मराठी रंगभूमीला पडलेलं गान-अभिनयाचं सहजसुंदर स्वप्न म्हणजे ज्योत्स्ना भोळे! त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांरंभानिमित्ताने त्यांची कन्या वंदना खांडेकर यांनी आपल्या या अलौकिक आईचा घेतलेला धांडोळा..
आ ईची एकसष्टी आमच्या प्रफुल्लाताईने (प्रफुल्ला डहाणूकर.. माझी मावसबहीण) तिच्या लोणावळ्यातल्या बंगल्यात खूप धूमधडाक्याने केली होती. सगळे नातेवाईक जमले होते. अजून सगळे आठवण काढतात. मला मात्र चुकला होता हा सोहोळा. खूप रुखरुख लागली होती बरेच दिवस. पण नंतर आम्ही तिची पंचाहत्तरी आणि सहस्रचंद्रदर्शनही आप्तस्वकीयांच्या मेळाव्यात साजरं केलं होतं. निमित्त कोणतंही असो; चार माणसं एकत्र जमली की तिला फार आवडायचं.
आता तर तिने शंभरीत पदार्पण केलंय! यावेळी मात्र मी कंबर कसली आहे- तिला जे जे आवडायचं, ते ते सगळं करायचं ठरवलं आहे. तरुण पिढीबद्दल तिला खूप विश्वास होता, आशा होत्या. म्हणूनच तरुण पिढीच्या संचात ‘कुलवधू’ करणार आहोत! शिवाय.. काय काय जमतंय ते बघू या! एक मात्र तिला ‘सरप्राइज’ देणार आहे. तिचा जीवनपट आकार घेतोय एका लघुपटातून- ‘ज्योत्स्ना.. अमृतवर्षिणी’ असं त्याचं नामकरण केलंय. पुलंनी म्हटलं ते अगदी खरं आहे. तिच्या साठीच्या वेळी ते म्हणाले होते, ‘‘साठी वगैरे शब्द ज्योत्स्नाबाईंच्या संदर्भात मला व्याकरणदृष्टय़ासुद्धा चुकीचे वाटतात.’’
तिचं वय मोजण्याच्या भानगडीतच पडायचं नाही, खरं म्हणजे. तिनेही कधीच वयाचा बाऊ केला नाही. त्यामुळे आता ‘ज्योत्स्नाबाई थकल्या’ असे ‘टिपिकल’ उद्गार तिच्या बाबतीत काढायला कोणी धजलं नाही. त्या त्या वयात तिचा स्वाभाविक डौल कायमच राहिला.. खास तिची अशी ‘ज्योत्स्ना ग्रेस.’
यावर्षी तिची जन्मशताब्दी आहे. तिचा जन्म १९१४ मधला. गोव्यातल्या बांदिवडय़ातला. घरासमोरच महालक्ष्मीचं मंदिर. देवीने तिला असा एक दैवी गुण बहाल केला, की त्याच्याशी वयाचा संबंध नाही. तो म्हणजे तिचा ‘एकमेव’ जातीचा आवाज.. तिचा स्वर! तिचा आवाज हा तिचा अमरपट्टा आहे. शंभरीतही ती तो घालून बसली आहे. त्यामुळे आपल्यातच आहे ती! आजवर कितीकांना तिने आपल्या आवाजाने, आपल्या भावगर्भ गाण्याने जिंकलंय त्याला मोजदाद नाही. शतकभर हा आवाज काना-मनात गुंजत राहिला आहे. आज ऐंशीच्या घरात असलेल्या तिच्या चाहत्यांना तिचं गाणं म्हातारपण विसरायला लावतं, प्रफुल्लित करतं. पूर्वी एकदा रँग्लर परांजप्यांना आजारपणामुळे इस्पितळात दाखल केलं होतं तेव्हा त्यांनी आईचं गाणं ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. आईने ताबडतोब जाऊन त्यांच्या आवडीची दोन-तीन गाणी त्यांना म्हणून दाखवली होती. हाच प्रसंग यशवंतराव चव्हाणांच्या आजारपणाच्या वेळीही घडला होता. तिच्या गाण्यात एक नैसर्गिक दैवी गुण आहे, जो मनाला विलक्षण आनंद देतो, उभारी देतो.
