– मोनिका गजेंद्रगडकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकनिर्मितीतून बालजगत समृद्ध करणाऱ्या ज्योत्स्ना प्रकाशन संस्थेने अलीकडेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. यंदा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा श्री. पु. भागवत पुरस्कारही प्राप्त झाला. यानिमित्ताने संस्थेच्या पुस्तकप्रवासाविषयी…
महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा श्री. पु. भागवत प्रकाशक पुरस्कार यंदा ज्योत्स्ना प्रकाशन संस्थेला मिळाला. ही बातमी वाचली नि माझ्यातल्या ५० वर्षांपूर्वीच्या बालवाचकाने आनंदाने टाळ्या पिटल्या. आमच्या घरातल्या माझ्या कपाटातली माझ्या वडिलांनी मला भेट म्हणून दिलेल्या ज्योत्स्ना प्रकाशनाच्या ‘तांबू गाय’पासूनची अनेक पुस्तकांची पानं डोळ्यांसमोरून फडफडून गेली… नजरेसमोर आली ती ज्योत्स्ना प्रकाशनाची नाममुद्रा. पौर्णिमेचा गोल चंद्र, त्याच्या पार्श्वभूमीवर फुललेलं कमळ, त्याची गोलाकार ‘ळ’सारखी पानं… खाली ज्योत्स्ना प्रकाशन अशी आद्याक्षरं… वाटलं, हा सन्मान एका अर्थाने बालवाचकांचाही आहे! ज्या बालवाचकांसाठी हे बालसाहित्याचं चांदणं (खरं तर या बालवाचकांमुळेही) गेली ७५ वर्षं अखंड पाझरत राहिलं आहे. ज्योत्स्ना प्रकाशनाच्या या मुद्रेशी अर्थातच त्यांच्या पुस्तकांशी- माझ्यासारख्याही अनेक प्रौढ वाचकांचे शैशव घट्ट जोडलेलं आहे. आपल्याला क्षणात बाल होऊन जायचं असेल तर ज्योत्स्ना प्रकाशनाच्या या पुस्तकावर सहज नजर टाकावी. पाहता पाहता आपलं संपून गेलेलं शैशव, त्याच्या गोड, टवटवीत खुणा सापडू लागतात. बालमनाला त्यावेळी पडलेल्या लहान मोठ्या प्रश्नांची, शंकांची, भास-आभासांची, रहस्यांची, आश्चर्यांची न उलगडणारी कोडी ज्या पुस्तकांनी अशीतशी उलगडत नेली; आणि अद्भुततेची नि सत्याची सांगड घालत आम्हाला शहाणं करण्याच्या वाटेवर चालायला शिकवलं… ते आमचं त्यावेळचं निरागस बालमनाचं हसू या पुस्तकांच्या पानापानांवर विलसताना दिसू लागतं. मनाच्या एका कोपऱ्यात पंख मिटून पडलेली त्या आठवणींची फुलपाखरं अचानक जागी होऊन भोवती भिरभिरू लागतात नि आपण त्यांच्या मखमली पंखांचं अद्भुतपण पुन्हा अनुभवत बाल होऊन जातो. गुळगुळीत मुखपृष्ठांच्या, ठसठशीत सुबक नि सुटसुटीत टायपातल्या दलालांच्या, मुळगावकरांच्या सुंदर, आल्हादक चित्रांनी नटलेल्या छोटेखानी पुस्तकांची मी लहानपणी डोळे लावून वाट पाहिली आहे. माझ्या लेखक वडिलांबरोबर बसून एकेका शब्दावर बोटं टेकवत अक्षर अक्षर जुळवत आपल्याला वाचता येऊ लागल्याचं शहाणपण मिरवलं आहे. या पुस्तकांतल्या प्राण्यांच्या, कीटकांच्या, सापांच्या, पुराणातल्या, इसापनीतीच्या गोष्टी अगदी जेवताना वाचत, त्या पुस्तकांवर पदार्थांचे तेलकट डाग पाडत त्याची पारायणं केली आहेत. त्या पुस्तकांनी संस्कारित केलेल्या जाणिवांचे आज वाचक म्हणून माझ्यात असणारे प्रगल्भ अंश माझ्या गाठीशी आहेत. एक जाणता वाचक म्हणून घडलेल्या माझ्यासारख्या अनेकांना ज्योत्स्ना प्रकाशनाचे हे ऋण म्हणूनच मान्य करावे लागते.
अर्धशतक सातत्याने नि चिकाटीने बालसाहित्यच प्रकाशित करणारी ही संस्था मराठी प्रकाशन विश्वातलं एक आश्चर्य मानायला हवं. एखाददुसरा अपवादवगळता अशी बालसाहित्याला वाहून घेणारी प्रकाशन संस्था एकमेव असावी- जिने मराठी साहित्यातला बालवाङ्मयाचा प्रवाह सुदृढ, समृद्ध केला. त्याला आयाम दिले. मुख्यत: काळाप्रमाणे बदलत गेलेले, अधिक व्यापक नि वैश्विक होत गेलेले मुलांचे जग त्यांनी नुसते जाणून घेतले नाही, तर ते विस्तारत जाणार हे ओळखत आपल्या पुस्तकांत डिझायनिंगपासून ते मजकुरापर्यंत, आकारापर्यंत कल्पकता दाखवत अनेक प्रयोग करत नेले. शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडकांनी म्हटलं होतं, ‘‘बालसाहित्य हे बालभोग्य असावं. ते केवळ ज्ञानामृत पाजणारं, बोधप्रद असेल नि ते तसंच वर्षानुवर्षे लिहिलं गेलं तर बालवाचक या साहित्याशी जोडले न जाता दुरावतच जातील.’’ ज्योत्स्ना प्रकाशनाने एका अर्थी बालसाहित्याची पारंपरिक, रूढ व्याख्या बदलून टाकली. या साहित्याला सुंदर सुंदर चित्रांचे दृश्यात्मक देखणेपण दिले. नेमक्या शब्दांतून, वाक्प्रचारांतून, भाषिक सौंदर्यातून ध्वन्यार्थ दिले. बहुरंगी मुखपृष्ठांचे पुस्तकांना चेहरे दिले. मुलांचा विकास हा अधिक मोकळेपणाने त्यांच्या रुचीला जाणून घेत त्यांच्या कलेने करत हळूहळू या बोधप्रद साहित्यातून त्यांना प्रथम बाहेर काढले. बालसाहित्य म्हणजे स्वप्नाळू परीकथा, बडबडगीते वा कविता, धाडसी कथा एवढेच मर्यादित नाही, तर त्याच्या कक्षा अपरिमित आहेत हे सांगत मुलांमधले सुप्त गुण वाढीस कसे लागतील हे पाहत पुस्तकांपलीकडचे खूप काही सामोरे आणले. मुलांचा भाषिक, प्रातिभ विकास पुस्तकांच्या पानापानांतून कसा करता येईल हे पाहिले. गेल्या काही वर्षांतली माधुरी पुरंदरे, संगीता बर्वे, पुंडलिक वझे, माधव खरे, सुनंदा अमरापूरकर, विजय पाडळकर, समीर दीवाणजी, गार्गी सहस्राबुद्धे आदी लेखकांची पुस्तकं पाहिली. त्यातले विषय, आशय, संकल्पना पाहिल्या की ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ ही केशवसुतांची ओळ आठवून जाते. ही पुस्तकं केवळ मुलांसाठीच नाहीत तर प्रौढ वाचकातही एक लहान मूल दडलेले असते नि तेही सतत जिवंत असावे, ठेवावे, राहावे हे जणू ओळखून या प्रौढ वाचकांतल्या त्या लहान मुलासाठीही ही पुस्तकं आहेत असंच वाटतं. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुमार गंधर्वांवरचं माधुरीताईंचं ‘कुमार स्वर : एक गंधर्व कथा’ हे देखणं पुस्तक. मुलांना कुमार गंधर्वांसारख्या अलौकिक प्रतिभावान गायकाची, त्याच्या गायकीची, स्वरांची ओळख पोहोचवत त्यांचा जीवनपट वाचताना आपण मोठेही गुंतून जातो. त्यातील चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या सजीव नि अस्सल चित्रांची किमया तर भान हरपून टाकते. ज्योत्स्ना प्रकाशनाने अशी मुलांबरोबर पालकांचीही वाचक अभिरुची जोपासत ठेवली आहे. मुलांआधी पालकांनी अशा पुस्तकांनी समृद्ध व्हावे म्हणजे ही समृद्धी मुलांपर्यंत आपोआपच पोहोचेल हा वाचन संक्रमण संस्काराचा पाया जणू त्यांनी घालून दिला.
ज्योत्स्ना प्रकाशनाच्या पुस्तकांची मुख्य खासियत म्हणायची तर त्या पुस्तकांच्या निर्मिती मूल्यांची श्रीमंती! कागदापासून टाइपपर्यंत, चित्रांपासून पुस्तकाच्या मांडणीपर्यंत, लेखकाच्या सत्त्वशील मजकुरापर्यंतच्या या श्रीमंतीमुळे बालवाचक, कुमारवाचक या पुस्तकांकडे आकर्षित न झाले तरच नवल! ल. गो. परांजपे यांनी ही प्रकाशन संस्था १९५०मध्ये काढली. स्वत:ची तीन पुस्तकं काढूनच त्यांनी ही बालवाङ्मयाची मुहूर्तमेढ रोवली. मुलांसाठी पुस्तकं काढायची तर त्यांच्या इवल्याशा नजरेला आकर्षण वाटेल, त्यांना वाचायला सुलभ जाईल ते मोठ्या जाड टाइपमधील साहित्य प्रकाशित करून… हे ओळखून त्यांनी मुद्रकाकडून खास स्वत:साठी म्हणून मोठा टाइप पाडून घेतला, तो नंतर कोण घेणार म्हणून मुद्रकाने प्रथम नकार दिल्यावर जास्त पैसे त्यासाठी मोजले. मुलांना चित्रभाषा अधिक समजेल हे ओळखून दलाल, मुळगांवकर यांसारख्या नावाजलेल्या चित्रकारांना आमंत्रित केले. आज ज्योत्स्ना प्रकाशनाच्या पुस्तकांची हीच ठळक ओळख ठरली आहे! त्यांची ती दृष्टी त्यांच्या मोठ्या चिरंजीवांनी- मिलिंद परांजपे यांनी विस्तारत विस्तारत अधिक आधुनिक नि प्रयोगशील केली. १९८९ पासून मुलांसाठी चित्रकलेवरची, तर २००० पासून मोठ्यांसाठीही चित्रकलेवरची पुस्तकं मराठीसह इंग्रजीतही त्यांनी काढायला सुरुवात केली. चित्रकलेच्या जोडीला विमानांची मॉडेल्स करणं हाही पुस्तकाच्या क्षेत्रातला आगळावेगळा प्रयोग त्यांनी केला. पाकिटासारखे घड्यांचे पुस्तक काढले. मुलांची विविध कलांविषयीची जाण, आकलन वाढावं, पर्यावरणाबद्दल, निसर्गाबद्दल, त्यातल्या रहस्यांबद्दल, मुलांच्या मनात एकीकडे औत्सुक्य निर्माण करत दुसरीकडे त्यांना ज्ञान, माहिती पुरवणं नि त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास करत जाणं… हे ज्योत्स्ना प्रकाशनाच्या वेगवेगळ्या पुस्तकांमुळे साधलं गेलं. एक प्रकारे मुलांसाठी पुस्तकं काढताना बालमनाच्या मानसशास्त्राचाही थोडा अभ्यास असावा लागतो. मिलिंद नि त्यांचे धाकटे बंधू विकास यांनी तो केला असावा किंवा बालमन त्यांना चांगलंच वाचता येत असावं! वाचू आनंदे (माधुरी पुरंदरे, नंदिता वागळे), चित्रे काढा (पुंडलिक वझे), मुले शिकती करताना (मंजिरी निंबकर, शलाका), प्रवासावरची राजस्थान, गोवा या प्रांतांवरची, विविध वाद्यांच्या निर्मितीवरची, पाश्चात्त्य कलाकृतींवरची… जशी ‘हॅनाची सूटकेस’, ‘अनोळखी मित्र’- कमबीझ काकावांड, ‘आपल्याला माणूसपण कोणी दिलं?’ – आना फोरलाती, शिवाय मराठीतील काही कादंबऱ्यांचे कुमारवयीन मुलांकरिता केलेले संक्षिप्तीकरणाचे प्रयोग… वगैरे ज्योत्स्ना प्रकाशनाची पुस्तकं (ही यादी आणखीही वाढवता येईल), ती पाहताना खास करून भाषांतरित, रूपांतरित पुस्तकं पाहताना आपल्या हे लक्षात येतं की, अशा पुस्तकांमुळे मुलांचं समाजभान, विविध संस्कृतींचं भान वाढतं. त्यांच्या विचारकक्षा रुंदावतात. एकूणच प्रयोग करायचे म्हणून ज्योत्स्ना प्रकाशनाने हे प्रयोग केलेले नाहीत, त्यात एक निश्चित विचार आहे. दृष्टी आहे. त्यांच्या या प्रयोगांची दखल म्हणूनच NCERT ( Delhi), F. l. P. ( Fedaration of Indian Publisher Delhi) यांनी घेतली हे विशेष. त्यांची पुस्तके विविध भाषांमध्ये भाषांतरित झाली. ती पुस्तकं परदेशातही पोहोचली. आजचा काळ हा डिजिटल क्रांतीचा काळ आहे. मुलं पुस्तकांपासून दूर जात आहेत. त्यांची भाषा मराठी राहिलेली नाही तर इंग्रजी झाली आहे. ती टेक्निकल, नेट फ्रीक आहेत… मातृभाषेबद्दल, पुस्तकांबद्दल त्यांच्या पालकांनाच जिथे आस्था उरलेली नाही तिथे मुलांकडून अपेक्षा ठेवणं दुरापास्तच… परंतु या कठीण काळातही ज्योत्स्ना प्रकाशनाची पुस्तकं त्याच दिमाखात प्रकाशित होत आहेत. लेखकांना नवे विषय, संकल्पना सुचवत त्यांच्याकडून लिहून घेत कसदार बालसाहित्यिकांची मांदियाळी ज्योत्स्ना प्रकाशन निर्माण करते आहे. उदा. ‘पैठणी कशी तयार होते’ हे सांगणारं राधिका टिपणीस या नव्या लेखिकेचं पुस्तक, ऋतुजा घाटे यांचं ‘बुब्बा आजीची उबदार शाल’ हे पुस्तक. राधिका टिपणीस, प्रियाल मोटे, रमा हर्डीकर यांसारखे अनेक बालसाहित्यिक (आणि चित्रकारसुद्धा) ज्योत्स्ना प्रकाशनाचे शोध आहेत. याबद्दल ज्योत्स्ना प्रकाशनचे कौतुक नि तितकंच आश्चार्य वाटतं. समांतरपणे या पुस्तकांची चित्र सजावट पाहिली तर ती परदेशी पुस्तकांनाही मागे टाकेल अशी आहे. लेखकांबरोबर सानिका देशपांडे, समीप शेवडे, मकरंद डंभारे अशा नव्या प्रतिभावान चित्रकारांची फौज ज्योत्स्ना प्रकाशननाने उभी केली आहे.
विकास परांजपे म्हणतात, ‘‘हा काळ कठीण आहेच, पण आजही मराठीत एक वर्ग आहे, जो मुलांना इंग्रजी माध्यमात घालूनही त्याला मराठी वाचता आले पाहिजे, त्यावर मराठी संस्कृतीचे संस्कार व्हायला हवेत असा आग्रह धरून त्यांच्यात मराठी वाचन संस्कार करू पाहतो आहे. हा ‘क्रीम’ वर्ग कमी असेल, पण तो आहे नि तो राहणार. त्याला ज्योत्स्ना प्रकाशनाच्या पुस्तकांकडे त्यासाठी यावे लागते नि त्याला येत राहावेच लागेल.’’
उच्च वाङ्मयाभिरुचीसाठी व्रतस्थ राहून अभिजात वाङ्मयाचा ध्यास बाळगणाऱ्या श्री. पु. भागवत यांच्या नावाचा सर्वोच्च सन्मान ज्योत्स्ना प्रकाशनाला जेव्हा दिला जातो; तेव्हा निवड समितीने दाखवलेल्या या औचित्याला मनापासून दाद द्यावी वाटते. कारण थोड्याफार फरकाने ज्योत्स्ना प्रकाशन मुलांमधील वाचक त्यांच्या लहानवयातच घडवत नेत त्याला भावी जाणकार वाचक बनवण्याचं आणि उच्च वाङ्मयाभिरुचीकडे त्याची पावलं वळवण्याचं कार्य सजगतेनं करत आहे. म्हणूनच मिलिंद आणि विकास परांजपे यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
monikagadkar@gmail.com