीतून तसेच दुर्बिणीतून आकाशात काय काय पाहता येईल याची पद्धतशीर माहिती लेखकाने दिली आहे. आठवे प्रकरण खगोलात घडणाऱ्या विविध घटनांबद्दल आहे. ग्रहणे, धूमकेतूचे आगमन, उल्कापात, अधिक्रमण, पिधान युती अशा अनेक घटनांची माहिती या प्रकरणात येते. खगोलशास्त्र या विषयाबाबत नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘याचा सामान्य माणसाला उपयोग काय?’शेवटच्या म्हणजे नवव्या प्रकरणात लेखकाने याचा ऊहापोह केला आहे. या विषयाशी निगडित अनेक गैरसमजसुद्धा आहेत. उदा. ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, ग्रहणे, उडत्या तबकडय़ा, बम्र्युडा त्रिकोण इत्यादी. याही बाबतीत लेखकाने अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. शेवटी मराठी-इंग्रजी आणि इंग्रजी झ्र् मराठी अशा दोन शब्दसूची दिल्या आहेत; त्यामुळे वाचकांची मोठी सोय झाली आहे.
या पुस्तकात दिलेल्या रंगीत छायाचित्रांचा ( १६ पाने) उल्लेख केलाच पाहिजे. ती अतिशय सुंदर आहेत. पुस्तकाचा कागद, छपाई आणि मांडणी राजहंस प्रकाशनाच्या परंपरेला साजेल अशीच आहे. या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर होणे खूप आवश्यक आहे असे सुचवावेसे वाटते.
‘ओळख आपल्या विश्वाची’, – डॉ. गिरीश पिंपळे, राजहंस प्रकाशन.
पाने -१२०, किंमत २०० रुपये.