नुकतेच दिवंगत झालेले ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांचे ‘लोकसत्ता’शी आतडय़ाचे नाते होते. ‘लोकसत्ता’मध्ये शब्दकोडय़ाचे सहसंपादक म्हणून त्यांनी काही काळ नोकरी केली. आणि त्यानंतरही वेगवेगळ्या नात्यांनी ते ‘लोकसत्ता’शी गेले जवळजवळ सहा दशकांहून अधिक काळ जोडलेले राहिले. ‘लोकसत्ता’तील या दिवसांबद्दल त्यांनी २००१ च्या ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकात एक हृद्य लेख लिहिला होता. त्यांच्याशी असलेल्या ‘लोकसत्ता’च्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा देण्याकरता आम्ही तो संपादित स्वरूपात पुनर्मुद्रित करीत आहोत…
२६ जुलै १९५१ या दिवशी मी ‘लोकसत्ता’च्या चाकरीत रुजू झालो. त्यावेळी ‘लोकसत्ता’शी जे ऋणानुबंध जुळले ते आजतागायत कायम आहेत. ‘लोकसत्ता’त मला सामावून घेण्यापूर्वी माझी चाचणी परीक्षा किंवा मुलाखत ‘लोकसत्ता’चे त्यावेळचे मॅनेजर टी. एस. कृष्णन् आणि जनरल मॅनेजर क्लॉड स्कॉट यांनी घेतली होती. क्लॉड स्कॉट हे युरोपियन होते. त्यापूर्वी युरोपियन गोरी माणसे दुरून पाहिली होती, पण त्यांच्याशी बोलण्याचा योग कधी आला नव्हता. स्कॉटसाहेबांनी मला काही प्रश्न विचारले. त्यांची मी यथामती उत्तरे दिली. त्यांचे प्रश्न मला समजले किती आणि मी दिलेली उत्तरे त्यांना समजली किती, हे एका गणपतीलाच माहीत! पण त्यांच्या त्या परीक्षेत मी उतरलो. नंतर कृष्णन्साहेबांनी मला काही प्रश्न विचारले. हिंदीच्या कुबडय़ा घेत माझ्या लंगडय़ा इंग्लिशमधून मी त्यांना उत्तरे दिली. काय असेल ते असो, दोघांनी माझी नेमणूक निश्चित करून टाकली… (उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
त्याआधी ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक ह. रा. महाजनी यांनी माझ्याबद्दल या दोघांनाही काही चांगले सांगितले असले पाहिजे. अन्यथा माझ्यासारख्या पोरसवदा मुलाला त्यांनी एकदम महत्त्वपूर्ण जागी नेमले नसते. मी शब्दकोडय़ांचा सहसंपादक आणि रचनाकार म्हणून ‘लोकसत्ता’च्या सेवेत रुजू झालो. महाजनींशी माझा त्यापूर्वी आलेला संबंध म्हणजे केवळ मी त्यांना पाठविलेली पत्रे- एवढाच होता. मी ‘लोकसत्ता’ची शब्दकोडी प्रारंभापासून नियमितपणे सोडवीत असे आणि कोडय़ात ज्या चुका होत, त्या पत्रे पाठवून महाजनींना कळवीत असे. कारण संपादक महाजनी हेच ‘लोकसत्ता’चे मालक आहेत अशी माझी भाबडी समजूत होती.
