अलीकडेच मध्य प्रदेशातील कान्हा व पेंचच्या जंगलात गेलो होतो. पेंचमध्ये फेरफटका मारताना एक अतिशय रोमांचक घटना घडली. सुमारे २०० चितळांचा एक कळप वाटेत चरत होता. इतक्यात एक वाघीण कळपातून आली. पण तिने त्यांच्याकडे पाहिलेही नाही. ती आपल्याच नादात चालत सरळ आमच्या दिशेने आली आणि जंगलात लुप्त झाली! क्षणभर आम्ही थक्क होऊन पाहत राहिलो. इतके, की कॅमेऱ्याने फोटो घेण्याचेही विसरून गेलो. भानावर आल्यावर जमेल तितकी छायाचित्रे घेतली. रूमवर परतल्यानंतर छायाचित्रे पाहिली. वाघीण चितळांच्या कळपाला ओलांडून जातानाचे छायाचित्र मला मिळाले होते. त्याला मथळाही सुचला- ‘मी माझ्या गरजांसाठी जगते.. हव्यासासाठी नाही.’ वाघिणीचे पोट भरलेले
होते. त्यामुळे तिला उगीच हरणांना मारण्यात रस नव्हता.
इथेच निसर्गातील प्राणी मानवापेक्षा वेगळे ठरतात. आपण अन्न व पशामागे लागतो. आपला हव्यास कधीच संपत नाही. तर वाघासारख्या हिंस्र श्वापदालासुद्धा केवळ भूक भागणे महत्त्वाचे वाटते. मी ही छायाचित्रे सँक्च्युरी एशियाच्या फेसबुक पेजवर टाकली. त्याला प्रतिक्रियांद्वारे प्रचंड प्रतिसाद मिळाला. सँक्च्युरी एशियाचे फेसबुक पेज वेळ घालवण्यासाठी वा मजा म्हणून तयार करण्यात आलेले नाही. वन्यजीवनातील दुर्मीळ क्षण, वन्यजीवन संरक्षण क्षेत्रातील ज्येष्ठांशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे व्यासपीठ आहे.
जंगलच्या प्रत्येक भेटीत काहीतरी वेगळं पाहायला, अनुभवायाला मिळतं. त्यामुळे प्रत्येक जंगलभेट अविस्मरणीयच ठरते. अगदी एखादा लहानसा कीटक किंवा एखादे जंगली फूलही सुंदर आस्वादानुभव देते. असे उत्कट अनुभव इतरांशी वाटून घेतल्याने त्यांच्यातही जंगलाविषयीची जागरूकता निर्माण होते. अशा अनुभवांतूनच आपल्याला निसर्ग व त्याच्या वर्तनाविषयी माहिती मिळते.
अशा प्रकारची दुर्मीळ दृश्ये जंगलात सतत वावर असणाऱ्यांना कधी ना कधी दिसत असतातच. कारण जंगलात  काही ना काही सतत घडतच असते. जंगलात जाणाऱ्यांना एक प्रश्न नेहमी विचारला जातो की, ‘तिथे असे काय आहे ज्यामुळे तुम्ही वारंवार जाता?’’ त्याचे उत्तर : आम्ही दरवेळी काहीतरी नवीन अनुभव घेऊन येतो. आम्ही जेव्हा जंगलात प्रवेश करतो तेव्हा काय अनुभव घेऊन परतणार आहोत हे माहिती नसते. माहीत नसलेले जाणून घेण्याची ही प्रबळ भावनाच आम्हाला जंगलात वारंवार खेचून आणते.  केवळ जंगलाचे सौंदर्य न्याहाळणेच महत्त्वाचे नसते, तर त्याच्याबाबतीत आपली जबाबदारी त्याहून कित्येक पटींनी मोठी आहे. आमचा संजीवनी ग्रुप वन्यजीव संरक्षणातील आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असतो. अशाच एका कार्यक्रमात कान्हातील शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळेचे दप्तर व पाण्याची बाटली असे दीडशे संच आम्ही वाटले. यातली बहुतेक मुले अभयारण्यात काम करणाऱ्या स्थानिक वाटाडय़ांची तसेच बगा आदिवासींची होती. तिथे शाळेत जाणाऱ्या अनेक मुलांनी कधी दप्तरही पाहिलेले नाही! जंगलांचे संरक्षण आणि त्याची निगा राखणाऱ्यांना मदत करणे ही केवळ वनविभागाची जबाबदारी नाही, ती आपणा सर्वाची आहे. आपणापैकी कोण कधी वन्यजीव संरक्षक बनेल सांगता येत नाही. कारण ती एक मन:स्थिती आहे; ते पद नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा