गावागावातलं एकूण सांस्कृतिक वातावरण अधिक विकसित करण्यात, माणसा-माणसांना जोडण्यात ‘हाय कल्चर’ आणि    ‘लो कल्चर’ यातील भेदाभेद कमी करण्यात एकेकाळी राज्य नाटय़स्पर्धेनं मोलाची मदत केली. बाहेरगावचे कितीतरी उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, तंत्रज्ञ या स्पर्धेनं मराठी रंगभूमीला बहाल केले. या योगदानावर पुढची अनेक र्वष मराठी रंगभूमी पोसली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्याच्या सांस्कृतिक विभागाची महत्ता जाणून घेण्यासाठी केवळ ‘राज्य नाटय़स्पर्धा’ एवढेच शब्द पुरेसे आहेत. राज्याच्या सांस्कृतिक खात्यानं दुसरं काहीही केलं नसतं आणि ही स्पर्धा नावीन्याचं आवाहन स्वीकारत काटेकोरपणे कार्यरत ठेवली असती, तर सारी युवा पिढी त्या खात्याची सदैव ऋणी राहिली असती. नको त्या राजकीय विचारप्रणालींपासून आणि विध्वंसक वृत्तीपासून युवा पिढीला दूर ठेवण्याची कितीतरी जबरदस्त ताकद या स्पर्धेत होती. राज्यकर्त्यांना ती ओळखता आली असती तर आजच्यासारखी डबघाईची परिस्थिती या स्पर्धेवर आली नसती. राज्याच्या कलात्मकतेचं एकेकाळी फडफडणारं निशाण उत्तरार्धात चोळामोळा होऊन पडलं, म्हणूनच आज हे हरपलेलं श्रेय काय होतं, याचं स्मरणरंजन करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही.

राज्य स्थापनेच्या अगोदरपासून सुरू झालेली स्पर्धा त्यानंतरही मा. यशवंतराव चव्हाण यांच्या द्रष्टेपणाने चालू राहिली आणि अगदी कालपरवापर्यंत नाटकवेडा महाराष्ट्र ते नाटकानं झपाटलेला महाराष्ट्र याचं प्रत्यंतर देत राहिली.

या नाटय़स्पर्धेने नवनवे कलावंत दिले, नवे नाटककार आणि नवी वेधक नाटकं दिली, सादरीकरणाच्या वेगवेगळ्या तऱ्हा दिल्या, विविध नाटय़बाजांचं दर्शन घडवलं, तंत्रमंत्राचे अनेक चमत्कार केले. विविध कुशाग्र बुद्धीचे दिग्दर्शक दिले. रंगभूमी आणि नाटक या संबंधातले जे जे वेगळं, नवं होतं ते अगदी चोहोदिशांनी आणि भरभरून दिलं. पुढच्या अनेक वर्षांच्या रंगभूमीची बेगमीच या स्पर्धेनं केली. त्या कलासंपदेवर, त्या कलासंचितात तशीच भर पडत गेली असती, तर नाटय़सृष्टीला दिवसेंदिवस जे आज बाजारू स्वरूप येत राहिलं आहे, त्यापासून ती कायमची दूर राहिली असती, खोटी नाणी चालली नसती. प्रत्यक्ष नाटकांच्या प्रयोगांनी काय काय दिलं त्याचा फ्लॅश बॅक सगळेजणच उभे करतात, पण अप्रत्यक्षरीत्या या स्पर्धेनं नाटकाच्या बाहेर, रंगमंचाच्या बाहेरच्या अवकाशात विशेषत: गावात, तालुक्यात, जिल्ह्य़ात काय मन्वंतर घडवलं ते जाणून घेतलं तर या स्पर्धेची व्याप्ती आणि तिची शक्ती कशी सर्वव्यापी होती, याची कल्पना येईल.

या स्पर्धेनं गावोगावच्या नाटकवाल्यांना रंगकर्मी केलं. नाटक हे स्पर्धेसाठी करायचं होतं. दुसऱ्यापेक्षा आपण अधिक गुणवान कसं, ते दाखवायचं होतं. अहमहमिका होती. काय केलं, म्हणजे आपण वेगळे वाटू, वेगळे दिसू याचा शोध सुरू झाला.

पूर्वी नाक्यावर, कट्टय़ावर संध्याकाळी जमून गप्पा मारणं, गावातल्या बऱ्या पोरींबद्दल शेरेबाजी करणं, गावातली प्रकरणं चघळणं हीच रिकामपणाची कामगिरी होती. त्याला या स्पर्धेच्या नाटकामुळे फाटा मिळाला. नाटक आणि फक्त नाटकच अधिक महत्त्वाचं ठरलं. पोरींबद्दल नको ते कसं बोलणार? न जाणो, त्यातलीच एखादी नाटकाला हवी असली तर? अळीमिळी गुपचिळी!

‘विविध भारती’, ‘बेला के फूल’ असल्या रेडिओवरच्या हिंदी चित्रपट गाण्यांत रात्री भिजवून काढणं या स्पर्धेने आवरतं घ्यायला लावलं. मुलगा कुठे उंडारतो, केव्हा आणि कुठून रात्री घरी परततो याबद्दलची आई-बाबांची भीती या स्पर्धेने घालवून टाकली. मुलगा तालमीत असणार, रात्री येऊन झाकून ठेवलेलं जेवण जेवणार आणि गपचूप झोपी जाणार, याबाबत पालकांनी खातरजमा करून घेतली होती. ते निर्धास्त झाले.

‘नाटकात गेला आणि पोर बिघडला’ ही पारंपरिक समजूतच या स्पर्धेने रद्दबातल केली. नाटक त्यांच्या मुलाला सुधरवीत होतं. उन्नत करत होतं. ही स्पर्धा साधीसुधी नव्हती. सरकारी होती. त्यामुळे तिला विशेष महत्त्व होतं. मुंबईकर रसिकांपर्यंत पोचण्याची ती मॅरेथॉन होती. या स्पर्धेला राजमान्यता होती. सरकारी नोकरीत असलेल्या मुलाच्या बापाला विशेष अभिमान असायचा, तसाच या सरकारी स्पर्धेतील मुलाचा बाप गर्व करत असे. मुंबईला जोडलं जाण्याचा या स्पर्धेशिवाय दुसरा कोणताच मार्ग गावातून वा शहरातून उपलब्ध नव्हता. मुंबईच्या तुलनेने आपण नक्की कुठं आहोत हे जाणून घेण्याची स्पर्धा ही एकमेव संधी होती. कष्ट कामी आले आणि मुंबईकरांचीही शाबासकी मिळाली तर मग स्वर्ग दोन बोटेच!

प्रारंभी नाटकात काम करायला मुली मिळणं कठीण जायचं, पण हळूहळू निवड करण्यापर्यंत मजल गेली. रात्री तालमी उशिरापर्यंत चालायच्या. मुली घरोघरी सुखरूप पोहोचवल्या जायच्या. कुठे काही अनुचित प्रकार घडल्याचं ऐकिवात नाही. या स्पर्धेनं सर्वच संबंधितांना एका भावनिकतेनं बांधून टाकलं होतं. स्पर्धेनं नाटकवाल्यांचं, रंगकर्मीचं ‘कुटुंब’ केलं होतं.

तालीम संपल्यावर घरोघरी जाईपर्यंत मग नाटकावरच चर्चा चालत असे. हा शब्द बरोबर, तो चुकीचा, त्याचा जोर भलत्याच शब्दावर पडतो, त्यामुळे अर्थ बदलतो. भूमिका करुण आहे, म्हणून इतकं रडणं वा भावविवश व्हायची गरज नाही. अंकाचा शेवट धक्कादायक करण्यासाठी काही करता येईल का? चर्चेच्या फैरी. चुकांचा शोध सुरू होता. त्यातूनच नाटक शिकलं जात होतं. शिकवलं जात होतं. स्पर्धेनं नाटकाचं शिक्षण आपसातच सुरू केलं. स्पर्धेची तालीम म्हणजे नाटकाची शाळा झाली.

नाटकात काम करणारे वगळले तर अन्य लोकही तालमीला हजर असायचे. त्यात केवळ नाटकावरील प्रेमाने स्वयंसेवकगिरी करणारेही असायचे. कुणी चहा बनवणारे तर कुणी प्रॉम्प्टींग करणारे, तर कुणी व्यवस्था पाहणारे; सगळं स्वयंस्फूर्तीनं चालत असे. सातारच्या एका नाटकाच्या तालमीला मी हजर होतो. तिथे एक मुलगा नुसती रेखाटनं करत बसलेला असायचा. मंडळींनी नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी त्याच्यावरच सोपवली. प्रयोग जवळ येत चालला की तालमीची गर्दी वाढत असे. जो तो वाटेल ती मदत करायला तत्पर असे. नाटकासाठी कुठच्या कामाचा कमीपणा कुणी मानत नसे. संपूर्ण तीन अंकाच्या तालमीला तर कुणाच्या तरी घरून डबा यायचा. गावातल्या नाटकाला आपल्याकडून कसल्या कसल्या प्रकारची मदत व्हायलाच हवी, ही त्यामागची गावकऱ्यांची भावना असे. सरकारी स्पर्धेत नाटक करणारे गावासाठी जणू सरकारी पाहुणेच होते.

गावात अथवा शेजारच्या गावात दुसरं कुणी स्पर्धक असतील तर त्यांच्या नाटकात काय आहे, आपल्याला त्यापेक्षा वेगळं काय करता येईल, प्रयोग अधिक परिणामकारक कसा होईल याबाबत प्रयत्न, शोध सुरू व्हायचे.

स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा जुन्या प्रकाशित नाटकाचा प्रयोग करण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. काही मंडळींनी जुन्यालाही टापटिपीचं वा नवं स्वरूप देऊन पारितोषिकं मिळवली. पण जसजसा स्पर्धेचा चेहरा स्पष्ट होऊ लागला, तसतशी जुनी नाटकं पारितोषिक मिळवण्याच्या कामी उपयोगाची नाहीत, हे लक्षात आलं. शिवाय जुनं नाटक हे दुसराही कुणी करण्याची शक्यता असते. आपलं नाटक हे फक्त आपलंच हवं, (प्रेमातलं माणूस जसं एकटय़ाचंच असावं लागतं!) ही भावना बळावली. आणि त्यातून स्वतंत्र, नव्या नाटकाच्या लेखनाचे प्रयत्न सुरू झाले. पुण्या-मुंबईतल्या मंडळींचं ठीक होतं. त्यांना इंग्रजी नाटकं आणि ब्रिटिश ग्रंथालयं खुली होती. इतरांना ते अशक्य होतं. मग संस्थेतल्याच कुणाला तरी, जो किंचित लेखक असेल, कवी असेल, त्याला नाटक लिहायला प्रवृत्त करावं लागत असे, विषय सुचवले जात. तो चार पाच पानं खरडून टाके. त्या निमित्ताने सिद्ध झालेल्या उत्तम नाटकांचा अभ्यास होई. तालमीत सूचना केल्या जात. प्रसंग इम्प्रोव्हाइज केले जात. नाटक घडत जात असे, उभं राहत असे. संस्थेची गरज म्हणून नाटककार निर्माण झाले. आणि मग तेच नवे नाटककार पुढच्या रंगभूमीचे तारणहार ठरले. स्पर्धेने स्पर्धकांच्या सृजनतेलाच चाळवलं.

पारितोषिकाची बात तर दूरच राहिली. पण स्पर्धेतल्या नाटकात जो कुणी असेल, त्याचा केवळ त्या असण्यामुळे गावात एकदम भाव वधारायचा. लोक त्याच्याकडे आदराने पाहायचे. पूर्वी कुस्ती जिंकणाऱ्याला किंवा बैलगाडय़ांच्या शर्यतीत भाग घेणाऱ्यांना असा मान मिळत असे. नाटकातला माणूस त्याहीपेक्षा अधिक मानमरातबाचा होता. कारण ही स्पर्धा शिकलेल्यांची होती आणि त्या दिवसात शिकलेल्यांपुढे नतमस्तक व्हायची पद्धत होती.

तरुणांच्या चर्चेचा विषय नाटक हाच असायचा. मुंबईतल्या वृत्तपत्रात नाटकाबद्दल येणाऱ्या मजकुराचं सर्वासमवेत वाचन व्हायचं. काही लोक इकडून तिकडून पैसे जमवून मुंबईला जाऊन नाटकं बघून यायचे.

नागपूर, नाशिक, कोल्हापूर येथील वृत्तपत्रात तर स्पर्धेबद्दलची काही ना काही बातमी येतच राहायची. मी नागपूरला प्राथमिक स्पर्धेला परीक्षक होतो. (१९८०) दोन दिवस स्पर्धा नव्हती. त्या सुट्टीत मी बाबा आमटेंच्या आश्रमाला भेट देऊन आलो. त्या पुण्यपुरुषाचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशीच्या ‘लोकमत’मध्ये ‘परीक्षकांची बाबा आमटेंच्या आश्रमाला भेट’ अशी ठळक टायपातली दोन कॉलमी बातमी छापून आली. बातमी देण्याएवढा मी मोठा खासच नव्हतो, पण स्पर्धा मोठी-महत्त्वाची होती. तिचाच गुण नाही तर वाण मला लागला होता.

प्रारंभी स्पर्धक संस्थेत भजनी मंडळ, व्यायाम शाळा, वाचनालय यांची नावं असायची. स्पर्धक संस्था रजिस्टर्ड असण्याचा नियम होता. त्या नियमाच्या पूर्तीसाठी अशा संस्थांच्या नावाची मदत घ्यावी लागत असे. पण कालांतराने त्या त्या संस्थांनी स्वत:चीच नाटकं स्पर्धेत उतरवायला सुरुवात केली. स्पर्धेने नसलेल्या नाटकवाल्यांनाही नाटकवाले बनवलं.

मुंबई-पुण्यातल्या नाटय़संस्थांना ही राज्यनाटय़स्पर्धा म्हणजे एक निमित्त होतं. मुंबई ही मराठी रंगभूमीची सर्वलक्षी भूमी असल्यामुळे स्पर्धेचं अप्रुप मुंबईकरांना फक्त चढाओढीसाठीचं होतं. मुंबई-पुण्याच्या बाहेर ही स्पर्धा केवळ उत्तम नाटय़प्रयोग सिद्ध करण्यापुरतीच राहिली नव्हती. गावागावातलं एकूण सांस्कृतिक वातावरण अधिक विकसित करण्यात, माणसामाणसांना जोडण्यात ‘हाय कल्चर’ आणि ‘लो कल्चर’ यातील भेदाभेद कमी करण्यात या स्पर्धेनं मोलाची मदत केली. बाहेरगावचे कितीतरी उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, तंत्रज्ञ या स्पर्धेनं मराठी रंगभूमीला बहाल केले. या योगदानावर पुढची अनेक र्वष मराठी रंगभूमी पोसली गेली आणि नवनवे उन्मेष प्रकट करत राहिली.

आजूबाजूच्या बदललेल्या परिस्थितीनुसार स्पर्धेचं स्वरूप आमूलाग्र बदललं असतं, गावागावातून निर्माण झालेलं नाटकवेड पूर्वीसारखंच प्रवाही ठेवण्यात संयोजक यशस्वी झाले असते, तर राज्यनाटय़स्पर्धेची आज जी दयनीय अवस्था झाली, ती झाली नसती. केवळ स्मरणरंजनात आनंद मानण्याची पाळी आली नसती!

( राज्य नाटय़ स्पर्धेतील परीक्षकाची जबाबदारी पार पाडत असतानाच मी स्पर्धक संस्थांशी सुसंवाद साधत असे. माझ्या स्मरणवहीतील त्यांच्या कथनाच्या नोंदीवरूनच हा लेख तयार केला आहे. मुंबई, पुण्याबाहेरच्या कालच्या स्पर्धेचं ते वास्तव दर्शन आहे.)