कमलाकर नाडकर्णी यांच्या ‘वल्लभपूरची दंतकथा’ नाटकावरील लेखाने ४० वर्षांपूर्वी आम्ही कोलकात्याच्या महाराष्ट्र मंडळात व नंतर दिल्लीत बृहन्महाराष्ट्र नाटय़स्पर्धेत केलेल्या या नाटकाच्या आठवणींना उजाळा मिळाला. नाटक प्रथम वाचले तेव्हा जाणवले की ते बरेच मोठे आहे. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे ते छोटे तरी करायला हवे होते किंवा बदलणे भाग होते. पण मी नाटकाच्या प्रेमात पडलो होतो. ठरवले की हेच नाटक करायचे. तेव्हा ते छोटे करणे भाग होते. पण बादल सरकारांच्या नाटकाला कात्री लावायला मन धजेना. माझी अडचण मी माझ्या एका बंगाली मित्राला सांगितली. तो म्हणाला, ‘मग बादलबाबूंना का नाही भेटत?’ पण मला ते भेटतील याची खात्री नव्हती. तरीही त्यांच्यासमोर जाऊन थडकलो. त्यांचे नाटक बसवण्याची परवानगी मागितली व ते छोटे करण्याच्या गरजेबद्दलही बोललो. त्यावर ते म्हणाले ‘मी कुणालाच  परवानगी नाकारत नाही. माझे नाटक कुणीही करू शकतो. तुला नाटक छोटे करायचे असेल तर तेही तू करू शकतोस. फक्त नाटय़वस्तूला धक्का लागू न देता तू ते करावे, एवढीच अपेक्षा मी ठेवतो.’ मला आश्चर्य वाटले. कुठलाही नाटककार स्वत:च्या कलाकृतीला कात्री लावू देणार नाही. मला तर ही त्यांची विनयशीलताच वाटली.
एव्हाना ‘वल्लभपुरेर रूपककथा’चे अनुवादक अमोल पालेकरांनाही पत्र गेले होते. उत्तरात त्यांनी मानधनाची रक्कम बादलबाबूंना देण्याची सूचना केली. तेव्हा नाटककाराला मानधन देण्याची प्रथा बंगालमध्ये नव्हती. तरीही आम्ही ते त्यांना अगत्यपूर्वक दिले. आणि नाटकाची काटछाट करण्याच्या उद्योगाला लागलो. मूळ नाटक पाच दृश्यांत विभागले होते. म्हणजेच एकूण चार मध्यांतरे! ती गाळून वेळ वाचवण्याकरता एकच मध्यांतर घ्यायचे ठरवले. नाटक दोन अंकांत विभागले. पहिली दोन दृश्ये पहिल्या अंकात व शेवटची तीन दुसऱ्या अंकात. दोन दृश्यांत काही सेकंदांचा अंधार. पण हे करूनही नाटक कालमर्यादेत बसेना. तेव्हा आम्ही संहितेकडे वळलो. ‘दंतकथे’च्या सुरुवातीलाच संजीव या पात्राचा प्रेक्षकांना उद्देशून तीन मिनिटांचा मोनोलॉग आहे. नाटकाच्या कथानकाच्या दृष्टीने याला फारसे महत्त्व नसल्याचे जाणवले. शिवाय पुढे नाटकात संजीवची एन्ट्री चांगली नाटय़मय असूनही या मोनोलॉगमुळे त्या एन्ट्रीतील नाटय़च संपते असेही लक्षात आले. नाटक संपल्यावर पाचव्या दृश्याचा पडदा पडल्यानंतरही संजीव-भूपतीचा दीड पानी संवाद आहे. पण तोपर्यंत तर नाटकच संपलेले असते! असा विचार करून आम्ही हे दोन्ही संवाद गाळून टाकले. कुठलेही नाटक रंगण्याच्या दृष्टीने पहिली दहा मिनिटे नि:संशय फार महत्त्वाची असतात. पण याच दहा मिनिटांत या नाटकात काहीही ‘घडत’ नाही. हे लक्षात घेऊन या प्रवेशातील पाचही पात्रांना ‘मुलखावेगळे’ स्वभाव देऊन प्रवेशाला उठाव आणणे गरजेचे होते. हेही निव्वळ अभिनयाच्या जोरावर, संहितेत कुठलाही बदल न करता आम्ही यशस्वीरीत्या केले. या प्रवेशानंतर काही सेकंदांचा अंधार करून दुसरा प्रवेश सुरू केल्यामुळे काही पात्रांचे वेषांतर आणि रंगमंचावरचे फेरबदल रंगमंचावरच करताना दाखवले. त्यामुळे तो प्रकार आणखीनच गंमतीशीर झाला. पहिल्या प्रवेशाच्या सुरुवातीपासूनच या पाच पात्रांनी प्रेक्षकांना अक्षरश: काबीज केले. कुठल्याही फार्सिकल प्रकारचे अवलंबन न करताही प्रयोग इतका चढला, की नाटक जे रंगत गेले ते शेवटपर्यंत.
दिल्लीतील प्रयोगात तर प्रेक्षक एवढे ‘इन्व्हॉल्व’ झाले की हशा-टाळ्यांबरोबरच ‘बक अप हलदार’, ‘डोन्ट बी नव्‍‌र्हस’ अशा उत्स्फूर्त आरोळ्या प्रेक्षकांतून येत होत्या. आणि तालीम करताना जे जाणवले नाही ते पडदा पडताना जाणवले. ते हे, की प्रौढ-वृद्ध प्रेक्षकांनाही त्यांच्या बालपणात घेऊन जाण्याची विलक्षण ताकद या नाटकात आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा