प्रत्येक पिढीने आधीच्या पिढीची असुरक्षितता, भय, न्यूनगंड पुढे आपल्या अंगावर घेऊन वागवत बसण्याची सक्ती कोणत्याही सुसंस्कृत समाजात नसते. त्याचप्रमाणे आपली आदर्श मूल्येसुद्धा पुढील पिढीवर कोणत्याही पिढीने लादता कामा नयेत. काळ फार वेगाने बदलत असतो आणि मूल्यव्यवस्था ही कालसापेक्ष असते. आपल्याला ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि सर्वात अग्रक्रमी असाव्यात असे वाटते, त्या अतिशय साहजिकपणे पुढील पिढीला बिनमहत्त्वाच्या आणि संपूर्ण कंटाळवाण्या वाटणे, हे नुसते साहजिकच नाही, तर चांगलेच आहे. भारतीय स्त्रीवाद ही यापैकी अशी एक गोष्ट आहे- जी पुन्हा शिवायला  झाली आहे, कारण जुनी आता होत नाही.

मी निर्णय न घेणाऱ्या आणि दुसऱ्याच्या कष्टांवर किंवा नुसतेच नवऱ्याच्या कमाईवर आयुष्य काढणाऱ्या बायका घरीही पाहिल्या नाहीत आणि आजूबाजूच्या समाजातही नाही. मी ज्या वातावरणात आणि आर्थिक व सामाजिक संस्कृतीत वाढलो त्यात बायका पैसे कमवायला घराबाहेर पडत होत्या. असे करताना त्या आत्मसन्मानाची किंवा समतेची पावडर तोंडाला लावून कोणत्याही चळवळीची जाहिरात करीत नव्हत्या. त्यांना पुस्तकी आणि प्राध्यापकी विचारांच्या बडबडी ऐकायला किंवा सभांना जायला वेळ नव्हता. याचे सोपे कारण- त्यांना घर चालवायचे होते आणि कुटुंब पोसायचे होते. पूर्णवेळ गृहिणी म्हणून घरी बसून स्वत:च्या सुखाची किंवा दु:खाची अंडी उबवत बसणाऱ्या बायका प्राणिसंग्रहालयात पाहायला जावे तशा दुर्मीळ असत. किंवा त्या खूप श्रीमंत अशा व्यापारीवर्गात असत; जिथे दागिने मिरवून घराण्याची श्रीमंती दाखवणे आणि वारस पैदा करून व्यापारउदीमाला घरचे मनुष्यबळ पुरवणे अशी कामे त्या करीत. माझ्या आजूबाजूला जगणाऱ्या बायका नोकऱ्या आणि विविध व्यवसाय करून पैसे कमावत होत्या. त्यांना तसे केल्याशिवाय पर्याय नसे. आणि हे सगळे मी स्त्रीवादी पंडित असलेल्या माणसांना भेटण्याआधीच माझ्या आयुष्यात चालू होते.

Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!
alyse ogletree, Breast Milk , newborn baby
अमृततुल्य आईच्या दुधाचे दान करणारी ॲलिसे
Pink Rickshaw , Pink Rickshaw Women Maharashtra ,
नवीन वर्षात महिलांना ‘गुलाबी रिक्षा’ मिळणार, राज्यभरातून कसा आहे प्रतिसाद?
aata thambaych nahi, Mumbai municipal corporation,
‘आता थांबायचं नाय’, रात्रशाळेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या कामगारांच्या यशाची कहाणी रुपेरी पडद्यावर
Women jewelery theft Alandi, Women jewelery Alandi,
पुणे : दुचाकीवरील महिलेकडील चार लाखांचे दागिने चोरले, आळंदी रस्त्यावरील घटना

स्वत:ला स्त्रीवादी  म्हणवून घेऊन पुस्तकी पांडित्य दाखवून ‘स्त्रीचा आत्मसन्मान, तिचे आर्थिक स्वातंत्र्य’ अशी काही बडबड करणारी माणसे माझ्या आयुष्यात जमू लागली तेव्हा मला लक्षात आले की आपण स्त्रीवादी, पर्यावरणवादी, गांधीवादी, समाजवादी असल्या अनेकविध वादी काळाच्या पुढच्या काळात जन्माला आलो आहोत. आपण भांडवलवादाच्या उभारणीच्या उंबरठय़ावर उभे आहोत. आपल्याला समता आणि बंधुभावाने नोकऱ्या आणि संधी मिळणार नाहीत. ही सगळी माणसे अजूनही साठ-सत्तर सालातील पुस्तकी बडबड करीत आहेत. आणि ही स्त्रीवादी माणसे जे बोलत आहेत, त्यांचे म्हणणे ऐकायला आपल्या आया-बहिणींना वेळ नाही. कारण ही माणसे पुस्तकी बडबड आणि सभापांडित्य दाखवण्यापलीकडे कुणाचेही काहीही ठोसपणे भले करणार नाहीत.

‘आपण आपले काम करावे आणि पैसे कमावून घर चालवावे. वेळ पडली तर भांडावे, रडावे, एकमेकांना सोबत द्यावी, नाही तर सोडावे आणि आपली वाट ओळखून चालू लागावे..’ हे शिकायला आपल्या घरातील आयांना आणि मुलींना या मास्तरकी करणाऱ्या विद्यापीठातील हुश्शार बायांची मुळीच गरज नाही. कारण आदर्शवादी आणि समतेचे परिपूर्ण आयुष्य जगणे ही एक विनोदी आणि परीकल्पनेतली गोष्ट आहे. हे सत्य या विदुषी बायांना कळले असले तरी त्या ते मान्य करणार नाहीत. कारण समता आणि स्वातंत्र्य याविषयी खूप बोलत राहणे आणि लिहीत राहणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. आपल्या नाही. आपल्याला जगायचे आहे.

मी माझ्या आजूबाजूला ज्या माणसांमध्ये तरुणपणात वावरलो ती माणसे स्त्रीवादी म्हणवून घेत होती, पण ती स्वत: स्त्रीवादाचा  मूर्तिमंत पराभव होती, हे आताशा जेव्हा सावकाश लक्षात यायला लागले तेव्हा माझा माझ्या जाणिवांवरील विश्वास शांतपणे पक्का होत गेला. ज्या जाणिवेला मी माझ्या उमेदीच्या काळात प्रश्न विचारत होतो, ती जाणीव. प्रश्न हा होता, की स्त्रीचे इतके मोठय़ा प्रमाणावर ग्लोरिफिकेशन करणाऱ्या या माणसांना आपण काही चूक करतो आहोत हे लक्षात येत नाही का? स्त्रीवादाचे स्वरूप आणि म्हणणे हे पुरुष कसे दुबळे आणि भ्रष्ट आहेत, हे दाखवणे आहे का? ‘समानता हे मूल्य पाळू या’ असे म्हणणाऱ्या कोणत्या व्यक्ती स्वत:च्या वैयक्तिक आणि राजकीय परिघात ते स्वत: पाळताना दिसतात? स्त्रीला देव्हाऱ्यात बसवून ठेवण्याचे काम जितके पारंपरिक समाजव्यवस्थेत केले जाते त्यापेक्षा जास्त प्रमाणात हे समाजसंशोधक म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील स्त्रीवादी लोक करीत नाहीत का? आणि या माणसांच्या नीतिमत्तेला आणि विचारप्रक्रियेला कोणत्याही प्रकारची कालसापेक्षता आहे किंवा नाही?

मूळ चिनी जेवण आणि भारतीय चिनी जेवण यात जसा जमीन-अस्मानाचा फरक असतो, तसेच बहुधा स्त्रीवाद आणि महाराष्ट्रातील अभ्यासाचा स्त्रीवाद यांच्यात असावा. महाराष्ट्रात शिवसैनिकांइतके संवेदनशील असे दुसरे फक्त स्त्रीवादी लोक असतात. जरा काही बोलले की दुखावून ते उलटे चालून येतात आणि प्रश्न म्हणून विचारू देत नाहीत, हे मला सावकाश लक्षात आले. आपण ज्या माणसांमध्ये तरुणपणी वावरलो त्यांच्या वैचारिक जाणिवेत त्रुटी होत्या आणि वैयक्तिक आयुष्याचे निर्णय आणि पुस्तकी विचारसरणी यांत फार मोठी तफावत होती. म्हणूनच आपला चळवळी आणि कार्यकर्त्यांकडे पाहायचा दृष्टिकोन संपूर्ण काळवंडून गेला की काय अशी जाणीव मला गेल्या काही वर्षांत प्रकर्षांने होऊ लागली आहे. या जाणिवेतून मी माझ्या घरातील आणि कुटुंबातील आजूबाजूच्या स्त्रियांकडे पुन्हा एकदा डोळे उघडून संवेदनशीलतेने पाहू लागलो. ज्या संवेदनशीलतेची त्यांना गरज होती; पुस्तकी स्त्रीवादाला नाही.

