अरुंधती देवस्थळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेनेसान्स म्हणजे मानवी संस्कृतीच्या इतिहासातला वसंत ऋतू! या काळात निर्मितीला आलेला बहर अनेक प्रकारे जीवन बदलणारा होता! कलेच्याच बाबतीत बोलायचं तर सर्जनशीलतेचे मानदंड याच काळात घडले, माणूस स्वहस्ते काय घडवू शकतो याची विविध कलांमधली अनेक देखणी उदाहरणं एकमेकांसोबत उमलत राहिली; आणि काळय़ा आजारातून वाचलेल्या जगाला जणू एक नवा सुंदर जन्म मिळाला. स्थापत्य, चित्र आणि शिल्पकलेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या अष्टपैलू प्रतिभांमध्ये लाभलेल्या दीर्घायुष्यात फक्त कला जगणारा मायकेलएंजेलो (१४७५-१५६४)  हे निर्विवाद शिखरच म्हणायला हवं. ती उंची तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही कोणा कलाकाराला गाठता आलेली  नाही.

मायकेलएंजेलोचा जन्म काप्रेजेमधल्या एका खेडय़ातला. लहानपणीच आई वारली आणि कुटुंब फ्लॉरेन्सला स्थायिक झालं. मायकेलला त्या काळच्या रीतीप्रमाणे ग्रामर स्कूलमध्ये दाखल केलं, पण लवकरच त्याची चित्रकलेतील गती आणि ओढ पाहून त्याला दर्जेदार कामासाठी प्रसिद्ध गिरलंदायो बंधूंच्या ‘बतेगा’त (कलाकारांना प्रशिक्षित करणारी कार्यशाळा) पाठवलं गेलं. आधीपासूनच ब्यूनॉरेती कुटुंब हुद्देदार. गावात त्यांची पत होती, त्यामुळे ‘बतेगा’मधला त्याचा प्रवेश त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारा नव्हता, पण हे घडलं खरं! तरुणपणीच तो नावारूपाला आल्यानंतर परिस्थितीत अशी काही उलटापालट झाली की, मायकेललाच दंडाधिकारी वडिलांना वेळोवेळी आर्थिक मदत करावी लागली, भावांना बऱ्यापैकी नोकऱ्या लावून द्याव्या लागल्या.

तीन वर्षांच्या प्रशिक्षणात एक प्रसंग असाही की, आपल्या ख्यातनाम शिक्षकाचं काम या शिकाऊ पोराने सुधारून दिलं आणि पाठीवर कौतुकाची थाप पडलीच, पण त्यांची उर्मटपणे थट्टाही केली. दुखावलेल्या डोमिनिकोंनी त्याला कार्यशाळेतून काढून टाकलं. मायकेलएंजेलोच्या अद्वितीय कलेबरोबरच बोचऱ्या आढय़तेची कहाणीही इथूनच सुरू झाली. तिची झळ पुढे त्याचा हितचिंतक असलेल्या लिओनार्दोलाही लागणार होती. दरम्यान, प्लास्टरमध्ये मॉडेल्सच्या बांधणीत त्याला रस वाटायला लागला. शिल्पात प्रमाणबद्ध मनुष्याकृती, देहबोली ते वस्त्राच्या चुण्या तो सुंदरप्रकारे दाखवू शकतो हे लक्षात आल्यावर, त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. गुणग्राहक, उमद्या मनाच्या डोमिनिकोंनी उमराव मेडिचींच्या शिल्पोद्यान प्रकल्पासाठी मायकेलचं नाव सुचवलं- काम करता-करता शिकणारा हुशार तरुण म्हणून. शिल्पकार म्हणून आपलं कौशल्य दाखवण्याची ही त्याला मिळालेली पहिली संधी. लोरेंझो मेडिचींना मायकेलचं काम इतकं पसंत पडलं की ते तहहयात त्याचे ग्राहक बनले. इतके की, त्यांनी जिओव्हानीच्या अनुभवी देखरेखीखाली पुढील शिक्षणाबरोबर दरबारात कसं वागावं हेही त्याला शिकवलं. आपल्या मुलांबरोबर त्याला ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, कवी डांटे, पेट्रार्क आणि बोकॅचिओ यांच्यासारखे थोर लेखक वाचायला शिकवले; आणि म्हणून इतर कलाकारांपेक्षा मायकेलएंजेलोची एक वेगळीच ओळख घडत गेली. हे वाचन त्याला भविष्यातल्या अभिव्यक्तीत कामी येणार होतं, त्याच्या निओप्लेटॉनिक कवितेची मुळं याच काळातली असावीत. त्याची होत असणारी वाहवा पाहून बरोबरच्या एका शिल्पकाराला इतका मत्सर वाटला की त्याने गुद्दा मारून मायकेलचं नाक तोडलं. मायकेल बरा झाला, पण नाक जरासं वाकडंच  राहिलं. शिल्पांसाठी लिओनार्दोसारखी आता त्यालाही ‘शरीर रचना’ (अ‍ॅनाटॉमी) शिकण्याची गरज वाटू लागली होती, पण त्याकाळी विच्छेदनाची कायदेशीर परवानगी अशक्यप्राय होती. म्हणून तो अपघातात मृत किंवा धार्मिक अपराधाच्या शिक्षेमुळे जिवंत जाळले गेलेले देह अवैध मार्गाने मिळवून, गुप्तपणे त्यात स्नायू आणि शिरांची रचना आणि कार्य समजावून घेऊ पाही. त्याचे चरित्रकार कोंडिवींची नोंद आहे की : अशा अभ्यासासाठी चिरफाडीने त्याला पोटांत ढवळून येई, अन्न जाईना, अपचन होऊ लागलं म्हणून त्याने या अभ्यासाचा नाद सोडला.

लोरेंझो मेडिचींच्या अकाली निधनानंतर मायकेल घरी परतला. त्यांच्या उपकारांची फेड करण्याची संधी अनेक वर्षांनी मिळणार होती. मेडिची परिवाराच्या चर्चची दर्शनी भिंत, मेडिची चॅपल, लोरेंझो आणि ज्युलिआनो या बंधूंच्या कबरी, आतलं कबरीस्तान आणि वाचकांसाठी लाकडी नक्षीदार डेस्कांसकट लॉरेंशिअन लायब्ररी खूप मेहनतीने डिझाइन करून देऊन यात त्याने पहाटेचं (स्त्री) आणि अंधाराचं  (पुरुष) ही सुंदर शिल्पं केली. तिथेही मन रमेना म्हणून तो व्हेनिसला निघून गेला. तिथून बलोनियात एका नव्या मित्राच्या घरी वर्षभर राहिला. अस्वस्थतेत चार-दोन शिल्पंही केली. हे काही खरं नव्हे हे जाणवत असावं. फ्लॉरेन्सला परतल्यावर त्याने क्युपिडचं शिल्पं केलं, त्याने त्याला परत प्रकाशझोतात आणलं. दरम्यान, वर्षभर खपून ग्रीक मद्याचा देव बॅकसचं सेन्शुअस शिल्प केलं (संगमरवर २३० से मी. १४९६-९७). हातात मद्याचा प्याला, विलग ओठ, कलती मान, मस्तकी द्राक्ष आणि वेलीचा मुकुट, डोळय़ात तरळणारी नशा, डाव्या हातात कटिवस्त्र. त्याला लगटून उभा एक छोटासा ‘satyr’, कान आणि पाय बकऱ्याचे, हातात द्राक्षांचा घोस. या कामाच्या बिदागीने कुटुंबाला जप्तीपासून वाचवलं तेव्हा मायकेलचं वय २१ वर्ष होतं. कागदोपत्री आता त्याची सही ‘शिल्पकार मिशेलएंजेलो’ अशी होती.     

१४९२च्या सुमाराला प्लूटाकच्या वर्णनावर आधारित Battle of Centaurs (८० x ९०.५ सें.मी.) या संगमरवरी शिल्पातून मायकेलएंजेलोने जाणता- अजाणता शिल्पकलेची दिशा बदलली आणि स्वत:च्या कीर्तीचा पायाही घातला. शिल्पातल्या युद्ध दृश्यात गतिमान योद्धे एकमेकांना भिडलेले. प्रत्येक देहावर आणि मनावर तणाव. गतिमानता आणि ऊर्जा यांचं प्रतीक असलेलं हे शिल्प प्रथमच मानवाकृतींना अ‍ॅक्शनमध्ये दाखवणारं, म्हणून महत्त्वाचं. इतर कुठलीही सजावट नसल्याने डोळे रिलीफमधल्या या शिल्पावरच खिळून राहतात. हे शिल्प मायकेलएंजेलोचं लाडकं, त्याने अखेपर्यंत स्वत:जवळ ठेवलं होतं. आजही ते त्याच्या फ्लोरेन्सच्या घरी ‘काजा ब्यूनॉरेती’मध्ये आहे.

नवतरुण  मायकेलएंजेलोला कीर्तीच्या शिखरावर पोहोचवणारं संगमरवरी Pieta  (म्हणजे सहानुभूती/ दया, १७४ x १९५ सें.मी, १४९८-९९) हे अतिशय प्रसिद्ध शिल्प, ज्याचं पूर्णत्व आणि सौंदर्य शब्दातीत आहेत. नव्याने लाभलेली प्रतिष्ठा आणि कस पणाला लावणारं हे काम कोवळय़ा वयात मिळणं हाच सन्मान होता. खडकावर बसलेल्या मॅडोनाच्या मांडीवर क्रुसावरून उतरवलेला निष्प्राण जीजस, त्याच्या हाता-पायांवर आणि छातीवर ठोकलेल्या खिळय़ांच्या खुणा.. अतिशय तलम कौशल्यानं साकारलेले माय-लेक. मनुष्य देह असूनही हे दोघे सामान्य नव्हेत हे बघताना जाणवावं असं शिल्पकौशल्य. तरुण लेकाचा मृतदेह मांडीवर घेतलेल्या आईचा दु:खाने कोरा चेहरा. किंचित अधोमुख चेहऱ्यावर, या क्षणी जणू काळ थांबलेला. त्याच्या देहाला सावरण्यासाठी जरा उंचावर टेकवलेला उजवा पाय. पायघोळ पोशाखाला पडलेले सळ. हे शिल्प करताना मायकेलएंजेलोचं वय फक्त तेवीस वर्ष होतं. जीजसच्या कृश मृतदेहाच्या बरगडय़ा, स्नायू आणि शिरा.. मागे लटकलेली मान. इतका परफेक्ट मृतदेह कलेत एरवी न पाहिल्याचं बोललं जातं. त्या काळातले कलासमीक्षक वासारी या शिल्पाचं सौंदर्य ‘दैवी’ आहे असं म्हणतात. मेरीच्या खांद्यावरून खाली आलेल्या पट्टय़ावर, मागाहून स्वत:चं नाव कोरलेलं हे मायकेलएंजेलोचं एकमेव शिल्प! नंतर त्यालाच अवघड वाटू लागलं आणि त्याने परत आपली सही शिल्पावर कधी न करायचं ठरवलं. बिदागीत पोपने त्याला ४५५ सुवर्णमुद्रा दिल्या होत्या. यानंतर चर्च आणि राजघराण्यांकडून एकामागून एक प्रतिष्ठित कामं मिळत गेली आणि पैसाही. मॅडोनाचं मातृत्व आणि मांडीवरचा बाळ जीजस यांचं त्याच्या मनावर गारूडच असावं, कारण त्याने या दोघांची वेगवेगळय़ा तऱ्हेची अनेक शिल्पं आणि चित्रं आत्मीयतेने काढलेली आहेत.

रोममधल्या प्रतिष्ठापनेनंतर ‘पिएटा’ कुठेही गेलेली नाही- अपवाद फक्त न्यूयॉर्कच्या वल्र्ड फेअरचा ( १९६४). तिचा प्रवास आणि मुक्काम अतिशय कडक सुरक्षा देखरेखीखाली झाला होता. अटलांटिकमधून जाताना जहाज बुडालं तरी हे शिल्प अनाघ्रात राहील आणि आपलं स्थान नेमकं कुठे आहे हे रेडिओ सिग्नल्सद्वारा ‘ती’ सांगू शकणार होती. १९७२ मध्ये तिच्यावर एका माथेफिरूने हातोडीने हल्ला केला होता, त्यानंतर तिला तिहेरी बुलेटप्रूफ काचेच्या आत ठेवण्यात आलं. हल्ल्यात जायबंदी झालेल्या मेरीच्या पापण्या दुरुस्त करणं  सर्वात कठीण होतं, दुरुस्तीचं काम वर्षभर चाललं होतं. या आधी एकदा तिची बोटं दुरुस्त करावी लागली होती. हे शिल्प आता व्हॅटिकनमधल्या सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये आहे. काही वर्षांनी सिस्तीन चॅपेलमध्ये एक भित्तिचित्रं बनवताना मायकेलने पिएटा चित्ररूपात आणलं आहे.

आता कथा सुप्रसिद्ध ‘David’ च्या जन्माची १८६०च्या सुमाराला फ्लॉरेन्स कॅथीड्रल ऑफीसने ५.५ मीटर उंचीचा संगमरवराचा अजस्र, अखंड कातळ कॅराराच्या खाणीतून बोटीने आणला होता. त्यातून कॅथीड्रल ऑफ सेंट मेरी ऑफ द फ्लॉवरसाठी १२ पुतळे बनवावेत असा विचार होता. चार-पाच शिल्पकारांना विचारणा झाली, काहींनी प्रयत्न करून पाहिले, पण न पेलल्याने सोडून दिले. त्यात लिओनाडरे द विंचीही होते. नंतरची ४० वर्ष हा कातळ पडून होता. त्यातून ‘बुक ऑफ सॅम्युएल’मधल्या वीरपुरुष डेव्हिडची शिल्पाकृती बनवण्याची कामगिरी २६ वर्षीय मायकेलएंजेलोला सोपवली. ही शिल्पाकृती पाहिल्यावर म्हटलं जातं की, मायकेलला अशी काहीतरी अंत:प्रेरणा मिळाली होती की, या खडकात कोणी एक दैवी पुरुषाकृती अडकून पडली आहे, त्याने आपली साधनं वापरून तिला खडकाच्या बंदिवासातून मुक्त करायचंय. त्यानं तसंच केलं आणि डेव्हिड बाहेर येत गेला. त्यानं १५०१-४, ही चार सलग वर्ष एकांतवासात राहून यावर काम केलं आणि पाच मीटर उंचीचा (जवळजवळ १७ फूट) ५०० टन वजनाचा डेव्हिड कोरला गेला. त्याचे चरित्रकार कोंडिवी लिहितात : या शिल्पाला तो ‘il gigante’ (महाकाय) म्हणे. एकांतात काम करणाऱ्या मायकेलने प्रथम या पुतळय़ाची मेणात प्रतिकृती करून समोर पाण्यात ठेवली होती. जसजसा एकेक भाग होई, पाणी खाली येई. ते छिन्नी, पाथरसारखी आपली साधनं सारखे बदलत राहत, मनात आहे तसंच शिल्पात उतरावं म्हणून.’’ हे त्याने बनवलेलं सर्वात प्रसिद्ध शिल्प म्हणजे  रेनेसान्सला दिलेली देखणी देणगी! या आधीही चित्र -शिल्पकारांनी डेव्हिडने गोलाएथला मारतानाची चित्रं काढली होती, शिल्पं बनवली होती, पण मायकेलएंजेलोने शिल्पात दाखवण्याचा क्षण अतिशय चतुराईने निवडला आहे. नवतरुण डेव्हिडचा देह आणि प्रभावी देहबोली. कसलेलं शरीर, स्नायू आणि दगड पकडलेल्या उजव्या हातावर शिरांचं ताठरलेपण, एकाग्र डोळे, आक्रसलेल्या भुवया, कपाळावर पडलेल्या आठय़ा, डोळय़ात योद्धय़ाचा निर्धार (न दाखवलेलं रक्त नजरेत उतरल्यासारखं) आणि डाव्या खांद्यावर टाकलेली गोफण. ही लढाई चांगल्या आणि वाईटामधली, म्हणून डेव्हिडला नैतिकतेचं अदृश्य बळ. मनावरचा तणाव देहावरही उतरलेला. गोलाएथ कितीही अक्राळविक्राळ असेना, जिंकणार डेव्हिडच हे या शिल्पातून ध्वनित झाल्यासारखं. या शिल्पानंतरची कृती म्हणजे गोफणीतल्या दगडाने राक्षसाचा कपाळमोक्ष आणि सत्याचा, सुविचाराचा होणारा जय!

शिल्प पूर्ण झाल्यावर ठेवावं कुठे हा निर्णय करण्यासाठी तज्ज्ञांची समिती बनवण्यात आली त्यात लिओनार्दो द विंची, सांद्रो बोटीचेली आदींचा समावेश होता. सर्वानुमते ते शहराच्या मुख्य चौकात पलाझो डेला सिंन्योरीयामध्ये चबुतऱ्यावर उभारण्यात आलं. नंतर त्यावर उमटणाऱ्या काळाच्या खुणा रोखण्यासाठी ते बंद इमारतीत हलवावं लागलं. शिल्पांच्या इतिहासांत एकमुखाने गौरवलं गेलेलं हे शिल्प १८७३ पासून गॅलेरिआ डेला अ‍ॅकेडेमियामध्ये ठेवलं आहे. इथे डेव्हिड अर्धघुमटाकृती कमानींमागे ठेवला आहे. वर नैसर्गिक प्रकाशासाठी उंच काचेचं छत, त्याच्याकडे नेणाऱ्या वाटेवर दोन्ही बाजूला संगमरवरी शिल्पं, भालदार चोपदार असावेत तशी. डेव्हिड देखणा आहेच, पण त्याला साजेलशी जी मांडणी गॅलरीने केली आहे तीही त्याच्या भव्यतेला शोभेलशी, अतिशय काळजीपूर्वक केलेली आहे हे लक्षात येतं. मिशेलएंजेलो निर्मित डेव्हिड नव्याने गणराज्य बनलेल्या फ्लॉरेन्सच्या स्वातंत्र्याचं प्रतीक बनला..

त्याकाळी होत तशा याही शिल्पाच्या तीन प्रतिकृती बनवून फ्लॉरेन्समधल्या मोक्याच्या जागी स्थापन करण्यात आल्या. मूळ अ‍ॅकेडेमियामध्ये आहे. दुसरं शिल्पं जुन्या राजवाडय़ाच्या समोरच्या दुओमो चौकात आहे, आणि तिसरं शिल्पं पिझाले मिशेलएंजेलोमध्ये. याची एक प्लास्टर ऑफ पॅरिसमधली प्रतिकृती लंडनच्या व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझिअममध्येही आहे. त्याच्या आधी डोनातेलो (१४४०) (यात निर्वस्त्र तलवारधारी डेव्हिडने फक्त हॅटसारखे शिरस्त्राण आणि पायात बूट घातल्याने काहीतरी विचित्र वाटणारा) आणि वेरोचिओ (१४७३-७५) या दोन मास्टर्सनी डेव्हिडचे ब्राँझमध्ये पुतळे केले होते. दोन्हीत डेव्हिडच्या पायाजवळ त्यांनी मारलेल्या गोलाएथचं शिर आहे. तेही आपापल्यापरीने सुंदर आहेत. कारवाज्योचं एक पेंटिंगही आहे या प्रसंगाचं, पण मायकेलएंजेलोची सर कुणाला येणं अशक्य. त्याचं काम बघायला कलाप्रेमी अमीरउमराव परदेशातून येऊ लागले आणि त्याला फ्रान्स, आताचा बेल्जियम, हॉलंडसारख्या देशांतून काम मिळू लागलं. वेगवेगळय़ा चर्चेसमध्ये त्याची बायबलमधील कथांवर आधारित शिल्पं खास विनंती करून मागवण्यात येऊ लागली.

(क्रमश:)

arundhati.deosthale@gmail.com