मंगल कातकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीवनातलं दारिद्य्र, अंध:कार दूर करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे शिक्षण. शिक्षणाने माणूस नुसता शिक्षित होत नाही, तर तो पिढय़ान् पिढय़ा वाटय़ाला आलेला अज्ञानाचा शाप धुऊन काढतो. आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य ज्ञान किरणांनी उजळून टाकतो. असं संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींच्या आत्मकथनाने मराठी साहित्य समृद्ध आहे. याच समृद्ध साहित्यविश्वात भर घालणारे, ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांचे कठीण आयुष्य दाखविणारे पोपट श्रीराम काळे लिखित ‘काजवा’ हे पुस्तक होय. शिक्षणाने माणूस नुसता साक्षर होत नाही तर तो दुसऱ्यांसाठी प्रकाशवाटा कशा निर्माण करतो; तसेच प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, समाजसेवक वृत्तीने शिक्षण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे जीवन उत्तमपणे उलगडले आहे. पोपट काळे हे एका ऊसतोडणी करणाऱ्या मजुराच्या घरी जन्माला आले. आई-वडील अशिक्षित होते. पण त्यांनी पोपटरावांच्या हातात ऊस तोडणीचा कोयता न देता पाटी- पेन्सिल देऊन आयुष्याला वेगळे वळण दिले. ऊसतोडणी करणारा मजूर वर्षांतले पाच-सहा महिने आपली मुलंबाळं व जनावरं घेऊन ऊसतोडणीसाठी गावोगाव भटकत असतो. दिवस-रात्र मेहनत करून पावसाळय़ात आपल्या गावी शेतीची कामे करण्यासाठी येतो व पुन्हा आपल्या ऊसतोडणी कामासाठी भटकंती करतो. अशा भटकंतीच्या आयुष्यात मुलांचं शिक्षण होणं अवघड असतं. पण पोपटरावांच्या पालकांनी आपल्या मुलाला जसं जमेल तसं त्या त्या गावातल्या शाळेत पाठवलं. अगदी लहान असताना काळजावर दगड ठेवून पोपटरावांचे पालक एकटय़ाला शिक्षणासाठी आपल्या गावी ठेवून ऊसतोडणी करण्यासाठी जात. सात-आठ वर्षांचे पोपटराव शिक्षणाच्या ओढीने एकटे कसे राहिले, स्वयंपाक करता येत नसताना हळहळू कसे शिकले, आलेल्या प्रत्येक संकटावर कसे मात करत पुढे जात राहिले, अशिक्षित असल्याने सावकाराकडून त्यांच्या कुटुंबाची कशी पिळवणूक झाली, पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबाला प्रसंगी काय काय करावे लागले हे खरंच वाचण्यासारखे आहे.

‘काजवा’ या आत्मकथनात पोपटरावांच्या जन्मापासून ते शिक्षण अधिकारी होण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास आपल्याला वाचायला मिळतो. आत्मकथनाला प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांनी ‘अंधार भेदणारं उजेडसूत्र’ या नावाची उत्कृष्ट अशी प्रस्तावना लिहिली आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव पोपटरावांनी अगदी प्रांजळपणे मांडले आहेत. त्यात त्यांना आलेले कटू अनुभव, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कामगिरी बजावताना होणारा त्रास, प्रसंगी शासनाकडून होणारी चौकशी, आपला प्रामाणिकपणा जपत काम करणारे अधिकारी व पदावर असताना पोपटरावांनी शिक्षणक्षेत्रात सुरू केलेले नवनवीन उपक्रम इत्यादींची माहिती आपल्याला वाचायला मिळते.

खरं तर शिक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांनी समाजसेवक या नात्याने आपले काम प्रामाणिकपणे केले तर वंचितांच्या आयुष्यात कसा बदल होऊ शकतो हे पोपटरावांच्या शिक्षणक्षेत्रातल्या कार्यावरून समजते. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची समाजाला गरज आहे. त्यामुळे हे आत्मचरित्र समाजातल्या प्रत्येकासाठी प्रेरक आहे.

अनेकदा आत्मकथनात लेखक ‘स्व’च्या प्रेमात अडकून राहिल्याने त्याचे स्वप्रेमाचे उमाळे सबंध पुस्तकभर झळकत राहतात. पण पोपटरावांनी आपल्या आयुष्याचा संघर्षमय पट दु:खाचं भांडवल न करता सहजपणे मांडला आहे. शिक्षण क्षेत्रातली नकारात्मक बाजू जशी स्पष्टपणे मांडली आहे, तशीच या क्षेत्रातले शासनाच्या निर्णयामुळे होणारे सकारात्मक बदलही मांडले आहेत. काही माणसं स्वत:चं आयुष्य चांगलं घडविल्यानंतर शांतपणे फक्त स्वत:साठी जगतात. पण पोपटराव तसे नाहीत. त्यांनी आपल्या लहान भावांना व पत्नीला प्रोत्साहन देऊन उच्चशिक्षण दिले. अनेक विद्यार्थ्यांना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन व योग्य ती मदत केली. काजव्याप्रमाणे स्वत: जळत दुसऱ्यांना प्रकाश दाखविण्याचा प्रयत्न केला.

लोकांच्या आयुष्यात साखरेचा गोडवा देणारा कारखाना मजुरांच्या आयुष्यात काळा धूर सोडत राहतो.. हे जरी खरं असलं तरी शिक्षणाचा दिवा मजुरांच्या जीवनात पेटला की तो काळा धूर बाजूला सारून आयुष्य उजळवतो. बोलकं मुखपृष्ठ व मलपृष्ठ पुस्तक वाचण्याची आपली उत्सुकता वाढवितात. आत्मकथनाची भाषा साधी, सोपी, प्रवाही आहे. लेखकाच्या ‘स्व’चे अनुभव कुठेही रटाळ होत नाहीत. शिक्षणाचा गंध नसणाऱ्या घरात जन्म होऊनही शिक्षण अधिकारी होण्यापर्यंतचा लेखकाचा प्रवास प्रत्येक विद्यार्थ्यांला जसा प्रेरक आहे तसा शिक्षकांनाही आहे. समाजातल्या वंचित, अज्ञानाच्या अंध:कारात जगणाऱ्या प्रत्येकाला प्रकाशवाट दाखविणारं, ‘अत्त दीप भव’ या गौतम बुद्धांच्या वचनाची आठवण करून देणारं हे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचावं असचं आहे.

‘काजवा’, पोपट श्रीराम काळे, मनोविकास प्रकाशन, पाने- २७२, किंमत- ३५० रुपये  

mukatkar@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajava popat shreeram kale book review zws
Show comments