राजेश खरात
सर्वांत सजग आणि कृतिशील विद्यार्थी घडविणारे विद्यापीठ म्हणून ‘जेएनयू’ची ख्याती. संशोधन, सामाजिकशास्त्रे, कला आणि परकीय भाषा अभ्यासासाठी असलेल्या हजार जागांसाठी देशभरातील प्रवेशोत्सुकांची संख्या दरवर्षी लाखांवर पोहोचते. ‘जेएनयू’च्या घडणीपासून विद्यादानात तिचा लौकिक पसरविण्यात मराठी माणसांचा वाटा महाराष्ट्रासाठी अद्याप अनभिज्ञच. विविध शाखांतील निकालानंतर उच्चशिक्षणातील प्रवेशाच्या लगबगीला काही दिवस राहिलेले असताना आणि पुढील आठवड्यातील ‘जेएनयू’च्या स्थापनादिनानिमित्त आपल्या विद्यार्थी-पालकांना या ज्ञानपोयीची वेगळी ओळख…

एनयू’ म्हणजेच दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची खरी ओळख केवळ तीन अक्षरांशी निगडित आहे. गेले दशकभर या विद्यापीठाच्या आवारात अतिशय किरकोळ घटना घडली तरी त्याची राष्ट्रीय बातमी होते. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ‘जेएनयू’बद्दलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी होणाऱ्या प्रवेश-प्रक्रियेच्या वेळेस ते ठळक दिसते. प्रवेश अर्जांची संख्या गेल्या काही वर्षांपासून लाखांहून अधिक होत चाललीय. दिल्लीत येणाऱ्या सुशिक्षित तरुणाईला ‘जेएनयू’ पाहण्याची उत्सुकता असते आणि ते कुणाची ना कुणाची ओळख काढून येथे येतातच. पुणे-मुंबई येथील महाविद्यालये आणि काही पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी दरवर्षी येतात. जेएनयूची स्थापना १९६९ साली झाली, तेव्हापासून जेएनयूच्या जडणघडणीत काही विशिष्ट राज्यांतील प्राध्यापकांचा आणि डाव्या विचारसरणीचा पगडा होता आणि अजूनही आहे. ‘जेएनयू’ निर्माण होण्याआधी इंडियन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज्, (आयएसआयएस) १९५५ साली अस्तित्वात आले. या संस्थेला ‘जेएनयू’ची जननी म्हणता येईल. नंतर १९६९ साली ‘जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी’त या संस्थेचा समावेश झाला.

सुरुवात करायची तर…

‘जेएनयू’ निर्मिती प्रक्रियेत महाराष्ट्रातील आणि मराठी बुद्धिजीवींचे मोलाचे योगदान आहे. १९६५ चे जेएनयूचे बिल. त्याचे कर्ते-करविते म्हणजे न्या. एम. सी. छागला. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि अमेरिका आणि ब्रिटनमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम केल्यामुळे पाश्चात्त्य विद्यापीठाच्या धर्तीवर त्यांना भारतात एक विद्यापीठ निर्माण करायचे होते; आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेदेखील तेच स्वप्न असल्याने भारतीय संसदेत याबाबत ज्या ज्या वेळी चर्चा घडत, त्या त्या वेळी एल. एम. सिंघवी आणि बापूजी अणे यांनी त्याबाबत विविध सूचना केल्या.

१९५५ ला स्थापन झालेल्या ‘इंडियन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज्’ या संस्थेतील शिक्षक वर्ग सुरुवातीला प्रामुख्याने दक्षिण भारतीय आणि दिल्लीच्या आसपास असलेल्या उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश तसेच ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहार येथील होते. त्यामुळे साहजिकच या संस्थेतील विद्यार्थीदेखील दक्षिण भारतीय किंवा उत्तर भारतीय होते. या ‘इंडियन स्कूल…’च्या आणि आजच्या जेएनयूच्या जडणघडणीत मराठी अभिजनांची भरीव मेहनत कामी आली. याबाबत मराठी जनमानस आजही बऱ्यापैकी अनभिज्ञ आहे. या ‘इंडियन स्कूल…’मध्ये मराठी विद्यार्थ्यांना पाठविण्याचे श्रेय साताऱ्यातील औंध संस्थानचे पंतप्रतिनिधी आणि भारताचे माजी राजदूत आप्पासाहेब भवानराव पंत यांना दिले पाहिजे. १९५५ ते १९६० या काळात आप्पा पंत हे तिबेट, भूतान आणि सिक्कीम या तीन ठिकाणी भारताचे राजकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याच काळात ‘इंडियन स्कूल…’ची स्थापना झाली. आप्पा पंतांना त्याच वेळी या संस्थेचे महत्त्व कळल्यामुळे त्यांनी येथे शिकण्यासाठी त्यांच्या संपर्क क्षेत्रातील पुणे आणि सातारा या भागातील विद्यार्थांना प्रोत्साहित केले. १९५५ च्या पहिल्या वर्षाच्या वर्गामध्ये महाराष्ट्राला सुपरिचित असणारे विद्वान आणि राज्यशास्त्रज्ञ राम बापट होते तर त्यांच्याच वर्गात जेएनयूतच आयुष्य घालविणाऱ्या प्रा. उर्मिला फडणीस आणि मुंबई विद्यापीठातील नागरिकशास्त्र तसेच राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख बी. रमेश बाबू हेदेखील होते. पुढील काही वर्षामध्ये अर्थशास्त्र विषयात संशोधन करणारे प्रा. बिडकर आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ प्रा. बोकील अशी काही नावे घेता येतील. तसेच प्रा. गोविंद पुरुषोत्तम देशपांडे, पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. एस. एन. तवले असे दिग्गज या संस्थेत शिकले. यांच्यापैकी प्रा. राम बापट यांनी दिल्लीतील झाकीर हुसेन महाविद्यालयात काही काळ अध्यापन केले आणि ते महाराष्ट्रात परतले. तर प्रा. उर्मिला फडणीस आणि त्यांचे पती उमाशंकर फडणीस हे दाम्पत्य जेएनयूतच राहिले. उमाशंकर फडणीस हे मराठी असले तरी त्यांचा महाराष्ट्राशी अधिक संपर्क नव्हता. ते मूळचे दक्षिणेकडील तंजावरच्या मराठी कुटुंबातील. सोशलिस्ट पक्षात सक्रिय असताना प्रौढ शिक्षण क्षेत्रात त्यांचे संशोधन होते. प्रा. उर्मिला फडणीस या मूळच्या इतिहास संशोधक. नंतर त्यांची रुची आंतरराष्ट्रीय राजकारण, परराष्ट्रीय धोरण आणि त्यानंतर वांशिकता विषयात वाढली. सखोल संशोधन करून समाजशास्त्रज्ञ म्हणून जगाला त्या परिचित झाल्या. जेएनयूत राहून त्यांनी श्रीलंका आणि मालदीव बेटे यांवर केलेले संशोधन हे जगमान्य आहे. वांशिकता विषयात पारंगत असणाऱ्या जगातील पहिल्या पाचांमध्ये त्यांचे नाव आजही घेतले जाते. त्या जेएनयूतील दक्षिण आशियाई केंद्राच्या प्रमुख देखील होत्या. मालदीववर पहिले पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका म्हणूनही त्यांची ख्याती. फडणीस दाम्पत्य हे केवळ शिक्षण क्षेत्रात विपुल संशोधन आणि भरीव योगदानामुळे ओळखले जात नव्हते. ते हयात असेपर्यंत ‘जेएनयू’मधील विद्यार्थ्यांचे पालक बनणे त्यांनी पसंत केले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलींचे लोण जेएनयूच्या दरवाजापर्यंत पोचले होते, तेव्हा तेथील अनेकजणांनी शीख कुटुंबीयांना विद्यापीठात आसरा दिला. फडणीस कुटुंबीयांनीदेखील त्यांच्या ‘५७ दक्षिणापूरम’ या राहत्या घरी बेघर शीख कुटुंबांना राहू दिले. तसेच शेजारील वसतिगृहामध्ये मानसिक धक्क्यात असणाऱ्या दोन शीख विद्यार्थांना घरी आणून आधार दिला. त्यातीलच एक म्हणजे तरणजीत सिंग संधू. तो पुढे अमेरिकेत भारताचा राजदूत म्हणून नावारूपास आला, अशी माहिती त्यांची मुलगी अदिती फडणीस यांनी दिली. येथे शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी हा जेएनयूच्या ऋणात आजन्म बंदिस्त राहतो. फडणीस कुटुंबीयांचा आदर्श घेऊन आजदेखील अनेक प्राध्यापक कुटुंबे किंवा विद्यार्थी संघटना विद्यार्थांसाठी सदैव जागरूक असतात. हीच खरी ‘जेएनयू’ची ओळख.

‘गोपु’ यांची कारकीर्द…

त्या काळात संपूर्ण भारतातून ‘इंडियन स्कूल…’मध्ये येण्यासाठी प्रवेश-परीक्षा घेतली जात असे. महाराष्ट्र सरकारने तेथे जाणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी शासनाची शिष्यवृत्ती देऊ केली होती. विद्यार्थ्यांना स्वत:चा खर्च आणि संशोधन सुकरपणे करता येईल, यासाठी हा खटाटोप. एवढे असूनही बोटावर मोजता येतील इतकेच विद्यार्थी महाराष्ट्रातून दिल्लीत जात. त्यापैकी एक प्रा. गोविंद पुरुषोत्तम देशपांडे. रहिमतपूर,(सातारा) गावातून विद्यार्थी म्हणून ते जेएनयूत आले आणि सेवापूर्तीपर्यंत येथेच राहिले. ‘सेंटर फॉर ईस्ट एशियन स्टडीज्’ येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिग्गजांनी प्रबंध पूर्ण केले. त्यांचा पीएच.डी.चा विद्यार्थी असण्याचे अभिमान बाळगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दोन वेळा भारताचे परराष्ट्रीय मंत्रीपद भूषविणारे डॉ. एस. जयशंकर होत. महाराष्ट्रात ‘गोपु’ असेच संबोधल्या जाणाऱ्या देशपांडेसरांचे घर विद्यार्थांसाठी नेहमीच उघडे असे. त्याबाबत वेळ-काळाचे बंधन नसे. मराठी भाषा, नाट्यसंबंधित किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्यानंतर देशपांडे पती-पत्नी जेएनयूमध्ये परतणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कारमधून घेऊन जात असत. अनेक वर्षे त्यांनी चीनच्या संदर्भात इंग्रजी आणि मराठीत विपुल लेखन केले. ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे भारतभर आणि भारताबाहेरदेखील लोकांना भावले. त्यावर टीका -टिप्पणीही झाली, पण त्यांची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली. हा ठामपणा जेएनयूच्या प्रशासन पदांवर असताना म्हणजे केंद्र प्रमुख आणि ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज्’चे अधिष्ठाता होते, तेव्हाही ते दाखवत असत. त्यामुळे त्यांच्याबाबत सर्व स्तरावर आदर होता. डाव्या विचारसरणीचा पुरस्कार केल्याने आणि त्यांचे विचार सार्वजनिक जीवनात मांडल्यामुळे महाराष्ट्रात काही वृत्तपत्रांमधून त्यांच्यावर आगपाखड होत असे. पण त्यांनी त्याची तमा बाळगली नाही.
संशोधकांचे योगदान…

प्रा. के. आर. सिंघ नागपूरच्या राजघराण्याशी संबंधित असणारे आणखी एक मराठी आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व. १९६४-६५ च्या दरम्यान ते नागपूरहून दिल्लीत पोचले आणि शेवटपर्यंत जेएनयूत राहिले. दिल्लीतच त्यांची हयात गेली. या काळात त्यांनी जेएनयू आणि देशाच्या संरक्षण मंत्रालयात भरीव काम केले. सागरी-संरक्षण, हिंदी महासागर, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका या विषयातील त्यांच्या संशोधन आणि लिखाणाची भारत सरकारने वेळोवेळी दखल घेतली. भारत सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीवरदेखील त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. ‘बे ऑफ बेंगॉल कम्युनिटी’ची संकल्पनाही त्यांचीच आहे. पुढे जाऊन त्याचे ‘बिम्स्टेक’ असे नामकरण झाले. गेल्या आठवड्यात बिम्स्टेकची शिखर परिषद बँकॉक येथे पार पडली. प्रा. के. आर. सिंघ यांनी निवृत्तीनंतरदेखील आपल्या संशोधनाच्या मूळ स्वभावाला जागून १९९८ साली महाराष्ट्राच्या सागरी समुद्री किल्ल्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. भारतीय नौदलासाठी या समुद्री किल्ल्यांचे सामरिक महत्त्व किती, यावरचे संशोधन त्यांनी अधोरेखित केले. संदर्भासाठी मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात नियमित जाता यावे म्हणून कलिना कॅम्पसच्या मुलांच्या वसतिगृहात ते राहत. त्याच होस्टेलच्या मेसमध्ये मिळेल ते जेवण घेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘आज्ञापत्रा’चा आधार घेत त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. दिल्लीत चार दशके राहूनदेखील मराठी भाषेवरचे त्यांचे एवढे प्रभुत्व होते की, आज्ञापत्रातील प्रत्येक शब्दांचा अर्थ त्यांना माहिती होता. एवढे योगदान देणारी व्यक्ती ही मराठी होती हेच दिल्लीतील त्यांच्या मराठी विद्यार्थ्यांना आणि लोकांना माहिती नाही. त्यांच्यापाठोपाठ १९६६ साली नागपूरमधूनच आलेले प्रा. विजयकुमार जांभूळकर याच ‘इंडियन स्कूल…’ (आताचे जेएनयू) संस्थेत आले आणि पुढे त्यांनी १९७२ ते २००८ पर्यंत जेएनयूतील ‘डिप्लोमसी सेंटर’मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी पन्नासच्या वर एम.फिल आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अडल्यानडल्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरून त्यांचे शिक्षण आणि संशोधन कायम ठेवले. मराठी मुलांसाठी त्यांचा आर्थिक आणि मानसिक मोठा आधार होता आणि आजही ते दिल्लीत राहून विद्यार्थ्यांसाठी मदतीसाठी सदैव तत्पर असतात. याच काळात प्रा. के. एस. जवातकर ‘इंडियन स्कूल…’च्या आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संघटना या केंद्रात विद्यार्थी म्हणून आले आणि येथेच प्राध्यापक म्हणून रुजू झाले. हिंदी महासागरातील वसलेले बेट ‘दिएगो गार्सिया’ हे मूळचे भारतीय आहे. त्यांच्यावर ब्रिटन आणि अमेरिकेचा दावा चुकीचा आहे आणि आपण बेट मिळविले पाहिजे, अशी मांडणी त्यांनी केली होती.

सन १९६७ मध्ये प्रा. निर्मला जोशी आल्या. त्यांचे कुटुंब मूळचे अकलूजचे. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानात असल्याने निर्मला यांचा प्रवास आधी मुंबईचे रुपारेल कॉलेज आणि एम. एस. युनिव्हर्सिटी, बडोदा असा झाला. मग ‘इंडियन स्कूल…’ नंतर पीएच.डी.साठी दोन वर्षे मॉस्को आणि १९७२ मध्ये प्राध्यापक म्हणून जेएनयूत सोव्हिएत केंद्रात त्या रुजू झाल्या. निवृत्तीनंतर त्या पुण्यात स्थायिक आहेत. आजही भारताच्या परराष्ट्रीय आणि संरक्षण विभागाच्या धोरणनिर्मितीसाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते.

परकीय भाषाकेंद्रांची जडण-घडण…

जेएनयूच्या निर्मिती काळातच ‘स्कूल ऑफ फॉरिन लँग्वेज’ निर्माण करताना धारवाड येथील डॉ. के. जी महाले यांनी दिल्लीत येऊन फ्रें च भाषा केंद्र उभे केले. पुढे ते जेएनयूचे प्र-कुलगुरू झाले. संस्था-निर्माता अशी त्यांची लोकप्रियता आहे. त्यांच्यानंतर आलेल्या प्रा. अनुराधा कुंटे यांनी तर भारतभरात आपले आणि जेएनयूचे नाव केले. सर्वार्थाने मुंबई विद्यापीठाच्या बी.ए, एम.ए आणि पीएच.डी.च्या या विद्यार्थिनीने दिल्लीत येऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांचे कौशल्य म्हणजे भाषांतर संवादक ( simultaneous interpretation). त्यांच्या या वकुबामुळेच त्यांना इंदिरा गांधी यांनी वैयक्तिक फ्रेंच भाषांतरकार म्हणून नियुक्त केले होते. भारतात शब्दांवर इतकी ताकद असलेले बोटावर मोजता येतील इतकेच भाषांतरकार आहेत. ते सर्वजण प्रा. कुंटे यांचे जेएनयूमधील विद्यार्थी आहेत. याच काळात भाषाशास्त्र केंद्राच्या निर्मितीसाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील सुमित्र मंगेश कत्रे यांना पाचारण करण्यात आले. ते युरो-भारतीय भाषांचे अभ्यासक. ‘लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया’चे संवर्धनही त्यांनी केले. जर्मन भाषा केंद्रासाठी पुण्याचेच प्रा. प्रमोद तलगेरी यांना दिल्लीत आणले गेले. त्यांनी जेएनयूतील जर्मन भाषा केंद्र भारतात एक अव्वल केंद्र म्हणून नावारूपास आणले. भाषांतर-अभ्यास कार्यक्रम सुरू करण्याची जबाबदारी प्रा. तलगेरी यांच्याकडे होती. उच्चस्तरीय इंडो-जर्मन कन्सल्टेटिव्ह ग्रुपचे ते सदस्य तर होतेच, पण अनेक वर्षे यूजीसीचे सदस्य म्हणूनदेखील त्यांनी काम केले होते.

प्रा. राजेंद्र डेंगळे हे १९७९ पासून चार वेळा सेंटर ऑफ जर्मन स्टडीज्, एसएलएल अॅण्ड सीएसचे अध्यक्ष होते. ते २०२१ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी विद्यापीठात ‘थिअरीज् ऑफ लिटरेचर’ प्रोग्राम विकसित केला. तेव्हापासून कल्चर स्टडीज् म्हणून ‘लिटरेचर स्टडीज्’ आणि ‘न्यू मीडिया’चाही समावेश झाला आहे. ते तीन वर्षे ‘डीन ऑफ स्टुडंट्स’ होते. त्या दरम्यान त्यांनी तीन नवीन वसतिगृहे सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. जेएनयू योग केंद्र विकसित केले. त्यांनी ‘जेएनयू’च्या सेंट्रल लायब्ररीचे अडीच वर्षे प्रभारी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्या काळात ग्रंथालयातील काही अभिलेखीय साहित्याच्या डिजिटलायझेशनची प्रक्रिया सुरू करण्याची जबाबदारी पार पाडली. स्पॅनिश भाषा केंद्र विकसित करण्यासाठी मूळचे पुण्याचेच, पण दिल्लीस्थित प्रा. वसंत गद्रे यांना जेएनयूत आमंत्रित करण्यात आले होते. फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश भाषा केंद्रांचे प्रमुखपद प्रा. अनुराधा कुंटे, प्रा. प्रमोद तलगेरी, प्रा. वसंत गद्रे आणि प्रा. राजेंद्र डेंगळे या चार मराठी बुद्धिजीवींनी भूषविले. त्यातील काही जणांनी दोनदा हे पद राखले. १९७०-१९८० च्या दशकात जेएनयूतील परराष्ट्रीय भाषा केंद्र म्हणजे पुण्यातील ‘रानडे इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेजेस’चे विस्तारित केंद्र असे म्हटले जात असे. येथेच जर्मन भाषा केंद्रात डॉ. पर्णळ चिरमुले आहेत. लैंगिक अत्याचार विरोधा GSCASH सारख्या अति संवेदनशील समितीच्या त्या प्रमुख होत्या. तसेच JNUTA या शिक्षक संघटनात त्यांचा सक्रिय सहभाग. त्यांनी जेएनयू प्रशासकीय सुधारणा समितीच्या सदस्य म्हणून काम पाहिले. याच ठिकाणी डॉ. प्रियदा उपाध्ये आहेत. ‘वर्किंग वुमेन्स होस्टेल’च्या वार्डन असतानाच त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांच्या समितीवर सदस्य म्हणूनही काम केले. गेल्या वर्षी डॉ. श्रेया गायकवाड आणि शुभा वैद्या या दोघी रुजू झाल्यात.

प्रा. मकरंद परांजपे हे नाव महाराष्ट्राला नवखे नाही. त्यांनी इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकांचे भाषांतर अनेक भाषांत प्रकाशित झालेले आहे. जेएनयूमधील एक प्रमुख विद्वान अशी त्यांची ख्याती आहे. भाषाशास्त्र आणि इंग्रजी केंद्राचे ते प्रमुख होते, तसेच इंग्रजी साहित्य आणि भाषा केंद्राचे देखील प्रमुखपद त्यांनी दोन वेळा भूषविले. आज याच केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. मिलिंद आवाड आहेत. बीडमधून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास फर्ग्युसननंतर जेएनयूत स्थिरावला. फ्रेंच भाषा विभागातील डॉ. शरद बाविस्कर हे तरुण आणि तडफदार प्राध्यापक. ‘भुरा’मुळे सतत त्यांच्या ‘जेएनयू’त असण्याच्या चर्चा होतात. जेएनयू आणि महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे.

सामाजिकशास्त्र विभागाचा विकास…

परराष्ट्र भाषा केंद्राच्या उभारणीमध्ये मराठी प्राध्यापकांचा जसा सिंहाचा वाटा होता, तसेच सामाजिकशास्त्र विभागात या केंद्र निर्मितीसाठी मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ प्रा. कृष्णा भारद्वाज (मूळच्या चंदावरकर) यांनी केलेले कार्य अवर्णनीय आहे. वाहतूक आणि शेतीविषयक अर्थशास्त्र यात त्यांचा गाढा अभ्यास असल्यामुळे जगभरात त्याची नोंद घेतली गेली. त्या केंद्राच्या प्रवर्तकच होत्या. आज याच केंद्रातर्फे ‘डॉ. कृष्णा भारद्वाज मेमोरिअल लेक्चर सिरीज्’ अव्याहत सुरू आहे. १९७० च्या सुरुवातीला त्या मुंबई विद्यापीठातून जेएनयूत आल्या आणि १९९२ ला त्यांचे इथेच निधन झाले. केवळ ५६ वर्षांचे त्यांना आयुष्य लाभले. याच सामाजिकशास्त्र अभ्यास केंद्रात औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून आलेल्या प्रा. सुखदेव थोरात यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी आहे. ते ‘सेंटर फॉर सोशल अॅण्ड रिजनल स्टडीज्’ (सीएसआरडी) येथे आले. येथेच पीएच.डी. केली आणि याच ठिकाणी रुजू झाले. चार दशके जेएनयूत विविध पदांवर काम करत असताना त्यांनी मराठी आणि इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना आणि तरुण प्राध्यापकांना वेळोवेळी मदतीचा हात दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेएनयूला छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख करून देण्याचे श्रेय प्रा. थोरातसरांना दिले जाते. जेएनयूमध्ये ‘आंबेडकर स्टडी सर्कल’ ते ‘आंबेडकर स्कूल ऑफ थॉट’ असे विविध विचारमंच उभे करण्यात त्यांचाच मोठा सहभाग. जेएनयूत प्रथमच समान संधी कक्ष स्थापन करण्यात आले आणि त्यांनाच त्याचे प्रमुख म्हणून नेमले गेले. त्या ठिकाणी देखील त्यांची कामगिरी भरीव होती. आज जेएनयूमध्ये UDSF आणि BAPSA या विद्यार्थी-संघटना उभ्या राहिल्या त्या याच बळावर. डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांना केवळ आव्हान नाही तर पर्याय निर्माण झाला. पुढे UGC आणि ICSSR या महत्त्वाच्या संस्थांचे ते अध्यक्ष झाले. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी फेलोशिप असो किंवा प्रत्येक विद्यापीठातून ‘सेंटर फॉर एक्स्लूजन स्टडीज्’ ची स्थापना थोरात सरांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाली. जेएनयू प्रशासनाने त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेऊन त्यांना ‘निवृत्त मानद प्राध्यापक’ ( Professor Emeritus) पद देऊन त्यांचा सन्मान केला. राज्यशास्त्र अभ्यास केंद्रातील प्रा. गोपाल गुरू दोनदा त्या केंद्राचे प्रमुख झाले. विविध महत्त्वाच्या समितीवर त्यांच्या सूचना ग्राह्य मानल्या गेल्या. डॉ. हरीश वानखेडे हेदेखील याच विभागात आहेत, त्यांना रामन फेलोशिप मिळाली आहे. अमेरिकेत स्टॅन्फर्ड विद्यापीठात दोन वर्षे राहून त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. डॉ. रोहन चौधरी हेदेखील नुकतेच पुण्यातून येऊन राज्यशास्त्र विभागात रुजू झाले आहेत. नव्या पिढीतील इतिहास विभागात कोल्हापूरचे प्रा. अशोक कदम हेदेखील जेएनयूच्या अनेक समितीवर कार्यरत होते. ते विद्यार्थी कल्याण केंद्राचे अधिष्ठाता होते, तसेच इतिहास विभागाचे प्रमुख पददेखील त्यांनी भूषविले. भारतीय इतिहास संशोधक परिषदेचे ते प्रमुख होते. येथील एससी-एसटी कार्यालयाचे संपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. बेळगावचे प्रा. पी. एम. कुलकर्णी हेदेखील सीएसआरडी या केंद्राचे प्रमुख होते. नांदेडचे डॉ. प्राचीन घोडजकर हे सेंटर फॉर सोशल मेडिसिन केंद्रात आहेत. GSCASH सारख्या समितीवर त्यांनी अनेक वर्षे सदस्य म्हणून काम केले. धुळ्याचे डॉ. प्रदीप शिंदे हे फोर्ड फाऊंडेशनची फेलोशिप घेऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉक्टरेट पदवी मिळवून जेएनयूत आले. जेएनयू शिक्षक संघटनेच्या सचिवपदी असताना आणि एरवीदेखील शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितांसाठी नेहमीच त्यांनी हिरिरीने पुढाकार घेतला आणि त्यांच्या मागण्या लावून धरल्या. डॉ. अमित थोरात सीएसआरडीमध्ये आहेत.

अलीकडचे चित्र…

गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रातून अनेकजण ‘इंडियन स्कूल…’ मध्ये दाखल झाले, नाशिकचे डॉ. मनीष दाभाडे हेदेखील इथलेच विद्यार्थी. मग प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आठ वर्षे नर्मदा होस्टेलचे वॉर्डन होते, दोन वर्षे विद्वत परिषदेवर सदस्य म्हणून काम पाहिले. जुन्या ‘इंडियन स्कूल…’ला सत्तर वर्षे पूर्ण होत असताना संबंधित विविध समित्यांवर ते सध्या कार्यरत आहेत. तरुण पिढीतील मुंबईचे डॉ. वृषाल घोबले पश्चिम आशिया केंद्रात आहेत, तर बेळगावच्या डॉ. ज्योती भोसले या तुलनात्मक राज्यशास्त्र आणि राजकीय सिद्धांत या विभागात आहेत. त्यादेखील जेएनयूच्या शिक्षक संघटनेत सक्रिय असून त्यांनी सहसचिव पदाची धुरा सांभाळली आहे. पुण्याहून आलेले डॉ. अरविंद येलारी हे चीन अभ्यास केंद्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षा आणि सामरिक अभ्यास केंद्राची समन्वयक पदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असून, २०२३ मधील जेएनयू विद्यार्थी संघटनेची निवडणूक त्यांच्या देखरेखीखाली पार पडली. धाराशिवचे डॉ. मिलिंद धावारे हेदेखील दक्षिण आशिया अभ्यास केंद्रात कार्यरत असून या केंद्राचे चर्चासत्र संयोजकदेखील आहे. येथील विविध समित्यांवर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.

लाइफ सायन्सेसमधील प्रज्ञावंत…

स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसमध्ये प्रा. रावसाहेब काळे यांचे नाव सुपरिचित आहे. ते सुरुवातीपासून जेएनयूच्या प्रशासनात सक्रिय होते. १५ वर्षांपेक्षा जास्त काळ ते विद्वत परिषदेवर कार्यरत होते. काळेसर विद्यार्थिदशेत इथे आले आणि इथलेच रहिवासी झाले. समान संधी कार्यालयाचे ते प्रमुख असताना ते एससी- एसटी कक्षाचे संपर्क ( liason) अधिकारी होते. जेएनयूत राखीव जागा योग्य रीतीने भरल्या जाव्यात म्हणून रोस्टर पद्धती लागू करण्याचे मोठे काम त्यांनी केले. तसेच विद्यार्थी कल्याण केंद्राचे डीन, ‘प्रोव्होस्ट चीफ प्रोक्टर’ अशा अनेक पदावर त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याची छाप पाडली. जेएनयूमध्ये होस्टेलला नावे देताना भारतातील नदींची नावे दिली जातात. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी इंद्रायणी किंवा कोयना या नावांचा आग्रह धरला होता. शेवटी कोयना नदीचे नाव एका होस्टेलला देण्याचा निर्णय झाला. याच विभागात आता प्रा. अरुण खरात आहेत. ते आंतरराष्ट्रीय सहयोग कार्यालय आणि IQAC चे प्रमुख होते आणि सध्या जेएनयूच्या सुरक्षा विभागाशी संलग्नित आहेत.

कलाइतिहास आणि इतर…

मूळचे चंद्रपूरचे प्रा. यशदत्त अलोने हे कला इतिहासकार असून ‘स्कूल ऑफ आर्ट्स’ आणि ‘अॅस्थेटिक्स’ येथे कार्यरत आहेत. तेदेखील जेएनयूचे विद्यार्थी असून गेली दोन दशके प्राध्यापक आहेत. JNUTA चे सक्रिय सभासद असून, त्यांनी या शिक्षक संघटनेत सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले. तसेच ‘प्रोटेक्टिव्ह इग्नोरन्स’ या नव्या सिद्धांताची मांडणी करून शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवली. कोकणातून आलेल्या प्रा. शुक्ला सावंतदेखील याच विभागात असून त्यांचेही कला क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य मोठे आहे.

श्रीमती दमयंती तांबे इथल्या प्रशासनातील एक महत्त्वाचे नाव. जेएनयूच्या क्रीडा क्षेत्रांत वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर त्यांनी तीन दशके काम केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ‘जेएनयू’चे नाव क्रीडा क्षेत्रांतदेखील लोकप्रिय झाले. प्रा. दिलीप मोहिते हे हंबीरराव मोहिते यांचे वंशज जेएनयूमध्ये राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून पाच वर्षे निवड समितीवर होते. त्यांच्या कार्यकाळात भारतातून अतिशय होतकरू आणि गुणवंत प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली.

तीन वर्षांपूर्वी ‘जेएनयू’ प्रशासनाच्या उच्च पदावर म्हणजे कुलगुरू म्हणून आलेल्या प्रा. शान्तिश्री धुलीपुडी पंडित यादेखील पुण्यातून आलेल्या आहेत. त्या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू असून, जेएनयूची प्रतिमा मलिन होण्यापासून रोखण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. जेएनयूच्या माजी विद्यार्थिनी असल्याने त्यांना हे शक्य झाले. त्याचबरोबर प्राध्यापकांची सेवांतर्गत बढती आणि खुल्या नियुक्तीमधील राखीव जागेचा कोटा पूर्ण भरून काढण्याचे श्रेय त्यांना जाते.
‘जेएनयू’ची जननीसंस्था ‘इंडियन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज्’ला सत्तर वर्षे पूर्ण होत असताना आणि पुढील आठवड्यातच ‘जेएनयू’चा स्थापना दिन (२२ एप्रिल) साजरा केला जाणार असताना, या सर्वांचे स्मरण मराठी जगतास करून देणे म्हणूनच महत्त्वाचे वाटते.

(लेखक १९८७ सालापासून जेएनयूत दक्षिण आशिया अभ्यास केंद्रात सुरुवातीला विद्यार्थी आणि नंतर प्राध्यापक म्हणून कार्यरत. याच केंद्राचे ते प्रमुख आणि जेएनयूच्या समान संधी कक्षाचेदेखील प्रमुख. तसेच मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता.)
rkharat@hotmail.com