भानू काळे
साने गुरुजींनी मूल्यात्मक समाजप्रबोधनाचे व्रत डोळ्यांसमोर ठेवून एका समर्पित ध्येयवादाने स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाने नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. ‘साधना’च्या या पंचाहत्तरीतील पदार्पणानिमित्ताने एक सिंहावलोकन..
१५ ऑगस्ट १९४७ हा भारताप्रमाणे जगाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा दिवस आहे. कारण त्या दिवशी केवळ भारत नव्हे, तर एक-षष्टांश मानवता स्वतंत्र झाली. स्वातंत्र्यलढय़ात अनेक ध्येयवादी तरुण सहभागी झाले होते आणि त्या साऱ्यांच्या मनात त्या दिवशी ‘शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट’ हीच भावना होती. त्या पहाटेचा लालिमा क्षितिजावर रेंगाळत होता. त्याच ध्येयभारल्या काळात ‘साधना’ साप्ताहिकाचा जन्म झाला. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच साने गुरुजींनी स्थापन केलेले ‘साधना’ही अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे.
‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या आपल्या ग्रंथात रा. के. लेले यांनी म्हटल्याप्रमाणे, स्वातंत्र्यपूर्व काळातही साने गुरुजींनी खानदेशातून काही काळ ‘कॉंग्रेस’ नावाचे वृत्तपत्र चालवले होते. ते अल्पकाळच टिकले. पुढे गांधीहत्येनंतर गुरुजींनी केलेल्या २१ दिवसांच्या उपोषणाच्या काळात त्यांनी १० फेब्रुवारी १९४८ पासून ‘कर्तव्य’ नावाचे सायंदैनिक मुंबईत सुरू केले होते. पण तेही जेमतेम चार महिने चालले. त्यानंतर ‘साधना’ साप्ताहिकाचा छापखाना व प्रत्यक्ष पत्र मुंबईत उभे राहू शकले ते साने गुरुजी सत्कार निधीच्या रूपाने जो पैसा उभा करण्यात आला होता त्याच्या जोरावर. त्यांच्याच संपादकत्वाखाली १५ ऑगस्ट १९४८ रोजी ‘साधना’चा पहिला अंक प्रकाशित झाला. दुर्दैवाने त्यानंतर लवकरच- ११ जून १९५० रोजी गुरुजींनी आपली जीवनयात्रा संपवली. आपल्या अखेरच्या पत्रात त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आचार्य जावडेकर आणि रावसाहेब पटवर्धन यांनी ‘साधना’च्या संपादकपदाची धुरा सांभाळली. १९५५ साली जावडेकर निवर्तले आणि सर्व जबाबदारी रावसाहेब पटवर्धनांवर आली. त्यानंतर ‘साधना’ साप्ताहिक पुण्याला आले आणि पटवर्धन यांनी संपादकपद सोडल्यावर यदुनाथ थत्ते संपादक बनले, ते १९८० सालापर्यंत! पुढे ना. ग. गोरे, वसंत बापट, ग. प्र. प्रधान अशा कर्तृत्ववान संपादकांची मालिकाच ‘साधना’ला लाभली.
‘साधने’चा जन्मकाळ हा अनेक ध्येयवादी तरुणांच्या जीवनातला वसंत ऋतू होता. बेचाळीसच्या आंदोलनाची धुंदी कायम होती. समर्पणोत्सुक तरुण मनांना उत्साहाचे नवेनवे धुमारे फुटत होते. वाईमध्ये ऑक्टोबर १९४७ साली स्थापन झालेले ‘नवभारत’ मासिक किंवा मुंबईत ९ नोव्हेंबर १९४७ रोजी स्थापन झालेले ‘विवेक’ साप्ताहिक ही त्याच उत्साहाची उदाहरणे. एकूण समाजही स्वप्नाने भारलेला होता. त्यामुळे त्या कालखंडात इतरही अनेकांचे सहकार्य ‘साधना’ला मिळत गेले.
पण पुढे ही परिस्थिती झपाटय़ाने बदलू लागली. माझा ‘साधना’शी संपर्क येऊ लागला तो साधारण १९९८ साली- म्हणजे डॉ. नरेन्द्र दाभोलकर संपादक झाल्यानंतर. ‘अंतर्नाद’चे आणि ‘साधना’चे बरेच वर्गणीदार समान होते आणि ‘साधना’मध्ये नियमित लिहिणारे दत्तप्रसाद दाभोलकर, ज्ञानेश्वर मुळे, दत्ता दामोदर नायक, विनय हर्डीकर, सुरेश द्वादशीवार वगैरे लेखक ‘अंतर्नाद’चेही लेखक होते. त्यांच्याशी बोलताना कधी कधी ‘साधना’चा विषय निघायचा. त्यावेळी ‘साधना’ची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. ते बदलत्या काळाशी जुळवून घेऊ शकले नव्हते. साने गुरुजींची ‘धडपडणारी मुले’ धवलकेशी झाली होती. जुने निष्ठावान वर्गणीदार होते, तरी ‘पुढे कसं होणार?’ हा प्रश्न होताच. पण ‘करू नका एवढय़ात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही..’ या सुरेश भटांच्या ओळी प्रिय असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी मोठय़ा शर्थीने बाजू लढवली.
दाभोलकरांनी ‘साधना’त वैचारिक खुलेपणा आणला. विरोधी मतांनाही स्थान दिले. उदाहरणार्थ, चेतन पंडित यांचे पर्यावरणवाद्यांच्या विरोधातले किंवा देवेंद्र गावंडे यांचे नक्षलवाद्यांच्या विरोधातले लेखन आपले काही पारंपरिक वाचक दुखावतील याची कल्पना असूनही ‘साधना’ने आवर्जून छापले. अनेक उत्तम विशेषांक काढले. ते बहुजनांपर्यंत पोहचवले. हीना कौसर खान किंवा राजा शिरगुप्पे अशांना अभ्यासवृत्ती देऊन वेगवेगळ्या विषयांवर लिहिते केले. बाल-कुमार वाचकांसाठी विशेषांक काढायला सुरुवात केली. या सर्व संपादकीय उपक्रमांना त्यांनी उत्तम व्यावसायिकतेचीही जोड दिली. साधना मीडिया सेंटर उभारले. भरीव कॉर्पस (स्थावर निधी) उभारला. त्यातून संस्थेसाठी नियमित उत्पन्नाची सोय केली. दिवाळी अंकासाठी स्वत: फिरून दरवर्षी बऱ्यापैकी जाहिराती मिळवल्या. ‘साधना’चा मरगळलेला पुस्तक प्रकाशन व्यवसाय त्यांनी ‘श्यामची आई’च्या खूप पुढे नेला. नियतकालिकांत लेख छापून येण्यापेक्षा पुस्तक निघणे हे कुठल्याही साहित्यिकाला अधिक प्रिय होते. साप्ताहिकाचे विक्री-आयुष्य (शेल्फ-लाइफ) फार तर दोन-तीन आठवडे असते; पुस्तके मात्र अनेक वर्षे बाजारात खपत राहू शकतात. त्यामुळे ती काढणे केव्हाही अधिक फायद्याचे होते. शिवाय स्वत:चे कार्यालय, विक्री दालन होतेच. सर्वचदृष्टय़ा पुस्तक प्रकाशन वाढवणे किफायती होते.
‘साधना’ची ही सारी वाटचाल एक समव्यावसायिक या नात्याने मी दुरून, पण बारकाईने पाहत होतो. आणि कोणीही कौतुक करावे अशीच ती होती. एकूणच ‘साधना’चे संपादकपद डॉ. दाभोलकरांनी खूप गांभीर्याने निभवले. ‘अनेक कामांपैकी एक काम’ यादृष्टीने त्यांनी त्याकडे कधी पाहिले नाही. त्यांचे मोठे योगदान म्हणजे २००७ पासून युवा संपादक, २०१० पासून कार्यकारी संपादक आणि आता संपादक असलेल्या विनोद शिरसाठ यांच्या रूपाने त्यांनी स्वत:साठी उत्तम तरुण वारसदार तयार केला. ‘नशीब न मानणारा नशीबवान माणूस’ असे स्वत:चे वर्णन करणाऱ्या दाभोलकरांनी ‘साधना’चा कायापालट केला होता असेच म्हणता येईल.
‘साधना’बद्दल लिहिताना दत्त सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा अप्पासाहेब सा. रे. पाटील यांचा उल्लेख टाळता येणार नाही. निधनापूर्वीची काही वर्षे ते ‘साधना’चे कार्यकारी विश्वस्तही होते. जाहिराती व अन्य प्रकारे त्यांचे ‘साधना’ला भरघोस आणि इतर कोणाहीपेक्षा अधिक प्रमाणात आर्थिक साहाय्य होते.
बरोबर दहा वर्षांपूर्वी- म्हणजे १३ ऑगस्ट २०१२ रोजी ‘साधना’ साप्ताहिकाने पासष्टाव्या वर्षांत पदार्पण केले तेव्हा डॉ. दाभोलकरांनी ‘मराठी नियतकालिके : आव्हाने व संधी’ या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यात ‘अंतर्नाद’, ‘अनुभव’ व ‘माहेर’च्या संपादकांनी व ‘साधना’चे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांनी भाषणे केली होती. ती चारही भाषणे ‘साधना’च्या १ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. ‘साधने’तील वृत्तांतानुसार, परिसंवादाच्या पूर्वतयारीसाठी दाभोलकर, रा. ग. जाधव आणि शिरसाठ यांची चर्चा चालू असताना जाधवसर म्हणाले होते, ‘फक्त कंटेंटवर चर्चा व्हावी.’ त्यावेळी शिरसाठ म्हणाले, ‘सर, एका मर्यादेनंतर अंकाचा दर्जा हा व्यवस्थापन, वितरण व अर्थकारण यावरच अवलंबून असतो.’ आपल्या भाषणातही शिरसाठ यांनी ते वाक्य दोन वेळा उच्चारले होते आणि पाच वर्षांनंतर ‘साधना’च्या अंकात (१ सप्टेंबर २०१७) संपादक शिरसाठ यांनी ते भाषण पुनर्मुद्रितही केले होते. ‘साधना’मध्ये होऊ शकणाऱ्या भावी बदलांची ती सुखद नांदी होती. या परिसंवादात ‘नियतकालिकाच्या संपादकापुढचे सर्वात मोठे आव्हान स्वत:ला अपडेट करणे हे आहे,’ असेही शिरसाठ म्हणाले होते. ‘स्वत:ला अपडेट करणे’ वैचारिक पातळीवरही व्हावे ही अपेक्षा त्यावेळी माझ्या मनात उमटून गेली होती. उदाहरणार्थ, ‘स्थापण्या समता-शांती’ हे साने गुरुजींनी पहिल्या अंकापासून समोर ठेवलेले ब्रीद होते. या ब्रीदात सामावलेली मूल्ये कायम राहायलाच हवीत, पण त्यांचे प्रकटीकरण असलेले वैचारिक आग्रह काळाच्या ओघात बदलायला हवेत. कारण मागच्या ७५ वर्षांत हे जग खूप बदलले आहे. अनेक पाश्चात्त्य देशांत आज ‘समता आणि शांती’ ही मूल्ये प्रस्थापित झालेली आहेत. ते त्यांना कसे शक्य झाले याचा मोकळ्या मनाने अभ्यास व्हायला हवा.
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेन्द्र दाभोलकरांची दुर्दैवी हत्या झाली. विनोद शिरसाठ संपादक झाले. ‘साधना’ची वाटचाल आज अधिकच दमदारपणे चालू आहे. शिरसाठांनी लेखांमध्ये अधिक वैविध्य आणले आणि पुढे त्यांची चांगली पुस्तकेही काढली. ‘इकेबाना’ हे दत्ता दामोदर नायक यांचे जगातील वेगवेगळ्या देशांतून त्यांनी केलेल्या प्रवासाचे रसाळ आणि शैलीपूर्ण चित्रण करणारे पुस्तक किंवा ‘मुलांसाठी विवेकानंद’ हे दत्तप्रसाद दाभोलकर यांचे ‘आयुष्यात अलौकिक यश कसे मिळवावे’ हे विवेकानंदांच्या शब्दांत सांगणारे पुस्तक ही या वैविध्यपूर्ण प्रकाशनांची चांगली उदाहरणे आहेत. ‘नोकरशाहीचे रंग’ (ज्ञानेश्वर मुळे), ‘झुंडीचे मानसशास्त्र’ (विश्वास पाटील), ‘चार्वाक’ (सुरेश द्वादशीवार), ‘लॉरी बेकर’ (अतुल देऊळगावकर) किंवा ‘चिनी महासत्तेचा उदय’ (सतीश बागल) ही अशीच आणखी काही आशयवैविध्य असलेली पुस्तके. ललित साहित्य प्रकाशित करण्याकडे मात्र ‘साधना’ने थोडे अधिक लक्ष द्यायला हवे असे सुचवावेसे वाटते. एकेकाळी ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही ह. मो. मराठे यांची छोटी, पण वाचकाला खिळवून ठेवणारी आणि जीवाला चटका लावणारी कादंबरी ‘साधना’च्या दिवाळी अंकात वाचल्याचे आठवते. माझ्या आठवणीनुसार शंकर सारडा यांनी त्या अंकाचे संपादन केले होते. अशा साहित्याची अनेक वाचक आजही प्रतीक्षा करत असणार.
शिरसाठांनी युवा पिढीला डोळ्यासमोर ठेवून अनेक डिजिटल प्रकल्प हाती घेतले आहेत. पुस्तकांच्या विक्रीसाठी इंटरनेटचा वापर होत आहे. ‘कर्तव्यसाधना’ पोर्टलवरील मजकूर वाचकाला मोबाइलवर वाचता आणि ऐकताही येतो. मराठीप्रमाणेच त्यावर इंग्रजी मजकूरही असतो. ‘साधना’चे संकेतस्थळ अद्ययावत आहे आणि लवकरच ‘साधना’चे सर्वच जुने अंक अभ्यासकांना त्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. यासाठी आवश्यक ते आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य मिळवण्यात सुदैवाने ‘साधना’ला यश मिळाले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवलेले गोव्यातील एक लेखक आणि यशस्वी उद्योजक दत्ता दामोदर नायक किंवा महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या कंपनीचे प्रणेते व चीफ मेंटॉर विवेक सावंत- जे आता साधना ट्रस्टचे अध्यक्षही आहेत- यांच्या आस्थापनांच्या जाहिराती ‘साधना’त नियमित असतात. साने गुरुजींवर अजूनही श्रद्धा असलेले ‘साधने’चे सर्वदूर पसरलेले हितचिंतक आणि सुरेश माने, मनोहर पाटील यांच्यासारखे सहकारी देत असलेले योगदानही महत्त्वाचे आहे.
अर्थात हा सगळा व्यावहारिक भाग झाला. त्यासाठी आवश्यक ते अर्थबळ आजच्या काळात एक वेळ उभे करता येईलही; पण ज्यासाठी हा सगळा खटाटोप करायचा, त्या सकस साहित्यनिर्मितीपुढच्या आव्हानांना तोंड देणे अधिक अवघड आहे. उदाहरणार्थ, साहित्याला त्याचे समाजातील एकेकाळचे अग्रस्थान परत मिळवून देणे हे मोठेच आव्हान आहे. आज साहित्य अग्रस्थानी उरलेले नाही हे उघड आहे. परिणामत: नियतकालिकांचा प्राणवायू मानता येईल अशा दर्जेदार साहित्याची निर्मितीच खूप मंदावली आहे. मोबाइल व टीव्हीवरून ज्ञान व रंजनाचा महापूर अविरत अंगावर येतो आहे. त्यातून वाचनासाठी वेळ वाचवणे वाचनप्रेमींनाही आज खूप अवघड वाटते. त्यामुळे पुस्तके किंवा नियतकालिके प्रयत्नपूर्वक काढली आणि खपवली तरी प्रत्यक्षात ती ‘वाचली’ जातात का, असा प्रश्न मनात उभा राहतो.
‘कर्दळीच्या कोंभाची लवलव ही तिची मुळे जिथे रुजलेली असतात त्या मातीतल्या ओलाव्याची खूण असते,’ असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. साहित्य किंवा कलेतील चैतन्याची लवलव हीदेखील ज्या समाजातून ते साहित्य किंवा कला निर्माण होते, त्या समाजाच्या मुळाशी असलेल्या सांस्कृतिक ओलाव्यातूनच संक्रमित झालेली असते. ती लवलव आतूनच उमलून आलेली नसेल तर बाहेरून पाणी शिंपडून ती आणणे अवघड आहे. दुर्दैवाने आजच्या समाजात तो ‘मुळीचा झरा’, तो सांस्कृतिक ओलावा आटत चाललेला आहे. तो कसा पुनर्भारित करता येईल हे शताब्दीकडे वाटचाल करतानाचे ‘साधना’पुढचे आणि एकूणच साहित्यसृष्टीपुढचे सर्वात मोठे आव्हान असेल.
bhanukale@gmail.com