प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सर्वसामान्य माणसाला तुरुंग आणि त्यातील शिक्षा याची नेहमीच भीती वाटते. सर्वसाधारणपणे चित्रपट पाहून आणि कथा-कादंबऱ्या वाचून तुरुंगाबद्दल त्याच्या मनात काही कल्पना तयार होत असतात. वास्तविक पोलिसांमधील काही थोडेफार लोक आणि गुन्हेगार वगळता तुरुंग नावाचा गूढ प्रकार आतून प्रत्यक्ष कोणी पाहिलेला नसतो आणि तशी फारशी इच्छाही कोणाला नसते.
नेमक्या याच गूढ गोष्टींचा आधार घेऊन व्यंगचित्रकार कधी गंभीर, तर कधी गमतीदार भाष्य करत असतो. कैद्याची कोठडी, उंचावर असलेली एक छोटीशी खिडकी, त्याचे पळून जाण्याचे प्रयत्न, जाड भिंती, कैद्यांचा पोषाख, त्यांचा दिनक्रम, क्रूर शिक्षा, खाण्यासाठी कदान्न, लोखंडी भक्कम दरवाजा, फाशीची जागा, दोरखंड, खटका आणि दोन कैद्यांमधलं संभाषण वगैरे वगैरे गोष्टींचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून व्यंगचित्रकार चित्रं काढतात. कधी ही चित्रं हास्यस्फोटक असतात, कधी ती स्मितहास्य उत्पन्न करतात, कधी गंभीर व्हायला लावतात, तर कधी कधी चक्क अंगावर येतात.
स्वातंत्र्यापूर्वी फक्त अट्टल गुन्हेगार आणि कट्टर देशभक्त यांचीच जागा तुरुंगात असायची. पण स्वातंत्र्यानंतर आपण बरीच प्रगती केली असून एक सर्वसमावेशकता यात आणली आहे. म्हणूनच समाजाच्या अनेक स्तरांतले लोक तुरुंगात ‘टाइम स्पेंट’ करताना दिसतात. उद्योगपती, राजकारणी, सिनेनट, पत्रकार, धर्मगुरू, पोलीस अधिकारी यांच्याबरोबरीने खतरनाक गुंड किंवा अतिरेकी एकत्रितपणे बसून हास्यविनोद करत आहेत असे दृश्य सामान्य माणसाच्या मनात अधूनमधून येत असतं. साहजिकच जगभरातल्या अनेक व्यंगचित्रकारांनी हा विषय अनेक प्रकाराने हाताळला आहे.
सायमन बॉन्ड (१९४७-२०११) हा ब्रिटिश- अमेरिकन चित्रकार, व्यंगचित्रकार आणि स्टँडअप कॉमेडी करणारा कलावंत. त्याची व्यंगचित्रं ‘सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट’, ‘एस्क्वायर’, ‘न्यू यॉर्कर’ इत्यादीमध्ये यायची. त्याचं एक पुस्तक म्हणजे ‘हंड्रेड अँड वन युजेस ऑफ डेड कॅट’! अत्यंत विचित्र आणि विक्षिप्त असा हा विषय असला तरी हे पुस्तक प्रचंड यशस्वी झालं. त्यावर टीकाही झाली. विशेष म्हणजे तो स्वत:ही मांजर पाळायचा. सायमनचे ‘ऑड विजन अँड बिइझारे साइट्स’ या नावाचं एक पुस्तक आहे, ज्यात अतिशय वेगळ्या प्रकारच्या कल्पना घेऊन त्यांने व्यंगचित्रं काढली आहेत. ही चित्रं शब्दांपेक्षा रेषांतून अधिक भाष्य करतात. त्याला स्वत:ला कल्पना सुचणं हा प्रकार खूप आवडायचा, पण चित्रं काढायला फारसं आवडायचं नाही असं त्याने लिहून ठेवलंय. छोटय़ा छोटय़ा उभ्या रेषांनी तो चित्रं काढतो. पात्रांच्या चेहऱ्यावर फारशी एक्स्प्रेशन्स नसतात. पण तो जे सांगतो ते मात्र फार गंभीर असतं, मूलभूत असतं आणि चमत्कृतीपूर्णही असतं.
तुरुंगातील अत्यंत कंटाळवाण्या आयुष्यावर सायमन बॉन्डचं हे चित्र बेतलेलं आहे. वेळ घालवण्यासाठी प्राथमिक शाळेतला खेळ म्हणजे नऊ चौकोनांत खेळला जाणारा गोळा-फुली हा खेळ. दोन कैदी हा खेळ खेळताना दाखवले आहेत. यासाठी खिडकीच्या पडलेल्या सावल्यांचा वापर ते करताहेत. दृश्यपातळीवर अत्यंत प्रभावी असलेलं आणि कारुण्याची छटा असलेलं हे चित्र आहे.
तुरुंगात काही कैद्यांना पश्चात्ताप होतो. आपल्याला वाटतं की केलेल्या कृत्याबद्दल हा पश्चात्ताप असावा. पण ते तसं नेहमीच असतं असं नाही. एका व्यंगचित्रातला कैदी म्हणतोय, ‘मी खूप लवकर ही गुन्हेगारी कृत्यं सुरू केली असती तर बरं झालं असतं! एव्हाना शिक्षा भोगून बाहेर पडलो असतो!!’
एका व्यंगचित्रात साखळदंडांनी हात-पाय बांधलेल्या दोन कैद्यांमधला एकजण दुसऱ्याचे सांत्वन करताना म्हणतो, ‘ठीक आहे, इथे तुझ्या स्वातंत्र्यावर थोडय़ा मर्यादा आल्या आहेत. पण इथे तू अधिक सुरक्षित आहेस हा फायदा लक्षात घे!’
पीटर अर्नो हे गेल्या शतकातील ज्येष्ठ अमेरिकन व्यंगचित्रकार. काळ्या-पांढऱ्या रंगांचे ब्रशचे फटकारे मारून ते उत्तम विनोदी प्रसंग छान उभे करतात. ठळक रेषा, उत्तम रेखाटन, चेहऱ्यावरच्या भावनांचे यथार्थ विरूपीकरण आणि हसवणारा विनोद यामुळे गेल्या शतकात ते खूप लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या या सोबतच्या चित्रातील कैदी हा खरं तर तुरुंगातच खूप सुखी आहे! महिन्यातून एकदा कधीतरी भेटायला आलेल्या बायकोला तो म्हणतोय की, ‘गप्पा जरा लवकर आटप. आमचे तुरुंगातील करमणुकीचे कार्यक्रम आता सुरू होतील.’
शेनी आणि झीग्लर या ‘न्यू यॉर्कर’च्या व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रं ही एकदम अंगावर येणारी आहेत. गिलोटिनने मुंडकं उडवलं जाणाऱ्याला विचारलं जातं (जणू काही शेवटची इच्छाच!) की, ‘‘तुला तुझं मुंडकं ठेवण्यासाठी प्लास्टिक बकेट पाहिजे की कागदाची चालेल?’’ तर दुसऱ्या चित्रात अपंगांसाठी केलेली सोय दाखवली आहे!!
एकूणच तुरुंग आणि फाशी वगैरे विषयावर भरपूर चित्रं काढण्याची संधी आपल्या देशात उपलब्ध आहे. माझ्या एका मालिकेतील व्यंगचित्रात सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे आणि त्यातले एक अति उच्चपदस्थ विचार मांडत आहेत की, ‘आपल्या भविष्यासंदर्भातला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्योगपती, राजकारणी, अभिनेते वगैरेंसाठी स्वतंत्र व्हीआयपी तुरुंग असावेत की साध्या तुरुंगात स्वतंत्र व्हीआयपी कोठडय़ा असाव्यात?’
एक माजी मंत्री तर तुरुंगातल्या सहकाऱ्याला सांगतो की, ‘‘खरंच मी निर्दोष आहे. एक जबाबदार मंत्री म्हणून मी नेहमीप्रमाणे भ्रष्टाचार केला, इतकंच!’’ याच मालिकेतल्या दुसऱ्या एका चित्रात एक साधा कैदी तुरुंगाधिकाऱ्यांना विनंती करतो की, ‘‘माझी शिक्षा महिन्याभराने वाढवा! मला आणखी काही दिवस मुख्यमंत्र्यांच्या सहवासात राहायचंय!’’ फाशीची शिक्षा झालेला एक कैदी दुसऱ्या कैद्याला म्हणतोय, ‘‘मी आता राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार आहे! मला लवकरात लवकर फाशी द्यावी म्हणून.. इतकं इथलं जेवण बेकार आहे.’’ एका चित्रात कोठडीबाहेरचा रखवालदार कैद्याला सांगतोय की, ‘‘इलेक्ट्रिक चेअरवर बसवून तुला उद्या फाशी देणार होते, पण ते आता पुढे ढकललंय. कारण उद्यापासून येथे लोडशेडिंग सुरू होतंय!’’
आपल्या देशातल्या एका मुख्यमंत्र्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाल्यावर एक पॉकेट कार्टून काढलं होतं. त्यात तुरुंगात असलेल्या नेत्याला खिडकीतून बाहेर तिरंगा फडकताना दिसतो, कारण त्या दिवशी स्वातंत्र्यदिन असतो. अशा वेळी त्यांचा कोठडीतला सहकारी म्हणतो, ‘‘गेल्या वर्षी या सुमारास तुम्ही केलेलं भाषण खूप प्रभावी होतं साहेब. भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात येईल असं तुम्ही म्हणाला होतात.’’
पण आपल्या एकूणच न्यायव्यवस्थेबद्दल भाष्य करावे अशी परिस्थिती नक्कीच आहे. त्यावरच्या एका चित्रात तुरुंग अधिकारी बोलताना दाखवले आहेत. ते म्हणतात, ‘‘वाईट बातमी! २८ वर्षांनंतर आपण ज्याला उद्या फाशी देणार होतो, तो कैदी अखेरीस वृद्धापकाळाने आजच तुरुंगात मेला.’’
फाशीची शिक्षा झालेला कैदी तुरुंगात खूप आजारी पडला तर त्याबद्दल हे तुरुंगाधिकारी डॉक्टरांना जे सांगतात ते असंच (सोबतच्या व्यंगचित्रातील) अंतर्मुख करायला लावणारं आहे!!