नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com
१८८० साली ‘संगीत शाकुंतल’चा प्रथम प्रयोग सादर झाला आणि मराठी क्षितिजावर ‘नाटय़संगीत’ या लोकप्रिय प्रकाराचा उदय झाला. सुरुवातीच्या काळात कीर्तनी परंपरेला साजेसे संगीत आणि ठराविक साक्या व दिंडय़ा यांच्या चालींचा वापर करून नाटय़संगीत या प्रकाराला आकार देण्यात आला. त्यानंतर विसाव्या शतकाच्या आरंभाला पं. भास्करबुवा बखले, पं. गोविंदराव टेंबे आणि पं. रामकृष्णबुवा वझे यांच्यासारख्या तपस्वी संगीतकारांनी उत्तर हिंदुस्थानी अभिजात शास्त्रीय संगीताचा वापर नाटकांमधील पदांना चाली देण्याकरता सुरू केला. त्यानंतर बरीच वर्षे याच प्रकारचे संगीत रूढ होते आणि त्याला लोकाश्रय व लोकप्रियताही मिळत होती. मागील एका लेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, ज्योत्स्नाबाई भोळे आणि मो. ग. रांगणेकरांच्या नाटकांमध्ये पहिल्यांदाच नाटकातील पदांना भावगीताचे वळण देण्यात आले आणि आणि तो प्रकारसुद्धा रसिकांनी उचलून धरला. परंतु तरीसुद्धा नाटय़संगीतात कालांतराने एक तोच तोचपणा येत गेला आणि त्याच्यात म्हणावी तशी सुखद स्थित्यंतरे येईनात. त्याच त्याच पदांना त्याच त्याच पद्धतीने म्हणण्याची एक रीतच ठरून गेली.
या सगळ्या मरगळलेल्या अवस्थेला १९६०-७० च्या दशकांत दोन वेगवेगळ्या प्रकारांनी छेद दिला गेला. त्यातील एक प्रकारचे संगीत हे पूर्णपणे प्रायोगिक नाटकांना दिलेलं संगीत होतं आणि तशा अर्थी ते पारंपरिक नाटय़संगीत नव्हे. परंतु पारंपरिक नाटय़संगीताचा बाज तसाच ठेवून आणि भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा वापर करूनसुद्धा त्याच्यातला जुनाटपणा पूर्णपणे पुसून टाकून एका अत्यंत चैतन्यदायी संगीताची निर्मिती याच काळात झाली व खऱ्या अर्थाने मराठी नाटय़संगीताला नवसंजीवनी मिळाली. ‘सं. मत्स्यगंधा’ या वसंत कानेटकरलिखित नाटकाच्या संगीताच्या निमित्ताने ही जादू घडली होती. आणि हा किमयागार होता.. जितेंद्र अभिषेकी नावाचा तरुण संगीतकार!
अभिषेकीबुवांचं शिक्षण आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित, अझमत हुसेन खांसाहेब आणि जयपूर घराण्याचे गुल्लुभाई जसदनवाला यांच्याकडे झालं. परंतु त्यांनी संगीत दिलेली गाणी ऐकली की त्यांच्यातला संगीतकार घरात चालत आलेल्या कीर्तनी परंपरेतून जन्माला आलेला आहे हेच स्पष्टपणे जाणवतं. म्हणजे आग्रा घराण्याची उच्च प्रतीची तालीम त्यांना मिळाली होतीच यात शंका नाही; परंतु मराठी रसिकांना आवडणाऱ्या अत्यंत सुमधुर.. त्यातही एक खास अभिषेकी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रवाही चाली या केवळ त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या साधनेतून निर्माण झाल्या आहेत असे निश्चितच नाही. गोव्यातील पाश्चात्त्य संगीताचा प्रभावही त्यांच्या जडणघडणीवर झाला असणार यात काहीच शंका नाही. आणि एकूणच अभिषेकीबुवांना कुठलंही संगीत निषिद्ध असं नव्हतंच. त्यांनी मुख्यत्वेकरून शास्त्रीय संगीतावर आधारित अशाच रचना केल्या असल्या तरीही त्यातील ‘भावगीत तत्त्व’ त्यांनी पूर्णपणे जपलं. पाश्चात्त्य संगीताचासुद्धा अभिषेकीबुवांचा अभ्यास होता असं निश्चितपणे म्हणायला वाव आहे. आपली भारतीय शास्त्रीय संगीताची पाश्र्वभूमी सोडून त्यांनी ‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाकरता ज्या संगीतरचना केल्या त्या केवळ अद्वितीय अशा आहेत. ‘किती गोड गोड बाई जसे कमळ उमलले’ या गाण्यामध्ये Waltz चा वापर ज्या पद्धतीने केला गेला, किंवा ‘या गोजिरवाण्या घरात’ या गाण्यामध्ये जो पाश्चात्त्य ढंगाचा ठेका आणि सुरावटी वापरल्या गेल्या, ते केवळ अफाट आहे. आजच्या काळामध्ये या प्रकारचं माध्यमांतर आपण बऱ्याचदा ऐकतो. काळानुरूप ही लवचिकता आपण आपल्या अंगी बाणवली आहे. शास्त्रीय संगीतातील बरेच गायक आणि गायिका वेगवेगळ्या पाश्चात्त्य ढंगाच्या रचना विविध Bands मध्ये हे गाताना आपल्याला दिसतात. परंतु तो काळ त्यामानाने कर्मठ होता. आणि अभिषेकीबुवांसारख्या शास्त्रीय संगीतात घट्ट पाय रोवलेल्या माणसाने या प्रकारच्या संगीताला आपलंसं करत अशा रचना करणं हे खूप धाडसाचं होतं. आणि बुवांनी ते सहजपणे पेललं असंच म्हणावं लागेल.
एक संगीतकार म्हणून आपल्या पहिल्याच नाटकात अभिषेकीबुवांनी अत्यंत स्तिमित करणारी कामगिरी केलेली आपल्याला दिसते. ‘सं. मत्स्यगंधा’मध्ये रामदास कामत आणि आशालता वाबगांवकर यांच्याकरता त्यांनी चाली केल्या. त्यात भटियार रागातील ‘अर्थशून्य भासे मजला’ किंवा ‘गर्द सभोती रान साजणी’ ही आशालताबाईंनी गायलेली दोन अप्रतिम गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. आशालताबाई या गाणं शिकलेल्या होत्या आणि उत्तम सुरेल गात असत; परंतु त्या कसलेल्या बैठकीच्या गायिका नव्हत्या. त्यांच्याकरता संगीतरचना करताना अभिषेकीबुवांनी त्यामानाने गायला सोप्या अशा रचना केल्या. ‘तव भास अंतरा झाला’ ही अप्रतिम बैठकीच्या लावणीच्या धाटणीची रचनासुद्धा या नाटकात आपल्याला ऐकायला मिळते. परंतु खऱ्या अर्थाने अभिषेकीबुवांचा सुवर्णस्पर्श लाभलेली दोन गाणी म्हणजे ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ आणि ‘गुंतता हृदय हे..’! रामदास कामत हे अत्यंत पट्टीचे गायक. अतिशय भरीव आवाज त्यांना लाभला होता. त्यांच्या आवाजात ‘गुंतता हृदय हे’ हे गाणे ऐकताना त्यातील बारकावे फार सुंदर पद्धतीने आपल्यासमोर उलगडले जातात. म्हटलं तर खमाज रागावर आधारित हे भावप्रधान गाणं; परंतु त्यात अभिषेकीबुवांनी इतक्या बारीक बारीक मनोहारी खोडय़ा काढल्या आहेत की आपलं मन आनंदाने भरून जातं. यातील पहिल्या अंतऱ्याची चाल ही तसं बघायला गेलं तर ध्रुवपदासारखीच आहे. फक्त ‘संगम दो सरितांचा’ या ओळीला कोमल निषादाऐवजी शुद्ध निषाद घेऊन अभिषेकीबुवांनी जो परिणाम साधला आहे तो अत्यंत अभ्यास करण्याजोगा आहे. आणि त्याही पुढे जाऊन अंतऱ्याच्या ‘अद्वैत आपुले’ या ओळीवर जो शुद्ध धैवत येतो तो इतका विलोभनीय आहे, की आपल्या तोंडातून दाद गेल्याशिवाय राहूच शकत नाही. दुसऱ्या अंतऱ्यामध्ये ‘दुर्दैवे आपण दुरावलो या देही’ या ओळीत ‘आपण’ या शब्दावर आलेली हरकत ही मास्टर दीनानाथ यांची आठवण करून देते. तसेच ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ या पदामध्ये बघा! म्हटलं तर हा यमन आहे. परंतु काही काही ठिकाणी हा यमनसुद्धा आपण याआधी कधी ऐकलेला नाही असं वाटून जातं. तीव्र मध्यमावर येणारी सम ही जितकी आकर्षक, तितकेच ‘विचित्र नेमानेम’ या ओळीत धैवतावर येणारी चाल इतकी विस्मयचकित करणारी आहे, की तिथे अभिषेकीबुवांचं वेगळेपण जाणवतं. हा आपण याआधी मैफिलीमध्ये किंवा सिनेसंगीतात अथवा भावगीतांमध्ये ऐकलेला यमन वाटत नाही. त्याला एक अभिषेकी व्यक्तिमत्त्व प्राप्त झालेलं असतं.
