प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
१९३३ साली नागपूरमधील बेला या लहानशा खेडय़ामध्ये आगे कुटुंबात एक मुलगी जन्माला आली. तिच्या रूपावरून आई-वडिलांनी तिचे नामकरण ‘प्रभा’ असे केले. ही प्रभा पुढे आपल्या कर्तृत्वाचा प्रकाश पाडून अवघे चित्रकला क्षेत्र उजळून टाकेल असे भाकीत त्यावेळी कोणी केले असते तर त्यावर विश्वास बसणे अवघड होते. पण विधिलिखित काही वेगळेच होते. या मुलीने आपल्या कलासाधनेने संपूर्ण कलाविश्व उजळून टाकले व आपले ‘प्रभा’ हे नाव सार्थ केले. अर्थात हा प्रवास करण्यासाठी प्रभाला खडतर तपश्चर्या करावी लागली.
प्रभाने आपले आरंभीचे कलाशिक्षण नागपूरच्या ‘नागपूर स्कूल ऑफ आर्ट’मध्ये घेतले. पण तिच्या चित्रकल्पनांना तेथे योग्य वाव मिळेना. तिच्या कलासक्त मनाला कलेच्या अथांग महासागरात डुंबायचे होते आणि त्याकरता चित्रकारांची पंढरी मानल्या गेलेल्या मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टकडे तिचे डोळे लागले होते. पण या इच्छेला मुरड घालणारी आर्थिक परिस्थिती त्याआड येत होती. हा अडसर दूर करायचा ठाम निर्धार प्रभाने केला आणि शेवटी तो दूर करून प्रभाने मुंबईत पाय ठेवला.. सोबत केवळ दोन-अडीच रुपये घेऊन. ज्या जे. जे.चे स्वप्न तिच्या डोळ्यांत सदैव चमकत होते, त्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रभाच्या कलेला पूर्ण वाव मिळाला. तिच्या आयुष्यासोबतच तिच्या पॅलेटवर कलेचे अनेक रंग उधळू लागले. कधी जलरंगांच्या माध्यमातून, तर कधी तैलरंगांतून! जे. जे.मध्ये शिकत असताना प्रभाने जलरंगांत ‘भारतीय स्त्रिया’ या विषयावर एक लहानशी चित्रमालिका केली होती. आणि एअर इंडियाने ही सर्व चित्रे तेव्हा सत्त्याऐंशी रुपये आठ आण्याला प्रत्येकी एक याप्रमाणे खरेदी केली होती. या चित्रांचा वापर इन-फ्लाइट मेनूकार्डच्या कव्हरसाठी त्यांनी केला होता.
कोणत्याही चित्रकाराचा आरंभीचा काळ हा वस्तुनिष्ठ चित्रे काढण्याचा असतो. प्रभाच्या बाबतीतही तेच घडले. पण पुढे तिने पॉल क्ली यांना आदर्श मानले आणि त्यांच्या अमूर्त चित्रशैलीचा मागोवा काही काळ तिने घेतला. त्यांच्या आधुनिक शैलीतील स्वैर चित्रांकनावर पॉल क्ली या ज्येष्ठ चित्रकाराची छाप दिसून येत होती. याचबरोबर व्हॅन गॉग, पिकासो, अमृता शेरगील यांचेही आदर्श तिने डोळ्यासमोर ठेवले होते. पुढे अमृता शेरगील या चित्रकर्तीने तिच्या मनावर प्रचंड पगडा बसवला. अमृता शेरगीलने संपूर्ण भारत फिरून ग्रामीण स्त्रियांची दु:खे पाहिली, अनुभवली होती. तेच पुढे प्रभा यांनीही केले. त्यांनी दुर्गम भागातील आदिवासी स्त्रियांचा शोध घेतला. त्यांची दु:खे समजावून घेतली आणि पुढे या आदिवासी स्त्रिया प्रभा यांच्या चित्रांचा विषय ठरल्या.
जे. जे.मध्ये शिकत असतानाच प्रभा यांनी आपले पहिले चित्रप्रदर्शन भरवले. या प्रदर्शनातील चित्रांनी प्रभा यांना चांगलेच यश मिळवून दिले. एवढेच नव्हे, तर त्यातील तीन पेंटिंग्ज डॉ. भाभा यांनी आपल्या कलासंग्रहासाठी विकत घेतली. त्यातून प्रभाचे नाव उच्च कलावर्तुळात पोहोचले. त्याच सुमारास विदर्भातीलच एक विद्यार्थी जे. जे.मध्ये शिकण्यासाठी आला होता. पेंटिंग्ज व शिल्प या दोन्ही कला त्याला साध्य होत्या. हा कलाकार होते- पुढे शिल्पकलेत उच्चस्थानी पोहचलेले विठ्ठल बडगेलवार तथा बी. विठ्ठल! विठ्ठल यांना आरंभापासूनच पुराणे, तत्त्वज्ञान, प्राचीन भारतीय कलेत रुची होती. मानवी शरीराकृतीवर त्यांचा अभ्यास सुरू असे. जोडीला ते अर्थार्जनासाठी स्टेज डिझाइिनग, साइन बोर्ड्स यांचीही कामे करीत. पुढे ते पेंटिंग करू लागले. त्यांच्या पेंटिंग्जमध्ये जरी अमूर्त आकार असत, तरी त्यातली लय ते सांभाळून असत. त्यांची पेंटिंग्ज मोठमोठय़ा कॅनव्हासवर केलेली असत. अत्यंत सहजगत्या ते कॅनव्हास हाताळत. मात्र पुढे त्यांनी आपल्या कलेचा केंद्रिबदू शिल्पकला हाच ठेवला. त्यांची पेंटिंग्ज असोत वा शिल्पे- दोन्हींत सौंदर्यशास्त्र, पोत, घडण, त्यातील कारागिरी या सर्वच बाबतींत ती श्रेष्ठ ठरली. अगदी सहज ते द्विमितीपासून त्रिमितीकडे वळले. अशा या कलाकाराच्या सान्निध्यात प्रभा आल्या आणि रंग-रेषेबरोबरच दोघांच्या आयुष्याच्याही रेषा जुळल्या. १९५६ साली त्या बी. विठ्ठल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि स्वत:ही ‘बी. प्रभा’ या नावाने प्रसिद्धी पावल्या. बी. विठ्ठलांशी त्यांचा संसार अधिकाधिक उन्मुक्त कलानिर्मितीचा ठरला. लग्नाचे वर्ष उभयतांनी एकत्र कलाप्रदर्शन भरवून साजरे केले. इथून चित्रकार बी. प्रभा हे नाव कलाक्षेत्रात गाजू लागले.
फ्रेंच इम्प्रेशनिस्टपासून प्रोत्साहित झालेल्या बी. प्रभा आपल्या मनातील सुप्त इच्छाशक्तीचा परामर्श घेत आणि प्रयोगशीलतेची तहान भागवत असतानाच त्यांचा कलाप्रवास अमूर्ततेकडून अलंकारिकतेकडे वळला. त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी भारतीयत्वाचे रंग भरले. १९५८ सालच्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तेथे चित्र प्रदर्शित झाल्यावर बी. प्रभा हे नाव चर्चेत आले. त्याकाळी भारतात स्त्री-कलाकार अभावानेच होत्या. आपणही सामान्यांतील सामान्यापर्यंत पोहोचायचे ही आकांक्षा त्यांनी बाळगली. दुसरी अमृता शेरगील बनण्याचे त्यांनी ठरवले. आधुनिकतेकडून वास्तवतेकडे वळण्याचे माध्यम म्हणूनही कदाचित त्यांनी हा विचार केला असावा. त्यांच्या संवेदनशील मनाला जाणवल्या भारतातील स्त्रियांच्या व्यथा! त्यांची दु:खे, त्यांच्या विवंचना जवळून पाहून त्यांची चित्रे साकारण्यास त्यांनी सुरुवात केली. भारतीय स्त्रीजीवनाचा त्यांचा हा अभ्यास अमृता शेरगील यांची आठवण करून देतो. बी. प्रभा यांनी रंगविलेल्या चित्रांचे विषय मुंबईच्या कोळी महिला, समुद्रकिनारे, भाजी विकणाऱ्या बायका, वधूचा लग्नसोहळा, मडकी विकणाऱ्या आदिवासी स्त्रिया असे असत. पुरुषी चेहरे मात्र बी. प्रभाच्या कॅनव्हासने नेहमीच नाकारले.
बी. प्रभा यांना चित्रकलेइतकीच संगीताचीही आवड होती. त्यांचा आवाजही गायनास अनुकूल होता. किंबहुना चित्रकला व संगीत यांतून नेमकी कशाची निवड करायची, हा संभ्रमही आरंभी त्यांचा मनात होता. पण दोन्हीत प्रावीण्य मिळवून यशाचे शिखर गाठणे कठीण आहे, हे ओळखून त्यांनी चित्रकलेला वाहून घेतले. संगीत सोडणे त्यांच्यासाठी कष्टप्रद होते. त्याचवेळी त्यांनी मनाशी एक निर्णय घेतला, की पेंटिंग्जना संगीताची जोड द्यायची! ‘मी हाताने पेंटिंग्ज करेन त्यावेळी कानाने गाणे ऐकेन..’ असे म्हणून त्यांनी दोन्ही कला एकत्र आणल्या आणि त्यामुळेच त्यांच्या चित्रांतून संगीताचा बाज नेहमी आढळतो. त्यांनी एका पेंटिंगमध्ये एक मुलगी दाखवून तिच्या डोक्यावर एक गडद रंगाचा ढग दाखवला होता. आपल्या जीवनात या मुलीने काय कष्ट सोसलेत, त्याचे ते प्रतीक होते. स्त्रियांची दु:खे, त्यांच्यावरील आघात दृश्यरूपात आणणे, हेच लक्ष्य त्यांनी आपल्या चित्रांत ठेवले. बी. प्रभा यांच्या चित्रांतील आदिवासी स्त्रिया या उंच माना, लांब हात-पाय असलेल्या दिसतात. स्त्रियांच्या विविध अवस्था दाखवणाऱ्या या चित्रांनी आपला डौल किंचितही ढळू दिला नाही. चित्रांमध्ये तांबडा, निळा, पांढरा रंग वापरून त्या भारतीय मातीशी नाते सांगणारी रंगसंगती साधत. त्यामुळे अस्सल भारतीयत्वाने नटलेली ही चित्रे त्यातील सहजता, सुलभता, पोत आणि लावण्यमय आकार पाहणाऱ्याला आत्मिक समाधान देत. आपल्या स्वैर कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक कलापद्धती हाताळल्या. निसर्गचित्रांबरोबरच मानवी जीवनाला भेडसावणारे गंभीर विषय (दुष्काळ, भूक, बेघर, बांगलादेश युद्धाचे आघात, आदी) त्यांनी हाताळले. ते हाताळताना त्यातल्या व्यथेला त्यांनी वाचा फोडली. त्यांच्या दु:खाशी त्या समरस झाल्या.
आपल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत बी. प्रभा यांनी देश-परदेशात ५० च्या वर चित्रप्रदर्शने भरविली. स्पर्धात्मक प्रदर्शनांतून अनेक पारितोषिके, मानसन्मान मिळवले. या कलाकार पती-पत्नींचा संसार चित्रसंपन्न होता. त्यांच्याकडे अनेक कलाकारांचा राबता असे.
बी. प्रभा यांचे व्यक्तिमत्त्व कोणालाही आदर वाटावा असे होते. सावळा रंग, बोलके डोळे, प्रेमळ नजर, इतर स्त्रियांनी हेवा करावा असे लांबसडक केस त्यांना लाभले होते. कधी कधी लांब केसांचा पेंटिंग करताना त्यांना अडथळा होई. मग केस कापण्याचा विचार त्या बोलून दाखवीत. परंतु बी. विठ्ठल यांचा त्यास विरोध असे. मग ते स्वत: त्यांचे केस नीट विंचरून देत असत. सर्वाशी मिळून-मिसळून वागण्याचा प्रेमळ स्वभाव असलेली ही चित्रकर्ती सर्वानाच मदत करायला तत्पर असे. विशेषत: होतकरू कलाकार व कलाविद्यार्थ्यांच्या मदतीसाठी त्यांचा हात सदैव पुढे असे. स्त्रियांबद्दल कळकळ, आस्था बाळगणाऱ्या बी. प्रभांनी ‘मला अद्यापि सुखी व आनंदी स्त्री भेटायची आहे,’ अशा शब्दांत आपले मत व्यक्त केले आहे. कला- क्षितिजावर तेजाने तळपणाऱ्या या चित्रकर्तीचा महाराष्ट्र शासनाने १९८७ साली राज्य कला प्रदर्शनात सत्कार करून गौरव केला. असा सुखी संसार सुरू असताना १९९२ मध्ये बी. विठ्ठल अनपेक्षितपणे त्यांचा हात आणि साथ सोडून या जगातून निघून गेले. बी. प्रभा यांच्या आयुष्यात एक प्रचंड पोकळी निर्माण झाली. पण दु:ख गिळून त्यांनी स्वत:ला सावरले व चित्रकलेत स्वत:ला पूर्णपणे गुंतवून घेतले. १९९३ साली बी. प्रभा यांनी आपले ५१ वे प्रदर्शन भरवले अन् त्या रूपाने त्यांनी आपल्या दिवंगत पतीला श्रद्धांजली वाहिली.
‘उत्कृष्ट पेंटर होण्यासाठी आवश्यक गोष्टी म्हणजे तुम्ही एक चांगला माणूस असणे आवश्यक आहे. सभोवतालचे सौंदर्य तुम्हाला दिसणे गरजेचे आहे. तुमचे मन संवेदनशील हवे. आकाशातील सूर्य, चंद्र, तारे पाहा. त्यांचे सौंदर्य अभ्यासण्यासाठी तुम्हाला एक जन्मही पुरणार नाही. मानवी आकारांचा अभ्यास व सराव सतत करत राहिले पाहिजे. अॅनाटॉमी अतिशय महत्त्वाची असते. सततच्या सरावाने हात साफ होतो, अन्यथा तो आखडतो. गायक आणि संगीतकाराप्रमाणे चित्रकारानेही रियाज करणे अत्यंत आवश्यक आहे,’ असा संदेश बी. प्रभा यांनी कलाकारांना व कलाविद्यार्थ्यांना दिला.
आपल्या अफाट कलासाधनेतून निर्मितीची एक निश्चित वाट चोखाळणाऱ्या या चित्रकर्तीने २० सप्टेंबर २००१ रोजी या जगाचा निरोप घेतला. संपूर्ण कलाविश्वात आपल्या तेजाचे कण उधळून, अनेकांना मार्ग दाखवून ही प्रभा अखेर मावळली.
rajapost@gmail.com