दलित पॅंथरचे एक प्रणेते आणि आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे साहित्यिक-विचारवंत राजा ढाले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे जीवश्चकंठश्च मित्र आणि वैचारिक सहकारी असलेल्या ज. वि. पवार यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सच्चा पाईक ठरलेला आणि त्यासाठी आपले आयुष्य पणाला लावणारा राजा ढाले नामक झंझावात नुकताच अचानक निमाला. एक महाकाय वादळ शांत झाले. फुले-आंबेडकर नावाचे एक गुरुकुल निर्माण झाले होते. त्याचा राजा ढाले नावाचा आचार्य आज अस्तंगत झाला. हे गुरुकुल म्हणजे ओजस्वी आणि तेजस्वी माणसे निर्माण करणारा कारखाना होता. या कारखान्यातून कवी, लेखक, विचारवंत, चित्रकार, पत्रकार आणि समीक्षक यांची अमाप निर्मिती झाली. त्याने मळलेली मळवाट ही आज हजारोंची पायवाट झाली आहे. परंतु ही वाट मळताना ढाले यांनी पार केलेले खाचखळगे, त्यांना टोचलेले काटे आणि त्यांची रक्ताळलेली पावले यांचा गेल्या पाच दशकांचा मी साक्षीदार आहे. त्यांनी जोपासलेला विशुद्ध आंबेडकरवाद, फुले-शाहू यांचा वारसा हे पुढील अनेक पिढय़ांचे धन आहे. सत्तरीच्या दशकात जेव्हा पुरोगामित्वाच्या बुरख्याखाली मार्क्सवाद फोफावत होता तेव्हा हा बुरखा टराटर फाडण्याचे काम केले ते राजा ढाले यांनीच. त्यांच्या या ऐतिहासिक कर्तृत्वाला साथ देण्याची संधी मला मिळाली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आजही लोकशाहीच्या नावाखाली वर्चस्ववाद फोफावताना ढाले यांच्या ढालीची गरज असताना त्यांचे निधन होणे हे एकूणच समाजाचे मोठे नुकसान आहे.
प्रस्थापितांविरुद्ध लढणे हा त्यांचा स्थायीभाव होता. ‘मोडेन, पण वाकणार नाही’ हा त्यांचा बाणा होता. त्यामुळे उभ्या आयुष्यात त्यांनी कोणाशीही हातमिळवणी केली नाही. तत्त्वनिष्ठेशी तडजोड केली नाही. म्हणूनच एका छोटय़ा खोलीत हजारो ग्रंथांच्या सान्निध्यात त्यांनी संपूर्ण जीवन कंठले. त्यांनी पुस्तकांवर प्रचंड प्रेम केले असले तरी समाजविघातक प्रवृत्ती जोपासणाऱ्या ग्रंथांना जाळण्यास मागेपुढे पाहिले नाही. ‘सत्यकथे’ची होळी आणि गीतादहन ही त्याचीच बोलकी उदाहरणे. त्यांनी ‘सत्यकथे’ची होळी केली नसती तर मराठी साहित्याची जी कोंडी झाली होती, ती फुटलीच नसती. दलित साहित्याबद्दलही तेच बोलता येईल.
मी त्यांचा १९६६ सालापासूनचा सहकारी. त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या चिटणीसपदासाठी निडणूक लढवली होती. त्यांना कॉलेजबा लेखकांनीही समर्थन दिले होते. मी आणि ढाले बी. ए.ला असताना एकाच बाकावर बसत होतो. प्रा. अनंत काणेकर आणि प्रा. रमेश तेंडुलकर यांचे आम्ही आवडते विद्यार्थी होतो. मी लाजाळू असल्यामुळे मराठीतील या ‘राजा’ला घाबरून होतो. या निवडणुकीत मी त्यांचा प्रचार केला. या निवडणुकीसाठी राजा ढाले आणि पां. सि. वाडकर उमेदवारी करीत होते, तर विरोधी उमेदवार होते अशोक लचके आणि सुलभा कोरे. या निवडणुकीत ढाले-वाडकर यांचा पराभव झाला. मी त्यांच्या नकळत त्यांचा प्रचार करीत होतो. पुढील आयुष्यात त्यांनी जेव्हा लोकसभेसाठी दोन वेळा निवडणूक लढवली तेव्हाही त्यांचा मुख्य प्रचारक मीच होतो.
ढाले यांच्या पन्नासाव्या वाढदिवशी (३० सप्टेंबर १९९० रोजी) त्यांच्या तोवरच्या समग्र साहित्याचा ‘अस्तित्वाच्या रेषा’ नावाने गौरवग्रंथ प्रकाशित केला गेला. या ग्रंथात ढाले यांची बालगीते, कविता, ललित लेख, परखड मुलाखती, घणाघाती भाषणे, ग्रंथ-परीक्षणे, मूलगामी धम्मविचार आणि आसमंत हादरवणारे लेख संपादित केलेले होते. १९९० साली मी त्यांच्याबद्दल जे लिहिले होते त्याची आज पुनरावृत्ती करीत आहे. संपादकीयात मी लिहिले होते की- ‘काही नावेच अशी असतात, की त्यांच्या नावातच बंड असते. त्यांचे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर व्यवस्थेविरुद्ध बंड थोपटणारा बंडखोर दिसतो. त्यांची बंडाळी असते ती प्रस्थापित व्यवस्थेला जमीनदोस्त करण्यासाठी. बघता बघता त्यांच्या हातातील लेखणी तलवार बनते आणि डोळ्यांचे पाते लवते- न लवते तोच ती शत्रूवर झेप घेते. शत्रू- मग तो कितीही जुनाट असो वा बलाढय़ असो- त्याचा खात्मा हा ठरलेलाच असतो. राजा ढाले हे अशाच बंडखोरांपैकी एक. सभा-संमेलनांतून आणि साहित्यातून स्वाभिमानाचा कंठरव करणारे पायलीला पन्नास सापडतात. परंतु हेच ‘स्वाभिमानी’ अनेक स्वामींच्या घरचे श्वान असतात. वाऱ्याप्रमाणे पाठ फिरवणारे हे क्रांतिकारक लाखदा वाकतील, परंतु ढाले असल्या क्रांतिकारकांचा थरकाप उडवतात. याचे एकमेव कारण म्हणजे ढाले हे वाकविण्यात वाक्बगार आहेत, वाकण्यात नव्हे.’
ढाले यांचे असे अनेकांना वाकवण्याचे प्रसंग मी अनुभवले आहेत. उदाहरणच द्यायचे झाल्यास फुले बदनामीविरोधी चळवळीचे देता येईल. मराठीतील एका ज्येष्ठ पत्रकाराने ‘ही कसली फुले? ही तर दरुगधी!’ अशा अर्थाचा एक लेख एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात लिहिला होता. त्यावेळी सगळे फुले-समर्थक आपापले झेंडे विसरून रस्त्यावर उतरले होते. तेव्हा त्या चळवळीचे वैचारिक नेतृत्व ढाले यांनीच केले होते. त्यासाठी ‘धम्मलिपी’चा अख्खा अंक त्यांनी एकहाती प्रसिद्ध केला होता. तो अंक वाचून फुले-विरोधकांची वाचाच बंद झाली होती. असाच प्रकार ‘रिडल्स ऑफ हिंदुइझम’च्या चळवळीच्या वेळी झाला होता. ‘रामकृष्णाचे काय गौडबंगाल (रिडल्स) आहे’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित चौथा खंड महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला होता. या ग्रंथावर बंदी आणण्यासाठी काही संघटना कार्यरत झाल्या होत्या. यावेळी सामाजिक संतुलन बिघडते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी दलितांनी दहा लाखांचा प्रचंड मोर्चा काढला होता. वर्णयुद्ध पेटते की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. यावेळी तीन समूह होते.. एक- महाराष्ट्र सरकार, दोन- शिवसेना आणि तिसरी शक्ती होती- दलित जनता. दलितांनी ५ फेब्रुवारी १९८८ रोजी काढलेल्या महामोर्चानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या बंगल्यावर बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे आणि दलितांच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर, राजा ढाले, मी, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर वगैरे उपस्थित होतो. गढुळलेले सामाजिक जीवन निर्मळ करण्यासाठी एक पर्याय समोर ठेवण्यात आला होता. तो पर्याय असा होता की- ‘या ग्रंथातील विचारांशी शासन सहमत असेलच असे नाही’ ही ओळ लिहिण्यासाठी सगळ्यांनी ढाले यांना विनंती केली. त्यांनी आपल्या सुवाच्य अक्षरात ती लिहिली. त्यांचे अक्षर पाहून बाळासाहेब ठाकरे खूपच खूश झाले. ही ओळ ढाले यांच्याच अक्षरात छापावी असा बाळासाहेब ठाकरेंनी आग्रह धरला. ही बैठक समाजवैमनस्य नष्ट करणारी ठरली. पुढे महाराष्ट्र सरकारने ही तळटीप प्रसिद्ध केली; परंतु ती नेहमीच्या पद्धतीने!
ढाले यांची एक आठवण सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही. आम्ही त्यावेळचे सगळे लेखक बाबूराव बागूल संपादित ‘आम्ही’ या अंकासाठी सिद्धार्थ विहार येथे जमलो होतो. बाबूराव, दया पवार, अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ, राजा ढाले आणि मी या बैठकीला हजर होतो. ‘आम्ही’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी ढसाळ यांनी त्यांची ‘माण्साने’ ही कविता आणली होती. नेहमीप्रमाणे ढसाळांच्या कवितेचा मीच पहिला वाचक असल्यामुळे मी ती वाचल्यावर बाबूरावांकडे दिली. बाबूरावांनी ती वाचल्यावर ‘आम्ही’मध्ये छापण्यास नकार दिला. बाबूराव त्यावेळी आमचे आदर्श असले तरी माझी अन् बाबूरावांची तावातावाने त्यावर चर्चा झाली. या कवितेच्या पूर्वभागात नामदेव ढसाळ यांनी लेखक, संत-महंत यांच्यावर खूपच टीका केली होती. परंतु उर्वरित कवितेत ‘उरल्यासुरल्या माण्सांनी बंधुभावाने वागावे, एक तीळ सातजणानी खंडून खावा’ असा विचार मांडला होता. ढाले त्यावेळी बाहेर गेले होते. त्यांनी माझा मोठा झालेला आवाज ऐकला. त्यांनी परत आल्यावर काय झाले असे मला विचारले. मी झालेला सगळा प्रकार कथन केला आणि ढालेंना नामदेवची कविता वाचायला दिली. वाचताना त्यांचा चेहरा मी पारखत होतो. कविता पूर्ण वाचल्यानंतर त्यांनी बाबूरावांना- या कवितेत काय वाईट आहे, असा प्रश्न केला. परंतु तरीही बाबूरावांनी ती कविता प्रसिद्ध करण्यास विरोध दर्शवला. तेव्हा ढाले यांनी मला सांगितले की, ती कविता तुमच्या (ज. वि.- नामदेव) ‘विद्रोह’ अंकात प्रसिद्ध करा. ‘विद्रोह’चा तो दुसराच अंक होता. त्यात ढाले यांचा दलित साहित्यावर प्रदीर्घ लेख होता. या अंकाच्या मलपृष्ठावर आम्ही ती कविता प्रसिद्ध केली. या कवितेची पुढे प्रशंसा झाली. राजा ढाले हे नामदेव ढसाळांच्या कवितेवर प्रेम करणारे होते. मला त्या दिवशी राजा ढाले यांच्या रूपात एक साक्षेपी परीक्षक दिसला.
माझ्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त राजा ढाले यांनी मला एक खाजगी पत्र पाठवले. त्या पत्रात ते म्हणतात- ‘आपण दोघे एका फांदीवरील दोन पक्षी आहोत. या फांदीचे नाव आहे- आंबेडकरवाद.’ या फांदीवरचा एक पक्षी राजा ढाले आता भुर्रकन उडून गेला आहे.. मला एकाकी पाडून! ते कधीच लोकांना एकटे दिसायचे नाहीत. आम्ही दोघे एकमेकांची सावली होतो. त्यातली एक सावली लोप पावली आहे. आता या फांदीवर एकटय़ानेच बसून टाहो फोडण्याशिवाय पर्याय नाही. माझ्या कवितेची भलावण करून पाठ थोपटणारा हात आता कधीच दिसणार नाही. त्यांच्या स्मृती जागविणे एवढेच आता हाती आहे. त्यांचे प्रचंड हस्तलिखित अप्रकाशित आहे. ते प्रकाशित करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.