‘सं. मत्स्यगंधा’नंतर अभिषेकीबुवांचं एक अत्यंत महत्त्वाचं नाटक म्हणजे ‘हे बंध रेशमाचे’! यातसुद्धा अभिषेकीबुवांनी एकाहून एक सरस अशा रचना केल्या आहेत. ‘काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी’ हे शांताबाईंनी लिहिलेलं अप्रतिम लोकप्रिय भावगीत, ‘का धरिला परदेश सजणा’ ही मारुबिहागमधील ठुमरी आणि ‘विकल मन आज’ हे बकुळ पंडित यांनी गायलेले अप्रतिम पद या नाटकात आहेच; परंतु ‘संगीतरस सुरस मम जीवनाधार’ ही बिहागडामधील रचना हा अभिषेकीबुवांचा खरोखरच एक मास्टरपीस आहे. ‘हे बंध रेशमाचे’प्रमाणेच ‘धाडिला राम तिने का वनी’ आणि ‘गोरा कुंभार’ या नाटकांकरतासुद्धा अभिषेकीबुवांनी संगीत दिले आणि तिथेही नियम तोच! भारतीय शास्त्रीय संगीताचं अभिजातपण कुठेही हरवू न देता आणि तरीही त्यात वेगवेगळे प्रयोग करत अत्यंत आव्हानात्मक अशा चाली करणं, हे तत्त्व अभिषेकीबुवांनी शेवटपर्यंत जपलं. ‘अवमानिता मी झाले’ या अप्रतिम नाटय़पदाकरता बुवांनी टप्प्याचा वापर केला. टप्पा हा उपशास्त्रीय प्रकार नाटय़पदांमध्ये याआधी फारसा वापरला गेला नव्हता. मला आठवते त्याप्रमाणे ‘पुष्पपराग सुगंधित’ या पदात असा वापर झालेला आहे. ‘घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला’ या पदात मिश्र पहाडीचा अतिशय सुंदर, पण पूर्णपणे मराठी वाटेल असा प्रयोग त्यांनी केला.
‘मीरा मधुरा’ या नाटकातील ‘अशी सखी सहचरी’ आणि ‘आनंद सुधा बरसे’ ही दोन गाणीही खास अभिषेकी पद्धतीची आहेत! संपूर्ण मालकंस आणि नंदसारखे राग अभिषेकीबुवांनी या गाण्यात वापरले. एकूणच बुवांची नाटय़पदे ऐकली की आपल्याला लक्षात येतं, की कधीही न वापरले गेलेले बरेच राग त्यांनी आपल्या रचनांमध्ये भरपूर वापरले. देवता भैरव, नंद, संपूर्ण मालकंस, सालगवराळी, सूर्यकंस आणि सरस्वती यांसारखे राग मराठी नाटय़संगीत या प्रांतात फारसे रुळले नव्हते, ते बुवांनी आपल्या रचनांमध्ये गुंफले. ‘ययाती आणि देवयानी’ हेही बुवांचं एक अत्यंत महत्त्वाचं नाटक. यातसुद्धा ‘प्रेम वरदान’ या पदाकरता गावती आणि ‘हे सुरांनो चंद्र व्हा..’करता चारूकेशी असे चाकोरीबाहेरचे राग त्यांनी योजले. त्यांच्या रचना वेगळ्या वाटतात याचं हे पण एक महत्त्वाचं कारण आहे.