‘विश्रब्ध शारदा’मध्ये परखड समीक्षक शरच्चंद्र गोखले यांचं ज्योत्स्नाबाईंच्या आवाजाविषयीचं निरीक्षण फार बोलकं आहे. ‘‘तो आवाज सांगून समजणार नाही, तो ऐकलाच पाहिजे. तो साधाभोळा वाटतो, पण ते वाटणे फसवे आहे. त्यांच्या आवाजात ‘डायाफ्राम विब्रातो’ आहे, तो काळजाचा ठाव घेतो. ज्योत्स्नाबाईंच्या आवाजात हळवेपणा, नाटकीपणा काडीचा नाही.. अस्सल आवाज.’’
एक जातिवंत सांगीतिक जाण तिच्या शास्त्रीय संगीतात, रंगपदांमध्ये, भावगीतांमध्ये मला सतत जाणवते. आग्रा आणि तानरस खाँ घराण्याच्या तालमीत तिचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं. लहानपणी विलायत हुसेन खाँ, खादिम हुसेन खाँ यांच्याकडे आग्रा घराण्याचं. काही काळ वझेबुवांकडेही. आणि पुढे ‘तानरस’ घराण्याचे इनायत हुसेन खाँ यांच्याकडे. एक काळ तिने रागदारीच्या पेशकारीतही खूप गाजवला होता. जाणकारांची वाहवा मिळवली होती. मोठमोठय़ा संगीत सभांमधून तिचं खूप नाव झालं होतं. अनेक वर्षे नाटय़प्रयोगांच्या बरोबरीने तिने या मैफिलीही चालू ठेवल्या होत्या. १९४१ ते ६५ पर्यंत तिचे नाटकांचे प्रयोग धूमधडाक्यात चालू होते. ‘कुलवधू’ तर उसंतच देत नव्हतं, इतकं लोकप्रिय झालं होतं. मात्र, एकदा वि. रा. आठवले म्हणाले, ‘ज्योत्स्नाबाईंनी रंगभूमी गाजवली असली तरी आम्ही एक उत्तम शास्त्रीय गायिका गमावली.’ संगीत अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाल्यावर तिच्यावर तोच शिक्का बसल्यासारखं झालं, याची तिलाही काहीशी खंत वाटे. ‘संगीत अभिनेत्री’ म्हणून तिला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला खरा; पण शास्त्रीय संगीताकडे तिच्या मनाची खरी ओढ होती असं तिच्या बोलण्यातून जाणवायचं. तिने जे जे केलं, ते विशेष आणि वेगळंच केलं. १९३३ मध्ये नाटय़-मन्वंतरच्या ‘आंधळ्यांच्या शाळे’त तिने भूमिका केली ती केवळ पपांच्या (केशवराव भोळे) आणि इतरांच्या आग्रहाखातरच. १८ वर्षांची होती ती तेव्हा! तिच्या रूपाने रंगभूमीवर खऱ्या अर्थाने स्त्रीचं पहिलं पदार्पण झालं आणि रंगभूमीला एक सर्वगुणसंपन्न कलाकार लाभली. गाणं, अभिनय आणि देखणेपणाचा त्रिवेणी संगम तिच्यात होता. केवढा मोठा भाग्ययोग ठरला हा! १९४१ ला मो. ग. रांगणेकरांची ‘नाटय़निकेतन’ सुरू झाल्यावर तर रंगभूमीवर क्रांतीच झाली. नाटय़-मन्वंतरने तिची कारकीर्द सुरू झाली, पण नाटय़निकेतनने ती रूढ केली असं म्हणायला हरकत नाही. रसिकांना तिच्या ‘आशीर्वाद’, ‘कुलवधू’, ‘एक होता म्हातारा’, कोणे एकेकाळी’ इ. नाटकांचं वेडच लागलं. रंगभूमीच्या इतिहासातला हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण हे काम सोपं नव्हतं. बालगंधर्वाची मराठी मनावरची मोहिनी आजतागायत उतरलेली नाही. ती चिरंतन आहे. आईचंही ते दैवत. परंतु कालानुसार सर्वच क्षेत्रांत क्रांती, बदल होत असतात, त्यानुसार हळूहळू एका वेगळ्या नाटकाची प्रतीक्षा समाजाकडून होऊ लागली होती. ही प्रतीक्षा नाटय़-निकेतनने संपवली. सर्वार्थाने स्वागतार्ह, सुयोग्य असे बदल नाटकाच्या सर्व अंगांमध्ये घडले- लेखन, रचना, नेपथ्य, दिग्दर्शन, प्रयोगकाल, संगीत, रंगमंचावरील पात्रांचा वावर! त्यात नायिका ज्योत्स्ना भोळे यांनी रंगभूमीवर अत्यंत सहज, पण डौलदारपणे वावरत परिणामकारक अभिनयाने आणि गायनाने प्रेक्षकांचं चित्त जिंकून त्यांच्या मनावर अक्षरश: अधिराज्य केलं. सतत पंचवीस वषर्ं! ‘माझ्यानंतर मला ज्योत्स्नाबाईच दिसतात!,’ हे बालगंधर्वाचे उद्गार त्यांनी सार्थ केले.
मी आईच्या सगळ्या भूमिका पाहिल्या आहेत. प्रत्येक भूमिकेत तिचा ‘परकायाप्रवेश’ व्हायचा. समोर असे ती ‘भानुमती’, ‘उमा’, ‘राधा’, ‘सीता’, किंवा ‘विद्याहरण’मधली ‘देवयानी’! पदं गातानाही भूमिकेचं भान तिने कधी निसटू दिलं नाही. गातानाचे हातवारे तर कधीच केले नाहीत.
भावगीताच्या क्षेत्रातही तिचं एक अढळ स्थान आहे. तिचं ‘माझिया माहेरा जा’ ऐकताना पुरुषवर्गाच्याही डोळ्यांत पाणी आलेलं मी पाहिलं आहे. खरंच, पपा म्हणतात तशी ती ‘रसाळ गायिका’ आहे. त्यांच्याकडे ती १६-१७ वर्षांची असताना भावगीत शिकली आणि झपाटूनच गेली. १८ व्या वर्षी ती सौ. भोळे झाली! तिच्यातले अंगभूत गुण आणि पपांचं सर्व प्रकारे मार्गदर्शन यांचा मिलाफ म्हणजेच ज्योत्स्ना भोळे! उपजतच तिचं मन संस्कारक्षम होतं, उत्तम ते टिपून घेणारं होतं. अगदी लहानपणापासून तिचं आयुष्य ज्या प्रकारे घडत गेलं, त्यावरूनही हे दिसून येतं. तिच्यासमोर ज्या ज्या संधी आल्या, त्यांचं सोनं झालं.. तिनं ते निष्ठेनं केलं!
चौथीपर्यंत शिकली असली तरी ती अलौकिक अर्थाने ‘वाढत’ राहिली. पपांच्या सहवासात तिला साहित्याची गोडी लागली. काही श्रुतिकाही तिने लिहिल्या. त्यापैकी ‘घराण्याचा पीळ’ लोकांना खूपच आवडली. तिनं ‘आराधना’ हे नाटक लिहिलं. त्याचं दिग्दर्शन, संगीत तिनंच केलं. एखाद्या प्रसंगी भाषण करण्याची वेळ आली तर ती बोलतही असे छान. ही सगळी आत्मोन्नती तिने कशी केली असेल? मला वाटतं, तिच्या ठायी एक निराळीच ऊर्जा आणि ऊर्मी वास करीत होती. माझं स्पष्ट मत आहे की, ती निसर्गदेवतेची लाडकी होती.. लाडकी निसर्गकन्या!
‘ज्योत्स्नाबाई भेटल्या की कसं प्रसन्न वाटतं.. दिवस चांगला जातो!’ अशा सदिच्छा तर तिला नेहमीच मिळत. अजूनही आम्हाला तिची  आठवण काढणारी मंडळी भेटतात. ती आता नाही याची हुरहुर त्यांना वाटत असते. नुसत्या ‘असण्याने’सुद्धा तिने किती मनं जिंकली होती, याची जाणीव नेहमीच होते.
ती माझी आई आहे, हे माझं.. आम्हा भावंडांचं खरंच मोठं भाग्य! आई म्हणून वाटणारा तिच्या कर्तृत्वाचा अभिमान हा एक भाग झाला; परंतु एक व्यक्ती म्हणूनही ती असामान्य आहे यात शंका नाही.
तिची जन्मशताब्दी साजरी करताना आम्ही तिचे कुटुंबीय, सुहृद एकत्र आहोतच; पण रसिकहो, तुमचाही सहभाग त्यात असेल, हे नि:संशय. कारण तुम्ही तिच्यावर आणि तिने तुमच्यावर खूप प्रेम केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा