समीर गायकवाड
दुपारची वेळ होती. ऊन चांगलंच भाजून काढत होतं. पाणंदीतून वर आल्यावर गावाच्या कच्च्या रस्त्यालगत असलेल्या डांबरी सडकेनजीक एस.टी.च्या थांब्यावर लिंबाच्या सावल्यांचा झिम्मा सुरू होता. मधूनच येणारी वाऱ्याची आल्हाददायक झुळूक गारवा जवळ आल्याची जाणीव करून देत होती. वर उंच आभाळात पाखरांचे खेळ सुरू होते. सूर मारून खाली येणारी घार नजरेच्या टप्प्यात येऊन गर्रकन् वळून पुन्हा झेप घेत होती. तिच्यामागे तिचा थवा घुमत होता. वाऱ्याचा जोर वाढला की पाखरं शांत होत. रस्त्याला लागून असलेल्या चिंचेच्या झाडाचा नाजूक पाला झड लागावी तसा पडत होता. ती पानझड पानविडय़ातल्या गुंजपत्त्याची काळ्या मातीवर रांगोळी काढल्यागत दिसत होती. इथं सडकेला वाहनांची वर्दळ कायम असते. भुर्र्रकन् जाणाऱ्या गाडय़ा आणि त्यात बसलेली रंगीबेरंगी कपडय़ांतली माणसं पाहताना वेळ कसा जातो ते कळत नाही. गावात मन लागलं नाही, घरी भांडय़ाला भांडं लागलं की इथे येऊन मलाच्या दगडाला टेकून बसायचं. कुणाशीही न बोलता नुसतं निरखत राहिलं की आभाळ काळजात उतरतं. इथली लगबग पाहताना मनातला गाळ निवळत असल्यानं मुकाटय़ानं बसलेली माणसं हटकून दिसत होती. तर काही बोलघेवडी मंडळी चकाटय़ा पिटत होती. गावात येणारे-जाणारे हौसे, गवसे, नवसे आणि अडलीनडली मंडळी गाठ पडण्याचं हे नेमकं ठिकाण असल्यानं रिकामटेकडी माणसं गुळाच्या ढेपेवर घोंघावणाऱ्या माश्यांगत वाटत होती. ज्यांना पार, देऊळ, चावडी कुठंच गोडी वाटत नसे, ते जीव इथं रमत. त्यातलेच काही चेहरे सडकेच्या डाव्या बाजूस असलेल्या दामूअण्णाच्या हॉटेलात आशाळभूतपणे बसून होते. निसर्गाचं संगीत एका लयीत सुरू होतं. त्यात खंड पाडला तो एकाएकी वेगात येऊन करकचून ब्रेक दाबून थांबलेल्या एक्सप्रेस गाडीनं. या गाडीचा गावाला थांबा नव्हता तरीही ती थांबली होती. लोकांच्या भुवया वर झाल्या. सत्तरी पार केलेलं कुठल्या तरी खेडय़ातलं एक जोडपं एसटीतून उतरलं. कर्नाटकी चौकट इरकली साडी-चोळी त्या स्त्रीच्या अंगावर होती. दुई हातात हिरव्यागार बांगडय़ा होत्या. म्हातारा टिपिकल धोतर, सदरा, टोपीच्या वेशात होता. त्याच्या सदऱ्यावर कुंकवात बुडवलेल्या हातांचे छाप उठून दिसत होते. तिच्या कपाळाला लावलेलं आडवं कुंकू घामानं पसरलेलं होतं. दोघंही चालताना गुडघ्यात वाकत होते. बहुधा तुळजापूरला जाऊन आलेले असावेत. अंग भाजून काढणाऱ्या उन्हाची त्या थकलेल्या जोडप्यास सवय असावी, पण अशी तणतणीची सवय नसावी हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं. त्यांच्यात धुसफूस चालली होती. त्या भांडणाच्या भरात खाली उतरले होते. दोघांतला संवाद लाह्य फुटाव्यात तसा सुरू होता.
‘‘मी काय म्हणत होते, तिथंच अजून एखांदा मुक्काम केला असता ना.’’
‘‘अगं, माझ्या लक्षात आलं नाही गं.’’
‘‘सारखं गाडीतनं चढउतार करून माझं गुडघं दुखताहेत. मला प्रवास सहन हुईनासा झालाय.’’
‘‘तुझी पिशवी देती का माझ्याकडं?’’
‘‘हे सगळं असंच होणार. माझं मेलीचं नशीबच फुटकं.’’
‘‘अगं, आपलं काय वाईट झालंय का!’’
‘‘जन्मभर कशाची हौसमौज नाही की संसाराला कशाची गोडी नाही.’’
‘‘आता द्य्ोव द्य्ोव करत फिरतोयच की आपण.’’
‘‘व्हय तर.. इकडून तिकडं गाठोडं आवळून फिरत्येय नव्हं का!’’
‘‘अगं, हळू बोल गं, लोकास्नी ऐकू जातंय. तुझ्याबद्दल वाईट वाटतंय. पर मी तरी काय करू? तूच सांग बरं.’’
‘‘का बरं हळू आवाजात बोलू? त्येंच्या घरातबी भांडय़ाला भांडं लागतच असंल ना.’’
‘‘ बग- आपण असं करू, पंढरपूरचा प्रवास उद्यावर ढकलू.’’
त्यांना थांबलेलं बघून कदमाचा सुन्या पॅसिंजर गावल्याच्या खुशीनं आपलं जीपडं घेऊन तिथं आला आणि कुठंशीक जायचं म्हणून विचारू लागला.
आपली तणतण न थांबवता त्याच्याकडं बघत म्हातारी बोलली, ‘‘आमाला तुजं जीपडं नको रे बाबा. तू जा तपल्या वाटंनं.’’
तिने तुसडय़ासारखं वागलेलं म्हाताऱ्याला रुचलं नाही. हळू आवाजात म्हातारा बोलला,
‘‘अगं, असं नको गं राग राग करू.’’
‘‘मंग करू तरी काय? घरी-दारी आजवर मन मारतच जगल्ये का न्हाय?’’
‘‘मी कमी पडलो असंल गं. पर माझी मजबुरी बी बघ की जरा.. आता येईल ती गाडी धरू, मंग गाडीत बसल्यावर काय बोल लावायचेत ते लाव.’’
एव्हाना त्या म्हाताऱ्याच्या धुरकट डोळ्यांत पाणी जमा झालेलं. सडकेवरल्या लोकांच्या नजराही त्यांच्यावर खिळल्या होत्या. ती दोघंच देवदर्शनाला निघाली असावीत आणि वाटंनं भांडणतंटा सुरूच राहिल्यानं एकाएकी खाली उतरले असावेत. त्यांच्या गावाच्या सडकेलाही मन शांत करणारा असाच भवताल असावा. त्या ओढीनंच गाडीतून उतरल्याबरोबर त्यांनी लिंबाची सावली गाठली आणि वाहनांवर नजर ठेवून बसून राहिले.
प्रवासाची सवय नसल्याने म्हातारीही पार शिणली होती. त्याच्या जोडीला आता आयुष्यभर दाबून ठेवलेल्या दु:खांचा कढ नको तिथं बाहेर आला होता. त्या माऊलीचा संताप अनावर झाला होता. ती थरथर कापत बोलत होती आणि तो थकलेला वृक्ष हताश होऊन तिच्याकडे पाहत होता. दोघांच्या हातातल्या पिशव्या आता रस्त्यावर विसावल्या होत्या.
मनाचा हिय्या करत तो पुन्हा बोलता झाला-
‘‘मी काय मुद्दाम केलं का गं?’’
‘‘तुमी चुकला न्हाईत. चुकल्ये तर मी. इतके साल संसार केला, पर कधी कुठं तक्रार केली का?’’
आता त्या माऊलीचा बांध फुटला. आजूबाजूला चोरटय़ा नजरेनं बघत भान राखून म्हातारा हळूच तिच्याजवळ गेला. म्हातारा पार पाखरागत झाला होता. बायकोच्या पाठीवरून हात फिरवून तिला शांत करावं असं त्याला खूप वाटलं असावं, पण त्याचं धाडस झालं नाही. भर रस्त्यात आडगावी तिला कसं समजावून सांगायचं हे त्याला उमजत नव्हतं. तो आपला तिच्या जवळ बसून आभाळाकडं बघत होता. मघाशी आभाळातून खाली-वर करणाऱ्या घारी आता खाली येत नव्हत्या. म्हाताऱ्याच्या फडफडणाऱ्या म्लान डोळ्यांत उतरणारी निळाई गालावर आस्तेकदम पाझरू लागली होती.
बऱ्याच वेळापासून त्यांच्या भांडणाकडं लक्ष देऊन असलेली रस्त्यावर बसून डहाळं विकणारी शांताबाई कान देऊन ऐकत होती. चोरून निरखत होती. म्हाताऱ्याचे अश्रू बघून हात झटकत ती ताडकन् उठली. त्या बाईंकडे ती गेली.
‘‘बाई, तुजं सगळं खरंय, पर तुजी जागा चुकली. धनी चुकलं म्हंत्येत नव्हं, मग मोठय़ा मनानं एक डाव माफ करून घरी जाऊन हिसाब मांडलेला बरा. जास्त ताणू नये बाई. माफ करायला वेळ लावला की जीव पस्तावतो. नको वाढवू माय. आपल्याच कारभाऱ्याची बेअब्रू करून काय व्हनार? त्रास जसा तुला झाला असंल तसाच त्येंनापन झाला असंलच की. त्यांनी कुणावर राग काढावा बाई?’’
शांताबाईची मध्यस्थी गुणकारी ठरली. तिने भरल्या डोळ्यांनी दोघांचे हात एकमेकांच्या हातात दिले. दोघांना हायसं वाटलं. त्या स्पर्शानं त्यांचं दु:ख परस्परांच्या काळजापर्यंत पोहोचतं केलं. त्यांना भरून आलं. तितक्यात पंढरपूरकडे जाणारी लाल-पिवळी एसटी आली आणि दोघंही पिशव्या घेऊन गाडीत जाऊन बसले. गाडी निघाली आणि खिडकीतून बाहेर आलेल्या भेगाळलेल्या हातांनी शांताबाईचा निरोप घेतला.
कंबरेत वाकलेल्या, साठी पार झालेल्या शांताबाईचं कपाळ रिकामं आहे. कोरीव गोंदवलेलं पान-फूल तिच्या काळ्या कपाळावर अजूनही उठून दिसतं. तिचा नवरा दारू पिऊन मारायचा तिला. तिच्या कमाईवर जगला आणि मेला. सगळं किडूकमिडूक नवऱ्याच्या दवाखान्यापायी तिनं विकून टाकलं. तिच्या एकुलत्या एक पोरीचा नवरादेखील दारुडा निघाला. तिचा अतोनात छळ करायचा तो. एकदा रागाच्या भरात शांताबाईनं त्याच्या डोक्यात कुदळ घातली. त्याचं काम तमाम केलं. बाईमाणसानं केलेला तो तालुक्यातला पहिला खून होता! साक्षीपुराव्याअभावी सेशन्स कोर्टात ती निर्दोष सुटली. पण तिच्या आयुष्याला एक सल लागली.. आईमुळं विधवा झाली म्हणून पोरगी तिलाच दोष देत राहिली. पण पोरीच्या आयुष्याची कीड गेली, या विचारानं शांताबाई समाधानी राहिली. लंकेची पार्वती होऊन आता ती रस्त्यावर माळवं विकत बसते आणि त्यावर आयुष्य कंठते. एकटीच राहते आणि घासातला घास चार जणांना देते. तिच्याकडं जगण्याच्या विविध समस्यांवर तोडगे आहेत. काही काळे आहेत, तर काही पांढरे आहेत. आतादेखील तिनं या दोघांतला वाद सहज सोडवला. ते दोघं गेल्यानंतर मात्र बराच वेळ ती पाडस हरवलेल्या हरिणीसारखी कासावीस होऊन बसून होती.
त्या दिवशी घरी गेल्यावर शांताबाई पार उन्मळून पडली. तिला गुरासारखी मारझोड करणाऱ्या नवऱ्याने तिच्यावर कधी जीव लावला नव्हता की कधी साधं प्रेमदेखील केलं नव्हतं. मरताना अखेरच्या क्षणी मात्र त्याने तिची क्षमायाचना केली, तिची माफी मागितली. त्याचं बोलून झाल्यावर शांताबाईला बोलायचं होतं. त्याला माफ केल्याचं सांगायचं होतं. पण तिने काही बोलण्याआधीच त्याचे श्वास थांबले होते. आपलं बोलणं राहून गेलं या गोष्टीची खंत तिला कधीच स्वस्थ बसू देत नव्हती. या जोडप्याच्या भांडणातनं तिच्या जुन्या जखमेची खपली निघाली आणि त्यातून रक्ताऐवजी भळाभळा अश्रू वाहू लागले..
sameerbapu@gmail.com