कविकुलगुरू कालिदास हा चित्रकार असावा असा दाट संशय यावा इतपत त्याचे चित्रकलेचे ज्ञान सखोल होते, हे त्याची वाङ्मयीन चित्रदर्शी वर्णनशैली, चित्रकारितेच्या तत्त्वांचा त्यातला वापर, चित्रसंकल्पनांचे उपयोजन यांतून दिसून येते. निदान तो जाणकार कलामर्मज्ञ निश्चितपणे असावा.
कलावंत त्याच्या प्रतिभाशक्तीने नित्यनूतन असं भावविश्व निर्माण करत असतो आणि त्यातून मिळणारा अलौकिक आनंद घेत असतो आणि रसिकांनाही देत असतो. या प्रतिभेबाबत अलंकारशास्त्रज्ञ भट्टतौत म्हणतो :
प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मता।
तदनुप्राणनाजीवद् वर्णनानिपुण: कवि:।।
अर्थात् तेजाच्या नित्यनवीन उन्मेषाने चमकणारी बुद्धी म्हणजेच ‘प्रतिभा’ होय आणि त्या प्रतिभेच्या चैतन्याचा संचार झाल्यामुळे ज्याच्या वर्णनामध्ये जिवंतपणा उत्पन्न होतो, तो ‘कवी’ होय.
परंपरेनुसार ‘महाकवी’ हे बिरूद लावणारे भवभूती, बाण, भास यांच्यासारखे खरोखरच उत्तम असे खूप कवी संस्कृतात होऊन गेले; पण ‘कविकुलगुरू’ ही पदवी आणि महाकवीपदाची महावस्त्रे खऱ्या अर्थाने लाभली व शोभली ती कालिदासालाच! कालिदासाच्या नावाने घातलेल्या करंगळीच्या शेजारची अनामिका ही आजतागायत ‘अनामिका’च राहिली आहे.
त्याची वाङ्मयीन महत्ता साठवली आहे ती त्याच्या विलक्षण प्रतिमाविश्वात! साहित्यात किंवा चित्रात म्हणा, अखेरीस कलाकाराची प्रतिभा जिवंत किती वाटते आणि तिने ऊर्जेचे उत्थापन किती होते, याला महत्त्व आहे. साहित्यात हा जिवंतपणा भावनेमुळे येत असेल; (भावना ऊर्जेचे उत्थापन करते म्हणून तर तिला कलेत अनन्यसाधारण महत्त्व आहे.) पण तो चित्रात व्यक्त होतो तो रंग-रेषादींमुळे. वाङ्मयाचे वाहन शब्द हेच असते. वाङ्मयातसुद्धा प्रतिमांचीच साधना करायची असते; पण ती रंग-रेषा, नाद यांनी अन्य ललितकलांत सरळसरळ होते तशी- म्हणजे शब्दांत अंतर्भूत अर्थाने होऊ शकत नाही. कालिदासांचं वाङ्मय हे तर प्रतिमासाधनेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रतिमासाधनेसाठी जे- वाक् आणि अर्थ- हे मिथुन आवश्यक ठरतं त्या वाङ्मयविश्वाच्या प्राणशक्तीचं महत्त्व व माहात्म्य ओळखून या महाकवीने ‘रघुवंशा’च्या सुरुवातीलाच त्यांची गंभीर आळवणी केली आहे..
वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।
जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ।।
चित्रकार प्रतिमेची- म्हणजे रेषा, आकार, घनता, रंग, पोत आदीची साधना करतो. प्रतीकात्मक उमटण्यात त्याला रस असतो. कालिदासाच्या साहित्यात ही ‘शब्दप्रतीके’ विपुल प्रमाणात सापडतात. आपल्या वाङ्मयात त्याने प्रतिमेचीच पूजा बांधली आहे. एखाद्या कुशल चित्रकारासारखीच रंगरेषादी आकारांची साधना तो करतो. त्याच्या काव्य-नाटकांतून हे सोदाहरण सिद्ध होतं. त्यांत प्रकट होणारं कालिदासाचं व्यक्तिमत्त्व अनुभवसंपन्न व कलासक्त आहे. केवळ त्यांतली त्याची प्रतिमासृष्टी जरी घेतली, तरी त्याच्या कुतूहलाचा व जाणकारीचा पल्ला किती व्यापक होता याची कल्पना येते. सर्व प्राचीन विद्या व शास्त्रे त्याला अवगत होतीच; पण नाटय़, संगीत, चित्र इत्यादी कलांमध्येही त्याला सक्रिय आस्था होती. केवळ चित्रदर्शी वर्णने हेच कालिदासाच्या इंद्रधनु साहित्यकृतींचं वैशिष्टय़ नाही. त्याहूनही एक आगळा विशेष म्हणजे चित्रकलाविषयक त्याचे दोन्ही- शास्त्र व कर्म- पक्षाचे ज्ञान सर्वत्र प्रतिबिंबित झाले आहे. कालिदासाची जातकुळी एकंदरीतच चित्रकारितेची आहे.
चित्रांचे प्रकार, चित्रकलेचे साहित्य, चित्रकलेचा उपयोग याविषयीची त्याची जाण प्रगल्भ होती. ‘चित्र’कल्पनेचे वाहक असलेले शब्द कालिदासाने अनेक ठिकाणी वापरले आहेत. चित्र, सादृश्य, प्रतिच्छंद, प्रतिकृती, आलेख्य, प्रतिमा, प्रतियातन असे शब्द चित्राचे पर्यायी शब्द म्हणून आलेले आहेत. यावरून चित्रांचे विविध प्रकार त्याला माहीत होते असे अनुमान काढता येते. कापडावर किंवा भिंतीवर रंगांनी काढलेल्या चित्रांनाच त्याने ‘चित्र’ शब्द वापरलेला दिसतो, ‘प्रतिमा’ शब्द दगडाची मूर्ती या अर्थी वापरला असून, ‘प्रतियातन’ शब्द लाकडात किंवा दगडात कोरलेले शिल्प या अर्थाने आलेला आहे. तसेच कापडावर उमटविलेली ठशांची चित्रे किंवा विणताना जुळविलेली चित्रे यांचाही उल्लेख आहे. चित्रफलकावर पट किंवा कापड लावून त्यावर काढलेल्या चित्रांचे वर्णन आहे. ‘शाकुंतला’त दृष्यन्त आपण काढलेल्या स्मरणचित्राकडे बघत आपली करमणूक होते काय, हे पाहत असता दु:खमग्न झाल्याचे, तर ‘मेघदुता’मध्ये प्रेमातिशयामुळे यक्षावर रागावलेल्या यक्षिणीचे चित्र शिळेवर गेरूने काढल्याचे भावपूर्ण वर्णन आहे. ‘मालविकाग्न्निमित्र’च्या प्रथम प्रवेशात मालविका अग्निमित्राच्या प्रथम दृष्टीस पडली ती चित्ररूपानेच. या महाकवीने चित्रकलाविषयक मार्मिक उद्गार या प्रकारांचं वर्णन करताना काढले आहेत.
कालिदासाने पृष्ठभागावरील चित्रांचे विशेष विवेचन केले आहे. अशा चित्रांना चित्रफलक, रंग आणि कुंचले या साहित्याची आवश्यकता असते. ‘शाकुन्तल’च्या सहाव्या अंकात दृष्यन्ताचा चित्रप्रदर्शनविधी सविस्तर वर्णिला असून, त्यात हे साहित्य दाखविले आहे. कुंचला, वर्तिका आणि तुलिका असे शब्द कवीने केवळ ‘शाकुन्तला’तच नव्हे, तर इतरही काव्यांत वापरले आहेत. ‘रघुवंशा’तही विरहकातर अग्निवर्ण राजामध्ये सात्विकभावाचा उदय झाल्याने त्याच्या हाताच्या बोटांना घाम येऊन हातातून कुंचला पडत असल्याने तो फार कष्टाने चित्र पूर्ण करू शकत असे, असे वर्णन आहे. चित्रलेखनाच्या साहित्यापैकी रंग हे काही खनिजजन्य व काही वनस्पतिजन्य होते. अजिंठय़ाच्या भित्तिचित्रांतही अशा रंगांचा वापर झालेला आहे. कालिदास आणि अजिंठय़ाची भित्तिचित्रे समकालीन मानली तर चित्रांसाठीची आरेखन, रंगनिर्मिती, रंगलेपन पद्धती, इ. चित्रकलेची तांत्रिक अंगे त्याने जवळून पाहिली असावी. प्रत्यक्षातही अनुभवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. धातुराग म्हणजे खनिजरंग होत. हिमालयातील विद्याधर स्त्रिया भुर्जपत्रांवर धातुरसाने प्रणयपत्रिका लिहीत, असेही वर्णन त्याने केले आहे.
चित्रकलेच्या अनेक उपयोगांपैकी एक म्हणजे गृहसौंदर्य वाढविणे. ‘उत्तर मेघदुता’मध्ये अलकेतील प्रासाद चित्रांनी सुशोभित असल्याचे वर्णन आहे. ‘मालविकाग्निमित्र’मधील नाटय़शालेच्या भिंती चित्रांनी सुशोभित दाखविल्या आहेत. रंगशाळा, चित्रशाळा तसेच नाटकाचार्य, चित्रकलाचार्य ही पदेही आहेत. ‘रघुवंशा’मध्ये भवनांमध्ये वनवासकालीन राम व सीतेची चित्रे असल्याचे उल्लेख हे गृहसौंदर्य वाढविण्यासाठी चित्रे उपयोगात आणली जात याचा निर्वाळा देतात. राजवाडय़ातील चित्रशाळेचा उद्देश राजघराण्यातील स्त्री-पुरुषांची चित्रे काढून ठेवण्याचा उघड दिसतो. चित्रकलेची योजना शिक्षणक्रमात करण्याची ही कालिदासकालीन पद्धती असावी असे दिसते व तिला अनुसरून राजघराण्यातील मुलामुलींनाच नाही, तर आश्रमातील मुलामुलींनाही ही कला व्यवहारोपयोगी म्हणून शिकविण्यात येत असे. कालिदासाने दृष्यन्त, पुरूरवा आणि यक्ष हे नायक ‘रघुवंशा’तील राजा, ‘मेघदुता’तील यक्षिणी ही सर्व पात्रे उत्तम, कुशल चित्रकार म्हणून दाखविली आहेत.
चित्राची उपमा देण्याची कालिदासाला फार आवड दिसते. ‘शाकुन्तला’त नटीच्या रागगायनाने मोहून गेल्यामुळे सारी सभा जणू चित्रात काढल्यासारखी स्तब्ध झाली आहे, असे सूत्रधार वर्णन करतो. ‘रघुवंशा’त दिलीप राजा सिंहावर बाण सोडू लागला असता त्याची बोटे बाणावर तशीच राहून हात हलेनासा झाला, त्यावेळी तो चित्रात काढल्यासारखा जणू दिसू लागला.. अशी चित्रमय वर्णनशैलीची शेकडो उदाहरणे देता येतील.
प्रतिभावंत चित्रकाराला जसा प्रत्येक घटनेचा अन्वयार्थ रेषांच्या दृश्यबंधात लागतो तसा कालिदासाला प्रसंग शब्दांच्या द्वारा दिसतो. आपण रेखाटत असलेला प्रसंग, त्याचे त्या विशिष्ट रचनेच्या आकृतिबंधातील स्थान यांचा त्याला कधीही विसर पडत नाही. आकृतिबंधाची विलक्षण रेखीव आणि कलात्मक जाणीव, त्यासाठी आवश्यक असणारी शब्दकळा, कल्पनासमृद्धी आणि विलक्षण मोठा कलात्मक संयम यामुळे त्याच्या सर्वच रचनांना अनुपमेय सौंदर्य आणि सुघड शिल्पाकृतींचे सौष्ठव प्राप्त झालेले आहे. दृश्यकलेच्या मूलभूत घटकांची व चित्ररचनेसाठी आवश्यक असलेल्या संयोजन तत्त्वांची आरासच कालिदास त्याच्या चित्रदर्शी भाषासौंदर्यातून चित्रकारांपुढे मांडतो.
एखाद्या काव्याचा अनुवाद करून पाहणे म्हणा किंवा ते काव्य रंग, रेषा, आकारादींनी समूर्त करणे म्हणा, त्या कलाकृतीचा अधिक उत्कटपणे रसास्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे. निदान मला तरी कालिदासाच्या साहित्याने चित्रनिर्मितीसाठी प्रेरणा दिल्याने त्याच्या साहित्याशी जास्त जवळीक साधता आली. कालिदासाचे चित्रकलेच्या दोन्ही पक्षाचे- शास्त्र आणि कर्म- सूक्ष्म ज्ञान पाहता तो एक उत्तम, कुशल चित्रकारही असावा असे वाटल्याशिवाय राहत नाही. पण यासंदर्भात त्यांच्या वाङ्मयाव्यतिरिक्त इतर कोणताच पुरावा नसल्याने ‘तो चित्रकार असावा’ या विधानाला पुष्टी मिळत नाही. मात्र, कालिदास चित्रकलामर्मज्ञ होता, हा तर्क खचितच सुसंगत ठरतो.
पंकज भांबुरकर – bhamburkar.pankaj@gmail.com