मराठी रंगभूमीवरील पहिली कृष्णसुखात्मिका (ब्लॅक कॉमेडी) राज्य नाटय़स्पर्धेने दिली ते साल होतं १९७४! सतीश आळेकरांच्या ‘महानिर्वाण’ या नाटकानं या वर्षी एका नवीन आणि वेगळ्याच नाटय़प्रकाराची मुहूर्तमेढ रोवली. हिंदू धार्मिक कर्मकांडातील अंधारा पोकळपणा हे नाटक व्यक्त करतं. या कर्मकांडात माणूस घुसमटला जातो. त्या निर्थकतेतून बाहेर पडण्याची त्याची खटपट कशी हास्यास्पद होते, याचं तिरप्या शैलीत उपरोधपूर्ण केलेलं चित्रण म्हणजेच ‘महानिर्वाण.’ या वर्षीचे आणखीन एक महत्त्वाचं नाटक म्हणजे रत्नाकर मतकरीलिखित ‘आरण्यक’! मुक्तछंदातलं हे नाटक ग्रीक ट्रॅजेडीच्या स्वरूपातलं होतं. भारतीय युद्धानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर वानप्रस्थाश्रमात जातात. या वृद्धांच्या शोकात्म मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न या नाटकानं केला होता.
पुण्याच्या ‘महाराष्ट्र कलोपासक’ या संस्थेनं राज्य नाटय़स्पर्धेत पुन्हा बाजी मारली ती १९७१ साली. नाटक होतं चिं. त्र्यं. खानोलकरांचं ‘कालाय् तस्मै नम:’! भविष्यकथन आणि नियती यांच्या संघर्षांवर आधारलेल्या या नाटकानं त्या वर्षी प्रेक्षकांची जबरदस्त पकड घेतली होती. पडदा उघडल्यानंतर घडणारं एका आलिशान चौसोपी वाडय़ाचं दर्शन तर लाजवाबच होतं. दिग्दर्शक राजा नातू यांनी त्या वाडय़ाच्या कोपऱ्या न् कोपऱ्याचा असा काही वापर करून घेतला होता, की केवळ लक्षणीय नेपथ्य एवढाच विशेष न राहता त्या नाटकाचं नेपथ्य हे त्यातलं एक पात्रच झालं होतं. त्यामुळे वाडय़ात घडणाऱ्या नाटय़मय घटना अधिकच गडद झाल्या. भविष्यकथनाच्या कैचीत सापडलेल्या शकूच्या विविध मनोव्यापारांचं जे दर्शन योगिनी बेदरकरनं त्यात घडवलं होतं, ते अविस्मरणीयच होतं. (ही गुणी कलावती त्यानंतर प्रकर्षांनं कुठल्या नाटकात दिसल्याचं स्मरत नाही.) अभिनयाच्या रौप्यपदकानं तिच्या गुणवत्तेला योग्य ती दादही दिली. राजा नातूंना दिग्दर्शनाचं दुसरं पारितोषिक मिळालं, तर चिं. त्र्यं. खानोलकरांना लेखनाचं पहिलं पारितोषिक प्राप्त झालं. याच नाटकावर आधारीत ‘अनकही’ नावाचा चित्रपट नंतर अमोल पालेकर आणि जयंत धर्माधिकारी यांनी तयार केला होता.
‘विजय तेंडुलकर’ हे नाव आणि राज्य नाटय़स्पर्धा यांचा बहुधा छत्तीसचा आकडा असावा. ‘शांतता कोर्ट चालू आहे!’सारखं राष्ट्रीय गुणवत्ता लाभलेलं नाटक राज्य नाटय़स्पर्धेच्या  गुणवत्ता यादीतून साफच वगळलं गेलं. लेखनाला, प्रयोगाला, संस्थेला तर पारितोषिक मिळालं नाहीच; पण बेणारेबाईंची अप्रतिम भूमिका करणाऱ्या सुलभा देशपांडे यांनाही वैयक्तिक पारितोषिक देण्यास स्पर्धा कचरली. स्पर्धेचा इतिहास ज्ञात नसणाऱ्यांना ‘शांतता’चा प्रयोग स्पर्धेत झालाच नाही असं या निकालामुळे वाटलं असेल.
१९७२ सालच्या स्पर्धेत जगद्विख्यात ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा प्रयोग झाला. या नाटकावर आजवर बरंच काही लिहिलं गेलं आहे, पण ते सर्व समीक्षणात्मक लेखन प्रयोगाविषयीचं आहे. खळबळ निर्माण करणारे नाटककार म्हणून तेंडुलकरांबद्दल जी कुजबूज होती ती ‘घाशीराम’ नाटकापासून उघड आणि आवाजी झाली. पण स्पर्धेतल्या परीक्षकांत वादंग झाला तो मुळातच ‘हे नाटक आहे की नाही?’ याच प्रश्नावरून!
बरोबरच आहे. ज्यात तीन अंकांत सांगितलेली गोष्ट नाही, अनपेक्षित धक्के नाहीत, वळणं नाहीत, सुभाषितवजा वाक्यं नाहीत, डोळ्यांत भरणारं नेपथ्य नाही अशा संहितेला नाटक तरी कसं म्हणायचं? कीर्तन, खेळे, दशावतार, लावणी, कव्वाली अशा कितीतरी लोककलाप्रकाराचं ते कडबोळं आहे. त्याला नाटक कसं म्हणायचं? परंपरेच्या सगळ्या चौकटी मोडणारं आणि वहिवाट सोडून भलत्याच वाटेला जाणाऱ्या या सादरीकरणाला नाटक कसं म्हणायचं? बरं, हे कमी पडलं म्हणून की काय, नाटकाचा चरित्रनायक पेशवाईतील थोर मुत्सद्दी नाना फडणवीस यांच्या काळ्या कृत्यांचंच दर्शन दाखवणारं नाटक! त्यातही अखिल ब्राह्मणवर्गाचीच चेष्टा! उदात्त, मंगल, टाळ्या वाजवायला देणारे असे आदरयुक्त काहीही नाही. मग याला नाटक तरी का म्हणावं? परीक्षकांच्या डोक्यात असेच काहीसे विचार आले असणार! परंपरावादी मुळातच या नाटकाला खुडून काढण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना सत्ताधारी पक्ष, दडपशाही, सुप्रतिष्ठांची लाचारी आणि लोकांना चेतवून आपलं आसन स्थिर करण्याची वृत्ती या सगळ्या विशेषांचा लोककलेच्या व इतिहासाच्या माध्यमातून केलेला प्रतीकात्मक वापर- हे सारं परीक्षकांच्या गावीही नव्हतं. एका विशिष्ट काळातल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा छेदच नाटककार आपल्यापुढे ठेवत आहे याचं आकलन तर त्यांना झालं नव्हतंच; पण सादरीकरणाच्या पद्धतीत ‘टोटल थिएटर’ नावाची काही पद्धत असते हेही त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे ‘घाशीराम’ हे नाटकच आहे का? या अप्रबुद्ध प्रश्नाने ही मंडळी ‘घाशीराम’ची स्पर्धेतून हकालपट्टी करण्याच्या प्रयत्नात होती. पण मुळात नाटकाची ताकद, त्याच्या सादरीकरणातील सफाई, त्यातली दृश्यात्मकता व कलात्मकता आणि देहबोलीतून प्रकट होणारी अभिनयशक्ती एवढी जबरदस्त होती, की आकाशातून कुणी पडला असता तरी स्पर्धेतील लक्षणीय गुणवत्तेतून ‘घाशीराम’ला वगळणं त्याला शक्य झालं नसतं. परीक्षकांच्या दीर्घकाळच्या वादावादीनंतर हे नाटक अंतिम स्पर्धेसाठी पाठविण्यात आलं आणि तिथंही या नाटकाला दुसरं पारितोषिक देण्यात आलं. (पहिल्या बक्षिसाचं मानकरी ठरलं विजय बोंद्रे दिग्दर्शित ‘मेन विदाऊट श्ॉडोज’ हे अनुवादित नाटक. मूळ लेखक- सात्र्) लेखक विजय तेंडुलकरांना पारितोषिकापासून दूर ठेवून नाटकावरील रागाचं उट्टं परीक्षकांनी लेखनावर काढलं. त्या वर्षी लेखनाची पारितोषिके रत्नाकर मतकरी (‘प्रेमकहाणी’), श्याम फडके (‘अध्र्याच्या शोधात दोन’) आणि दत्ता खेबुडकर (‘या नावेला हवे सुकाणू’) यांना मिळाली.
मराठी रंगभूमीवरील पहिली कृष्णसुखात्मिका (ब्लॅक कॉमेडी) या स्पर्धेने दिली ते साल होतं १९७४! सतीश आळेकरांच्या ‘महानिर्वाण’ या नाटकानं या वर्षी एका नवीन आणि वेगळ्याच नाटय़प्रकाराची मुहूर्तमेढ रोवली. हिंदू धार्मिक कर्मकांडातील अंधारा पोकळपणा हे नाटक व्यक्त करतं. या कर्मकांडात माणूस घुसमटला जातो. त्या निर्थकतेतून बाहेर पडण्याची त्याची खटपट कशी हास्यास्पद होते, याचं तिरप्या शैलीत उपरोधपूर्ण केलेलं चित्रण म्हणजेच ‘महानिर्वाण.’ यातला नायक मृत ‘भाऊराव’ आहे. त्याचा मृतदेह तिथंच आहे. आणि तरीही तो जिवंत होऊन आपल्याच मरणाचे आख्यान (कीर्तन) लावतो. त्याचं हे जिवंत होणं ही रंगमंचीय युक्ती नव्हे. हिंदू कल्पनेनुसार मृतासंबंधीचे सर्व प्रकारचे तेराव्यापर्यंत चालणारे अंत्यविधी पूर्ण केल्याखेरीज मृत व्यक्ती खऱ्या अर्थाने देहमुक्त होत नाही. त्यामुळेच मृत भाऊराव ‘जिवंत’ होऊन आपल्याच गतआयुष्याकडे पाहतात यात काही विसंगत वाटत नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे १३ व्या दिवसांपर्यंत त्यांचे अग्निसंस्कार लांबणीवर पडतात. मृत झालेल्या दिवसापासून १३ व्या दिवसापर्यंतचा प्रवास म्हणजेच निर्वाणाचे महानिर्वाण! हे नाटक केवळ कृष्णसुखात्मिकाच नाही, तर विधीनाटय़ही आहे. मृत्यूनंतर होणाऱ्या वेगवेगळ्या विधींचे विडंबन या नाटकाला वेगळेच परिमाण देते. ताटी रंगीबेरंगी फुग्यांनी सजविणे, एका विशिष्ट तालातच पात्रांची हालचाल होणे, स्मशानातील पिंडासाठी भांडणाऱ्या कावळ्यांचं मानवीकरण करणे आणि आटय़ापाटय़ा खेळणारा भाऊरावांचा मुलगा नाना- तसाच आटापाटय़ा खेळल्यासारखाच घरात प्रवेश करतो.. या सर्वातून आळेकरांची विशिष्ट दिग्दर्शनशैली व कर्मकांडांतील हास्यास्पदता प्रकट करण्याची समर्थता लक्षात येते. पतीच्या निधनानंतर तिच्या मनात उमटणारे डावीकडून तिसऱ्या पुरुषाचे रुबाबदार चित्र हा तर नाटकातील प्रतीकात्मकतेचा उच्चांकच आहे. आळेकरांनी एकूणच प्रयोगाची जी लय ठेवली होती, मुक्त अवकाशाचा जो वापर केला होता आणि लोककलांचे जे फ्युजन केले होते- त्याला तोडच नाही. चंद्रकांत काळेंचा (भाऊराव) व सतीश आळेकर (नाना) यांचा अभिनय, रमेश मेढेकर व सुरेश बसाळे यांचा स्मशानातला प्रसंग, ताटी सजवतानाचा समूहाचा लयबद्ध नृत्याविष्कार हे सारे चार दशकांपूर्वीचे मंचीय घटित कालच पाहिल्यासारखे आजही डोळ्यांसमोर उभे राहते. चारएक वर्षांपूर्वी या नाटकाचे मूळ संचात झालेले सर्व प्रयोग हाऊसफुल्ल गेले. ‘महानिर्वाण’ नाटक अक्षय आहे हेच या घटनेनं पटवून दिलं. मरणावरचं (मरणविधींवरचं) हे नाटक अमर आहे यात शंकाच नाही.
‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक म्हणजे एक रंगसोहळा होता. ते अधिक रंजक, नेत्रसुखद व श्रुतीमधुर होते. तर ‘महानिर्वाण’ हसवता हसवता काळजावर चरा उमटवते.. अस्वस्थ करते. म्हणूनच ते अक्षय आहे. राज्य नाटय़स्पर्धेनं मराठी रंगभूमीला दिलेले ते एक महत्त्वाचे योगदान आहे. त्यावर्षीच्या नाटय़स्पर्धेत ‘महानिर्वाण’ला नाटय़निर्मितीचे दुसरे पारितोषिक मिळाले. (पहिले पारितोषिक ‘आविष्कार’च्या ‘चांगुणा’ला मिळाले.) सतीश आळेकर यांना लेखनाचे प्रथम पारितोषिक व दिग्दर्शनाचे तिसरे पारितोषिक मिळाले. चंद्रकांत काळे यांनी संगीत दिग्दर्शनाचे व अभिनयाचे पारितोषिक मिळवले. ‘महानिर्वाण’ पाच पारितोषिकांचे मानकरी ठरले.
‘महानिर्वाण’ नाटकाचे इंग्रजी, कन्नड, कोंकणी, गुजराती, डोग्री, पंजाबी, बंगाली, राजस्थानी व हिंदी अशा नऊ भाषांमध्ये अनुवाद झाले असून, त्यांचे प्रयोगही झाले आहेत. इंग्रजी भाषांतराचे शीर्षक ‘द ड्रेड डिपारचर’ असे असून, गुजरातीचे ‘ताथैया’, तर हिंदीचे ‘आझादी लाश की’ अशी शीर्षके आहेत. अन्य अनुवाद मूळ शीर्षकानेच झाले आहेत.
