डॉ. पंकज विश्वास भांबुरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढाच्या पहिल्या दिवशी…म्हणजेच कालिदासदिनी मेघदूताचीच आठवण काढली जाते. पण त्या मेघांच्या कौतुकदाटीवाटीत नेहमीच कालिदासाचे विदूषक झाकोळले जातात. या विदूषकांनी केवळ हास्य निर्माण केले नाही तर कथानायकांच्या प्रेम प्रकरणांच्या सफलतेत मोलाची भूमिका बजावली. इतर संस्कृत नाटकांतील अन्य विदूषकांपेक्षा कालिदासीय नाटकांतील विदूषक सर्वार्थाने आगळे ठरतात ते त्यांच्या कलारसिकत्वामुळे…

संस्कृत नाटकांमध्ये विदूषक हे हसणारं आणि हसवणारं पात्र आहे. स्पष्टवक्ता टीकाकार आणि हास्य निर्माता विनोदकार या दोन्ही भूमिका त्याच्या ठायी एकवटल्या आहेत. नाटकातील नायक राजाचा तो सहचर असून प्रेमात पडलेल्या नायकाला उत्तेजन देणे, मदत करणे, विरह प्रसंगी त्याच्या दु:खावर हळुवार फुंकर घालणे अशा प्रकारची त्याची नाट्यगत कार्य. शृंगार रसाच्या दर्शनात नर्मसचिव किंवाकामसचिव अशी त्याला संज्ञा आहे. रंगभूमीवरील नायकाचा प्रवेश तो सुचित करतो तसेच सेवकाचे वा निरोप्याचे कामही त्याला करावे लागते.

कालिदासाच्या तीनही नाटकांतील विदूषकांत त्या पात्राला आवश्यक असे गुण असले तरी त्या नाटकांमध्ये त्यांच्या आगळ्या भूमिका आहेत. ज्यात ते एकमेकांहून विपरीत पात्रांच्या रूपात दिसतात. अनेक वेळा अशा काही ज्ञानाच्या गोष्टी करतात की कोणी असा दावा करू शकणार नाही की ते मूर्ख आहेत. विदूषक एक विशेषाधिकार प्राप्त चरित्र आहे. ज्याच्याजवळ राजाची चेष्टा करण्याचा, आजूबाजूच्या लोकांचा उपहास करण्याचा आणि त्यासोबत निर्भयपणे ज्ञान आणि पूर्ण सत्य प्रस्तुत करण्याचा परवाना आहे.

हेही वाचा : प्रत्येकाचा जलसण वेगळा…

राजाचे सहचर असल्याने राजाच्या कलागुणांचा विदूषकांना परिचय असतो. एखाद्या चित्रकारासारखी सूक्ष्म निरीक्षणशक्ती त्यांच्याकडे आहे. स्वत: चित्रकार असतील /नसतील; पण चित्राचं महत्त्व आणि महात्म्य ते जाणतात. चित्राविषयी वा चित्रनिर्मिती प्रक्रियेविषयी भाष्य करताना ते कमालीचे गंभीर होतात. हे विदूषक मानसतज्ज्ञाचीही भूमिका घेतात!

मालविकाग्निमित्र –

‘मालविकाग्निमित्रा’त राजा अग्निमित्रानं मालविकेस सर्वप्रथम चित्रात पाहिल्यानंतर तिला प्रत्यक्ष पाहण्यासाठी काहीतरी उपाय शोधून काढण्याचं कार्य त्यानं विदूषकावर सोपवलं असतं. तो सांगण्यासाठी गौतमाचं आगमन दाखवलं आहे. राजा त्याला ज्ञाननेत्रसंपन्न संबोधून उपाययोजनेविषयी विचारतो तेव्हा उपाय काय विचारता, कार्यसिद्धीविषयी विचारा, असा उलट प्रश्न गौतम करतो. अर्थात गौतम मोठ्या चलाखीने नाट्याचार्यांचं भांडण लावून त्यातून नृत्य प्रसंग सिद्ध होऊन योजनापूर्वक मालविकेचं नयनरम्य दर्शन अग्निमित्राला घडवून देतो. प्रयोगक्षमता आणि रंजकता या दृष्टींनी विचार करताना या नाटकाचं मोठं आकर्षण विनोद हेच दिसतं. परिणामी गौतमाचं पात्र सर्वांत महत्त्वाचं ठरतं. कालिदासाच्या गौतमात फुकटचे ब्राह्मण्य, खादाडपणा, भित्रेपणा, कुरूपपणा इत्यादी सांकेतिक विदूषकी विशेष आहेतच. तो नुसता विदूषक नाही. नायकाचा मित्र आहे. कामतंत्र सचिव आहे आणि नायकाला नायिकेची प्राप्ती करून देताना कारस्थानाचे डावपेच लढवताना एखाद्या मुत्सद्द्याचा आव न आणता त्याने बावळा वेश परिधान करून नानाकळा प्रगट केल्या आहेत. गौतमाची बुद्धी तशी त्याची जीभही धारदार आहे. राजाराणी सकट सर्वच पात्रांची तो थट्टा करतो. गौतमाचे शाब्दिक विनोद खोचक आहेत, मर्मभेदक आहेत, प्रसंगी निर्दयही आहेत; पण त्यांच्या मागे सूक्ष्म अवलोकन आणि उपहासाची मार्मिक दृष्टी आहे, हे नाकारता येत नाही. राजाचा निकटचा मित्र असला तरी गौतमाच्या थट्टेचा सारा विषय म्हणजे नाटकाचा नायक राजा अग्निमित्र. राजासारख्या एका श्रेष्ठ व्यक्तीची ही रेवडी म्हणजे प्रतिष्ठित समाज संकेतांवरच मार्मिक प्रहार होय. प्रसंगानुरूप गौतमाने निर्मिलेल्या विनोदाने नुसते हास्य पिकत नाही तर त्यावर मार्मिक शहाणपणाची फुलेही फुलतात.

हेही वाचा : कहाण्या तर ओल्याचिंबच राहतात…

विक्रमोर्वशीय-

उर्वशीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या पुरुरव्याला प्रमद वनात घेऊन आल्यानंतर तिच्या पुनर्भेटीसाठी जो उपाय माणवक सुचवू पाहतो त्यातच त्याचं कलारसिकत्व स्पष्ट होतं. नाटकातील दुसऱ्या अंकात एका संभाव्य चित्राचा उल्लेख आहे. विरहामुळे व्यथित झालेल्या पुरुरव्याला तिच्या प्राप्तीचा कोणता मार्ग सुचवावा या चिंतेत माणवक चूर असतो. मित्राची नायिका मानवी आटोक्याच्या पलीकडची असल्यामुळे त्याला काहीच सुचत नव्हते. मित्राने इतक्या विश्वासाने आपल्याला तोडगा विचारावा आणि आपल्याला मात्र काहीच सांगता येऊ नये, या जाणिवेने माणवक अस्वस्थ होतो. अचानक एक कल्पना त्याच्या मनात झळकते. आनंदाने चुटकी वाजवून तो आपला चेहरा राजाकडे वळवत म्हणतो, ‘‘ एक तर तू निवांत झोप घे म्हणजे तुला स्वप्न पडेल. जागेपणी सारखा तिचाच ध्यास लागलेला असल्यामुळे स्वप्नात हमखास तिची भेट घडेल.’’ त्यावर राजा खिन्नपणे हसून म्हणतो, ‘‘अरे वेड्या, काळजीमुळे माझी झोपच मुळी उडून गेली आहे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही, मग स्वप्न पडेल तरी कसे? आणि स्वप्नात भेट होणे तर लांबच राहिले.’’ माणवक पुन्हा डोके खाजवतो आणि म्हणतो , ‘‘मग तू असे कर उर्वशीचे चित्र काढ म्हणजे चित्रात तरी तिची तुझी भेट होईल.’’ तिथे तीच अडचण आहे ना ! राजा उद्विग्नतेने म्हणतो,‘‘ विरंगुळा म्हणून माझ्या प्रियतमेचे चित्र काढायला मी बसेनसुद्धा; पण चित्र पूर्ण होत आले की तिच्या आठवणीने माझे डोळे पुन्हा भरून येतील.. मला पुढचे काहीच दिसेनासे होईल..शिवाय ओघळणाऱ्या अश्रूंमुळे चित्र पुसले जाईल ते वेगळंच.’’

कालिदासीय काव्य- नाटकांत विरहावस्थेत नायक-नायिका मनोविनोदनासाठी एकमेकांची चित्रे काढत असल्याची उदाहरणे आहेत. रघुवंशात कामासक्त चित्रकला मर्मज्ञ अग्निवर्ण राजा त्याच्या प्रियतमेचे चित्र काढत असल्याचं वर्णन आहे. शाकुंतलात राजा दुष्यंतही शकुंतलेचं चित्र काढतो तर मेघदूतातसुद्धा विरही यक्ष त्याच्या यक्षिणीचं चित्र शिलातलावर काढण्याचा प्रयत्न करतो. विक्रमोर्वशियातील सदर चित्रही त्याच प्रकारात मोडतं. विशेष करून मेघदूतातील यक्षिणीचं चित्र काढण्याचा प्रयत्न करणारा यक्ष आणि उर्वशीचं चित्र काढण्याची कल्पना करणारा पुरुरवा यात बहुतांश साम्य दिसून येतं. फरक एवढाच की यक्षिणीचं चित्र काढण्यास सुरू करण्यापूर्वीच यक्षाचा सात्त्विक भाव प्रबळ होऊन त्याचे डोळे पाणावतात. तो चित्र निर्मितीस सुरुवातही करू शकत नाही. परंतु पुरुरवा मात्र उर्वशीचं संभाव्य चित्रांकन पूर्ण करू शकू अशी भावना बाळगतो; पण चित्र पूर्ण होत असताना तिच्या आठवणीने आपले डोळे भरून येतील अशी काळजी त्याला वाटते. आणि त्याही अवस्थेत तिचं चित्र पूर्ण करू शकलो तरी ओघळणाऱ्या अश्रूंमुळे ते पुसले जाईल अशी त्याची भावना असते.

हेही वाचा : किती याड काढशील?

प्रेमावस्थेत विशेषत: प्रियकर विरहावस्था भोगत असताना त्यांच्या शरीर- मनाचा सखोल, सर्वांगीण अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करणाऱ्या विदूषकाचं पर्यायाने कालिदासाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. उदाहरणार्थ, राजकार्य आणि विनोदनिर्मिती या दोन्ही दृष्टीने या नाटकात माणवक फारसा प्रभाव पाडत नाही हे खरं. खादाडपणा तसेच स्वत:च्या कुरूपपणावरचे हास्य उत्पादक भाष्य ही विदूषकाची लक्षणे त्याच्याही जवळ आहेत. विदूषकाचा वेंधळेपणाही त्याच्याजवळ आहे. पण त्याच्या एकूणच मानवी व्यवहाराबाबतीतला शहाणपणाही वाखाणण्याजोगा आहे. राजाला उपाय सुचवताना जेव्हा उर्वशीची प्रत्यक्ष भेट होऊ शकत नाही तर तिची स्वप्नात तरी भेट घे असं सुचविणाऱ्या माणवकाला जणू ‘मनी वसे, ते स्वप्नि दिसे’ ही म्हण माहीत होती असेच वाटते. कारण जागृत चेतन मन हे नेहमी अचेतन मनाशी संवाद साधत असतं. जागेपणी जो विचार कल्लोळ भावभावनांची घुसळण आपल्या मनात चालली असते तीच निद्रावस्थेत अचेतन मन कार्यान्वित झाल्यावर उसळी मारून वर येते याची पुरेपूर कल्पना माणवकाला आहे. म्हणून तो राजाला झोप घेण्याचा सल्ला देतो. तोही उपाय उपयोगाचा नाही म्हटल्यावर राजाला उर्वशीचं चित्र काढण्याचं सुचवतो. हा उपाय सुचवणं वाटतं तितकं साधं, सोपं नाही. चित्रनिर्मितीचा सल्ला देणारा माणवक चित्रकलेचंही मर्म जाणतो ते स्पष्ट होतं.

अभिज्ञान शाकुंतल-

शाकुंतलमधील माधव्याने शकुंतलेला प्रत्यक्ष पाहिलेलेच नाही. तिसऱ्या अंकातील प्रणयाची परिणती आणि पाचव्या अंकातील शकुंतलेचा अव्हेर या दोन्ही गोष्टी अंशत: विदूषक उपस्थित नसल्यामुळेच आहे तशा घडल्या आहेत, हे लक्षात आलं म्हणजे विदूषकाला कथा प्रवाहापासून दूर ठेवण्यात कालिदासाने योजलेलं सुधारलेलं नाट्यतंत्र आणि त्याची नाट्यकलेची समज या दोघांची नीट कल्पना येते.

शाकुंतलच्या सहाव्या अंकात दुष्यंताने रेखाटलेल्या शकुंतलेच्या स्मरण चित्राचं सविस्तर वर्णन आहे. कन्व आश्रमात शकुंतलेचं तिच्या मैत्रिणींसह राजाला झालेलं दर्शन, हा या चित्रातील प्रसंग. मात्र हे स्मरण चित्र अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी राजा दासी चतुरिकेला चित्रफलक आणावयास सांगतो. त्यावेळी चित्रातील रेखाकृती आणि रंगभरणाबाबत माधव्याचं भाष्य त्याची चित्रकला मर्मज्ञता स्पष्ट करतं.

हेही वाचा : आमचे येथे आरोग्य दुप्पट करून मिळेल

एखाद्या चित्र समीक्षकासारखं चित्राचं बलस्थान अधोरेखित करत तो म्हणतो, ‘‘ वा मित्रा, किती सुंदर आकृत्या रेखाटल्या आहेस. अवयवांच्या सुंदर रेखाटनामुळे त्यावरील भाव किती दर्शनीय वाटतात. चित्रातील उंच-सखल भागांवर माझी दृष्टी अडखळते.’’ चित्रातील चराचर सृष्टी किती वास्तवपणे राजाने रेखाटली, रंगविली याची या वर्णनावरून कल्पना येते. रेखाटन हे चित्रनिर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाचं अंग. चित्रात ते प्रभावीपणे साध्य झाल्याचं विदूषकाच्या अभिप्रायावरून कळतं. चित्रात शकुंतलेसहित तिच्या सख्याही होत्या. या तीनपैकी शकुंतला कोणती हे माधव्याला ठाऊक नसल्याने तो राजाला विचारतो तेव्हा राजा त्यालाच ओळखावयास सांगतो. चित्रित शकुंतलेच्या व्यक्तिरेखेचं जे मार्मिक वर्णन विदूषक करतो त्यात त्याच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीची प्रचीती येते. माधव्य म्हणतो, ‘मला वाटते जिच्या केसांची गाठ शिथिल झाल्यामुळे त्यातील फुले गळून पडली आहेत, जिच्या चेहऱ्यावर घामाचे लहान थेंब आलेले आहेत, जिचे बाहू बरेच गळालेले दिसतात आणि जी किंचित थकल्यासारखी आहे, ती कोवळी पालवी फुटलेल्या आम्रवृक्षाजवळ चित्रित केलेली शकुंतला असून इतर दोघी तिच्या मैत्रिणी असाव्यात’ या वर्णनावरून दुष्यंताने शकुंतलेच्या व्यक्तिचित्रणातील बारीकसारीक तपशील आणि त्यावरून सुचित होणारे तिचे भाव किती कौशल्यपूर्वक चित्रित केले असतील याची कल्पना करावी. विशेष म्हणजे पहिल्या अंकातील दुष्यंत- शकुंतला प्रथम भेटीत विदूषक अनुपस्थित ठेवला आहे कालिदासाने. कारण दुष्यंताचं चित्रकलेतील कौशल्य आणि माधव्याचं कला रसिकत्व सहाव्या अंकातील या प्रसंगात सिद्ध करावंसं वाटलं असावं नाटककाराला.

मालविकाग्निमित्रमधील गौतम, विक्रमोर्वशीयमधील माणवक आणि अभिज्ञान शाकुंतलमधील माधव्य. कालिदासाची ही विदूषक त्रयी त्यांच्या कलारसिकत्वामुळे संस्कृत नाटकांतील इतर विदूषकांच्या रांगेत आगळी दिसते यात शंका नाही.

bhamburkar.pankaj@gmail.com
(लेखक चित्रकार असून कालिदासीय साहित्याचे अभ्यासक आहेत. )

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalidas s artful clown in his three dramas css
Show comments