ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांची सांगता ९ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सुहृदांनी लिहिलेले विशेष लेख –
‘झिम्मा’मध्ये खूप सविस्तरपणे मी महेशविषयी लिहिलं आहे. ते सगळं डावलून, त्याला वळसा घालून त्याच विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा मी या लेखात प्रयत्न करणार आहे. जमलं तर बरं असं वाटतं. महेश एलकुंचवार हा नाटककार आणि विजया मेहता ही दिग्दर्शिका यांचा परिचय काहीसा दूरस्थपणे झाला. ६६-६७ दरम्यान महेशनं लिहायला सुरुवात केली तेव्हा मी इंग्लंडला होते. मला शिष्यवृत्ती मिळाली होती.. शिकत शिकत आणि शिकवत शिकवत प्रयोग कसे करायचे, यासाठी. थोडक्यात, वर्कशॉप्स प्रॉडक्शन्स. ही संकल्पना आपल्याकडे तेव्हा आलेली नव्हती. या शिष्यवृत्तीच्या निमित्ताने मी सगळीकडे फिरत होते आणि खूप वेगवेगळे अनुभव घेत होते. भारतात परतल्यावर ‘रंगायन’च्या कामाच्या पद्धतीत फरक करून वर्कशॉप्स प्रॉडक्शन्स करायची, म्हणजे त्यातून नवीन नटांची, दिग्दर्शकांची पिढी तयार होईल असा माझा विचार होता.
त्यावेळेला माझा ‘रंगायन’चे श्री. पु. भागवत, माधव वाटवे, वृंदावन दंडवते, अशोक शहाणे यांच्याशी अव्याहत पत्रव्यवहार चालायचा. भागवतांनी ‘सत्यकथा’मध्ये प्रकाशित झालेल्या दोन एकांकिका मला पाठवल्या होत्या. सोबत लिहिलं होतं, ‘नवीन नाटककार आहे, नागपूरचा आहे. पहा, तुम्हाला आवडतात का?’ तो नाटककार म्हणजे महेश एलकुंचवार आणि त्या एकांकिका म्हणजे ‘होळी’ आणि ‘सुलतान.’ मी त्या वाचल्या आणि ठरवलं, वर्कशॉपची सुरुवात या दोन एकांकिकांनीच करायची. तशी ती झालीही. महेशनं बऱ्याच एकांकिका लिहिल्या. त्यातल्या आम्ही आणखीन तीन  केल्या. म्हणजे एकंदर पाच. त्यातली तिसरी ‘यातनाघर’- मीच केली. आमच्या अशोक साठेनं ‘कैफियत’ केली, तर राजा बापटनं ‘एका म्हाताऱ्याचा खून’ हा एकांकिका केली.
नाटककार म्हणून माहीत नसलेला हा माणूस ‘रंगायन’चा नाटककार होतो, एवढंचं नाही तर सबंध वर्कशॉपच आपल्या खांद्यावर घेऊन जातो! काय खासीयत होती त्याची? त्याची जी नाटकं मी केली, जी पाहिली, त्यातून मला त्याचे नाटककार म्हणून काय गुणधर्म दिसले? याची मांडणी करायचा प्रयत्न मी इथं करणार आहे.
माझे नाटकाकडे पाहण्याचे काही दृष्टिकोन आहेत.. काही श्रद्धा आहेत.
पीटर ब्रुक हे माझ्या गुरूंपेक्षाही मोठे गुरू. त्यांच्या मते, नाटय़कलेसाठी फक्त आवश्यक असते ती रंगावकाशाची पोकळी. ही रिकामी पोकळी अतिशय ज्वलंत असते. त्यात जर नाटय़निर्मिती व्हायची असेल तर त्यातला प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. तो ठोक्यासारखा पडत राहिला पाहिजे. पण हे झालं नाही की शब्द, शब्द आणि शब्दच फक्त उरतात. ते धाडधाड अंगावर कोसळतात. त्यामुळे त्या शब्दांतून कथानक पुढे जाणं, त्यातून एकमेकांची नाती तयार करणं, हे होत नाही. तुमची सुरुवातच जर शब्दातून असेल तर मग तुमचा अभिनय पण त्याला साजेसाच होतो. आणि मला तो खोटाच वाटतो. आपल्याकडे बरेचसे लोक कथानक आधी तयार करून मग नाटक लिहायला सुरुवात करतात. मी नावं घेत नाही, पण असे नाटककार माझ्या काळात महाराष्ट्रात खूप म्हणजे खूपच पॉप्युलर होते, आणि अजूनही आहेत. मीही प्रयत्न केला अशी नाटकं करण्याचा; पण ती नाटकं आपटली. मला शिंप्यानं बेतावं तसं बेतलेलं कथानक- ज्यात तुम्हाला शोध घेता येत नाही- असा प्रकार मानवत नाही. माझ्यामध्ये आणि महेशमध्ये जो दुवा साधला गेला तो इथे.
महेशच्या नाटकात विषय, कथानक नसतं. तो तुम्हाला भ्रमंती करायला लावतो. त्यातल्या पात्रांमागच्या माणसांचा वेध घेता घेता तुम्ही पात्रांवर येता. त्यामुळे वेगवेगळे प्रकार होऊ शकतात. मी जी भूमिका करते, ती भूमिका तशाच प्रकारे दुसरी बाई करेल असं नाही. कारण त्यात माझा शोध असतो. माझ्या मते, हे मला करायला मिळालेला विजय तेंडुलकरांनंतरचा महेश हा एक नाटककार आहे.
आता हे माझ्या बाबतीत का घडलं, यालाही कारण आहे. वयाच्या १८ व्या वर्षांपासून माझ्यावर अल्काझी- अदि मर्झबान यांचे संस्कार झाले. त्या काळात त्यांनी मला अतिशय उत्तम प्रतीचे नाटककार आणि त्यांची नाटकं यांचा परिचय करून दिला. उदा. टेनेसी विल्यम, ऑर्थर मिलर, जॉन ओसबोर्न ही सगळी मंडळी नाटककार म्हणून माझ्या अवतीभवती घोटाळत होती. दुसरी गोष्ट म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी मी माझं पहिलं नाटक केलं, ते तेंडुलकरांचं ‘श्रीमंत’! तिथपासून पुढील बारा र्वष मी फक्त तेंडुलकरांचीच नाटकं केली. तीच रचनेची आवड.. नव्हे श्रद्धा मला महेशमध्ये कुठेतरी दिसली. त्याच्या सगळ्या नाटकांमध्ये आत्मशोध असतो. मी त्याला लिखाणातली ‘आइसबर्गेन् क्वालिटी’ म्हणते. हिमनगाचा एक-दशांश भागच वर दिसतो. नऊ-दशांश भाग दृष्टिआड असतो. ती माझ्या मते महेशची माणूस म्हणून आणि नाटककार म्हणून जात आहे. म्हणून माझी केवळ नाटककार-दिग्दर्शिका म्हणूनच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनही महेशशी गट्टी जमली.  महेशमध्ये दिसणारी ही आइसबर्गेन क्वालिटी आजच्या बऱ्याच नाटककारांमध्ये दिसत नाही. नाटकातला प्रत्येक क्षण उकलत राहिला पाहिजे. मनाच्या तळात कुठेतरी लपलेले कंगोरे, कुठेतरी काहीतरी धगधगणारं.. ते सगळं बोललं जात नाही, पण जाणवत राहिलं पाहिजे. कारण ते हिमनगाच्या टोकासारखं असतं. महेशच्या नाटकांतून हे बऱ्याचदा स्तब्धतेत दडलेलं असतं. मात्र, अचानक त्याचा स्फोट होतो. ते खरं नाटय़ आहे. त्यात लय आणि तालाचं इन्स्टिंक्ट आहे. मला किशोरी (आमोणकर) किंवा (व्ही. एस.) गायतोंडे नेहमी म्हणायचे, ‘अगं विजया, तुमच्याकडे हालचाली आहेत, पात्रं आहेत. तुमच्याकडे सगळं कसं ठोस, काँक्रिट असतं.’ मी म्हणायचे, ‘ती नुसती टुल्स आहेत.. वरवर दिसणारी. त्याच्या पलीकडे जे आहे, ती नाटय़कला आहे. ती अतिशय तरल आहे.’  महेश त्याच्या स्वभावामुळे, शोध घेण्याच्या प्रवृत्तीमुळे त्या तरलपणाकडे झुकतो. मी असं म्हणेन की, त्याला शोध घेण्याची आवडच नाही, तर ते त्याचं धाडसच आहे एक प्रकारे.
.. तर ही सगळी महेशची बलस्थानं आहेत.
मी त्याच्या तीन एकांकिकांबद्दल सांगणार आहे. ‘होळी’ ही रंगायनच्या वर्कशॉपमधली पहिली एकांकिका. त्यात कथानक वगैरे नाही. एक घटना फक्त आहे. नागपुरातल्या एका वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना होळीची सुट्टी दिली जात नाही. उलट, त्यांच्यासाठी एक व्याख्यान ठेवलं जातं. अर्थातच मुलं ते उधळून लावतात. त्यातून त्यांचा उत्साह इतका वाढतो, की ते मजेमजेत एका बावळट मुलाला पकडतात. त्याचं रॅगिंग सुरू करतात. त्याला साडी नेसवतात. तो मुलगा त्या धक्क्य़ातून आत्महत्या करतो. तिथून आपल्याला चपराक बसते.
यातून मला दोन-चार गोष्टी शिकायला मिळाल्या. हे नाटक वाचल्याबरोबर माझ्या असं लक्षात आलं- माझ्याकडे त्यावेळेला बाळ कर्वे, मंगेश कुळकर्णी, दिलीप कुळकर्णी, इर्शाद हाश्मी, भक्ती बर्वे, मीना सुखटणकर (आताची मीना नाईक) ही सगळी पोरं या नाटकाला साजेशी होती. त्यांची एकमेकांतली नाती तयार करून त्यांचेच त्यांना स्वभाव परिपोष करायला सांगितले. तिथून मी इम्प्रोव्हायजेशन्स करायला शिकले. माझ्या मते, मराठीमध्ये हे प्रथमच झालं होतं. कदाचित भारतातही. जवळजवळ दीडेक महिना इम्प्रोव्हायजेशन केल्यावर आम्ही ‘होळी’कडे वळलो. नाटकातल्याच मुलांनी फर्निचर इकडून तिकडे करायचं. कॉमन रूमची कॅन्टीन करायची, कॅन्टीनची खोली करायची. सगळी मंडळी तरुण असल्यामुळे जबरदस्त ऊर्जा आणि उत्साह होता.
हे नाटक अंगावर यायचं. त्यातल्या मुलाचं रॅगिंग सुरू व्हायचं तेव्हा सगळे प्रेक्षक स्तब्ध होत. प्रयोगाला जे पालक यायचे ते म्हणायचे, ‘काय हे? आमच्या मुलाला आम्ही कधीच वसतिगृहात पाठवणार नाही.’ म्हणजे त्यातून प्रेक्षकांना अचानक हबका बसत असे. आयआयटीमधल्या प्रयोगाच्या वेळी तर तिथल्या काही मुलांनी येऊन ‘आम्ही जे रोज करतो, तेच तुम्ही चघळून चघळून आम्हालाच काय दाखवता?’ असा सवाल केला. त्यांचा नाटक उधळण्याचा मनसुबा होता. या प्रसंगातून मला आयुष्य आणि नाटक यांचं नातं कळलं.
मला महेशचं कौतुक वाटतं ते अशासाठी, की ‘होळी’ हे खऱ्या अर्थी वास्तविक आणि मुस्काटात मारणारं नाटक आहे. त्यानंतर यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं उभं राहिलेलं ‘सुलतान’ आम्ही केलं. ‘सुलतान’ म्हणजे एक स्टेटमेंट होतं. आजचा जो माणसांचा हव्यास आहे- सगळी सुखं पायाशी लोळण घेताहेत.. पैसा, प्रसिद्धी, स्त्रीसुख.. जी जी म्हणून सुखं आहेत ऐहिक- ती नोकरासारखी तुमच्या आजूबाजूला उभी आहेत, तरीही माणसाला आणखीन अधिक हवंय. त्यासाठी त्याचे जे प्रयत्न चालू आहेत, त्यात त्याचा आत्मा कुठेतरी तडफडतोय. त्या तडफडणाऱ्या आत्म्याचा ‘सुलतान’ करणारी ही मंडळी आहेत. त्याचा एकाला होतो त्रास. तो आत्मा घेतो आणि त्याला एका पिंजऱ्यात कोंबून ठेवतो. पण तो आत्मा वाघासारख्या सतत डरकाळ्या फोडतो. म्हणून एके दिवशी असह्य़ होऊन तो त्या आत्म्याला मारूनच टाकतो.
ही महेशची अगदी सुरुवातीची नाटकं आहेत. पण यावरून या माणसाची लिहिण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत कळते. आयुष्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अतिशय गंभीर, संवेदनशील आणि तळाशी जाऊन भिडणारा आहे हे जाणवतं. असा माणूस ज्या वेळेला काही निर्माण करतो, तेव्हा त्याकडे तुम्हाला चौकसपणे पाहायलाच लागतं.
महेशचं तिसरं नाटक म्हणजे ‘यातनाघर.’ त्याचा विषय साधा आहे. धाकटी बहीण अपंग आहे. मोठय़ा बहिणीचं तिला सांभाळण्यातच आयुष्य गेलेलं. तिच्याशिवाय तिच्या आयुष्यात दुसरं काही उरलेलंच नाही. ‘ती आहे म्हणून आपण आहोत!’ हे धाकटय़ा बहिणीला ठाऊक आहे. दोघीही एकमेकींशी खूप भांडतात. पण त्यांची एकमेकांपासून सुटका नाही. त्यातून त्यांचं जे आयुष्य आहे, जे घर आहे, ते यातनाघर होतं. याच्या उलट, अलीकडचं एक खूप लोकप्रिय नाटक- जे चांगल्यापैकी मानलं जातं. माझी जवळची मंडळी त्याच्याशी संबंधित आहेत. त्यात आई आणि मुलगी आहे. तेही एक प्रकारे ‘यातनाघर’च आहे. पण महेशनं जे केलंय, ते त्यात घडत नाही. आपल्याला काय म्हणायचंय, हे दाखवण्यासाठी त्यातील रचना, पात्रं ही मुद्दाम निर्माण केली आहेत असं वाटतं. त्यातून ‘नाटक’ निर्माण होत नाही. या तुलनेत महेशचं ‘यातनाघर’ अप्रतिम होतं. ते अजूनही माझ्या डोक्यात आहे.
..महेशचा माझ्यावर म्हणून हा असा प्रभाव आहे.
परंतु पुढे तळाशी जाऊन शोध घेण्याची त्याची ही जी कुवत आहे, त्यात कुठेतरी एक अॅटिटय़ूड आला. त्यामुळे त्याच्यातला नाटककार महत्त्वाचा ठरून पात्रं गौण ठरायला लागली. ती बेतलेली व्हायला लागली. त्यानं माझ्यासाठी ‘गाबरे’ लिहिलं. पण ते मला आवडलं नाही. नंतर त्यानेही ते नाकारलं. पण मी जेव्हा ते ‘नको म्हणाले’ तेव्हा तो जरा हर्ट झाला होता. त्याच्यानंतर त्यानं लिहिलं ‘वासनाकांड.’ मी म्हटलं, ‘हे तुला काहीतरी थिसिस मांडायचंय म्हणून उभं केलेलं वाटतंय.’ पुढे ‘गाबरे’ डॉ. श्रीराम लागूंनी केलं आणि ‘वासनाकांड’ अमोल पालेकरनं. महेशचं तिसरं नाटक ‘पार्टी.’ तेही अमोलनंच केलं. पण त्याचा गोविंद निहलानी यांनी जो सिनेमा केला, त्यात मी मुख्य भूमिका केली आणि ती मी फार एन्जॉय केली. कारण त्यात खरा महेश डोकावत होता.. कुठलाही मुलाहिजा न बाळगता आपली मतं मांडणारा आणि आपल्या मतांनी आपण काय स्कोअर केलंय, असा भ्रम डोक्यात न ठेवणारा.
त्यानंतर तब्बल सोळा वर्षांची गॅप गेली. एकदा एनसीपीएच्या माझ्या ऑफिसमध्ये येऊन महेशनं मला ‘वाडा चिरेबंदी’ ऐकवलं. हे महेशचं अतिशय प्रगल्भ नाटक आहे. त्याची कारणं बरीच. एक तर तो त्याच्या फार जवळचा विषय आहे. संपत आलेली सरंजामशाही.. त्यात अडकलेलं एक कुटुंब. पण आपण बदलत्या काळातले हतबल लोक आहोत याची त्यांना मुळी जाणीवच नाही. आपलं कुटुंब, जमीनदारी हे सगळं ते मनापासून पकडून आहेत. त्यामुळे ते सगळे अत्यंत निरागसपणे त्या दु:खाच्या काळातून जात आहेत.
हे महेशच्या घरातलं आहे, पण तरीही इन्डलजंट नाही. घरातलं असलं की त्याचं दु:ख असतं. पण तसं महेशचं झालं नाही. पण हे फार जवळून पाहिल्याकारणाने त्याचे जे वेदनेचे पदर आहेत, ते तुम्हाला उकलत उकलत पुढे नेतात. हे माझ्या मते अप्रतिम आहे. यात कथानक नाही, घटना आहे. घरातल्या कर्त्यां पुरुषाचं निधन झालेलं आहे. आणि त्याच्या निधनानंतर एकत्रित आलेली त्याची कुटुंबीय मंडळी. तीही मोजकीच. मुंबईला एक भाऊ आणि त्याची बायको आहे. आई, जहागिरदारी सांभाळणारा मोठा भाऊ, त्याची बायको आणि एक लग्न न झालेली मुलगी व मुलगा.. हे सगळे एकत्र येतात. त्यात वडलांच्या जाण्याच्या दु:खापेक्षाही आता आपलं कसं होणार, याची त्यांना सतत टोचणारी जाणीव.. मला यात काही अप्रतिम वाटलं असेल, तर ते म्हणजे विषय उकलला जाणं. हे मी पहिल्यांदाच यात पाहिलं. आणि ते मी कधीही विसरणार नाही.
‘वाडा चिरेबंदी’ हे विदर्भात घडणारं नाटक आहे. आणि त्याची बोलीभाषा वऱ्हाडी आहे. यातला ‘वाडा’ वऱ्हाडी आहे. माझ्या भिवंडीच्या घरासारखा तो वाडा नाही. म्हणून मी हे नाटक करण्याआधी महेशचा ‘वाडा’ पाहायला शिरपूरला गेले. एक वाडा तुम्हाला अनुभव देऊन कसा संपन्न करू शकतो, हे मी तिथं अनुभवलं. वाडा आणि त्याचं स्पंदन काय असतं.. त्या संस्कृतीचं स्पंदन काय असतं, हे मला तिथं पाहायला मिळालं.
या वाडय़ात माजघर हे मुख्य होतं. एका बाजूला झोपाळा होता. त्यावर मी आणि महेशची आई गप्पा करत बसायचो. त्या वाडय़ाच्या एका बाजूला स्वयंपाकघर होतं. मी झोपाळ्यावर गप्पा करत बसलेले असताना स्वयंपाकघरातून फोडणीचा आवाज, भाज्या-भाकऱ्यांचा एक खमंग खरपूस वास येई. रात्री रातकिडय़ांची किरकिर ऐकू येई. शिवाय वाडय़ात कुठेही जायचं असलं तरी माजघरातूनच जावं लागे. आजूबाजूला छोटय़ा छोटय़ा खोल्या. इथे प्रथम माझ्या लक्षात आलं- वाडय़ातले जे ताणतणाव आहेत, ते उभे करण्यासाठी जे काही आपण करणार आहोत, त्यात प्रत्येकाची एकांताची अशी जागा असणार आहे. जे काही खुपतंय ते तिथं बाहेर येतं. त्यातून सलणारी दु:खं कशी व्हिज्युअली येऊ शकतात, हा धडा मी तेव्हा गिरवला. याचा नाटकाशी संबंध नव्हता, पण विषयाशी होता.. पात्रांशी होता.
जिवंत नाटक लिहिण्याची ताकद महेशमध्ये पहिल्यापासूनच होती, पण ‘वाडा चिरेबंदी’मध्ये त्याची ग्रोथ प्रकट झाली. यातला दागिन्यांचा सीन हा माझ्या मते, मी केलेल्या नाटकांमधला एक अप्रतिम सीन आहे. तो उभा करण्यासाठी फक्त शब्द नाहीत, त्या शब्दांतून दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना हे सगळं फिरायला लागतं. त्यातून अॅब्स्ट्रॅक्ट असा धगधगता नाटय़क्षण निर्माण होतो.
अजून एक असाच प्रसंग. दुसऱ्या दिवशी वाटणी होणार आहे म्हणून मोठा भाऊ खोलीतल्या एकांतात आपल्या बायकोला सांगतो, ‘मी यादी करतोय. उद्या हे सगळं जाणार. एकदा घाल गं, बघू या तू कशी दिसतेस.’ आता हे महेशच्या शब्दांनी मला सांगितलं. ते करायचं असेल तर त्यासाठी प्रकाशयोजनेतून काहीतरी करायला लागेल, म्हणून कंदील आला. तो जमिनीवर ठेवला गेला. तो यादी वाचतोय. ती दागिन्यांचा डबा घेऊन मागच्या भिंतीजवळ जाते. तिथे आम्ही मुद्दाम आरसा ठेवला. पाठमोरी होऊन ती दागिने घालते. ती नऊवारी साडीत उभी राहिलेली. कंदिलाच्या प्रकाशात तिची भिंतीवरील सावली प्रचंड मोठी दिसते. एका क्षणी ती वळते. मानेपासून ते बेंबीच्या देठापर्यंत नखशिखान्त दागिन्यांनी मढलेली ती. हे चित्र उभं राहिलं.. महेशला अपेक्षित असलेल्या क्षणात. त्या दागिन्यांतून तिला घरातल्या सर्व स्त्रियांचा स्पर्श झाला.. तेव्हा ती जे बोलते, तीच वाक्यं तिची सासू म्हणून मी बोलते.. माझ्या मुलीसोबत स्मरणरंजनात जाऊन. या कोलांटउडय़ा जो घेऊ शकतो, तो माझ्या मते अतिशय महत्त्वाचा नाटककार!
महेश माझ्याबरोबर तालमींत असायचा. आमच्या खूप चर्चा व्हायच्या. त्यातून खूप काही निघायचं. असाच आणखी एक आम्ही दोघांनी तयार केलेला सीन. नाटकाच्या सुरुवातीचा हा सीन काव्यात्मकतेकडे झुकणारा आहे. या सीनमध्ये मुंबईचा भाऊ यायचाय म्हणून सगळे जण वाट पाहत थांबलेत. मी म्हटलं, ‘महेश, दुपारी नको, भावाला रात्री आण. रात्री आणलंस ना, तर वाडय़ातल्या सगळ्या खोल्या मला कंदिलानं उजळता येतील. शिवाय तू जी प्रतीकं उभी केलेली आहेस ती सगळी मला वापरता येतील. तू रात्रीचं सूचन करणारं फक्त एक वाक्य त्यात टाक.’ जिथे मृत्यू होतो तिथे केवळ मृत्यूचंच सावट नसतं, तर त्याचा वास पण असतो. ते सावट, रातकिडय़ांची किरकिर, मिणमिणता सगळा परिसर, उंदीर धावताहेत आणि धूळ पडतेय.. घरातल्या म्हातारीच्या कापऱ्या आवाजातील हाका.. या सगळ्यातून एकही शब्द न बोलता नाटय़कलेतला अतिशय प्रगल्भ असा नाटय़क्षण निर्माण झाला. पडदा उघडल्याबरोबर या वाडय़ात मृत्यू घडलाय, हे सांगावं लागत नाही. अशा प्रकारच्या संवेदनशील गोष्टींवर काम करत असताना तुम्ही स्वत: खूप वाढता.. व्हिज्युअली, सेन्शुअली.
माझ्या डोळ्यांसमोर या मुलाची सेन्शुअस क्वालिटी आज त्याच्या पंचाहत्तरीपर्यंत चालू राहिलीय.. म्हणूनच महेश मला नाटककार म्हणून खूप महत्त्वाचा वाटतो. तो आहे त्यापेक्षा मी त्याला खूप लहान समजते. या लेखाच्या वेळेला त्याला फोन करून विचारलं की, ‘तू कसा पंचाहत्तर वर्षांचा होशील?’ तो म्हणाला, ‘बाई, मी तुमच्यापेक्षा फार लहान नाही. तुम्ही मला फारच लहान समजता.’ कारण पहिल्या भेटीतला सडसडीत अंगकाठीचा, वैदर्भीय काळेपण असलेला मुलगाच अजूनही माझ्या मनात आहे. महेशचं ‘रंगायन’पासून माझ्याशी तयार झालेलं नातं आजही टिकून आहे. आमचं नातं जरी कामामुळे सुरू झालं असलं तरी ते तेवढय़ापुरतंच राहिलं नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, मी त्याचं माहेर आहे.