|| अभिजीत ताम्हणे
फ्रान्समधल्या लिऑन या शहरातली फॅगोर फॅक्टरी आता बंद पडली आहे. अर्थात याच शहरातले किती तरी उत्पादक कारखाने बंद पडलेले आहेतच; जसे कुठल्याही शहरात असतात. पण लिऑन शहरातलं दृश्यकलेचं द्वैवार्षिक प्रदर्शन यंदाच्या १५ व्या खेपेला फॅगोर फॅक्टरीत गेल्या मंगळवारपासून (१५ सप्टेंबर) भरलं आणि या कारखान्याचे कंगोरे जगभरच्या कलाप्रेक्षकांना उघडय़ा डोळ्यांनी पाहण्याचा मार्ग खुला झाला. लिऑनची ही द्वैवार्षकिी किंवा बिएनाले ५ जानेवारी २०२० पर्यंत खुली राहणार आहे. आपल्या केरळमध्ये कोची शहरात भरणारी कोची मुझिरिस बिएनाले ज्या आस्पनवॉल हाऊसमध्ये नेहमी भरते, तोही कारखानाच होता. इतकेच नव्हे तर जगातली पहिली द्वैवार्षकिी म्हणजे व्हेनिस बिएनाले- तीही मुख्यत: जिथे जिथे भरते ते आस्रेनाल हेही दारूगोळ्याचा कारखानाच तर होतं मध्ययुगापासून. मग फॅगोर फॅक्टरीचंच काय एवढं कवतिक?
फ्रेंच माणसं एखाद्या गोष्टीला भिडली की मनापासून भिडतात. त्यात यंदाच्या लिऑन बिएनालेला एकटय़ादुकटय़ाचं नव्हे, आठ जणांची नावं गुंफणकार किंवा क्युरेटर म्हणून.. या आठही जणांनी एका बंद, प्रदूषित कारखान्यावर गेले काही महिने प्रेम केलं आणि शिवाय लिऑन शहराला प्रदर्शनाच्या नियोजनात पुरेसा न्याय मिळाला पाहिजे, या शहरालगतच्या ग्रामीण भागावरही अन्याय नको, आदी अपेक्षांचंही आव्हान पेललं. तब्बल ५६ दृश्यकलावंतांकडून लिऑन बिएनालेसाठी- त्यातही फॅगोर फॅक्टरीसाठी- कलाकृती करवून घेतल्या. म्हणजे एक तर या कारखान्याच्या भग्नतेला, संहारकतेला आणि अशा भकास वर्तमानच्या दर्शनातून उत्पादकोत्तर (पोस्ट इंडस्ट्रिअल) काळाबद्दल जी चिंता वाटते तिला प्रतिसाद देतील असेच दृश्यकलावंत निवडले आणि दुसरं म्हणजे, या निवडलेल्या कलावंतांना वेळ आणि सर्वपरींचं साह्य़ दिलं. त्यात भारतीय एकही नसणं, हा अन्याय आहेच. नवे, समकालीन भारतीय कलावंत काय फक्त कॉपीच करतात असं वाटतं की काय यांना? तसं नाही, हे भारतीय कलावंत सिद्ध करत असतातच. पण अखेर, अनेक बिएनाले फक्त दृश्यकलावंतांशी नव्हे तर खासगी कलादालनांशीही संबंध राखून असतात. हे असं कालबाह्य कारण, भारतीय कलावंत इथं नसण्याशी नाइलाजानं जोडावं लागतं.
अर्थात, लिऑनला यंदा कोरियन, थाई, युरोपातल्या लहान, नगण्य देशांचे कलावंत होतेच आणि त्यांच्या कलाकृतीही प्रेक्षकाला आधी आकर्षून घेणाऱ्या- मग विचारप्रवृत्त करणाऱ्या- अशाच आहेत. त्यामुळेच लिऑनची बिएनाले तीन-चार दिवस त्या शहरात राहून पाहिल्यानंतर एक विचित्र प्रश्न पडला : या बिएनालेनं जगाचं आशादायक चित्र उभं केलं की निराशाजनक?
संभाव्य उत्तर आहे.. असं काही चित्रबित्र उभं करण्याची वेळ कधीच निघून गेली आहे. आणि आशा-निराशेच्या या आजच्या खेळात विद्यमान निराशेला समकालीन कलेत कसं सामावून घ्यायचं यांचे मार्ग शोधले पाहिजेत, हे.
मग पुढचा प्रश्न : कशाला सामावून घ्यायचं त्या निराशेला.. कलावंतानं कसं आनंदी असावं, फुलांसवे गाणी गावीत, रसिकांना जगण्याची उमेद द्यावी.. ते सोडून निराशा वगैरे हवीच कशाला?
संभाव्य उत्तर : रसिकांचं किंवा अरसिकांचंही भलंच व्हावं असं वाटणारा आजचा कलावंत जर आजच्या जगाकडे न पाहता ठरावीक (म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यवाद जेव्हा पहिल्यांदा कलेत रुजला, त्या काळात ठरत गेलेली) गाणीच गात बसला, तशीच छान छान निसर्गदृश्यं चितारत राहिला, तर ती आजच्या काळाशी प्रतारणा किंवा धूळफेकच!
हे उत्तर उगाच आलं मनात म्हणून लिहिलेलं नाही. लिऑन बिएनालेसंदर्भातही ते खरं आहे. निसर्गदृश्य याचा अर्थ आता कलेतही बदलावा लागेल, नव्हे तसा तो बदललेलाच आहे, असं म्हणणं लिऑन बिएनालेच्या गुंफणकारांनी ठामपणे, सोदाहरण मांडलं आहे आणि त्यासाठी १९८९ साली लिहिलं गेलेल्या ‘इकॉलॉजी, कम्युनिटी अँड लाइफस्टाईल : आउटलाइन ऑफ अॅन इकॉसॉफी’ या आन्रे इनेस यांच्या पुस्तकातून, आपण आता नैसर्गिक वातावरणात राहतच नसून वातावरण आपणच घडवतो आहोत- या प्रतिपादनाचा आधारही घेतला आहे.
हरीण, सिंह, म्हैस, बकरी अशा जनावरांची अगदी हुबेहूब शिल्पं यंत्रांवर कलेवरांसारखी पडली आहेत, तीच प्राणिशिल्पं समोरच्या व्हिडीओमध्ये मोटारगाडय़ांच्या बॉनेटवर लादली गेली आहेत आणि या मनुष्यहीन मोटारी यांत्रिक करामतीमुळे वेगात धावून, एकमेकींना ठोकरतात.. निको व्हासिलेरी याची ही कलाकृती, किंवा ईव्हा ल होस्ट यांच्या व्हिडीओ कलाकृतीतली कागदी पानं, ही या लिऑन बिएनालेतली दृश्यं, निसर्गाचा अर्थ बदलत असल्याची साक्ष देत राहतात. पण बाकीच्या अनेक कलाकृती निसर्गावर मात करण्याचा माणसाचा प्रयत्न कसा वाढत गेला, मात कशी यशस्वी होते आहे, याची ग्वाही देतात.
उदाहरणार्थ, अब्राहम पोइन्शेव्हाल या दृश्यकलावंताचं बलून उड्डाण! हा पठ्ठा दिवसरात्र मोठय़ा उडत्या हेलियम बलूनच्या खाली टांगलेल्या तंबूत राहिला आणि सकाळी उठून, तंबूच्याही बाहेर पडून चार दोर स्वत:च्या अंगाला बांधून हवेतल्या हवेत चा-ल-ला! हा अब्राहम पोइन्शेव्हालचा व्हिडीओ. (तांत्रिक करामत कुठेही नाही) एकीकडे, तर दुसऱ्या कलाकृतीत, १९ जानेवारी १७८४ रोजी लिऑनमध्ये बलून उडविण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. त्याची आठवण देणारा, पण प्रत्यक्षात अठराव्या शतकातल्या युरोपीय स्त्रिया अंगभर जे कॉस्रेट अंतर्वस्त्र म्हणून पेहेरत त्यासारख्या आकाराचा मोठा बलून दिसतो. मॉस्कोतल्या ताउस माखाशेवा या दृश्यकलावतीची ही कलाकृती आहे. योना ली या दक्षिण कोरियाच्या तरुण दृश्यकलावतीनं फॅक्टरीतच सुमारे पाच मजली उंचीवर, मालवाहतुकीचा कन्टेनर असतो तितक्या रुंदीचं एक राहण्याचं हॉटेल बांधलं आहे. त्याला भिंती नाहीत. दम लागेपर्यंत पायऱ्या चढून इथं जावंसं वाटतंच, कारण तेवढय़ा उंचीवरून या दालनातल्या बाकीच्यांच्या कलाकृती कशा दिसतात हे आपल्याला पाहायचं असतं. म्हणजे इथं बाकीच्या कलाकृती आपण जणू हिल स्टेशनला एखाद्या पॉइंटवरून निसर्ग पाहावा तशा पाहणार असतो!
बोगदा खणण्याच्या कामामुळे रस्त्यावर किती तरी अशा वस्तू दिसू लागतात, ज्या एरवी दिसत नाहीत. बोगदा खणण्याच्या महाकाय यंत्रालाच कलादालनात मांडून, त्याभोवती या अनपेक्षित वस्तूंचं मांडणशिल्प करताना जणू रस्त्याच्या पुनर्जन्माचा उत्सव साजरा करत असल्याचा आव लंडनमध्ये राहणारे, पण मूळचे आयरिश दृश्यकलावंत सॅम किओग यांनी आणला आहे.. ते उत्सवी अवसान उसनंच आहे, प्रत्यक्षात तर रस्ता उसवून पडला आहे, त्याचा कोथळाच बाहेर निघतो आहे असं जाणवत राहतं.
पन्नफन योदमणि हा थायलंडचा चित्रकार. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्याला थाई बौद्ध परंपरेतलं कलाशिक्षण मिळालं. पण पुढे पाश्चात्त्य कलाही तो शिकला. लिऑन बिएनालेसाठी त्यानं एक मोठ्ठा, टाकाऊ झालेला सिमेंट पाइप निवडला. आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांमधली अतिगरीब माणसं ज्या पायपांत राहत, तेवढा मोठा हा पाइप. त्याच्या आतल्या भिंतींवर पन्नफन योदमणि यांनी पारंपरिक बौद्ध आणि पाश्चात्त्य भित्तिचित्रं अगदी लहान आकारात नकलून काढली आहेत. चित्रांमधली कल्पना किंवा दृश्यं जुनी, पण पौर्वात्य आणि पाश्चात्य चित्रं एकमेकांत मिसळण्याची, फ्रेस्को आणि गुहाचित्रं या दोन्ही परंपरांना याच बंद फॅक्टरीतल्या फुटक्या पायपात एकमेकांजवळ आणण्याची किमया पन्नफन योदमणिची.
जितकं पाहावं, तितक्या संकल्पना स्पष्ट होत जाव्यात असा अनुभव गांभीर्यानं गुंफण केलेल्या कोणत्याही प्रदर्शनात येतोच. पण इथं लिऑन बिएनालेत कलावंतांना आपापल्या संवेदना जपण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यामुळेच काही कलाकृती अगदी एकमेकींसारख्या, काही एकमेकांशी फटकून अशी दृश्यरूपं इथं पाहायला मिळतात.
संवेदनांची जोड संकल्पनांना मिळाल्यामुळे अनेक अनुभव इथं थेट प्रेक्षकाला भिडतात. स्वत:ची लैंगिकता स्वत:ला ठरवू देणारं लिंगस्वातंत्र्य आणि ते न मानणाऱ्या जगाला अॅशली हान्स शीर्ल आणि जेकब लेना या लिंगस्वातंत्र्यवादी जोडीनं दात विचकून दाखवणं, कोसोव्होतल्या रूनिक या गावामध्ये सर्बयिन यादवीदरम्यान झालेल्या जाळपोळीच्या स्मृती पुसण्याचा हेतुपुरस्सर होत असलेला प्रयत्न आणि त्याविषयीच्या पेट्रिट हालिलाय यांच्या व्हिडीओ तसंच मांडणशिल्पात दु:स्वप्नातून जागं होणं, असे हे अनुभव.
तोच आजच्या संदर्भात कलेचा अनुभव म्हणावा काय? उत्तर वाचकांनीच (आधी स्वत:ला) द्यावं, पण संकल्पनांचा संवाद संवेदनेशी घडल्यावर कलेचा अनुभव अधिक प्रवाहीपणे भिडू शकतो, हे यंदा लिऑन बिएनालेनं दाखवून दिलं. लिऑन हे शहर दोन नद्यांच्या संगमावर वसलं आहे आणि यंदाच्या बिएनालेची मध्यवर्ती कल्पना- पाण्याला मिळत जाणारे पाणी- अशी आहे, हा निव्वळ योगायोग म्हणा हवं तर!
abhijeet.tamhane@expressindia.com