मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com
‘है राम के वजूद पे हिंदुसितां को नाज
एहले नजर समझते है उनको ईनामे हिंद’
(रामचंद्रावर भारताला गर्व आहे. मर्मज्ञ त्याला भारताचा महापुरुष म्हणून ओळखतात.)
या दोन ओळी कोणी लिहिल्या हे जो कोणी ओळखेल त्याला माझा सलाम. हाच प्रश्न मी गेल्या आठवडय़ात माझ्या दोन मित्रांना विचारला होता. (त्यात सोपान नव्हता.) या दोन मित्रांना उर्दू कवितेची बऱ्यापैकी समज आहे. (अर्थातच त्यांची ही समज हिंदी सिनेमातील साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, गुलजार यांच्या गाण्यांवर आधारलेली आहे.) त्यातला एक मित्र म्हणाला की, ‘हा दोहा पंधराव्या शतकातील संतकवी कबिराचा आहे.’ तर दुसरा म्हणाला, ‘या ओळी हिंदी फिल्म गीतकार शकील बदायुनी यांच्या आहेत.’ (‘बैजू बावरा’ या सिनेमातलं त्यांचं प्रसिद्ध गीत ‘मन तडपत हरी दरसन को आज’ तुम्हाला आठवत असेल.) या दोन्ही मित्रांची उत्तरं पूर्णपणे चुकीची आहेत.
आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी सांगतो की, या ओळी मुहम्मद इक्बाल यांच्या ‘राम’ या कवितेतील आहेत. (इक्बाल यांनी गुरू नानक आणि स्वामी रामतीर्थ यांच्यावरही एक- एक कविता लिहिली आहे.) ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ या प्रसिद्ध गीताचे जनकदेखील तेच. गैरफिल्मी आणि गैरसरकारी असलेलं हे गीत गेली सुमारे आठ दशकं भारतीय जनमानसात सर्वात जास्त लोकप्रिय असलेलं देशभक्तीपर गीत आहे. (महत्त्वाचं म्हणजे या गाण्याची पिलू रागावर आधारलेली चाल भारतरत्न पंडित रविशंकर यांनी बांधली आहे.)
आणि आता या कथेला एक झटका किंवा ज्याला आपण ‘स्टोरी में ट्विस्ट’ म्हणतो तो : ज्या इक्बालने १९०४ च्या आधी ‘सारे जहाँ से अच्छा’ हे देशभक्तीपर गीत लिहिलं आणि सुरुवातीला उल्लेख केलेली रामावरील कविता लिहिली, त्याच इक्बालची भूमिका १९०८ नंतर कशी बदलली याचा पुढील कविता हा एक नमुना आहे. अर्थातच त्यामुळे त्याच्या देशभक्त भारतीय चाहत्यांना जोरदार धक्का बसला.
‘चीनो अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा
मुस्लीम हैं हम, वतन हैं सारा जहाँ हमारा’
(चीन, अरबस्तान आणि हिंदुस्थान आमचे आहेत. आम्ही मुसलमान आहोत. सारं जग आमचा देश आहे.)
१९०४ सालापर्यंत धर्मनिरपेक्ष आणि देशप्रेमी भारतीय अल्लामा इक्बाल १९०८ सालानंतर मूलतत्त्ववादी इस्लामी- म्हणजेच जवळजवळ उलेमा कसे झाले याचं साधं आणि सोपं उत्तर माझ्यापाशी नाही. पण असं आमूलाग्र रूपांतरण त्यांच्यात घडून आलं, हे मात्र निश्चित. यासंदर्भात एक महत्त्वाची, पण कितपत प्रस्तुत हे मला माहीत नाही- घटना म्हणजे इक्बाल १९०४ पासून जवळजवळ चार र्वष उच्च शिक्षणासाठी इंग्लंड आणि जर्मनीत होते.
आता इक्बाल यांचे राजकीय विचार आणि कृती यांचा भारताच्या धर्माधिष्ठित फाळणीवर अप्रत्यक्ष परिणाम कसा झाला या विषयाकडे वळण्याआधी पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी इक्बाल यांची थोडक्यात माहिती देतो. (अर्थात ही माहिती इंटरनेट आणि विकिपीडियावर जाण्याची इच्छा नसणाऱ्या वाचकांसाठी आहे.)
पूर्ण नाव : अल्लमा सर मुहम्मद इक्बाल. (प्रकांड पंडिताला ‘अल्लामा’ ही उपाधी दिली जाते.) जन्म : सियालकोट- १८७७, मृत्यू : १९३८, लाहोर. (सियालकोट आणि लाहोर हे त्यावेळी ब्रिटिश इंडियाचे भाग होते. आता ते पाकिस्तानात आहेत.) शिक्षण : प्राथमिक शिक्षण मदरशात. नंतर स्कॉटिश मिशनरी स्कूल- सियालकोट. गव्हर्नमेंट कॉलेज (लाहोर)मधून बी. ए. आणि एम. ए. परदेशातील शिक्षण : ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज)मधून बी. ए. आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकमधून पीएच. डी.! पीएच. डी.साठीच्या त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘The Development of Metaphysics in Persia’ असा होता. १९०६ मध्ये िलकनस इन, इंग्लंड येथे बॅरिस्टर. त्यांनी तीन वेळा विवाह केला. पण एका वेळी त्यांच्या दोन बायका कधी नव्हत्या. राजकारण, अर्थशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आणि धर्म या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने विद्वत्तापूर्ण लिखाण केलेलं असलं तरी त्यांच्या उपजीविकेचा स्रोत मात्र बॅरिस्टरकीचा व्यवसाय हाच होता.
इक्बाल यांची हिंदू वंशावळ : त्यांचे पूर्वज सप्रू कुळातले काश्मिरी ब्राह्मण होते. मुघल सम्राट शहाजहान याच्या काळात त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. आपले पूर्वज काश्मिरी ब्राह्मण असल्याचा अभिमान ते कधी कधी व्यक्त करीत. पण या गोष्टीस आपण फार महत्त्व देऊ नये असं मला वाटतं.
इक्बाल यांचे कथासंग्रह उर्दू आणि पर्शियन या दोन्ही भाषांतून प्रसिद्ध झाले. आपला संदेश जगभर पसरावा या हेतूने त्यांनी आपले बरेच काव्य फारसीतून लिहिले. त्यांच्या या फारसी कवितासंग्रहांचा इंग्रजीत उत्तम अनुवाद झाला. त्यामुळे इक्बाल यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली आणि त्यांच्या काव्याचा सखोल अभ्यास होऊ लागला. त्यांचा पहिला उर्दू कवितासंग्रह १९२३ मध्ये प्रसिद्ध झाला. यानंतरचे दोन कवितासंग्रह ‘बाले जब्रेल’ (देवदूत गॅब्रिएल याचे पंख) व ‘जर्बे कलीम’ (उपदेशकांचा तडाखा) हे १९३५ पर्यंत प्रसिद्ध झाले.
सेतुमाधवराव पगडींनी इक्बाल यांच्या एकूण काव्याचे जे रसग्रहण केले आहे, ते असे : ‘इक्बालच्या काव्यात आपल्याला दोन ठळक वैशिष्टय़े दिसून येतात. इंग्लंडला जाईपर्यंतच्या काळात त्यांचे काव्य म्हणजे राष्ट्रप्रेम, निसर्गाची वर्णने, अप्रतिम कल्पनाविलास या विषयांना वाहिलेले असे होते. पण नंतर हळूहळू त्याची जागा तत्त्वज्ञानाने घेतली. इस्लाम आणि इस्लामी राजसत्ता, सामाजिक आणि धार्मिक संस्था यांच्या अवनतीचे मूळ शोधून काढून त्यातून मार्ग काढण्याच्या मागे इक्बाल लागला. त्यामुळे त्याच्या काव्यात काव्य कमी आणि तत्त्वज्ञान अधिक असा प्रकार होऊ लागला. पण तो भाषाप्रभू असल्यामुळे आणि कल्पनाविलासाची त्याला ईश्वरदत्त देणगी मिळाली असल्यामुळे त्याचे तत्त्वज्ञानपर काव्यही तितक्याच तळमळीचे आणि तितकेच प्रभावी बनले आहे.’
इक्बाल आणि टागोर हे दोघेही कधी एकमेकांना प्रत्यक्ष भेटले नाहीत. त्यांच्यात पत्रव्यवहारदेखील नव्हता. ते दोघेही जवळजवळ समकालीन आणि त्यांच्या काळातले प्रसिद्ध कवी होते, ही बाब लक्षात घेता हे जरा चमत्कारिक आणि दुर्दैवी वाटते. इक्बाल टागोरांबद्दल नेहमीच चांगलं बोलत असत. परंतु इक्बाल यांनी टागोरांबद्दल काही चांगलं म्हटलं असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालं याचं इक्बाल यांच्या चाहत्यांना नेहमीच वैषम्य वाटलं तरी स्वत: इक्बाल यांनी त्याबद्दल कधी जाहीररीत्या नाराजी प्रकट केली नाही. परंतु ‘टागोर यांची इराण भेट ही हिंदू आणि पर्शियन यांच्यातील आर्यन संबद्धता पुढे रेटण्याची चाल आहे आणि यामुळे इराणी जनता कदाचित पुन्हा झोराष्ट्रीयन धर्माकडे वळू शकेल..’ असा इशारा देणारं पत्र इक्बाल यांनी इराणी मुत्सद्दी गुलाम अब्बास आरम यांना टागोरांच्या इराण भेटीच्या वेळी पाठवलं होतं. याच पत्रात ‘टागोर हे भारतातील मुसलमानांची ब्रिटिश अंमल स्वीकारण्यासाठी दिशाभूल करत असल्याचा’ आरोपही त्यांनी केला होता. या सर्व प्रकरणात इक्बाल यांचं वर्तन हे लज्जास्पद होतं असं मला वाटतं.
आता जरा दुसऱ्या संदर्भात बोलायचं झालं तर रफिक झकारिया यांनी या दोन प्रतिभावान कवींबद्दल जे लिहिलंय ते सर्वसाधारणपणे मान्य होईल असं वाटतं. ते लिहितात, ‘‘टागोर यांनी माणसातील रोमँटिक भाग दृगोच्चर केला; तर इक्बाल यांनी माणसातील वीरता. टागोर यांनी स्त्रीत्वाच्या नाजूकतेचा आणि सौंदर्याचा गौरव केला, तर इक्बाल यांनी पुरुषत्वाच्या मर्दानगीचा. टागोरांच्या कवितेत संगीत होतं, तर इक्बाल यांच्या कवितेत आग. टागोर नम्र होते, तर इक्बाल अभिमानी. टागोर उत्साहाचा सळसळता झरा होता, तर इक्बाल आरामपसंत आणि सुस्त.’
‘इस्लाम धर्माचा आणि इस्लामी समाजाचा पायाच धर्मनिरपेक्षता ठिसूळ करेल. इतकंच नव्हे तर भारतातील हिंदू जनतेचं बहुमत इस्लामी वारसा, संस्कृती आणि राजकीय प्रभाव झाकोळून टाकेल,’ अशी भीती इक्बाल यांनी वारंवार व्यक्त केली होती. हा त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा गाभा होता असं म्हणता येईल.
इक्बाल आणि जिन्हा हे दोघेही जवळपास एकाच वयाचे असले तरी इक्बाल हे जिन्हा यांना आपले राजकीय गुरू मानत असत. मुस्लीम लीगमध्ये ते अतिशय जोमाने कार्यरत होते आणि जिन्हांच्या खूप जवळ होते. भारतीय मुस्लिमांना इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये काहीही भवितव्य नाही असं या दोघांना तीवतेने वाटत असे. कारण या पक्षात हिंदूंचं वर्चस्व होतं. मुस्लीम लीगमध्ये एकता राखू शकणारे आणि मुस्लीम सबलीकरणाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट पूर्ण करू शकणारे जिन्हा हेच एकमेव राजकीय नेते आहेत अशी इक्बाल यांची पूर्ण खात्री पटलेली होती. जिन्हा यांना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ‘‘तुम्ही फार व्यस्त असता हे मला माहिती आहे. तरीपण मी तुम्हाला अनेक वेळा पत्र लिहितो याबद्दल तुम्ही नाराज होणार नाहीत अशी मी आशा करतो. पण भारतातील मुस्लीम समाजाने ज्यांच्याकडे विश्वासाने निधरेक मार्गदर्शनासाठी बघावं असे तुम्हीच तर एकमेव आहात..’’ स्वत:वर लादलेला वनवास संपवून आणि लंडन येथील वास्तव्य सोडून मुस्लीम लीगचं नेतृत्व करण्यासाठी जिन्हा यांनी भारतात यावं यासाठी इक्बाल यांनी त्यांचं मन वळवलं होतं, हे फार कमी लोकांना माहीत असेल.
भारताच्या फाळणीआधीचं नऊ वर्षं जरी त्यांचं निधन झालं असलं तरी पाकिस्तानच्या निर्मितीत इक्बाल यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. १९३० साली अलाहाबाद येथील मुस्लीम लीगच्या वार्षिक अधिवेशनात आपल्या अध्यक्षीय भाषणात इक्बाल यांनी वायव्य भारतातील मुस्लीमबहुल प्रांताच्या स्वतंत्र राज्याची रूपरेखा मांडली होती. फाळणीच्या वेळी बंगाल आणि पंजाब यांचं जे विभाजन झालं त्याची एक प्रकारे ती नांदीच होती.
इक्बाल आणि इतर महत्त्वाच्या मुस्लीम पुढाऱ्यांची फाळणीच्या संदर्भात काय भूमिका होती, हे सारांशाने सांगायचं तर मी असं म्हणेन की (कृपा करून हे वाच्यार्थाने घेऊ नका. मी रूपकात्मक बोलतोय.), सर सय्यद अहमद हे द्विराष्ट्रवादाच्या सिद्धान्ताचे आणि म्हणून परिणामस्वरूप पाकिस्तानच्या निर्मितीचे पिता म्हटले, तर इक्बाल हे आई होते. जिन्हा हे प्रसूतितज्ज्ञ, शल्यचिकित्सक आणि सुईण होते. पाकिस्तान या बाळाचं ज्यांनी सिझेरियन ऑपरेशन पार पाडलं ते लॉर्ड माऊंटबॅटन हे बरेचसे आनंदी गॉडफादर होते. आणि करोडो भारतीय आणि गांधी-नेहरू यांच्यासारखे त्यांचे नेते चकित होऊन हा जीवघेणा खेळ हताश होऊन बघत होते.
जाता जाता : ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शर्मा यांच्याशी माझी बऱ्यापैकी ओळख झाली. त्यांचा आमच्या हाऊसिंग सोसायटीत एक फ्लॅट होता. खरं तर ते त्यांचं ऑफिस होतं. तिथं ते अनेक वेळा येत असत. (त्यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत असताना केदार शर्मा यांनी राज कपूरला थप्पड मारली होती.. असल्या गोष्टींसाठी ते आज ओळखले जातात, हे दुर्दैव आहे. वास्तविक ते अष्टपैलू व प्रतिभावान दिग्दर्शक होते. त्यांनी राज कपूर, मधुबाला, भारतभूषण , माला सिन्हा आणि तनुजा यांना सिनेसृष्टीत पदार्पणाची संधी दिली होती.) एकदा त्यांनी मला त्यांच्या शब्दांत सांगायचं म्हणजे इक्बाल यांचा एक अतिशय उमदा आणि त्यांना आवडणारा शेर म्हणून दाखवला. तो शेर असा..
‘ऐ ताईर-ए-लाहौती उस रिझ्क से मौत अच्छी
जिस रिझ्क से आती हो परवाझ में कोताही’
(हे स्वर्गीय पक्ष्या, जे अन्न खाल्ल्यामुळे तुझ्या भरारीत कमतरता येईल असं अन्न खाण्यापेक्षा मरण पत्करलं.)
सोपानने मला दोन प्रश्न विचारले. त्याचा पहिला प्रश्न : ‘वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत मदरशात शिक्षण घेणारा छोटा इक्बाल अचानक नंतर मिशनरी स्कूलमध्ये कसा काय शिक्षण घेऊ लागला?’ मी त्याला उत्तर दिलं- ‘सर सय्यद अहमद (१८१७-१८९८) या मुस्लीम समाजसुधारकाने सुरू केलेल्या परंपरेत याचं उत्तर आहे. भारतीय मुस्लिमांचं मागासलेपण पाहून ते अतिशय व्यथित होत असत. म्हणून त्यांनी या समाजासाठी धर्मनिरपेक्ष अशा युरोपियन शिक्षणाचा पुरस्कार केला. या शिक्षणामुळे ते हिंदूंशी समर्थपणे टक्कर घेऊ शकतील असा त्यांना विश्वास वाटत होता.’
सोपानचा दुसरा प्रश्न- ‘माझे मुस्लीम मित्र जेवढय़ा उत्साहाने ‘वंदे मातरम’ किंवा ‘जन गण मन’ म्हणत नाहीत त्यापेक्षा जास्त उत्साहाने ते ‘सारे जहाँ से अच्छा’ का म्हणतात याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलंय.’ यावर माझं उत्तर असं : ‘तू म्हणतोयस ते बरोबर आहे. याची तीन कारणं आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे हे गाणं उर्दू भाषेत आहे. आपल्या मुस्लीम बांधवांना ही भाषा फक्त आपलीच आहे असं वाटतं. पण ते चुकीचं आहे. दुसरं म्हणजे हे गीत त्यांच्या एका धर्मबांधवाने लिहिलं आहे. तिसरं म्हणजे इतर दोन गाण्यांसारखं ते त्यांच्यावर सरकारने ‘लादलं’ नाही, हे आहे.’
(टीप : इक्बाल यांच्या उर्दू कवितांची भाषांतरं- केदार शर्मानी मला दिलेला शेर वगळता- सेतुमाधवराव पगडी यांची आहेत.)
शब्दांकन : आनंद थत्ते