त्यावर्षीचे आणखीन एक महत्त्वाचे नाटक म्हणजे रत्नाकर मतकरीलिखित ‘आरण्यक.’ मुक्तछंदातले हे नाटक ग्रीक ट्रॅजेडीच्या स्वरूपातले होते. तोपर्यंतच्या मराठी रंगभूमीवरील पौराणिक पारंपरिकतेला आणि झममगाटाला या नाटकाने छेद दिला. भारतीय युद्धानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर वानप्रस्थाश्रमात जातात. या वृद्धांच्या मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न हे नाटक करते. काटकसर हे नाटय़लेखनतंत्राचं आवश्यक अंग आहे. (व्यक्तिरेखा जिवंत करण्याचं सामथ्र्य नसलेले अलीकडचे काही नाटककार रंगमंचावर अनाठायी गर्दी निर्माण करून नाटय़ निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात.) पाच पांडवांऐवजी ‘आरण्यक’मध्ये फक्त युधिष्ठिर आहे. कृष्णाचं अस्तित्व अन् अंत केवळ बासरीवादनातून प्रकट केला होता.
यात महाभारतकालीन भव्यता भिंती वा खांबांनी निर्माण न करता नेपथ्यात अधिकाधिक मोकळ्या अवकाशाला स्थान दिले होते. (महाभारताचीही अखेर उजाडच होती. त्यामुळे हा मोकळा अवकाश नाटय़ानुकूल वातावरणाला पोषक ठरला.) एकूण नेपथ्याची रचना होमकुंडवत होती. तीन बाजूंनी चढत जाणाऱ्या पायऱ्या व व्यक्तिरेखांच्या प्रसंगातील स्थानानुसार त्या पायऱ्यांचा केलेला वापर लक्षणीय होता. भ्रमिष्ट विदुर डोंगर चढतो व युधिष्ठिर त्याच्यापाठोपाठ एकामागोमाग पातळ्या चढत जातो- या दृश्याने सूचकता व परिणामकारकता ही दोन्ही वैशिष्टय़े अधोरेखित केली होती. (नेपथ्यनिर्माण- शशांक वैद्य) वेशभूषा, संगीत, प्रकाशयोजना, अभिनय व दिग्दर्शन या सर्वच बाबतींत उजव्या ठरलेल्या या नाटकाला दुसरे पारितोषिक (‘महानिर्वाण’बरोबर विभागून) मिळाले आणि ‘आविष्कार’च्या ‘चांगुणा’ या लोर्काच्या अनुवादित नाटकाला पहिले पारितोषिक दिले गेले. मुक्तछंद व महाभारताची कथा एवढय़ापुरतेच ‘आरण्यक’चे धर्मवीर भारती यांच्या ‘अंधायुग’ या नाटकाशी साम्य आहे. ‘अंधायुग’चा विषय अश्वत्थाम्याचा सूड हा आहे. पाश्र्वभूमी आहे भारतीय युद्धाच्या अखेरच्या दिवसाची. ‘आरण्यक’मध्ये युद्ध संपलेलं आहे आणि सर्वस्व गमावलेल्या वृद्धांची व्यथा हा त्याचा विषय आहे.
‘आरण्यक’ नाटकाच्या आजतागायत चार आवृत्त्या निघाल्या असून मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही या नाटकाचा समावेश केला गेला होता. गुजरातीत या नाटकाचा अनुवाद ‘वनप्रस्थान’ या नावानं झाला आहे. मराठी पुस्तकाला दुर्गा भागवत यांची प्रस्तावना लाभली आहे. राज्य नाटय़स्पर्धेच्या प्रयोगात वसंत सोमण (प्रतिहारी), दिलीप प्रभावळकर (विदुर), रवी पटवर्धन (धृतराष्ट्र), लक्ष्मी पेंढारकर (कुंती), प्रदीप भिडे (युधिष्ठिर), भारत तांडेल (युयुत्सु), प्रतिभा मतकरी (गांधारी), वामन परांजपे (व्याध) या कलावंतांचा सहभाग होता. रवी पटवर्धन यांना या स्पर्धेत धृतराष्ट्राच्या भूमिकेसाठी वैयक्तिक अभिनयाचे रौप्यपदक प्राप्त झाले.
चौऱ्याहत्तर सालच्या स्पर्धेनं एक कृष्णसुखात्मिका दिली आणि एक शोकात्मिका ‘कृष्ण’विना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा