सारे ‘थ्रिल’ कशात आहे? तर असे काहीतरी अगदी मृत्यूच्या जवळ जाऊन करायचे; पण मरायचे मात्र नाही. म्हणून लोक भयंकर वेगात गाडय़ा चालवतात. उंचीवरून उडय़ा टाकतात. समुद्राच्या तळाशी जातात. एव्हरेस्टवर जातात. समजा- मेलेच तर कधीतरी मरायचे होतेच, ते लवकर मेले, एवढेच म्हणायचे. बघणाऱ्यांना असा भयंकर धोका पत्करण्यातला वेडेपणा कळत नाही. बहुतेकजण ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको’ हा मंत्र म्हणत बेचव आयुष्य घालवण्यात पुरुषार्थ समजतात. आयुष्याचे करायचे काय, हा प्रश्न घेऊन बसतात. आला दिवस ढकलायचा, एवढेच त्यांचे आयुष्य.
अर्थात आपण कुठलेही ‘थ्रिल’ अनुभवताना कोणत्याही प्रकारे नुकसान करून घ्यायचे नाही, हे मात्र नक्की. म्हणजे रस्त्यावरून भरधाव वाहन चालवून कुणाला ठार मारणे हा बेशरमपणा आहे. स्वत:चे तंगडे तोडून घेणे हा मूर्खपणा आहे. ‘थ्रिल’ अनुभवताना सतर्क राहणे, पुरेपूर सुरक्षितता सांभाळून सारे काही करणे, हे फार महत्त्वाचे. आपल्या बाजूने सर्व प्रकारे प्रयत्न केल्यावर मग आता जे नशिबात असेल ते थ्रिल. काहीजण याबाबतीत व्यामोहात पडतात. म्हणजे सुरुवात कशी करायची, तेच त्यांना कळत नाही. उदाहरणार्थ, आपल्याला पोहायला शिकायचे आहे; पोहता न येणारे पाण्यात पडले तर मरतात, हे सगळ्यांनाच माहिती असते. आपला मास्तर म्हणाला की, उतरा पाण्यात; तर आपल्याला पोहता तर येत नाही, मग पाण्यात कसे उतरायचे? असा प्रश्न अगदी तर्कशुद्ध आहे. आधी जमिनीवर शिकवा, मग पाण्यात उतरतो, म्हणालात तर तेदेखील तर्कशुद्ध आहे. पण असे होणार नाही, हेही तर्कशुद्ध आहे. आता हा तिढा कसा सोडवायचा? तर धोका पत्करायचा!!! आपल्या नशिबावर आणि मास्तरवर विश्वास ठेवायचा. पुरेशी काळजी घ्यायची आणि मग पाण्यात उतरायचे. पोहायला शिकणाऱ्यातले काहीजण दरवर्षी मरतात. आपण त्यात नसलो तर नशीब म्हणायचे, दुसरे काय? पण पोहायला शिकायचे. शिकायचेच नाही म्हणालात तर आयुष्य बेचव होऊन जाईल.
हिमालयात अगर कोणत्याही पर्वतराजीत गिरीभ्रमण करताना हे आपल्याला माहिती असायलाच लागते, की इथे भूकंप होतात, दरडी कोसळतात, प्राणवायू कमी पडून माणसे मरतात, भयानक थंडीमुळे काहीजणांची बोटे गळून पडतात. पण याकरता आपण योग्य ती तयारी करून जायचेच असते. ते वातावरण अनुभवायचेच असते. आणि त्या पर्वताने परवानगी दिली तर शिखरावर पोहोचून जिवंत परत यायचेच असते. पण मस्ती करायची नसते, कारण निसर्गापुढे आपण कस्पटाच्याही कस्पटासारखे असतो. अहंकार कामाला येत नाही. शिखराच्या जवळ आल्यावर हवा बदलली तर पर्वताने परवानगी नाकारली असे लक्षात घेऊन पुन्हा खाली यायला लागायचे असते. यामध्ये काहीही वाईट वाटून घेण्यासारखे नसते. कारण आपण जेथपर्यंत पोहोचलो तेदेखील खूप असते.
आफ्रिकेतील किलीमांजारो पर्वतातले उहुरू शिखर १९,४३० फुटांवर आहे. डोंगर चढण्याचे विशेष प्रशिक्षण न घेता चढता येईल असे जगातले सर्वोच्च शिखर म्हणजे किलीमांजारो. आम्ही मित्र तिथे जाताना हे सर्वाना माहिती होते की, दरवर्षी इथे २०-२५ लोक मरतात. तिथे वर पोचताना सहाव्या दिवशी सलग बारा तास चढत जावे लागले. पोहोचल्यावर भयानक दमलो आहोत हे स्पष्ट समजत होते. आता पर्वताच्या परवानगीने सहीसलामत खाली उतरणे बाकी होते. ते पार पडल्यावर दोन दिवसांनी आपण काय केले त्याचा अंदाज येऊ लागला. हे सारे करताना आपण कितीतरी ठिकाणी मेलो असतो, हे समजले. मग काहीजण इथे का मरत असतील, ते समजले. मार्टिना नवरातिलोवासारखी अत्यंत तंदुरुस्त बाईदेखील इथे मरायला टेकल्यामुळे तिला हेलिकॉप्टरने नैरोबीला न्यावे लागले, ते का? हेही कळले.
पॅराग्लायडिंगचा भारतात कधी अनुभव मिळेल असे वाटले नव्हते. पण आता तोही भारतात शक्य आहे. आपल्या ग्लायडरमध्ये हवा भरल्यावर पाय जमिनीवरून जेव्हा पहिल्यांदाच उचलले जातात तेव्हा वाटणारी चित्तथरारक भीती आणि त्याचबरोबर वाटणारी भयंकर मजा अनुभवण्यासारखी असते. तुम्ही पक्ष्यासारखे डोंगरावर उडत असता. खाली रस्त्यावर वाहने चाललेली असतात. पक्षी तुमच्याकडे बघून जात असतात. आपण पूर्णपणे हवेच्या स्वाधीन आहोत, पण हातात थोडेफार नियंत्रणही आहे, अशा अवस्थेत हवेचा एक झोका तुमचे ग्लायडर मिटवू शकतो आणि तुम्ही कित्येक हजार फूट कोसळू शकता, हेही तुम्हाला माहिती असते. समजा- असे झाले तर काय करायचे, हे तुम्ही शिकलेले असता. पण अशा वेळेस चित्त स्थिर ठेवता येईल का, हेही माहिती नसते. पण तुम्ही नियंत्रण करीत हलकेच जमिनीवर उतरता. काय मजा!!!
आयुष्याला अशा प्रसंगाने धार येते. मृत्यूची जाणीव आयुष्याला अर्थ प्राप्त करून देते, ती अशी. यात गमतीची गोष्ट अशी की, आयुष्यातील लहानातली लहान गोष्ट करताना काय किंवा एकदम अत्यंत कठीण गोष्ट करताना काय, आपण मृत्यूच्या जवळच असतो. रस्ता क्रॉस करताना आपण जितके मृत्यूच्या जवळ असतो तितकेच पॅराग्लायडिंग करताना किंवा एव्हरेस्टवर जाताना असतो. कमी नाही किंवा जास्ती नाही. आपल्याला उगाचच काही गोष्टी या जास्त धोकादायक वाटतात. नुसते इथे जाऊन येतो, असे म्हणत गेलेली माणसे अचानक अपघातात सापडून मरतात, तर दरीत कोसळलेल्या गाडीतील लहानगे बाळ वाचते.
आपण ‘देव तारी त्याला कोण मारी?’ हे वाक्य कंटाळा येईपर्यंत ऐकतो; पण ‘देव मारी त्याला कोण तारी?’ हे मात्र ऐकतच नाही. संकटातून सहीसलामत वाचलेले लोक ‘देवाची कृपा म्हणून वाचलो!’ असे बिनदिक्कत म्हणताना मुळात त्या संकटात आपण त्याच्याच कृपेमुळे पडलो, हे सोयीस्करपणे विसरतात. मृत्यू आपला सर्वात महत्त्वाचा सल्लागार आहे. तो आपल्या सतत जवळ असतो. भानावर राहण्यासाठी त्याची आठवण ठेवणे फार उपयोगी ठरते. त्याचे भान असले की हातून क्षुद्र वर्तन होऊ शकत नाही. एकेका क्षणाची मजा आणि आनंद कित्येक पटीने वाढतो. कारण पुढच्या क्षणी मी नसेन किंवा तू नसशील, हा साक्षात्कार त्या क्षणाची उत्कटता वाढवतो. कुणाचा निरोप घेताना आपण कदाचित परत कधीच भेटणार नाही, हे क्षणभर जरी मनात आले तरी निरोपाची उत्कटता वाढते आणि खरंच भेट नाही झाली, तर वाईट वाटत नाही. कारण अत्यंत उत्कटपणे निरोप घेऊन झालेला असतो. परत भेटलोच तर मग काय? खूपच आनंद असतो.
रुटीन आयुष्य काढणाऱ्यांना उद्या काहीही वेगळे होणार नाही याची जणू खात्रीच असते. म्हणूनच आयुष्य बोअर होऊ लागते. त्यात नुसता मृत्यूचा स्फुल्लिंग पडला की अशी मजा वाढते, की विचारू नका. आजचा दिवस माझा!!! उद्या मी असेन की नाही, कोण जाणे? हे मनात आणा. आसपास बघा. अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या तुमच्या आयुष्याला एक वेगळीच चव देतील. उद्याची उत्सुकता तुम्हाला वेड लावील. गडकिल्ले आहेत, समुद्र, नद्या आहेत, आकाश खुले आहे. नीट तयारी करा नि मारा उडय़ा बेधडक. काहीतरी क्षुद्र राजकारण, गटबाजी, धर्मकारण, गुंडगिरी करण्यात आयुष्य घालवण्यात काय अर्थ आहे?
मरू शकण्याचा आनंद
यात काय आनंद? असा प्रश्न हे शीर्षक वाचल्यावर सर्वानाच पडेल यात काय शंका! असे म्हणतात की, सिकंदर जेव्हा भारतात आला तेव्हा येथील अनंत गोष्टी पाहून
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-07-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व आयुष्य मजेत जाईल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joy of to be dead