मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com
चार वर्षांपूर्वी जूनमधल्या एक दमट घामेजल्या दिवशी मी देवेश कुमारला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या (जेएनयु) ब्रह्मपुत्रा हॉस्टेलच्या बाहेर एकदाचं गाठलंच. हे हॉस्टेल त्यावेळी सतत येणाऱ्या बातम्यांमुळे प्रकाशझोतात आलं होतं. (देवेश कुमार- मित्रमंडळींसाठी ‘डीके’- हा जेएनयुमध्ये पीएच. डी. करत असून, एका महत्त्वाच्या भारतीय विद्यार्थी संघटनेचा अतिशय हाय प्रोफाइल नेता आहे.) डीकेने ‘आझादी’ असं म्हणायच्या अगोदरच मी त्याला म्हटलं, ‘‘माझं नाव लाडलीमोहन सिन्हा आहे आणि मी ‘इझ्प्रादा’ या रशियन वर्तमानपत्राचा दिल्लीतला प्रतिनिधी आहे. आमच्या वर्तमानपत्राच्या रशियन वाचकांसाठी मला तुमची मुलाखत हवी आहे.’’ माझ्या या इन्ट्रोचा मला हवा तो परिणाम झाला आणि मी ‘इन्किलाब’ म्हणायच्या आधीच डीके म्हणाला, ‘‘ठीक आहे.. अध्र्या तासानंतर आपण जेएनयुच्या कॅन्टीनमध्ये भेटू या.’’
‘अत्यंत वैयक्तिक स्वरूपाच्या आणि कोर्टात न्यायप्रविष्ट असलेल्या गोष्टींबद्दलच्या कोणत्याही प्रश्नांना मी उत्तरं देणार नाही..’ असं डीकेने स्पष्ट केलं. मी त्याला जरा नाखुशीनेच होकार दिला. आमची मुलाखत- जी मी खाली जवळजवळ शब्दश: देत आहे- जराशी भरकटली. तरीपण मला वाटतं तशी ती रोचकही झाली.
डीके : माझ्याकडे फक्त पंधरा मिनिटं वेळ आहे. तेव्हा लाडलीमोहनजी, काय विचारायचं ते लवकर विचारा.
मी : ठीक आहे. भारतातल्या सगळ्या इंग्लिश टीव्ही चॅनल्सना तुम्ही हिंदी भाषेतच का मुलाखत देता?
डीके : भविष्यातही माझं हेच धोरण असणार आहे. आणि त्याचं कारण सांगतो तुम्हाला.. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. (वाचकांसाठी : भारतातील हिंदीभाषिकांची संख्या जरी सुमारे ४५% असली तरी हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही, तर ती आपल्या अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे.) तसं मी इंग्रजी अगदी सफाईने बोलू शकतो. अगदी शशी थरूरजींइतकं नाही, पण आमचे बिहारी बाबू पवनकुमार वर्माइतकं तर नक्कीच. शिवाय थोडीफार रशियन भाषादेखील मला येते. पण मी इंग्रजी जाणीवपूर्वक वापरत नाही. याचं कारण म्हणजे साम्राज्यवादी इंग्रजांचा हा वारसा टाळावा असं मला वाटतं.
मी : पण दक्षिण भारतातल्या बहुतांश लोकांना हिंदी कळत नाही त्याचं काय?
डीके : कोण म्हणतं त्यांना हिंदी कळत नाही? दक्षिण भारतातल्या बहुतांश लोकांना हिंदी कळते, हे आमच्या बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीने केव्हाच सिद्ध केलंय. आणि तुमच्या एक लक्षात आलं असेलच, की मी आपले पंतप्रधान मोदीजी वापरतात तशी आर. एस. एस. ब्रॅन्डची ब्राह्मणी हिंदी वापरत नाही, तर मी हिंदुस्थानी बोलीभाषा वापरतो. जर त्यांना अमिताभ बच्चन काय बोलतात हे कळत असेल तर देवेश कुमार काय बोलतो ते निश्चितच कळेल.
मी : ज्या जागतिक आणि भारतीय नेत्यांचा उल्लेख तुम्ही नेहमी तुमच्या भाषणात करता त्यात गांधीजींचा उल्लेख फारच क्वचित असतो. असं का?
डीके : माझ्या विचारसरणीच्या सर्व लोकांसाठी गांधीजी हे एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. आणि समाजात आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर गांधीजींचा मार्गच वापरला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. पण काय आहे माहीत आहे का, या पद्धती पर्यायी औषध (alternative medicine) व्यवस्थेसारख्या आहेत. म्हणजे त्यांचे फायदे दीर्घकाळाने दिसून येतात. आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत जे. एम. कीन्स यांनी म्हटल्याप्रमाणे- ‘‘In the long-run, We will all be dead.’’ आज आपल्या देशाची अवस्था अतिदक्षता विभागातील उपचारच ज्याला वाचवू शकतील अशा रुग्णासारखी झालेली आहे. (वाचकांसाठी.. भारतीय कम्युनिस्टांनी गांधीजींवर नेहमीच कठोर टीका केलेली आहे. त्यांना ‘भांडवलदारांचे एजंट’ असंदेखील म्हटलं आहे.)
मी : शिवाय तुम्ही धर्माचा उल्लेखदेखील टाळता. सध्या उदोउदो करायला बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तुम्ही नव्यानं शोधली आहे. आपल्या अनुयायांसह ज्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला त्या बौद्ध धर्माबद्दलही तुम्ही काही बोलत नाही..
डीके : हो, मला माहिती आहे. पण आमचा मसिहा कार्ल मार्क्स याने म्हटलंच आहे की, धर्म ही अफूची गोळी आहे. स्वाभाविकच आमची प्रतिमा ‘drug peddlers’ (ड्रग्स विकणारे) अशी चुकूनदेखील होऊ नये याची खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. आणि खरं सांगायचं तर सगळ्या पुरोगामी आणि सुज्ञ भारतीय नागरिकांप्रमाणे आम्हीदेखील एकच धर्म मानतो, तो म्हणजे.. भारतीय संविधानाचा धर्म!
मी : हे फारच रोचक आहे! पण मला एक सांगा.. लेनिन, गांधी आणि आंबेडकर या तीन परस्परविरोधी विचारधारांचा समन्वय तुम्ही कसा साधता? कारण स्टॅलिनसारख्या हुकूमशहामुळे लेनिन-स्टॅलिन यांची कारकीर्द ‘रेड टेरर’ (लाल दहशत) म्हणून ओळखली जाते. गांधीजी तर जवळजवळ विस्मृतीतच गेले आहेत आणि स्वतंत्र भारत या कठोर वास्तवाला सामोरं जायला अजूनदेखील तयार नाही; आणि व्होट बँक राजकारणासाठी भारतातील सर्व रंगांच्या पक्षनेत्यांनी (नरेंद्र मोदींपासून ते AIMIM च्या असाउद्दीन ओवेसींपर्यंत) आंबेडकरांच्या प्रतिमेचं अपहरण केलं आहे आणि निव्वळ आपल्या राजकीय फायद्यासाठी ते बाबासाहेबांच्या नावाचा वापर करीत आहेत..
डीके : तुमच्या या लांबलचक प्रश्नाचं सोपं आणि समाधानकारक उत्तर यावेळेस तरी माझ्याकडे नाहीये. पण तुम्ही उपस्थित केलेल्या या प्रश्नावर आमच्या जेएनयुमध्ये एक चांगला परिसंवाद होऊ शकेल. पण हे मात्र खरंय की.. तुम्ही उल्लेख केलेले हे तिन्ही नेते आमच्या पक्षाच्या सदस्यांना- विशेषकरून तरुणांना- नेहमीच स्फूर्ती देत आले आहेत. याचे कारण म्हणजे हे तिन्ही नेते आपापल्या पद्धतीने एक प्रकारे क्रांतिकारकच होते. त्यांनी सामाजिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध लढा दिला. समाजातल्या तळागाळातील आणि वंचित लोकांच्या उद्धारासाठी काम केलं.
मी : काही वर्षांपूर्वी फ्रेंच कम्युनिस्ट पार्टीने विळा-कोयता या पक्षाच्या बोधचिन्हाला सोडचिठ्ठी दिली. नव्या जमान्यातील कम्युनिस्टांच्या दृष्टीने ते आता प्रस्तुत नाही असं त्यांना कदाचित वाटत असावं. भारतातील तुमच्या पार्टीची असं काही करण्याची योजना आहे का?
डीके : असल्या फालतू प्रश्नाला मी उत्तर देऊ इच्छित नाही.
मी : मग आता एक तुम्हाला विचार करायला लावणारा प्रश्न.. स्फूर्तीसाठी तुम्ही लोक नेहमीच भारताबाहेरच्या व्यक्ती डोळ्यासमोर ठेवत आला आहात. अपवाद फक्त भगतसिंग यांचा. आता उदाहरण द्यायचं झालंच तर मी शिवाजी महाराजांचं देईन. महाराज खऱ्या अर्थाने मास लीडर असून जनतेचे राजे होते. त्यांनी वतनदारी प्रथा बंद करून गोरगरीब जनतेच्या हिताची महसूल व्यवस्था लागू केली होती. तरीदेखील तुम्ही लोक त्यांना स्फूर्तिदेवता मानत नाही.
डीके : या गोष्टीचे तुमच्याकडे काही वैध ऐतिहासिक पुरावे आहेत का?
मी : आहेत ना.. आणि ते तुमच्या पार्टीच्याच दोन ख्यातनाम नेत्यांनी दिले आहेत. एक म्हणजे कॉम्रेड एस. ए. डांगे आणि दुसरे म्हणजे ज्यांची २०१५ साली निर्घृण हत्या झाली ते कॉम्रेड गोविंद पानसरे. पानसरे यांनी तर ‘शिवाजी कोण होता?’ हे बेस्ट सेलर पुस्तकच लिहिलं असून, त्याची अर्धा डझन भाषांतून भाषांतरंदेखील झाली आहेत.
डीके : पॉइंट नोटेड.
मी : माझी वेळ संपत आलीये म्हणून हा शेवटचा प्रश्न.. इझ्प्रादाच्या रशियन आणि भारतीय वाचकांना आपण काय संदेश द्याल?
डीके : नक्कीच देतो. पण तुम्ही त्याचे संदर्भ नीट देणार असाल तर! संदेश हा असा : १९२१ साली उर्दू कवी बिस्मिल अशिमाबादी यांनी लिहिलेल्या आणि महान स्वातंत्र्यसैनिक पंडित रामप्रसाद बिस्मिल यांनी अमर केलेल्या पुढील दोन ओळी संदेश म्हणून देता येतील. ही कविता आम्हा कम्युनिस्टांना अतिशय प्रिय आहे. कारण तिने भगतसिंग यांच्यासकट अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली आहे. त्या ओळी अशा..
‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।
देखना है जोर कितना बाजू-ए-कातील में है॥’
(‘हृदयात पडली आहे आमच्या संघर्षांची एक ठिणगी
बघू या आता बाहुत बळ किती आहे शत्रूच्या’)
मी : रशियाचे तर मला माहीत नाही, पण भारतात आज तुमचा शत्रू कोण आहे?
डीके : शेरलॉक होम्स म्हणतो तसं ‘Elementary my dear watson.’ (इथे डीकेने अत्यंत सावधान पवित्रा घेतला. कारण चारच महिन्यांपूर्वी त्यांच्या एका ज्येष्ठ जेएनयु कॉम्रेडला सत्तारूढ पक्षावर प्रखर टीका केल्याबद्दल जेलची हवा खावी लागली होती.)
मी : ठीक आहे. मग मी ‘दस्विदानिया’ म्हणतो.
डीके : वा! क्या बात है, चाचा! तुम्हाला रशियन येतं का?
मी : नाही. पण ‘दस्विदानिया’ हा रशियन शब्द मी प्रथम कुठे आणि केव्हा ऐकला याची एक छोटीशी कथा आहे, ती तुम्हाला ऐकवतो. भारत आणि सोव्हिएत रशिया या दोघांनी मिळून १९५७ साली ‘परदेसी’ हा चित्रपट बनवला होता. त्यात बलराज सहानी (चित्रपटाचा नायक) यांनी आपल्या अफनासी निक्तीन या रशियन मित्राला निरोप देताना एक गाणं म्हटलं आहे. हा मित्र दीर्घकाळ भारतात (त्यावेळच्या महाराष्ट्रात) वास्तव्य करून आपल्या मातृभूमीला परत जातो असतो तेव्हा हे भावपूर्ण गाणं म्हटलं आहे. त्या गाण्याचा मुखडा ‘फिर मिलेंगे जाने वाले यार, दस्विदनिया..’ असा आहे. त्यामुळे या शब्दाचा अर्थ अगदी सहज कळतो.
डीके : तुम्ही रशियन का शिकला नाहीत?
मी : आता असं वाटतं की शिकायला हवी होती, म्हणजे टॉलस्टॉय यांची ‘अॅना कॅरेनिना’ मूळ रशियन भाषेतून वाचता आली असती.
डीके : कार्ल मार्क्सचं ‘दास कॅपिटल’ आणि लेनिन यांचं समग्र वाङ्मय वाचावंसं नाही वाटलं का?
मी : खरं सांगू? नाही वाटलं. आणि मार्क्सचं ‘दास कॅपिटल’ जर्मन भाषेत आहे, नाही का? आपण दिलेल्या वेळेबद्दल अनेक धन्यवाद.
जाता जाता तीन विचार.. पहिला म्हणजे जेएनयु हे एक जागतिक दर्जाचं विद्यापीठ आहे असा बऱ्याच भारतीयांचा गोड गैरसमज आहे आणि आजच्या वास्तवात त्याला काहीच आधार नाही. ‘दी सेंटर फॉर दी वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स’ या संस्थेनुसार, २०१८-१९ साली जेएनयुची जागतिक रँक ८८३ असून, भारतातील रँक १५ होती. हे रँकिंग काही कारणांमुळे संपूर्णपणे विश्वासार्ह नाही असं जरी मानलं, तरी हे आकडे काही आनंदाने मिरवावेत असे नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे, जेएनयुमध्ये शिक्षण घेतलेल्यांमध्ये अभिजीत बॅनर्जी- २०१९ सालचे अर्थशास्त्राचे नोबेलविजेते आणि पी. साईनाथ- २०११ सालचे मॅगसेसे पारितोषिकविजेते या दोनच व्यक्तींनी खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. दुसरं म्हणजे १९५७ साली मेहबूब खान यांनी निर्मिलेला ‘मदर इंडिया’ हा गाजलेला चित्रपट अनेकांना आठवत असेल. या छुप्या कम्युनिस्ट निर्माता-दिग्दर्शकाने आपल्या सर्व सिनेमांचं बोधचिन्ह ‘विळा-कोयता’ ठेवलं होतं. आणि यातला उपरोध असा की, त्याच्या सिनेमांची सुरुवात- ‘मुद्दईन लाख बुरा चाहे तो क्या होता है/ वही होता है जो मंजूर-ए-खुदा होता है/’ या अतिशय प्रारब्धवादी उर्दू शेरानं होत असे. ‘मदर इंडिया’ची भारतातून जेव्हा ऑस्कर स्पर्धेसाठी निवड झाली तेव्हा मेहबूब खान यांनी ऑस्कर अकादमीला पाठवलेल्या चित्रपटाच्या प्रिंटमधील विळा-कोयता हे बोधचिन्ह गुपचूपपणे काढून टाकलं होतं. (या चित्रपटाची ‘सवरेत्कृष्ट विदेशी चित्रपट’ या विभागातील पाच चित्रपटांमध्ये निवड झाली होती.) आणि आता तिसरं म्हणजे माझा मित्र सोपानने या लेखाच्या बाबतीत निर्भीडपणे व्यक्त केलेलं त्याचं मत : ‘‘मित्रा, मला तुझा हा देवेश कुमार अजिबात आवडला नाहीये.’’
शब्दांकन : आनंद थत्ते