डॉ. प्रज्ञा दया पवार

कामाठीपुरा हा औद्योगिकीकरण झालेल्या आधुनिक नागरी समाजाचा मुंबईतला अपरिहार्य हिस्सा. भांडवलशाहीमुळे अधिकच टोकदार झालेली जातवर्गिलगभेदजन्य विषमतेची तिथली कैक रूपं इथं लेखकाने टिपली आहेत. माणसांमध्ये परात्मभावाचं रोपण करणारा हिंस्र सामाजिक- राजकीय व्यवहार या कादंबरीत अप्रत्यक्षपणे उभा आहे. त्याच्या उत्पाती लपेटीत अडकलेल्या माणसांचं काय होतं? काय होतं नात्यांचं? सलोख्याचं? प्रेमाचं? हे यात पाहायला मिळतं..

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

साठी-सत्तरीच्या दशकात मराठी साहित्यात उपेक्षित समूहजीवनाच्या अनुभवविश्वाचे दरवाजे सताड उघडले गेले. त्यात निहित असलेली कमालीची दाहक, स्फोटक आशयसूत्रं, अभिव्यक्तीची अपारंपरिक धाटणी आणि समष्टीजन्य तोंडवळय़ाचं भक्कम अधिष्ठान.. अशा तिहेरी ऐवजामुळे मराठी साहित्याचा पैस विस्तारला. दलित, कृषीप्रधान, महानगरी, स्त्रीवादी अशा विविध संज्ञांनी जरी हे साहित्यप्रवाह निर्माण झाले असले, तरी जनवादी चळवळींचा ‘ड्रायव्हिंग फोर्स’ आणि त्यातून प्राप्त झालेली समूहसंबंद्धता हे या सर्वच उन्मेषांमधले सामायिक मुद्दे होते. महात्मा गांधींची ‘खेडय़ाकडे चला’ ही हाक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘शहराकडे चला’ ही घोषणा- या भिन्न विचारविश्वाच्या द्वंदात्मकतेतून साठोत्तरी साहित्याला एक विशिष्ट चेहरा प्राप्त झाला. जगभरातल्या परिघीकरण झालेल्या माणसांनी ‘कला आणि जगणं’ यातला ‘आणि’ मिटवण्यासाठी केलेला अभूतपूर्व संघर्षही मराठीतल्या साठोत्तरी साहित्याला इंधन पुरवत राहिला.

हेही वाचा : ऐसी अधमाची जाती..

बाबुराव बागूल, भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, चंद्रकांत खोत यांनी महानगराचा आलोक चित्रित करताना येथील अपरिहार्य हिस्सा असलेलं अधोविश्व विलक्षण सामर्थ्यांने पृष्ठस्तरावर आणलं. नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’ या कवितासंग्रहातून तिथल्या जगण्याचं रौरव वाचकांना परिचित झालं. मध्यमवर्गीय गुंगीतून जागं करत अधोविश्वाचं झाकण उघडून तिथल्या दाहक जगण्याच्या लीळांचं दर्शन घ्यायला ‘गोलपिठा’नं भाग पाडलं. प्राथमिक स्तरावर जगायची सक्ती करणाऱ्या दमनकारी व्यवस्थेचं नेमकं भान व्यक्तविलेल्या साठोत्तरी साहित्यातून अधोविश्वाचं समुचितपण उघडय़ा-नागडय़ा रोखठोक वास्तवासह चित्रित झालं. तिथले संघर्ष, मानवी नाते- संबंधाच्या परी, मूल्यजाणिवा यांचं निर्धारण मध्यमवर्गीय भिंगापलीकडे जाऊन करण्याची नैतिकता साठीसत्तरीच्या दशकांपासून ठळक होऊ लागली. निव्वळ ‘ह्युमन इंटरेस्ट’वर केंद्रीभूत झालेल्या साहित्याची सद्दी संपून व्यक्ती-समष्टी- सृष्टीसंबंधातल्या वर्चस्ववादी विषम संरचनेची कुरुपता दृश्यमान होऊ लागली.

मराठी साहित्याने सांस्कृतिक स्थित्यंतराची कूस पालटली त्यालाही आता बराच काळ लोटला आहे. आधीचे प्रश्न अधिकच विक्राळ झाले आहेत आणि एका नव्याच भारताचं चित्र आपल्यासमोर सध्या नाचवलं जाऊ लागलं आहे. कथित विकासाच्या भ्रमकल्लोळाचं आवरण इतकं गडद आहे की, त्यापलीकडचं- अलीकडचं काही दिसूच नये.
सुधीर जाधव यांची १४ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली ‘कामाठीपुरा’ (सृजन प्रकाशन) ही कादंबरी या भ्रमकल्लोळाला छेद देते आणि विकासाच्या प्रारूपाला मुळातून प्रश्नांकित करत, तळागाळातल्या समूहजाणिवांशी होड घेत त्यांना समकाळाच्या संदर्भचौकटीत प्रस्थापित करते.
‘कामाठीपुरा’ या कादंबरीचं कथन कामाठीपुऱ्याच्या भौतिकतेशी घट्टपणे नातं सांधून आहे. तिथल्या वास्तवाची छाया जवळपास सगळय़ाच पात्रांवर पडलेली आहे. मानवी व्यवहाराचं, त्यातल्या अठरापगड एकरेषीय नसलेल्या वर्तनाचं, भयभूकमैथुनादि आदिम प्रेरणांचं, विकारांचं, स्खलनाचं अतिशय जोरकस, प्रवाही चित्रण ही या कादंबरीची जमेची बाजू आहे. सुधीर जाधव यांचा बालपणापासून ते ऐन तारुण्यावस्थेतला काळ तिथेच व्यतीत झालेला असल्यामुळे कामाठीपुऱ्यांतर्गत विविधांगी अनुभवविश्वाचा रसरशीत, पण भेदक कोलाज त्यांच्या कादंबरीतून साकार होतो. अर्थात कथनात्मक संहितेच्या संरचनेचं उचित भान बाळगूनही ही कादंबरी चांगल्या अर्थाने ‘क्राफ्टमनशिप’पासून बचावली आहे. तिचं अतिशय ‘रॉ’ असणं हे सद्यकालीन मराठीतलं दुर्मीळ उदाहरण आहे.
कामाठीपुरा हा औद्योगिकीकरण झालेल्या आधुनिक नागरी समाजाचा मुंबईतला अपरिहार्य हिस्सा. भांडवलशाहीमुळे अधिकच टोकदार झालेली जातवर्गिलगभेदजन्य विषमतेची तिथली कैक रूपं लेखकाने टिपली आहेत. माणसांमध्ये परात्मभावाचं रोपण करणारा हिंस्र सामाजिक- राजकीय व्यवहार या कादंबरीत अप्रत्यक्षपणे उभा आहे. त्याच्या उत्पाती लपेटीत अडकलेल्या माणसांचं काय होतं? काय होतं नात्यांचं? सलोख्याचं? प्रेमाचं?

हेही वाचा : आदले । आत्ताचे : अमुकच्या व्याकूळतेचा तळशोध

ही कादंबरी कामाठीपुऱ्यातल्या अशा तमाम घटितांचा दस्तऐवज मांडते. सत्तरीचा अधोविश्वाचा अंतराळ त्यातल्या तमाम उलथापालथींसह, बारकाव्यांसह टिपते. महानगराची घाण उपसणारे, गरजा भागवणारे तमाम कष्टकरी, श्रमिक, वंचित, देहविक्रीसाठी उभ्या राहणाऱ्या स्त्रिया, त्यांचे दलाल, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, पोलीस कस्टडी, तुरुंगातलं निर्ममपण याचं आतून- बाहेरून चित्रण करते. मटका, पताडा, बेटिंग, जुगार, चरसीच्या अड्डय़ांचा हा इलाखा. ‘‘बढिया, कवला माल देता हुं साब.’’ म्हणत गिऱ्हाईकांना पटवणाऱ्या कुंटणखान्यातल्या दल्ल्यांची, पिला हाऊसची, गुप्त रोग्यांची, नागपाडा लॉकअपची, तिथल्या बराकीत चालणाऱ्या व्यवहारांची, पोलिसी मारहाणींची, हप्ता वसुलीची, अफिमच्या देवाणघेवाणीची, दारूच्या फुग्यांच्या डिलीव्हरीची, मजबुरीने शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांची ही कहाणी आहे. पण अधोविश्वाच्या याच पट्टय़ात सर्वसामान्य, चारचौघांसारखी नेकीने जगणारीही असंख्य माणसं आहेत. शिक्षण, नोकरी, सचोटी, भाईचारा, भगिनीभाव, विविध धर्मीय सण-समारंभातली त्यांची क्रियाशील भागीदारी हादेखील ‘कामाठीपुरा’ या कादंबरीचा एक लक्षणीय कोन आहे. हा कोन आजवरच्या कथन साहित्यातील आणि चित्रपटातील कामाठीपुऱ्याच्या एकारलेल्या चित्रणाला नाकारतो.

‘चिनु’ हे या कादंबरीतलं मध्यवर्ती पात्र असलं तरी त्यातलं कथ्य केवळ चिनुभोवती केंद्रित झालेलं नाही. किंबहुना ‘कामाठीपुरा’ हेच मध्यवर्ती कथ्य आहे. कामाठीपुरात जगणाऱ्या माणसांच्या मानुष-अमानुष व्यवहारांशी कामाठीपुऱ्याचं अभिन्न नातं आहे. कामाठीपुऱ्याचं लोकेशन हा या कादंबरीतला सर्वात सशक्त घटक आहे. तोच या कादंबरीच्या एकूण आशयसूत्राला प्रभावित करतो. पात्रवर्तनाच्या, पात्रजाणिवांच्या संदर्भातही लेखक कामाठीपुऱ्याच्या जमिनीबाहेर वाचकांना सहसा निसटू देत नाही. वेगवान घटिते, सतत हुलकावण्या देणारी विकासी पात्रे, कादंबरीच्या प्रारूपाशी कमालीचं ऐक्यत्व राखणारी महानगरी, बंबैय्या भाषेची असंख्य रूपं, निवेदनाच्या बदलत जाणाऱ्या पातळय़ा, इ. कादंबरीची सामग्री लेखकाने जबाबदारीने हाताळली आहे. पारंपरिक मूल्यव्यवस्थेशी फटकून वागणाऱ्या माणसांचं केवळ वरपांगी चित्रण यात येत नाही. माणसं अशी हैवानागत का वागतात आणि प्रसंगी हीच माणसं माणूसपणाच्या कोवळय़ा गाभ्याचं नितांतसुंदर दर्शन कसं घडवतात, यांसारखे गुंतागुंतीचे प्रश्न कादंबरीच्या पटलावर ठेवले जातात. बाप घरात शिरल्यावर कायम भेदरून बसलेल्या चिनुच्या चार लहानग्या बहिणी, जाहिरात कंपनीत प्युन असलेला, दारू प्यायल्यावर कर्दनकाळ झालेला, न चुकता दररोज बायकोला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा चिनुचा रामचंद्र जाधव नावाचा बाप (हाच बाप एरवी मात्र फार वेगळा आहे.), आईचं अपार दु:ख सहन न झाल्यामुळे तिरीमिरीने चिनुने चिडून बापावर केलेला प्राणांतिक हल्ला, दिवसेंदिवस खचत जाणारी त्याची आई.. अशा अवघड परिस्थितीशी झगडत चिनुने घेतलेलं शिक्षण, व्यायामशाळेत जाणं, बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेत भाग घेणं, गोविंदाच्या, जयंतीच्या उत्सवात समरसून सामील होणं, राधाच्या प्रेमात पडणं, पोटापाण्यासाठी तऱ्हेतऱ्हेची कामं करणं, आपली वस्ती महफूज राखणं, ‘अरे’ ला ‘का रे’ करणं, कोणताही अन्याय सहन न करणं आणि कुणावरही अन्याय होत असताना धावून जाणं, चिनुचा हळूहळू चिनूभाय होणं आणि सरतेशेवटी एकांकिका, नाटकाचा छंद जडल्यावर तिथल्या खातेऱ्यातून बाहेर पडण्याचा साक्षात्कारी क्षण गवसेपर्यंतचा चिनुचा प्रवास हा फक्त त्याचा एकटय़ाचा प्रवास राहात नाही.

हेही वाचा : दलितांचा आवाज गेला कुठे?

या वळणावळणाच्या, असंख्य चकव्यांच्या प्रवासात कामाठीपुऱ्यात एड्सने मेलेला लंगडय़ा वश्या आहे. चिनुच्या गँगमध्ये असलेले फेफ्टी, अरुण, काळय़ा मोहन, चंग्या, अशोक, आन्या, दाद्या, पापलेट या सर्वांचं चित्रविचित्र जगणं आहे. एका असहाय मुलीला सोडवणारे ‘डेयरडेव्हील शांताद्या’, बिल्किस आपा आणि त्यांची गँग आहे. पेंटर स्वामी अण्णा आणि कांची यांची हृद्य गोष्ट आहे. कामगार कल्याण केंद्राच्या नाटय़स्पर्धेचं दिग्दर्शन करणारे रामचंद्र साळुंखे ऊर्फ बाबू आहे. या केंद्राच्या आश्रयाला येऊन कामाठीपुऱ्यातली अनेक बिथरलेली पोरं नंतर सुधारली आहेत. हॉटेल साईदीप बारमध्ये कलेची पेशकश करून स्वत:चा श्रीमंत आशियाना उभारणारी सौंदर्याची, नृत्याची खाण असलेली अहंकारी शाजिया आणि तिची साथ धुडकावून अखेरीस हाजी मलंग बाबाच्या मजारीवर आसवं गाळत भान हरपून ढोलकी वाजवणारा, कलेशी इमान राखणारा फाटका, पण मनस्वी चंग्या आहे.

पात्रजाणिवांच्या अशा विविधांगी भूमींमुळे, अनेकपदरी संयुगामुळे ‘कामाठीपुरा’ ही कादंबरी अनन्यत्वाच्या दिशेने जाऊ पाहाते. त्यातला कालावकाश पारंपरिक संभाषितांना धुडकावून लावतो. वस्तुत: या कालावकाशामुळेच कामाठीपुऱ्यातंर्गत कथनाला हाडामांसाचा रसरशीत जिवंतपणा प्राप्त झाला आहे. ही कादंबरी वाचताना चलत् चित्रांच्या ठायी असणारी प्रभावी दृश्यात्मकता वाचकांना बांधून ठेवते. शाळेच्या सुट्टीत दारूच्या धंद्यावर ‘बेचन’ला तर कधी मटक्याच्या अड्डय़ावर ‘रायटर’ म्हणून हे सर्वजण काम करत करत जाणते झालेले. धंद्यातले सगळे कायदे- कानून, बारकावे कोळून प्यायलेले. शाळेच्या पुस्तकी जगापेक्षा ‘प्रॅक्टीकल’ अनुभवांना रोज तोंड देता देता अख्ख्या दुनियादारीला ओळखून असलेली ही मुलं.. त्यांचं लहानपण जरी करपून गेलेलं असलं तरी जगण्याला सामोरं जाताना एकमेकांसाठी ढाल होऊन मैत्रीचा, प्रेमाचा वर्षांव करताना कठीण समयी प्रसंगी जिवावर बेतलं तरी बेहत्तर या बाण्याने जिवाला जीव देणारी ही मुलं सामाजिक अस्तित्व माणसांच्या जाणिवांना घडवत असतं याचा पुनरुच्चार करणारी आहेत.

कामाठीपुऱ्यातलं स्त्रियांचं विशेषत: कुंटणखान्यातल्या स्त्रियांचं जगणं सुधीर जाधवांनी हातचं काहीही राखून न ठेवता केलं आहे. या स्त्रियांच्या वेदनेचा तळ गाठण्याच्या लेखकाच्या असोशीला कामाठीपुऱ्यातल्या अस्सल अनुभवांची धग आहे. दुर्गा, परमेश्वरी, सविता, लक्ष्मी, कोमल, खूशबू, रोशनी ही खरं तर प्रातिनिधिक नावं. भारतातल्या विभिन्न राज्यातून फसवून आणल्या गेलेल्या या अश्राप पोरी. बंगला क्रमांक ९९९मध्ये त्यांना आणून टाकलेलं. तिथं आधीच वस्तीला असलेल्या १४ मुली. ज्यांचा अंत अतिशय भयानक, असाध्य रोगांनी पोखरलेल्या अवस्थेत रस्त्यावर किंवा कुंटणखान्यातल्याच एखाद्या काळोख्या भिंतीलगतच्या कोपऱ्यात होणार आहे, हे कदाचित त्यांनाही माहीत आहे. तरीही त्या स्वप्नं पाहतात. जोहराबाई, गौहर सुलताना, हमिदा जान, रुखसाना यांच्या जागी आपणही असू ही उमेद धरतात. या देखण्या नृत्यांगनांच्या व्यक्तिमत्त्वाचा करिश्मा त्यांच्यावर कसं गारुड करतो, त्यांचे अतीव दिलखेच पदन्यास, ठुमके, अदाकारी, विभ्रम, घायाळ करून टाकणारी विलक्षण आर्तव्याकूळ गायकी- परिणामी त्यांच्या पायांशी पडणारी नोटांची रास, त्याविषयी या नवोढांना वाटणारं त्यांच्या जीवनशैलीचं आकर्षण कादंबरीत फार सहजगत्या येतं. याबद्दलची स्वाभाविकता लेखकाने हरवू दिलेली नाही हे फार महत्त्वाचं आहे. अर्थात शोषण आहेच, शोषणाची तीव्रताही आहे, पण त्या सावटाखाली असतानाही रोजचा दिवस जगायचा आहे आणि रसरसून जगायचा आहे, चांगुलपणा न गमावता जगायचा आहे हे भान या स्त्रियांना उच्च कोटीचं माणूसपण बहाल करतं. या केवळ बिच्चाऱ्या स्त्रिया नाहीत. त्या त्यांच्या परीने भोवतालाचा अर्थ लावतात. प्रसंगी हस्तक्षेप करतात. पराकोटीच्या विपरीत परिस्थितीतही उद्याच्या उगवणाऱ्या सूर्यावर विश्वास ठेवतात.

हेही वाचा : संगीतसंस्कृतीचा उपासक

.. तर कादंबरीच्या शेवटाकडे बाबरी मशीद पाडल्यावर वाढत जाणारी द्वि-ध्रुवात्मकता कामाठीपुऱ्याच्या भाईचाऱ्याला कशी उद्ध्वस्त करते याची दर्दनाक दृश्ये येतात. कामाठीपुऱ्यातला बदललेला माहौल, नागपाडा, आग्रीपाडा भागात दंगलीचं पसरलेलं लोण अलगाववादाचं भयावह सूचन करतं. चंद्रमणी बुद्धविहार मार्ग- शाखा क्रमांक पंचेचाळीसच्या डॉ. आंबेडकर जयंतीच्या सामूहिकतेचा, समता, करुणा, संघर्ष क्लेम करण्याचा वंचितांचा सार्वजनिक अवकाश कामाठीपुऱ्यातून नष्ट होत जातो. या दुखऱ्या वास्तवाचा निर्देशही कादंबरीच्या अखेरीस येतो. हा निर्देश अनेक शक्यतांना जन्म देणारा आणि सुधीर जाधव यांच्या आगामी काळातल्या लेखनाविषयीच्या रास्त अपेक्षा वाढविणारा आहे.

कवयित्री आणि लेखिका. प्राध्यापिका ही देखील एक ओळख. ‘आरपार लयीत प्राणांतिक’ ही गाजलेली दीर्घकविता. ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ हा कथासंग्रह, उत्कट जीवघेण्या धगीवर, दृश्यांचा ढोबळ समुद्र हे काव्यसंग्रह, धादांत खैरलांजी हे नाटक तसेच नामदेव ढसाळ यांच्या निवडक कवितांचे संपादन. महाराष्ट्र फाऊंडेशन, बिरसा मुंडा राष्ट्रीय साहित्य पुरस्कारांसह अनेक सन्मान.
pradnyadpawar@gmail.com

Story img Loader