मेधा पाटकर

गुजरातमधील नर्मदा बचाव आंदोलनामुळे जगभरात ज्यांचं नाव पोहोचलं त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांचं संघर्षपूर्ण आयुष्य आणि त्यांची सामाजिक आंदोलने यांचा सहप्रवास.. त्यांच्याच शब्दांत!

justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
Comedian Sunil Pal reveals kidnapping ordeal
“डोळ्यावर पट्टी बांधून एका घरात नेलं अन्…”, कॉमेडियन सुनील पालने सांगितला अपहरणाचा घटनाक्रम; म्हणाला, “२० लाख रुपये…”

‘लोकसत्ता’ने आत्मकथनपर लेखनाचा आग्रह धरला तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया  काहीशी नकारात्मकच होती. कारण हेच, की आजच्या घडीचे प्रश्न आजूबाजूला घोंघावत असताना स्वत:विषयी लिहिणे म्हणजे अपराधच! वेळ, काळ, शारीरिक मर्यादा यामुळे अनेकानेक अन्यायांना आपण पुरे पडू शकत नाही असे वाटत असतानाच हा प्रस्ताव समोर आला. त्यामुळे स्वत:ला अधिकच पराभूत  वाटून घ्यावे का, हा प्रश्न काही दिवस भेडसावत राहिला. अखेरीस, ‘का हो, तुम्ही समाजकार्यात कशा उतरलात? या क्षेत्रात तुम्ही आजवर टिकण्याचे कारण काय?’ या जनसामान्यांना पडणाऱ्या कुतूहलयुक्त प्रश्नांची उत्तरे देणे म्हणजेच ‘कार्यकर्तीची जडणघडण’ याविषयी लिहिणे होय असा विचार नंतर मनात आला. आणि या कथनातूनच एखाद्या शिबिरागत तरुणांना जनसमस्येच्या निमित्ताने या कार्यात उतरण्याचे आवाहन करायचे असे ठरवून हा आलेख नव्हे, तर संवाद सुरू करते आहे.. नववर्षांच्या सदिच्छांसह!

सामाजिक कार्यात असणे म्हणजे फार काही आगळेवेगळे जगणे नाही- आणि नसावेच, हा मनोमन भावणारा विचार सहजतेनं कार्य पुढे नेताना मला विनम्र करतो. म्हणूनच समाजकार्याची सुरुवात जगता, वाढताना भोवतालच्या परिसरातील माणसे, अनुभव, घटना आणि आव्हाने यांतूनच सहजसुंदर होत असते हेही जाणवत गेले. माझ्याबाबतीत अनेकांप्रमाणेच शाळा आणि घरापासूनच हे घडले. वडील आणि आई दोघेही सामाजिक-राजकीय कार्यातच अधिक बुडालेले असल्याने पदोपदीचे अनुभवही त्यातलेच. त्यातही आई मुख्य कमावती. वडील १६ व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत वर्षभराचा कारावास भोगून आल्यापासून श्रमिकांच्या संघटनकार्यास भिडलेले. मानधनी कार्यकर्ते. त्यामुळेच की काय, स्त्री-पुरुष भेदाचा शिरकाव आमच्या कौटुंबिक जीवनात कधी झालाच नाही. राष्ट्र सेवादल या समाजवादी संघटनेच्या कार्यातून एकमेकांशी विचारांनी जोडल्या गेलेल्या या दोघांनी जाणीवपूर्वक केलेले संस्कार हीच आम्हा भावंडांची सांपत्तिक ठेव!

एका मारवाडी चाळीतील १० x २० फूटाच्या जागेतील दोन खोल्यांत कामगारांच्या बैठका आणि आमचा अभ्यासही चालायचा. यादरम्यान एकीकडे अभ्यासाची पुस्तके डोळे फाडफाडून वाचत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या बैठकांचे शास्त्रही नकळतपणे मनावर बिंबत होते. त्यातून संघटनकार्याचे बाळकडू आपोआप मिळत गेले. घरात येणाऱ्या बोहारणी वा मोलकरणीशीही आदराने वागण्याच्या घरच्या संस्कारांतून आपसूक काही गोष्टी अंगात भिनत गेल्या. मानवी संबंध हे जाती-वर्गाच्या पलीकडचे असतात आणि असावेत, हा विचार त्यातूनच मनावर ठसत गेला. एकदा बोहारणीला की मासळीवालीला मी ‘तू’ म्हटल्यावरून मिळालेला आईचा फटका कुणालाही ‘अहो मावशी’च म्हणायचे, हे शिकवून गेला. आई-वडील दोघांचेही दिवसरात्र सतत काम करत जगणे हे आम्हा भावंडांनाही स्वस्थ बसू न देणारे होते. त्यामुळेच नृत्याच्या क्लासमधून रात्री दहा वाजता घरी परतणे असो किंवा वक्तृत्व स्पर्धासाठी सुट्टीतही तयारी करणे असो; आपण काही जगावेगळे करतो आहोत असे कधी वाटले नाही. शाळेत खुलगेबाई आणि नंतर कॉलेजात प्रा. प्र. ना. परांजपे यांच्यासारख्या कष्टाळू आणि विचारांची पेरणी करणाऱ्या शिक्षकांनी मूल्यांची मोलाची शिदोरी दिली. त्यातही मनाची मशागत करताना त्यांच्याकडून जाणीवपूर्वक लावले गेलेले सामाजिकतेचे रोपटे विसरता येणार नाही. त्यात कधी वडिलांनी त्यांच्या हातात मी भाषणाचा मसुदा देताच ‘विनोबांसारखे सरळ, सोपे, सुंदर लिहून आण..’ म्हणून सांगत रागे भरणे असो किंवा आरशासमोर उभे करून डोळ्याला डोळा भिडवून वक्तृत्वाचा प्रभाव वाढवण्याचा आईचा पाठ असो; ‘तू जे बोलतेस ते सचोटीचे असेल तर श्रोत्यांच्या नजरेस नजर भिडवून बोल. ओशाळल्या भिरभिरत्या नजरेने नको..’ यासारख्या तिच्या छोटय़ा छोटय़ा टिपण्ण्यासुद्धा आजवर सोबत करत आल्या आहेत.

शालेय व महाविद्यालयीन जीवनात अभ्यास आणि विविध कलांच्या पाठपुराव्यात आमची स्पर्धा असे ती वेळेशी! ही कसरत सांभाळताना अनेकदा नाकीनऊ येत. कित्येकदा आई-वडिलांना चकवून वा त्यांना पटवून आजूबाजूच्या मुलामुलींचे सुट्टीत केलेले संघटन, त्यांच्यासाठी वाचनालय चालवणे, सानेगुरुजी कथामालेसाठी रविवार सकाळ देणे, आठवडय़ातला एक दिवस गरीब वस्त्यांमध्ये घालवणे.. हे सगळे उपक्रम बरेच काही देऊन जात. आमच्या घरात कधीच दागिने, सिनेमे वा मनोरंजनासाठी भटकणे याबद्दल चर्चा होत नसल्याने त्या वयातली ऊर्जा, उत्साह आणि साहसाला वाट करून देणारे कार्यक्रम हे याच प्रकारचे असायचे. राष्ट्र सेवादलातल्या मुलांची रक्तदान शिबिरे तसेच सानेगुरुजी कथामालेच्या आयोजनातून मिळालेले व्यवस्थापन आणि शिस्तीचे पाठ आज कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणाची अनौपचारिक आखणी करतानाही उपयोगी पडतात.

सेवाभावी क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते आम्हाला मिळालेल्या अशा अनुकूल वातावरणापेक्षा पूर्णत: भिन्न, वंचित आणि अभावग्रस्त परिस्थितीतून येत असतात. आई-वडील असोत वा शिक्षक; त्यांचे ‘घडवणे’ या कार्यकर्त्यांच्या वाटय़ाला आलेले नसते. म्हणूनच मग घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, तसे नव्या कार्यकर्त्यांच्या घडणीसाठी आमच्यासारख्यांनीच पुढाकार घेणे गरजेचे असते. त्यासाठी त्यांना आपल्या बालपणीच्या सुरस कथा सांगण्याऐवजी प्रत्यक्ष कार्यातून हे मार्गदर्शन कसे मिळेल हे आम्ही पाहतो. तेव्हा वाटते, की सेवादलाच्या शिबिरांना दर उन्हाळी सुटीत पाठवणारे आपले आई-वडील प्रत्येक लहानग्याला मिळाले असते तर? सर्व दृष्टीने संपन्न असलेल्या पालकांनी आपल्या मुलांना मॉल्स वा सिनेमा थिएटरमध्ये घेऊन जाण्याऐवजी त्यांना एखादे गाव वा आदिवासी पाडा वा एखादी गरीब वस्ती, किंवा वेगळ्या मार्गाने चालविली जाणारी शाळा वा लोककलांचे आविष्कार दाखवण्यासाठी नेले तर? मुलांवर माणुसकीचे, विविध कलांचे संस्कार करणाऱ्या शिबिरांचा शोध घेऊन त्यांना तिथे पाठवले तर?

कष्टकरी कुटुंबांतील मुलांना या उपक्रमांत आणण्यासाठी आम्ही तेव्हा खूप धडपडत असू. आज गरीब वस्त्यांतील आंदोलनाची रणनीती आखताना त्यावेळच्या त्या उद्योगांतून कळत-नकळत मिळालेल्या आचारधनाचा लाभ आता न होता तरच नवल!

वस्तीवस्तीतील जातीपाती आणि धर्माचे राजकारण, गलिच्छ परिसरापलीकडचे, कच्च्या आडोशामागचे पक्के नातेगोते, जगण्यासाठीचा संघर्ष करत असतानाही त्यांनी जपलेली माणुसकी, लहान मुलांपासून कामाची सुरुवात करून पुढे त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना ‘वस्ती हेच आपले घर’ असा (निवारा नसतानादेखील!) दिलासा देणे.. हे सारे आज आठवतेय. आठवडय़ातील दोन दिवसांच्या अशा ‘प्रयोगा’तून आपल्याला खूप काही मिळत असले तरी ती वस्ती कितपत बदलतेय, त्यांच्या गरजांची पूर्तता होते का, हा विचार रात्री-बेरात्री घरी परतताना भेडसावत असे. या विचारातूनच पुढच्या काळात अशा कार्याची बांधिलकी पक्की होत गेली. समोर दिसणारी वंचना ही शोषण आणि अन्यायाच्या पायावर उभी राहिलेली भिंत आहे आणि ती त्यांना आपल्यापासून जरी वेगळे काढत नसली तरी वेगळे ठेवत आहे, या काहीशा अपराधी जाणिवेतून आपण आपल्या कोशातून बाहेर येऊ लागतो.. समोरच्या प्रश्नांना भिडू लागतो. भिंतीचे वास्तव स्वीकारत तिला भगदाड पाडण्याचं, त्यापलीकडे डोकावण्याचं, पलीकडच्यांना साद घालण्याचं कार्य हाती न घेता आपल्याला मग स्वस्थ बसवतच नाही. आणि तेव्हाच आपण ‘कार्यकर्ता’ बनतो.

‘कुठल्या मार्गाने जावे आम्ही?’ या तरुणांच्या प्रश्नाला सहजासहजी उत्तर देता येत नाही. याचे कारण म्हणजे मार्ग दाखवण्यासाठी आवश्यक असते ती विचार आणि आचारसंहिता! ती मला घडणीच्या वयातच मिळत गेली, म्हणूनच पावलं काही. आयुष्यात भेटलेल्या सगळ्या दानशूरांचे आभार मानता मानता ते सारे नि:स्पृह निघूनही गेले. ‘नेमेचि’ घरी येऊन आईला लेकीगत भरभरून प्रेम देणारे भाऊ रानडे.. माझ्यासाठी तेच होते सानेगुरुजींचे दर्शन. चपला कशा, कुठे काढाव्यात- इथपासून वेळ वाचवून निरनिराळ्या कामांमध्ये तो कसा गुंतवावा, याचे धडे कोणत्याही पाठय़पुस्तकाविना त्यांनीच दिले. शेजारची काकी म्हणजे नऊवारीतील मूर्तिमंत शिक्षिका! ही लख्ख इंग्रजी बोलणारी, इंग्रजांइतकीच गोरी बाई म्हणजे भांडारकरकाकी आणि खादी पेहेरून गांधीवादी काका मला वाचन, लेखन ते दुसरीपर्यंतचे शिक्षण देऊन गेले. आई आणि बाबा कामाला गेले की माझा वर्ग सुरू व्हायचा. आज आपापल्या नोकरीधंद्यात व्यग्र असलेल्या आई-वडिलांपलीकडे अशा एखाद्या व्यक्तीची पाखर लहानग्यांना मिळतेच असे नाही. म्हणूनच निवृत्त झालेल्या स्त्रियांनी वा जोडप्यांनी आपल्या नातवंडांसोबतच असे एखादे मूल घडवण्यात रस घेतला तर खूप काही साध्य होऊ शकेल. पाहा विचार करून!

काहींना वाचनासाठी प्रोत्साहन देणारे आई-वडील लाभतात. परंतु कष्टकऱ्यांच्या आणि अशिक्षित कुटुंबांतील मुलांना मात्र वाचनसाहित्य कुणीतरी पुरवावे लागते. मला ‘साधना’सारख्या नियतकालिकाचे दर्शन घरी होत असे. व्याख्यानांचे चालतेबोलते साहित्यही दारीच मिळत गेले. त्यामुळेच जात्यंध वा धर्माध होण्यापासून मी वाचले. आज बदललेल्या सामाजिक-धार्मिक ताणतणावाच्या वातावरणात नव्या पिढीला वाचवायचे तर कोणते साहित्य निर्माण करणे गरजेचे आहे, कोणत्या प्रकारच्या शाळा उभ्या करायच्या याचा ध्यास सुशिक्षित नागरिकांनी घेतला तर? सातपुडय़ातील पाडे-पहाडांत, मणिबेलीसारख्या गावांत गेली २७ वर्षे आम्ही चालविलेल्या जीवनशाळांचे उद्दिष्ट हेच तर आहे! त्यातून बाहेर पडलेली पाच हजाराहून अधिक मुले ही मधेच ‘ड्रॉप-आऊट’ नव्हे, तर ‘ड्रॉप-इन’ होऊन घरी, शेतीत परतली तरी काय बिघडले? यापैकी अनेक जण पदवीधर झाले. काही खेळाडू झाले. परंतु या समस्येला ना समाज महत्त्व देताना दिसत, ना सरकार! त्यामुळे आपल्या मर्यादा जाणवून या कार्यात काही काळ झोकून देऊन आपल्या बालपणीचे हे ‘धन’ त्यांना मुक्तपणे वाटावेसे वाटते. तेही त्यांचे आगळेवेगळे आदिवासी पर्यावरण समजून घेत, त्यांच्याशी स्वत:ला जोडून घेत बाहेरील जगाशी त्यांना जोडण्याचा संकल्प सोडला.

एकीकडे छोटय़ा छोटय़ा सामाजिक उपक्रमांबरोबरच राजकीय भानही हळूहळू येत गेले ते श्रमिक संघटनेच्या तसेच पक्षीय राजकारणातील अनुभवांतून! कुठलाही प्रश्न हाताळायचा तर त्याची राजकीय पाश्र्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे, हे कळण्याइतपत बाळकडू मिळाले होतेच. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या वडिलांची नगरसेवक म्हणून कारकीर्द त्यांच्या देश आणि समाजबदलाच्या बांधिलकीसह घडताना मी लहानपणी अनुभवली होती. राजकारण आणि संघटन यांत समन्वय साधण्याचे त्यांचे कसब मी पाहत आले होते. मालक आणि मजुरांतील संबंधांचे गणित सोडवताना मी त्यांना पाहिले होते. सेंच्युरी मिलच्या श्रमिकांचा लढा लढताना हे सारे आता आठवते. वडिलांनी घेतलेल्या मजुरांच्या बैठकीतील चर्चा, वादविवाद, तसेच मिलचे मालक घरी आले तरीही ताठ मानेने, पण अहिंसक मार्गाने झालेली त्यावेळची ती चर्चा! दिवाळीआधी कामगारांना बोनस न दिल्याची नाराजी मालकांकडून घरी आलेला मिठाईचा बॉक्स फेकून देऊन वडिलांनी व्यक्त केली होती. मजुरांच्या भल्याची ही तळमळ हल्ली कमी होताना पाहून मला ते सांगू लागले, ‘‘युनियनचे चित्र आणि चरित्रही आज बदलते आहे. तू त्या मार्गाने जाऊ नकोस. असंघटित श्रमिकांचे संघटन करून त्यांची शक्ती उभी कर!’’ त्यांची त्यावेळची युनियन आणि आज मध्य प्रदेशातील श्रमिकांनी बिर्लाच्या मिल्स ताब्यात घेऊन स्वत:च त्या चालवण्याच्या खटाटोपात सर्वपक्षीय युनियन्सची चालचलवणूक मी जवळून पाहते आहे. त्याचे भोग भोगते आहे. अशा वेळी वडिलांचे ते बोल आठवल्याशिवाय कसे राहील? म्हणूनच तर असंघटित बायाबापडय़ा रोजची आपली रोजीरोटी चुकवून, अत्याचार सहन करूनही न्यायासाठीचा लढा लढतात. संघटित कारखान्यांतील श्रमिकही पैशाची लालूच आणि ती दाखवणाऱ्या युनियन्सना नाकारून रोजगाराच्या अधिकारासाठी सत्याग्रही बनतात याबद्दल त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. त्यातूनच आपले इमान कायम राखत कानूनी व मैदानी लढाई कुठेही कमी पडू न देण्याची आपल्यावर येऊन पडलेली जबाबदारी एक सकारात्मक ऊर्जा देत राहते.

जडणघडणीतले अनुभव, त्यातून मिळालेले मोलाचे संस्कार आणि आजचे प्रश्न व त्यावरचे उपाय यांची सांगड घालताना कोणत्या अनुभवांतून जावे लागले/ लागते याचा लेखाजोखा यथावकाश या सदरात येईलच. तसेच निवडणुकांतील राजकारण कसे जोखले, पारखले, याबद्दल पुढच्या वेळी!

medha.narmada@gmail.com

Story img Loader