परंतु या सगळ्याहून अतिशय उत्तुंग आणि अतिशय समृद्ध असं एक संगीतशिल्प अभिषेकीबुवांकडून घडायचं होतं आणि आणि ते घडलं ‘कटय़ार काळजात घुसली’च्या निमित्ताने! पं. वसंतराव देशपांडे, बकुळ पंडित, भार्गवराममामा आचरेकर, प्रसाद सावकार यांच्यासारखे अत्यंत तयारीचे गायक-नट.. आणि नाटकाचा विषयसुद्धा संगीताशी संबंधित! संगीतातल्या दोन घराण्यांतील ईष्र्या, स्पर्धा आणि हेवेदावे यावर आधारित कथानक असल्यामुळे संगीतकाराला त्यात प्रचंड वाव होता. आणि आजवर कधीही झाली नाही अशी अजोड कामगिरी अभिषेकीबुवांनी या नाटकाच्या निमित्ताने केली. ‘कटय़ार’चे संगीत हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. या लेखात फार विस्तृतपणे तो मांडता येणार नाही. परंतु ‘घेई छंद मकरंद’ या पदाकरता वापरलेल्या दोन अत्यंत भिन्न प्रकृतीच्या स्वररचना, ‘तेजोनिधी लोहगोल’मध्ये येणारा ललित पंचम, ‘सुरत पिया’सारखी एक चमत्कृतीपूर्ण आणि विस्मयकारक रागमाला आणि तालमाला, ‘मुरलीधर शाम’मध्ये येणारा पूरियाकल्याण आणि ‘दिन गेले भजनाविण सारे’सारखी अत्यंत प्रासादिक रचना हे सगळंच स्वप्नवत आहे. आणि त्याचे वर्णन करायला शब्दच सापडत नाहीत. ‘कटय़ार’चे संगीत करायला अभिषेकीबुवाच हवे होते. आणि आपल्या साऱ्यांच्या नशिबाने तेच या नाटकाला संगीतकार म्हणून लाभले, हे महत्त्वाचं.
नाटय़संगीत सोडून शास्त्रीय संगीत, भावसंगीत आणि भक्तीसंगीत या प्रांतातसुद्धा बुवांनी अत्यंत वैशिष्टय़पूर्ण कामगिरी केली. त्याचा आढावा या लेखात घेणं केवळ अशक्य आहे. बुवांनी आपल्यासारख्या रसिकांवर अनंत उपकार केलेत. त्याची गणनाच होऊ शकत नाही.
मला आठवतो ७ नोव्हेंबर १९९८ हा दिवस. बुवा गेले त्या दिवशी पुण्यात भरत नाटय़मंदिरात नाटय़संगीताचा एक कार्यक्रम होता. बरेच मोठे गायक त्यात होते. मी पेटीवादक या भूमिकेत थोडासा सहभागी होतो. बुवांचे सुपुत्र शौनक अभिषेकीही या कार्यक्रमात सहभागी होणार होते. परंतु या दुर्दैवी घटनेनंतर ते या कार्यक्रमात गाऊ शकले नाहीत. परंतु कार्यक्रमाच्या शेवटाकडे जेव्हा भैरवी घेण्याची वेळ आली तेव्हा अचानक शौनकजी रंगमंदिरात आले आणि त्यांनी ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ हे पद म्हटलं. सभागृह डोळ्यांत पाणी आणि कानात प्राण आणून ते पद ऐकत होतं. आपण आज काय गमावलं आहे याची अत्यंत दु:खदायक जाणीव प्रत्येकाला झाली होती आणि अवघा महाराष्ट्र त्या दिवशी हळहळला होता. काही केल्या तो प्रसंग नजरेसमोरून जात नाही. असं प्रेम लाभणं हे प्रत्येक कलाकाराच्या नशिबात नसतं. अभिषेकीबुवांसारख्या उत्तुंग आणि तपस्वी कलाकारालाच ते मिळू शकतं. आपल्या रचनांनी बुवांनी नुसतं रसिकांना सुख दिलं नाही, तर अत्यंत समृद्ध केलं आणि एका सांगीतिक श्रीमंतीचा अनुभव दिला. त्याची परतफेड करणं हे कुणालाही शक्य नाही.. कधीच नाही..