मला हे लक्षात आले की माझ्या घरातील अतिशय तरुण अशा पुढील पिढीतील मुलींना आधीच्या पिढीची भाषाच कळत नाही. त्या मुली आणि मुले जास्त सोपे आणि वेगवान आयुष्य जगतात. ती मुले नाती तयार करताना तुमच्या परवानग्या मागायला येत नाहीत आणि नात्यातील ताणेबाणे कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर दर्शवत बसत नाहीत. त्यांच्या मनात आणि त्यांच्या खाजगी आयुष्यात काय चालले आहे हे समजणे आणि त्यावरून अनुमान काढणे अजिबातच सोपे नसते. ज्या व्यक्ती स्वत: पैसे कमावून स्वत:ला पोसत नाहीत किंवा कोणतेही काम करत नाहीत त्यांना कोणतीही सहानुभूती किंवा कोणताही खोटा आदर हा नवीन माणसांचा समाज देत नाही. त्यामुळे ज्या बायका अजूनही काही काम न करता किंवा स्वत:चे डोके आणि शरीर न चालवता घरी बसून असतात त्यांना या आणि यापुढील समाजरचनेत कोणतीही ठरावीक जागा असणार नाही. घरकाम नावाच्या मूल्याचे जे गरजेपेक्षा जास्त भांडवल स्त्रीवादी माणसांनी आणि मठ्ठ कौटुंबिक बायकांनी करून ठेवले आहे, त्या घरकामाला आणि त्यासाठी केलेल्या त्यागाला कोणतीही किंमत पुढची पिढी देणार नाही. आजचा काळ हा कोणतीही सेवा सहजपणे त्याचे मूल्य मोजून मिळवण्याचा काळ आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या आता सेवाक्षेत्रात मिळणाऱ्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या तीन गोष्टी आहेत. आईची माया, तिचा त्याग, तिच्याच हातची चव असल्या कोणत्याही आपल्या मनातील उत्कट भावनेला अठरा वर्षांनंतरची पिढी फार जागा देत बसणार नाही. त्याचे महत्त्व ती विसरणार नाही, पण ती पिढी त्या भावनांच्या कथा आणि त्यांची गाणी तयार करणार नाही.

यापुढील काळ हा स्थलांतरप्रिय समाजाचा काळ असणार आहे. आणि त्यामुळे पारंपरिक चिकट आठवणी आणि मूल्यव्यवस्थेतून पुढील पिढी फार शिताफीने स्वत:ची सुटका करेल. ती पारंपरिक जगणे जगेल, सणवार आणि खाणेपिणे साजरे करेल, धोतर आणि नऊवारी साडय़ा नेसून फिरेल; पण सोमवार सकाळ उजाडताच ती पिढी कुणाचीही नसेल. त्या पिढीला लिंग नाही. ती पिढी हे फक्त मनुष्यबळ आहे. स्त्री आणि पुरुष असे भेद कष्टाला उरणार नाहीत इतके एकसारखे आणि प्रचंड ताणाचे काम मनुष्यबळ म्हणून ती पिढी करेल.

काहीही न करता घरी बसून सर्वाच्या आयुष्यात प्रमाणाबाहेर ढवळाढवळ करून घरातल्या माणसांची आयुष्ये नासवणाऱ्या अनेक बायका मी आयुष्यात पाहिल्या आणि अनुभवल्या. त्यांचा पराभव येणारा काळ करेल या जाणिवेने मला अतिशय आनंद होतो. आणि असा आनंद होतो हे सांगायला मला आता संकोच वाटत नाही. कारण मला स्त्री आणि पुरुष यांच्यातील सैतानस्वरूपात भेद दिसत नाही. मला त्यात समता दिसते. ‘साध्याभोळ्या आणि पारंपरिक घरातील बिचाऱ्या स्त्रिया कशाला कुणाचे वाईट करतील?’ असे वाटणाऱ्या मला माझ्या आयुष्याने फार मोठा रंगीत सिनेमा दाखवत इथपर्यंत आणले आहे.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com

Story img Loader