‘लोकसत्ता’च्या शब्दकोडे विभागात विद्याधर गोखले हे संपादक होते आणि मी सहसंपादक. तीन आठवडय़ाला एक अशाप्रकारे ‘लोकसत्ता’ची शब्दकोडी तयार केली जात. सरकारी बंधने फार जाचक होती. तरीही ‘लोकसत्ता’ची शब्दकोडी फार नावाजलेली होती. ‘लोकसत्ता’ शब्दकोडे विभाग म्हणजे एक वेगळीच दुनिया होती. या विभागात २०-२५ मुली आणि पाच-सहा पुरुष असे काम करीत असत. ‘लोकसत्ता’ शब्दकोडय़ांना अमाप लोकप्रियता लाभली होती. प्रवेश फी एका चौकोनाला आठ आणे अशी होती. प्रारंभी बक्षिसाच्या रकमेवर सरकारी बंधन नव्हते. पण मागाहून तीस हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसे देऊ नयेत आणि वर्षांतून सतराच शब्दकोडी प्रकाशित करावी, अशी बंधने आली. प्रत्येक स्पर्धेत पाऊण ते एक लाख रुपये जमा होत असत. बक्षिसाची रक्कम जाऊन चांगला फायदा उरे. शिवाय वर्तमानपत्राचा खपही वाढे. या शब्दकोडय़ांची लोकप्रयिता टिकविण्यासाठी विद्याधर गोखले आणि मी खूपच मेहनत घेत असू. शब्दकोडय़ांच्या रचनेत विविध प्रकारचे उपक्रम करीत असू. शब्दकोडय़ांच्या चौकोनात एखादे वचन फिरविणे, शब्दकोडय़ांची विधाने एकाच विषयावर रचणे- असे अनेक प्रकार असत. जाहिरातीसुद्धा कल्पकतेने केल्या जात. त्या काळात कोडय़ांचा पारितोषिक वितरण समारंभ- म्हणजे बक्षीस देण्याचे कार्यक्रम हे मोठय़ा थाटामाटात होत. एकदा असा कार्यक्रम ठाणे येथे होता. आमच्या कार्यालयातील सगळी मंडळी ठाण्याला निघाली. त्या काळात ठाणे आताच्या इतके जवळ वाटत नसे. ठाण्याला पोहोचल्यावर लक्षात आले की बक्षीस द्यायचा चेक आपण सोबत आणलेलाच नाही. झाले! तोपर्यंत बक्षीस समारंभाची वेळसुद्धा येऊन ठेपली. ज्या बाईंना बक्षीस मिळाले होते त्यांच्या नातलगांना आम्ही बाजूला घेऊन ‘आम्ही चेक आणण्यास विसरलो आहोत, उद्या ठाण्याला येऊन चेक आणून देतो,’ असे विनवून पाहिले. परंतु त्या मंडळींनी आवाज चढवला, ‘तुमची बक्षिसे खोटी असतात. उगाचच जाहिराती करता. लोकांना फसवता..’ असे नाना प्रकारचे आरोप करायला लागले. समारंभाला जमलेल्या मंडळींतही चलबिचल सुरू झाली. काय करावे कळेना! पण आश्चर्याची गोष्ट अशी, की जनरल मॅनेजर कृष्णन्साहेब यांना आम्ही चेक आणायला विसरलो असू असे वाटले. त्यांनी चौकशी केली. आम्ही चेक न नेल्याचे त्यांना समजले तेव्हा त्यांनी तातडीने एक माणूस चेक घेऊन पाठविला. तो अगदी ऐनवेळी पोहोचला. चेक मिळाल्यावर सर्वाची तोंडे बंद झाली आणि आमचा जीव भांडय़ात पडला….(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
कोडे सोडविताना त्यासोबत लोक संपादकांना एखादे पत्रही लिहायचे. त्यात आपली परिस्थिती कशी बिकट आहे, याचे हृदयद्रावक वर्णन केलेले असे. काही लोक पत्रे लिहून वेगवेगळी आमिषेही दाखवीत. पैशाच्या व्यवहारात काय काय गमती घडतात, आणि लोक पैसे मिळवण्यासाठी काय काय क्लृप्त्या लढवतात, हे त्या काळात खूपच अनुभवाला आले. ‘लोकसत्ता’चा खप शब्दकोडय़ांमुळे होतो, ही संपादक ह. रा. महाजनींना मोठी खटकणारी बाब होती. गावा-गावातील लोक, विशेषत: विक्रेते- ‘कोडय़ाची लोकसत्ता’ असे म्हणत असत. शब्दकोडय़ांच्या प्रवेशपत्रिका रविवारी आणि सोमवारी प्रकाशित होत असत आणि या प्रवेशपत्रिका मिळाव्यात म्हणून ग्राहक रविवारी व सोमवारी प्रती अधिक प्रमाणात विकत घेत. ‘लोकसत्ता’चे बाकीचेही विभाग चांगले होते, पण खप मात्र शब्दकोडय़ांमुळे अधिक होत होता. कारण ज्या लोकांना एकापेक्षा अधिक प्रवेशपत्रिका पाठवायच्या असत, ते अधिक प्रती विकत घेत. एकेक माणूस चार, आठ, सोळा, बत्तीस अशा प्रती विकत घेई. कोऱ्या प्रवेशपत्रिकांसाठी रविवारप्रमाणे सोमवारीही खप मोठा असे. महाजनी ‘कोडय़ाची लोकसत्ता’ असे म्हटल्यावर चिडत. संतापत. हे ध्यानात आल्यावर आम्ही एक श्लोक रचला होता. ‘पेंडसे- पर्वते गेले, ठेले परी महाजनी।। कोडय़ाने लोकसत्तेचा, खप वाढे दिनोदिनी।।’ पर्वते आणि पेंडसे हे ‘लोकसत्ता’चे आधीचे संपादक. त्यांच्यानंतर महाजनी हे तिसरे संपादक. ‘लोकसत्ता’ दैनिकाला प्रतिष्ठा मिळावी आणि त्याबरोबरच खपही वाढावा यासाठी ह. रा. महाजनींनी खूपच प्रयत्न केले. ते स्वत: आणि ‘लोकसत्ता’चे त्याकाळचे सक्र्युलेशन मॅनेजर म्हणजे वितरण विभागप्रमुख रंगनाथन् या दोघांनी महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक तालुक्याच्या शहराला भेटी दिल्या. तिथल्या विक्रेत्यांच्या आणि वाचकांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. त्यावर इलाज शोधले. त्याप्रमाणे कार्यवाही केली. एवढय़ातच महाजनी परदेशात जाऊन आले. परदेशातील प्रसिद्ध दैनिकांचा भलामोठा गठ्ठा त्यांनी येताना बरोबर आणला होता. वर्तमानपत्राची मांडणी, सजावट या सर्व गोष्टींबद्दल सहकाऱ्यांबरोबर विचारविनिमय करून महाजनींनी ‘लोकसत्ता’चे स्वरूप बदलले. त्या काळात वर्तमानपत्रे बातम्या आणि राजकीय घडामोडी यांनीच अधिक भरलेली असत. अर्थात अग्रलेखालाही महत्त्व होतेच. महाजनींची लेखनशैली धारदार आणि उपहासगर्भ अशी होती. तिरकस आणि तिखट लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांना मुळी नेहमी वादाची खुमखुमीच असे. हे वाद वृत्तपत्रातून तर केले जातच, पण सभा-संमेलनांतूनही वादाला सामोरे जाण्याची महाजनींना हौस होती…(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
‘लोकसत्ता’त काम करणारी बहुतेक मंडळी ही साहित्य, राजकारणाच्या विविध प्रवाहांशी संबंधित अशी होती. बातम्या तयार करण्यासाठी म्हणून एक मोठे अंडाकृती टेबल होते. त्याच्याभोवती वार्ताहर आणि उपसंपादक बसत. मध्येच लहर आली की महाजनी आपल्या केबिनमधून बाहेर येऊन कंबरेवर एक हात घेत एका पायावर उभे राहत आणि जुन्या गोष्टी रंगवून सांगत. गोष्टी रंगवून सांगण्यात महाजनींचा हातखंडा होता. मधेच महाजनींना एखादे अवतरण सांगायचे असे, पण त्यांना त्याचा पहिला चरणच आठवे. मग दुसरा चरण विद्याधर गोखले सांगत. गोखल्यांची स्मरणशक्ती अफाट आणि बोलणे खमंग असायचे. गोखले चार लोकांत असले की तिथे केंद्रस्थानी गोखलेच असत. मग कोणाला बोलण्याचे कामच उरत नसे.
गोखल्यांचा स्वभाव मोठा आकर्षक होता. ते नागपूरकर असल्यामुळे मैत्रीला पक्के होते. पुढच्या आयुष्यात मला गोखल्यांच्या या गुणाचा खूप वेळा प्रत्यय आला. मी जेव्हा ‘लोकसत्ता’त नोकरीला लागलो त्यावेळी माझे वय बावीस होते आणि गोखले माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठे होते. म्हणजे दोघेही तसे तरुण होतो. आम्ही एकमेकांच्या संगतीने म्हातारे झालो आणि गोखल्यांनी आपले मन:पूत आयुष्य कसे व्यतीत केले, ते मी जवळून पाहिले. गोखल्यांकडे ढोंग नव्हते. लिहिण्याचा झपाटा जबरदस्त होता. लिहीत असताना पानाचा तोबरा भरून, मान तिरकी करून गोखले लिहीत. ऑफिसात आले की पॅण्ट आणि बुशकोट किंवा शर्ट- जे असेल ते काढून ठेवीत आणि आतील पट्टय़ा-पट्टय़ांची चौकडीची तोकडी पॅण्ट आणि बाह्य़ा असलेला गंजिफ्रॉक घालून ऑफिसात बसत. पान खाणे चालूच असे.
गोखल्यांचे वडील संभाजीराव गोखले हे विदर्भात मोठे राजकीय पुढारी होते. १९४८ च्या दरम्यान ते मंत्री होते. विदर्भात त्यांचा दबदबा प्रचंड होता. पण आपल्या मुलाने आपल्या स्थानाचा उपयोग करू नये अशी त्यांची तीव्र इच्छा होती. गोखले काही वर्षे मुंबईत शिक्षक होते. नंतर त्यावेळच्या ‘नवभारत’ या मराठी दैनिकात होते. आचार्य अत्र्यांच्या ‘नवयुग’मध्ये त्यांनी काही दिवस- म्हणजे काही दिवसच काम केले होते. संस्कृतचे पंडित, मराठीवर उत्तम प्रभुत्व. सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न होती. बोलण्यात नाटय़ भरपूर भरलेले आणि उदंड किस्से त्यांना माहीत तर होतेच; शिवाय साहित्यातील अनेक गोष्टीसुद्धा ते खुलवून सांगत….(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
१९५६ मध्ये शब्दकोडी बंद पडली. शब्दकोडे विभागातील काही स्टाफ इतर खात्यांत सामावून घ्यावयाचा असे धोरण कंपनीने आखले. मात्र, गोखले विरुद्ध महाजनी हा तिढा कायम असल्यामुळे महाजनींना गोखलेंना संपादक खात्यात येऊ द्यायचे नव्हते. खरे म्हणजे गोखले मुळात संपादक खात्यातच होते. ते आधी ‘रविवारचा लोकसत्ता’ पाहत असत. तरीही महाजनींनी त्यांना पुन्हा संपादक खात्यात घ्यायला नकार दिला. पण महाजनींची माझ्यावर मर्जी असल्यामुळे मला मात्र ते संपादक खात्यात घ्यायला तयार होते.
तेव्हाच एक वेगळी गोष्ट घडून आली. विवाहित गोखले प्रेमात पडले आणि दुसरे लग्न करणारच, अशा निग्रहाला आले. एका बाजूला ही परिस्थिती असताना शब्दकोडी बंद झाल्यामुळे गोखल्यांची नोकरी जाते की काय, अशी टांगती तलवार. मला ‘लोकसत्ता’च्या संपादक खात्यात जाण्यात रस नव्हता. कारण माझे इंग्लिश बेतास बात आणि त्या काळात संपादक खाते फार वेगळेच होते. तेव्हा मी महाजनींना गळ घालून सांगितले की, तुम्ही माझ्यासाठी काही करू नका, पण गोखल्यांना संपादक खात्यात सामावून घ्या. माझ्याप्रमाणे आणखीही काही लोकांनी महाजनींना तसा आग्रह धरला असला पाहिजे. आणि गोखले पुन्हा संपादक खात्यात रुजू झाले.
शब्दकोडी बंद झाल्यावर मला जी काही १५-१६ हजारांची रक्कम मिळाली ती घेऊन मी ‘लोकमित्र’ नावाचे साप्ताहिक सुरू केले. तो जवळ असलेला पैसा सहा महिन्यांतच उडाला आणि कर्जबाजारी होऊन ते साप्ताहिक बंद करावे लागले. माझ्यासाठी काहीतरी करावे असे महाजनींना वाटत होते. मी ‘लोकमित्र’ साप्ताहिकात संतवचनांवर आधारीत असे साहित्याच्या अंगाने भविष्य लिहीत असे. यात संतांचे एखादे अवतरण घेऊन त्याच्या अनुषंगाने त्या आठवडय़ाचे वा महिन्याचे भविष्य सांगावयाचे, असा तो प्रकार त्या काळात खूपच लोकप्रिय होता. ‘लोकमित्र’ साप्ताहिक चालले नाही, पण माझे भविष्य लोकांना आवडले आणि महाजनींनी मला ‘लोकसत्ता’त भविष्य लिहिण्याची कामगिरी दिली. ‘लोकसत्ता’त इतर विभागांत असलेल्यापैकी अनेकजण माझे मित्र, हितचिंतक होते. अशा लोकांमध्ये प्रेसमध्ये नायडू नावाचा भला माणूस होता. गुप्ता नावाचे एक ब्लॉकमेकर होते. हे सर्व लोक माझ्यासाठी काही करावे अशा विचारांनी अनेक बाजूंनी मदतीचा, साहाय्याचा हात पुढे करीत. म्हणजे मी ब्लॉक करण्याचे काम आणले तर गुप्ता मला ते काम योग्य दराने, पण त्वरित करून देत. ‘लोकसत्ता’चे छपाई कागदांच्या रिळांचे अंश शिल्लक राहत; ते नायडू मला विकत देई. आणि त्या रिळांच्या उरलेल्या कागदांतून मी कागदाची रिमे करून घेई. असे अनेक व्यवहार ‘लोकसत्ता’मार्फत होत असल्यामुळे मी ‘लोकसत्ता’त नोकरीला नसलो तरी ऑफिसात जाणे-येणे सुरू असे. गोखले आणि महाजनी यांच्या भेटी वारंवार होत. त्यामुळे ऑफिसात काय घडते हे तर कळेच; पण गोखले- महाजनींशी काही विशेष स्नेह जुळून गेला असल्यामुळे आणि मला नोकरी नसल्याने माझ्या मोकळ्या वेळेतील बराचसा वेळ मी गोखले आणि महाजनी यांच्याबरोबरच घालवीत असे…(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
‘लोकसत्ता’ या संस्थेशी आणि संस्थेत काम करणाऱ्या लोकांशी चांगले संबंध असले तरी त्यामुळे प्रपंच चालविणे जमण्यासारखे नव्हते. म्हणून १९५८ मध्ये ‘शब्दरंजन स्पर्धा’ सुरू केली. शब्दकोडय़ांच्या धंद्याचा अनुभव होताच; त्यामुळे सहा-सात महिने कष्टाचे गेल्यानंतर हा धंदा व्यवस्थित चालू लागला.
मी ‘लोकसत्ता’त भविष्य लिहीत होतो आणि माझ्या भविष्याचा मजकूर काही वेळा एकेका संपूर्ण पानाएवढा असे. पुढे १९६२ च्या फेब्रुवारीत ‘लोकसत्ता’चे भविष्य बंद केले. १९६४ पासून ‘शब्दरंजन’चा धंदा मंदीच्या वावटळीत सापडला. त्यात खूप त्रास झाला. १९७२ मध्ये ‘कालनिर्णय दिनदर्शिका’ सुरू केली. तिथेही पहिली काही वर्षे कष्टाची होती. पण मग हा धंदा व्यवस्थित चालू लागल्यावर स्वत:चे मोठे मुद्रणालय असावे असे वाटले. अंधेरी येथे जागा घेऊन आम्ही तिथे स्वत:ची इमारत बांधली आणि जर्मनीहून मोठे मशीन आणून ते प्रेसमध्ये लावले. यथावकाश यंत्रे वाढली. मुंबईतील अग्रगण्य मोठय़ा मुद्रणालयांत आमच्या प्रेसचे- ‘सुमंगल प्रेस’चे नाव होऊ लागले. दरम्यानच्या काळात ‘लोकसत्ता’च्या छपाईच्या कामात काही विशेष समस्या निर्माण झाल्या. म्हणजे त्यावेळी ‘लोकसत्ता’कडे असलेल्या यंत्रसामग्रीवर मागणीइतक्या प्रती छापून मिळत नसत. ‘लोकसत्ता’च्या व्यवस्थापनाकडून ‘तुम्ही ‘लोकसत्ता’ छापता का?’ अशी माझ्याकडे विचारणा झाली. दरम्यानच्या काळात आम्ही इंग्लिश-मराठी दैनिके, साप्ताहिके छापत होतोच. पण ‘लोकसत्ता’ छापावयाचा, ही कल्पनाच मोठी रम्य होती. ‘लोकसत्ता’शी असलेले भावनात्मक नाते याबाबत विशेष महत्त्वाचे ठरले होते. ‘लोकसत्ता’ आपल्या प्रेसमध्ये छापणार, ही कल्पनाच माझ्या दृष्टीने मोठी सुखद होती. ज्या दिवशी ‘लोकसत्ता’ आमच्याकडे छापण्यास सुरुवात झाली, त्या दिवशी रात्री अंक छापून होईपर्यंत मी स्वत: प्रेसवर होतो. एरवी वर्षभरातून एखादा दिवस मी तेथे जातो. पण ‘लोकसत्ता’ छापण्याचा आनंद हृदयात मावण्यासारखा नव्हता. माझा आणखी एका गाठीने लोकसत्ताशी असलेला संबंध दृढ झाला होता.
‘लोकसत्ता’त नोकरीत असताना मी लेख लिहिले होते. गोष्टी लिहिल्या होत्या. संपादकीय स्फुटे लिहिली होती. कविता लिहिल्या होत्या. नाटके-सिनेमाची परीक्षणे लिहिली होती. कविता लिहिल्या होत्या. भविष्य लिहिले होते. फार काय, बातमीपत्रेही लिहिली होती. ‘शब्दरंजन’ आणि ‘कालनिर्णय’ या दोहोंच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’चा जाहिरातदारही होतो आणि आहे. काही काळ दादरच्या काही भागांत विक्रीचा व्यवहारही सांभाळत होतो. इतक्या विविध मार्गानी ‘लोकसत्ता’शी संबंध सातत्याने येत होता. २६ जुलै २००१ या दिवशी ‘लोकसत्ता’शी असलेल्या या ऋणानुबंधांना ५० वर्षे पुरी होत होती. या दिवशी मुंबईच्या प्रीतम हॉटेलच्या हॉलमध्ये ‘लोकसत्ता’चे सर्व उच्चाधिकारी, मी आणि माझे काही सहकारी असे स्नेहभोजन झाले. ‘लोकसत्ता’शी संबंधित असलेले त्या संस्थेचे संचालक, संपादकांपासून ते अगदी उपसंपादकांपर्यंत अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘लोकसत्ता’ने मला एक गणपतीची मोठी पितळेची मूर्ती दिली, माझे कौतुक केले. एका वृत्तपत्राबरोबर एवढी प्रदीर्घ वाटचाल मी निष्ठेने केली आणि तिथल्या लोकांनीही मला प्रेमाच्या, आपुलकीच्या भावनेने सांभाळून घेतले. हे म्हटले तर आयुष्यातील मोठेच यश आहे…(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
पुऱ्या ५० वर्षांचा काळ म्हणजे अर्धे शतक झाले. एवढय़ा काळात दोन-तीन पिढय़ा होऊन जातात. इतका प्रदीर्घ काळ एका संस्थेशी विविधांगांनी संबंध येणे आणि तो टिकणे, ही गोष्ट भाग्याची म्हटली पाहिजे. ‘लोकसत्ता’चे आत्तापर्यंत सात संपादक झाले. त्र्यं. वि. पर्वते, पेंडसे, ह. रा. महाजनी, र. ना. लाटे, विद्याधर गोखले, माधव गडकरी आणि अरूण टिकेकर. माझा ‘लोकसत्ता’शी संबंध येण्यापूर्वी पर्वते आणि पेंडसे हे संपादक-पदावरून बाजूला झाले होते. महाजनींपासून सर्व संपादकांशी माझे संबंध चांगले राहिले. या सर्वानी मला खूपच प्रेमाने आणि मानाने वागविले. त्यांचे ऋण विसरता येणार नाही.
‘लोकसत्ता’चे संपादक डॉ. अरूण टिकेकर यांनी परमार्थ, अध्यात्म, सद्विचार अशा विषयांत काही लिखाण दैनिक स्वरूपात करण्याची सूचना मला केली आणि ‘देवाचिये द्वारी’ हे सदर ‘लोकसत्ता’त १९९२ च्या प्रारंभापासून १९९६ च्या अखेपर्यंत सलग पाच वर्षे चालू राहिले.
पूर्वीपासून संबंधित असलेल्या लोकांपैकी एकेक काळाच्या पडद्याआड जात आहेत. वृत्तपत्र हे लोकाभिमुख असते. तो व्यवसाय तर आहेच; आणि व्यवसाय म्हटला की व्यवहार आलाच. पण व्यवसाय करीत असताना काही स्नेहबंधने जपणे हे महत्त्वाचे असते. तीच खरी शिदोरी असते. आणि या गोष्टींशी संचालक वा मालक यापैकी कोणाचाही संबंध राहत नाही. दैनिक व्यवहार जी माणसे सांभाळतात तेच असे ऋणानुबंध जपत असतात. ‘लोकसत्ता’ला अशी एक परंपरा लाभली. त्या परंपरेत मला सहभागी होता आले, हे सर्व जवळून पाहता आले, हेच मोठे समाधान आहे. ५० वर्षांचा हा प्रदीर्घ कालखंड म्हणूनच समाधानाबरोबर एक अभिमानाची भावनाही मनात निर्माण करतो.
‘लोकसत्ता’शी जडले नाते..
२६ जुलै १९५१ या दिवशी मी ‘लोकसत्ता’च्या चाकरीत रुजू झालो. त्यावेळी ‘लोकसत्ता’शी जे ऋणानुबंध जुळले ते आजतागायत कायम आहेत. ‘लोकसत्ता’त मला सामावून घेण्यापूर्वी माझी चाचणी परीक्षा
आणखी वाचा
First published on: 25-08-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant salgaonkar relationship with loksatta